अजूनकाही
दिग्दर्शक श्रीराम राघवनन हा सध्या भारतात कार्यरत असलेल्या काही उत्तम चित्रपटकर्त्यांपैकी एक आहे. सोबतच तो निर्विवादपणे थरारपटांमधील मास्टर आहे. सुरुवातीलाच त्याचे आभार मानणारा ‘जजमेंटल हैं क्या’ हा चित्रपट थरारपट, आणि त्यातही पुन्हा मानसशास्त्रीय थरारपट अधिक ब्लॅक कॉमेडी अशा दोन्ही चित्रपट प्रकारांचं मिश्रण असलेला आहे. चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो, तसं हे निव्वळ आभार नसून या दिग्दर्शकाला दिलेली मानवंदना असल्याचं स्पष्ट होत जातं. त्यात निरनिराळे संदर्भ संवादांतून नव्हे, तर समोरील दृश्यचौकटींतून लागतील अशी राघवनची ट्रेडमार्क शैली दिसते. चित्रपटाचा स्कोअरसुद्धा राघवनच्या ‘जॉनी गद्दार’ आणि ‘अंधाधुन’चा संगीतकार असलेल्या डॅनियल बी. जॉर्जचा आहे. चित्रपटाचं अगदीच समर्पक आणि रूपकात्मक म्हणावंसं संकलनसुद्धा इथं आहे. एकूणच राघवन ज्या शैलीसाठी प्रसिद्ध झाला, त्या शैलीपासून प्रेरणा घेतल्याचे ठसे इथं दृकश्राव्य पातळीवर चित्रपटभर दिसतात. ज्यामुळे ‘जजमेंटल हैं क्या’चं जर थोडक्यात कौतुक करायचं झाल्यास, ‘तो राघवनने दिग्दर्शित न केलेला राघवनचा चित्रपट भासतो’, इतकं म्हणणं पुरेसं ठरेल!
चित्रपट सुरू होतो तो लहानग्या बॉबीच्या दृष्टिकोनातून. लहानपणी बॉबीला आपल्या आई-वडिलांचा मृत्यू होताना पाहावं लागतं. ते पचवण्यासाठी तिला पुढे जाऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अशातच पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर वर्तमानपत्रांची बहुतांशी खून-मृत्यूच्या बातम्यांची कात्रणं, त्या कात्रणांमधून बॉबीनं तयार केलेल्या ओरिगामी कलाकृती आणि इथूनतिथून झिरपणारं लालभडक रक्त यांचा समावेश असलेली श्रेयनामावली पाहून कुणालाही चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेची कल्पना यावी.
बॉबी (कंगना राणावत) डबिंग आर्टिस्ट असते. ती चित्रविचित्र बी-ग्रेड चित्रपटांचं डबिंग करते, नि अभिनय करण्याची इच्छा मनी बाळगून असल्याचे संकेत देणारे निरनिराळ्या वेषभूषांतील फोटो हौसेनं काढून घेत असते. तिचं काम निव्वळ अभिनेत्रींना आवाज देण्यापुरतं मर्यादित असतानाही ती समोरच्या पात्राच्या अंतरंगात घुसत, त्याच्याशी एकरूप होताना दिसते. तिच्या मनातील स्वतःची प्रतिमा तितक्याच स्वप्नवत दृश्यांतून आपल्याला वेळोवेळी दिसत राहते. एक सर्वस्वी भिन्न व्यक्ती बनण्याचा अनुभव ती यानिमित्तानं घेताना दिसते.
दरम्यान केशव (राजकुमार राव) आणि रीमा (अमायरा दस्तूर) हे तिच्या घरी भाडेकरू म्हणून रहायला येतात. आपल्या घरात इतर कुणी रहायला नको असं तिचं म्हणणं असतं, पण नाईलाजानं तिला आपल्या काकामुळे त्यांना राहू द्यावं लागलेलं असतं. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या बॉबीला केशवबाबत काहीतरी अस्वस्थ करणारं, काहीतरी काळंबेरं असल्याचं वाटू लागतं. या बाबींकडे सुरुवातीला दिसलेल्या, तिच्या लहानपणी मनावर बिंबवल्या गेलेल्या घटनेचे मानसशास्त्रीय परिणाम म्हणून पाहता येतं. अशा वेळी ‘दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता हैं’ गाण्यातील विशिष्ट ओळी विशिष्ट वेळा कशा वाजतात हे पहावं.
बॉबीच्या मनातील ही अस्वस्थता उत्तरोत्तर वाढत जाऊन तिचं त्यांच्यावर पाळत ठेवण्याचं प्रमाण वाढत जातं. अशातच अघटित घटना घडते नि तिचा संशय खरा असल्याचं वाटू लागतं. ती पोलिसांना केशव दोषी असल्याचं, तर तो बॉबी मूर्ख असल्याचं पटवून देऊ पाहतात. या प्रसंगांदरम्यान गडद छटा असणारा विनोद त्याच्या शिखरावर असतो. सतीश कौशिक आणि ब्रिजेंद्र काला या दोघांनी साकारलेले पोलीस अधिकारी या प्रसंगांना अधिक प्रभावी बनवतात.
प्रेक्षक म्हणून सुरुवातीपासूनच आपण सर्व चित्र बॉबीच्या दृष्टिकोनातून पाहत असल्यानं केशव दोषी असल्याची आपली जवळपास खात्री पटलेलीच असते. ज्याला कारणीभूत असलेली लेखक कनिका ढिल्लोन, दिग्दर्शक प्रकाश कोवेलमुदी आणि छायाचित्रकार पंकज कुमार यांची एकत्रित कामगिरी अनेक पातळ्यांवर एक उत्कृष्ट कलाकृती समोर आणते.
दृश्यं जणू भडक निऑन लाइट्सच्या प्रकाशात घडताहेत अशा तऱ्हेची सुंदर आणि तितकीच चतुराईनं केलेली दृश्यरचना आणि छायाचित्रणातून जणू केशवचं (बॉबीच्या दृष्टीने) दोषी असणं अधिकाधिक ठळकपणे अधोरेखित केलं जातं.
डॅनियल बी. जॉर्जचं पार्श्वसंगीत गडद, तीव्र आणि विनोदी छटांना अधिक नवे नि प्रभावी आयाम प्राप्त करून देतं. पूर्वार्धाच्या समाप्तीकडे जात असताना मात्र चित्रपट आधी होता, त्याहून अधिक गडद बनतो. आपल्याला चित्राची अधिक वेगळी बाजू असू शकते याची अस्वस्थ करणारी जाणीव करून दिली जाते. चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते पूर्वार्धाच्या शेवटापर्यंत पेरून ठेवलेली उत्प्रेरकं अपेक्षित ती कामगिरी करतात. त्यानंतर काय खरं नि काय खोटं, कोण अधिक बरोबर हे अधिकच अस्पष्ट बनत जातं. उत्तरार्धात हा आलेख अधिकच चढत जातो. यादरम्यान एकाच गाण्याच्या दोन वेगळ्या आवृत्त्या पूर्णतः टोकाच्या वातावरण निर्मितीसाठी कशा वापरल्या जातात हे पहाण्यासारखं आहे.
कंगना आणि राजकुमार यांची पात्रं एकमेकांवर कुरघोडी करणारी असली तरी कंगनाच्या पात्रात मूलतः एक आक्रमकता दडलेली आहे, जी तिने अतिरेक होऊ न देता अचूकपणे पकडलेली आहे. याउलट राजकुमारचं पात्र आणि त्याचा अभिनय दोन्ही बाबी अधिक संयत आणि आक्रमकतेचा अभाव असणाऱ्या आहेत. या सगळ्या प्रकरणात बहुतेक सर्वच कलाकारांची कामगिरी अप्रतिम झालेली आहे.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे चित्रपट त्याचं लेखन, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन आणि संगीत या सर्वच पातळ्यांवर राघवनच्या विशिष्ट अशा शैलीशी नातं सांगणारा आहे. त्यातही पुन्हा गेल्या वर्षी आलेला राघवनच्या ‘अंधाधुन’ची आठवण करून देणारा आहे. ‘जजमेंटल हैं क्या’ त्याच्या शेवटाबाबत काही प्रमाणात फसलेला असला तरी त्याने ‘अंधाधुन’प्रमाणेच एक जबरदस्त असा पूर्वार्ध निर्माण केलाय. ज्यासाठी त्याच्या शेवटाकडे जाताना जरा अहंमन्य बनण्याकडे दुर्लक्ष करता येतं.
‘जजमेंटल हैं क्या’ जे मांडू पाहतोय आणि ते ज्या सफाईदारपणे व कल्पकतेनं मांडू पाहतोय त्याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे त्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारायला हवं. त्याकडे ब्लॅक कॉमेडीच्या आवरणात दडलेला एक प्रयोगशील मानसशास्त्रीय थरारपट म्हणून पहायला हवं.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment