‘टोट्टा पटाखा आयटम माल’ : पुरुषांनाही बलात्काराची भीती वाटली पाहिजे? वाटते? वाटेल?
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
कल्पना मेंढेकर
  • ‘टोट्टा पटाखा आयटम माल’चं पोस्टर
  • Tue , 23 July 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie टोट्टा पटाखा आयटम माल Tottaa Pataaka Item Maal

‘Charite at war’, ‘High seas’, ‘Bolivar’, ‘दिल्ली क्राईम’ या नेटफ्लिक्सच्या सिरीज  खिळवून ठेवणाऱ्या असल्या तरी सतत पाहायला  झेपत नाहीत. काही दिवसांपूर्वी ‘charite at war’ आणि ‘दिल्ली क्राईम’ या सिरियस सिरीज दोन दिवसांत संपवल्या, पण बाकी सिरीज संपवताना मध्ये काहीतरी हिंदी हलकेफुलके, लवकर संपणारे सिनेमे हवे असतात. रेंगाळणारं काहीच नको वाटतं. पण पाऊस आणि नेटफ्लिक्स जमून येतं... आणि दोन-चार सिनेमांचा फडशा पडतो. काही बकवास सिनेमे अर्धवट बंद केले जातात, मग मुशाफिरी करताना सापडतो एक सिनेमा. नावावरून काहीच अर्थ लागेना. म्हटलं जरा डोकावून पाहूया. नाव होतं- टोट्टा पटाखा आयटम माल.

हा सिनेमा होता चौघींचा. चारचौघींसारख्या त्या चौघी. शहरी, निमशहरी कुठेही या चौघी सापडतील अशाच. पुरुषी क्रूरतेला बळी पडलेल्या. 

दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडानं खजील झालेल्या. पुरुषी ताकदीवर अनेक बलात्कार घडतात, पण लहानपणापासून स्त्री ही अशक्त, कमजोर, लाचार असण्याची भावना ठासून उरी बाळगणाऱ्या चौघी कुठेतरी आत धुमसत असतात. त्या पेटून उठतात, जेव्हा एक धडधाकट, अतिशय माजोरडा साडेसहा फूट उंचीचा तरुण त्यांची छेड काढतो. सुरुवातीला दुर्लक्ष्य करण्याचा पवित्रा घेणाऱ्या या चौधी शेवटी त्याला धडा शिकवण्याचे ठरवतात.

कणखर वृत्तीची कराटे टीचर चित्रा त्याला झुंज देते, तरी नाजूक स्त्री शरीर आणि माजलेला सांड, या दोघांत जुंपत नेहमीसारखा पुरुष हावी होतो, तेव्हा रात्री स्त्रियांसाठी टॅक्सीचा उद्योग करणारी शैला चिली स्प्रेनं वार करते. तिसरी स्त्री हरयाणा महिला पोलीस असते. ती आपल्या काठीनं वार करते. पुरुष कोसळतो. आपण त्याचा खून केला असं वाटून चौथी त्याला टॅक्सीत घालून पुढे जायचं ठरवते, पण तो जिवंत असतो. पुन्हा चिली स्प्रेचा मारा करत त्याला काबूत आणण्याचे प्रयत्न केले जातात.

एका बंद पडलेल्या ऑफिसच्या कपाटात त्याला बंद केलं जातं. पण आपण याला इथं डांबून नेमकं काय साधणार आहोत, या तिघींच्या प्रश्नाचं उत्तर देताना चौथी स्त्री विभा - जी फेसबुक मीडिया एक्स्पर्ट असते - एक योजना आखते. तिच्या मते आज स्त्रिया रात्री आठनंतर घराबाहेर पडायला का धजत नाहीत, निर्भया कांडनंतर अनेक मायबाप मुलींना दिल्लीत पाठवायला धास्तावलेत. स्त्रिया\मुलींचं मनोबल खचलं आहे, तर तिकडे पुरुष देखादेखी अनेक कांड करतात. स्वतःच्या प्रेयसीच्या क्लिप दाखवताना त्यांना जराही नैतिकतेचं भान वाटत नसून ती त्यांचा इगो सुखावणारी, मित्रांसोबत मजा लुटवणारी बाब वाटते. त्यांना धास्ती राहिली नाही. कांड केल्यानंतर समाज, कायदा आपल्याला ठेचून काढेल ही भीती वाटत नाही. अन्यथा निर्भयावर पाशवी अत्याचार करणारा क्रूर इसम हा शरीरानं सर्वांत कृश, अशक्त व्यक्ती होता. जर पुरुषी मनोवृत्तीच ढासळली तर त्याच्या शरीरावर काबू करता येऊ शकेल. ‘पुरुषांचा गॅंगरेप’सारख्या घटना पुढे आल्या तर नक्कीच त्यांचं मनोबल खचेल, पण सहजी मानेल तो अत्याचारी पुरुष कसला? आणि मग तयारी होते एका थीमलाईनवर काम करण्याची- ‘Men also should fear rape - revolution begins’.

सिनेमात भाषेचा वापर खूपच खुल्या तऱ्हेनं झाला असला तरी, ती सिनेमाची गरज वाटते. रेप करण्यामागची पुरुषी मानसिकता काय असते, स्त्रियांना घाणेरड्या भाषेत, अंगविक्षेप करून त्यांना काय सुख लाभतं, उपभोग्य वस्तू समजणारे पुरुष स्वत: कधी खचू शकतात का? 

एकूण या थीमलाईनवर काम करण्यासाठी एक व्हिडिओ शूट करताना चौघींना बलात्कार करावा लागला का? रेप आणि मारहाण होण्याची भीती कितपत घर करू शकते, त्याचा मानसिकतेवर काय आघात होतो, हा या सिनेमाचा आत्मा.

जाणीवपूर्वक तरीही केविलवाणा प्रयत्न दिग्दर्शक करतो आहे असं वाटतं. कारण वर्षानुवर्षं पुरुषसत्ता असणाऱ्या या समाजात एखाद्या गँगरेपनं घाबरणारा, काठोकाठ पुरुषी माज असलेला, संवेदनशीलता, सोशिकता हरवलेल्या समाजातला पुरुष (यात फक्त तरुणच नाही तर कुठल्याही वयातला पुरुष) हा सहजी याला बळी पडणार नाही, असं वाटत राहतं.

ही लढाई खूप मोठी आहे, पण कुठेतरी या विषयाला प्रतिरोधात्मक मार्ग शोधायला हवेतच, पण तरी हा मार्ग सुकर वाटत नाही. कारण जेव्हा त्या एका पुरुषावर चार स्त्रिया रेप करणार असं स्पष्ट होताना दिसतं, तेव्हा तो पुरुष आणखी सुखावतो, खुश होतो. इथंच सिनेमाचा मूळ उद्देश फेल ठरतो. पण दिग्दर्शकानं अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत ती पुरुषांच्या नजरेतून सुखावणारी बाब समोर आणली आहे.

या सिनेमातली आणखी एक गोष्ट नोंदवण्यासारखी आहे. ती म्हणजे यात एक फेमिनिस्ट म्हणून मिरवणारी स्त्री ही सगळ्यात जास्त या थीमच्या विरोधात असते. तिच्या मते असं करणं अत्यंत चूक आहे, पण बळी पडलेल्या तिन्ही स्त्रिया एकमतानं तिला खोडून लावतात. तेव्हा सहज लक्षात येतं, आजवर बळी पडलेल्या अनेक स्त्रिया आणि फेमिनिस्ट म्हणवून घेणारे आपल्यातलेच अनेक असे दोन गट सहज होऊ शकतात. इथं मुद्दाम मॅसेज, चित्रफीत वायरल करण्यापुरतं आपण हे काम करतोय, ही खटकणारी गोष्ट वाटते. दिग्दर्शकानं यावर थोडं काम करायला हवं होतं, असं सातत्यानं जाणवत राहतं.

हा सिनेमा काही ठिकाणी भरकटतोय असं वाटत असलं तरी दिग्दर्शकानं या खोल विषयाला हात घेतलाय म्हणून अभिनंदन करावंसं वाटतं.

.............................................................................................................................................

kmendhekar123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख