दोन आई आणि दोन बाबा यांच्यात होणारा संघर्ष ‘बाबा’ या सिनेमाचा गाभा आहे!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘बाबा’चं पोस्टर
  • Sat , 03 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie बाबा Baba आर्यन मेंघजी Aaryan Menghji दीपक दोब्रियाल Deepak Dobriyal नंदिता पाटकर Nandita Patkar

लग्नाअगोदर गरोदर राहणाऱ्या एका उच्चभ्रू स्त्रीची हेळसांड होत असताना जन्माला आलेल्या बाळाला तिचे वडील समाजाच्या भीतीपोटी एका मूकबधीर जोडप्याला देऊन टाकतात. ते मूकबधीर जोडपं त्याचं पालनपोषण करतं. पुढे त्या उच्चभ्रू स्त्रीचं एका पुरुषाशी लग्न होतं. वडिलांच्या भीतीमुळे मातृत्वाची इच्छा मनातच नष्ट करू पाहणाऱ्या त्या स्त्रीला लग्नानंतर बाळ आपल्याकडं असावं, असं वाटायला लागतं. मात्र मूकबधीर जोडप्यासोबत वाढणाऱ्या त्या बाळाला कुठल्याच भाषेतील शब्द कानी न पडल्यामुळे भाषेची ओळखच होत नाही. त्यामुळे त्याच मूकबधीर जोडप्यासोबत त्याची नाळ जुळते. मात्र तिथून पुढे दोन आई आणि दोन बाबा यांच्यात होणारा संघर्ष ‘बाबा’ या सिनेमाचा गाभा आहे.

‘आई’ आणि ‘बाबा’ हे नुसती शब्द नाहीत. तो ममता आणि प्रेम यांचा कधीच न अटणारा झरा आहे. आई-बाबानामक झऱ्याचं सर्वस्व असतं ते त्यांचं मूल. पालकत्व हा स्त्री-पुरुष यांना समृद्ध करणारा धागा आहे. पण त्यातला आनंद उपभोगता येणं, तितकंसं सोपं नसतं. त्यातले चढउतार पेलता यायला लागतात. त्यातल्या जबाबदारीचं भान जोपासता यायला लागतं. अन्यथा जो गुंता निर्माण होतो, त्यातून भावनिक कोरडेपणाची उबग येते. या गुंत्यावर भाष्य करताना दिग्दर्शक राज गुप्ता यांनी भावनिक पातळीवर सिनेमाला चांगलंच खिळून ठेवलं आहे.

व्यक्त होण्यासाठी शब्द असावे लागतात, असा समज असणाऱ्याला सिनेमा वेगळ्या विश्वात घेऊन जातो. सिनेमातला शब्दाविना होणारा प्रत्येक संवाद एक नवीन भाषा आणि एक नातं निर्माण करतो. त्या भाषेला व्यावहारिक जगात मर्यादा असतीलही, पण भावनिक विश्वात जी भाषा आपली वाटते, त्याचे विविध पैलू उलगडून दाखवताना दिग्दर्शकानं कथेवर घेतलेली मेहनत पडद्यावर बहरत जाते. दिग्दर्शक राज गुप्ता यांनी कथेला सहज आणि मोहक पद्धतीनं गुंफलं आहे.

पडद्यावर चालणारा मूक अभिनय आपल्या अंतर्मनाची घुसमट करत राहतो. स्वतःच्या पातळीवर व्यक्त होण्याची एक छोटी संधी या शब्दाविना चालणाऱ्या संवादानं मिळत राहते. रक्ताची नाती ही संकल्पना इथं गळून पडते. एकमेकांना समजून घेण्याची पूर्वअट नात्यातला भावनिक ओलावा हीच असावी, असं वाटायला लावताना दिग्दर्शक मानवी प्रवृत्तीवर अचूक भाष्य करतो.

सिनेमा जसंजसा पुढे जातो, तसं भावनिकतेचं पारडं जड व्हायला लागतं. निरागस माणसं आणि त्याहून अधिक निरागस त्याची माणूसपणाची जाण, यांचा मिलाफ कथेला पूरक ठरतो. प्रत्येक पात्र आपली भूमिका बजावताना अधिक प्रभावी ठरतं. त्यामुळे कथेला हलकीशी चढलेली मरगळ अभिनयामुळे सहज दुर्लक्षित करता येते.

दीपक दोब्रियाल यांचा हा पहिला मराठी सिनेमा. मात्र बॉलीवूडचा अनुभव पाठीशी असल्यामुळे त्यांच्या अभिनयानं सिनेमाला डगमगू दिलं नाही. नंदिता पाटकर यांची दीर्घकाळानंतरची एंट्री तशी धमाकेदार आहे. या दोघांच्या अभिनयानं सिनेमाला अधिक फुलवलं आहे. चितरंजन गिरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, कैलास वाघमारे, जयवंत वाडकर या तगड्या कलाकारांनी आपापल्या भूमिका बखूबी केल्या आहेत. विशेष म्हणजे आर्यन मेंघजी या चिमुकल्यानं आपल्या निरागस अभिनयानं सिनेमाला चार चांद लावले आहेत.

सिनेमाचा पूर्वार्ध अधिक उत्साही आहे, तर उत्तरार्ध कथेला साजेसा आणि भावनाप्रधान आहे. मात्र सिनेमा अत्यंत संथगतीनं शेवटाकडे जाताना स्पष्ट होतो. त्यात ओढाताण जाणवत नाही. त्यामुळे तो मनोरंजक ठरतो. संवाद कमी आहेत, मात्र त्यामुळे सिनेमाची परिणामकारकता थोडीही कमी होत नाही. संगीत, पटकथा, तांत्रिक बाबी यामध्ये सिनेमा प्रभावी ठरतो. कॅमेरा अत्यंत नावीन्यपूर्ण शैलीनं हाताळला आहे. त्यामुळे पडद्यावर उभं राहणारं चित्र नेत्र सुखवणारं ठरतं. प्रत्येक अँगल अचूक टिपताना त्यातला नैसर्गिकपणा जिवंत ठेवण्याचं काम कॅमेऱ्यानं केलं आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्याचबरोबर मांडणी आणि एडिटिंगमुळे सिनेमा बहरत जातो.

सिनेमाची कथा खरं तर ९०च्या दशकातली आहे. त्यामुळे कथेच्या अनुषंगानं उभं राहणारं चित्र थोडं विसंगत वाटतं. मात्र कथा परिणामकारक ठरल्यानं कथेच्या ‘बॅकग्राउंड’वर होणाऱ्या थोड्याफार चुका क्षम्य ठरतात.

सिनेमाची कथा ‘बाबा’ची असली तरी त्या कथेला पुढे घेऊन जाणारे अनेक घटक एकत्र जुळवून आणण्यात दिग्दर्शकाला यश मिळालं आहे. त्यामुळे सिनेमात शब्दांचं मौन धरलं असलं तरी त्यातली भावनिक चढाओढ हृदयस्पर्शी आहे.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख