अजूनकाही
‘स्माईल प्लीज’ हा सिनेमा एका डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) झालेल्या महिलेची गोष्ट सांगतो. ज्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष आहे. त्याला तोंड देताना जवळच्या माणसांचा आधार महत्त्वाचा असतो. डिमेन्शिया हा आजार रुग्णाच्या स्मरणशक्तीवर जो काही हल्ला चढवतो, त्यात रुग्ण त्याचं सगळं विश्वचं हरवून बसतो. अशा रुग्णाला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांची कुठलीही जाणीव राहत नाही. मग असे रुग्ण कुणाच्या आधारे जीवन जगत असतात? त्यांची आशा काय असते? या प्रश्नाभोवती हा सिनेमा फिरत राहतो.
शिशीर (प्रसाद ओक) आणि नंदिनी (मुक्ता बर्वे) हे जोडपं लग्नानंतर काही काळातच वेगळं होतं. त्यांना नूपुर (वेदश्री महाजन) नावाची मुलगी असते. नंदिनी फोटोग्राफर तर शिशीर फिल्म दिग्दर्शक असतो. नंदिनी लग्नानंतर नोकरी करू इच्छिते, मात्र शिशीरचा त्याला विरोध असतो. लहानपणापासून स्वतंत्र जगणाऱ्या नंदिनीची घुसमट होते. ती स्वतःच्या पद्धतीनं जगू पाहते. शेवटी ती घटस्फोट घेते. नूपुर घटस्फोटानंतर आईऐवजी वडिलांसोबत राहते. नंदिनीही तिच्या माहेरी- वडिलांकडे (सतीश आळेकर) राहायला जाते. इथं दिग्दर्शकाचा दोन स्त्रियांच्या जगण्याच्या चौकटी एकाच वेळी बंदिस्त आणि मुक्त अशा दाखवण्याचा प्रयत्न चांगलाच प्रभावी ठरतो.
.............................................................................................................................................
दोन प्रवृत्तींमधील द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या ‘ओह माय गोडसे’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5010/Oh-My-Godse
.............................................................................................................................................
नंदिनी स्वतःच्या कामात गढून जाते. पण तिला घटस्फोटानंतर स्वतःला सावरायला समुपदेशाकडे उपचार घ्यावे लागतात. नंदिनी तिची मैत्रीण- अंजलीकडे (अदिती गोवित्रीकर) उपचार घेत असते. एक दिवस अचानक तिला अस्वस्थ वाटू लागतं. तेव्हा ती अंजलीकडे जाते. काही तपासण्यांनंतर तिला डिमेन्शिया असल्याचं निदान होतं. स्वतःला कामात झोकून देणाऱ्या नंदिनीला त्याचा धक्का बसतो. आणि तिथून पुढे कथा हळूहळू उलगडत जाते.
कथा दमदार आणि दिग्दर्शन उत्तम आहे. सिनेमाचा सूर गंभीर असला तरी त्यातले भावनिक आणि नटखट संवाद सिनेमाचा तोल ढासळू देत नाहीत. संगीताची जमेची बाजू म्हणजे त्यात गडदपणा नाही. कॅमेऱ्याची किमया आणि तांत्रिक बाजू बहारदार आहे.
सिनेमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध संथ असला तरी बऱ्याच जागी ब्रेक होतो. पूर्वार्ध तांत्रिक बाजूनं अधिक प्रभावी आहे. मात्र उत्तरार्धात बऱ्याच गोष्टीची जुळवाजुळव केलेली आहे. त्यामुळे उत्तरार्धात सिनेमा थोडासा भरकटतो. त्यातल्या चढउतारात संयम जाणवत नाही. उलट गृहीतक सिद्ध करण्याची धडपड अधिक दिसते.
मुक्ता बर्वेचा अभिनय अत्यंत प्रभावी आहे. तिने एकाच वेळी भावनाप्रधान आणि व्यावहारिक विचार करणारी स्त्री अशी भूमिका रंगवली आहे. प्रसाद ओक बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर दिसतो. त्यानेही प्रभावी काम केलं आहे. कथेत मध्येच विराज (ललित प्रभाकर) हे पात्र अचानक येतं. त्यामुळे ते अतार्किक आणि घुसवल्यासारखं वाटतं. मात्र अभिनयाचा सूर गवसलेला हा कलाकार आपला ठसा उमटवतो. वेदश्री महाजननेही चांगलं काम केलं आहे.
सिनेमा एका आजारी स्त्रीचा मनोव्यापार दाखवतो. मात्र त्याला असलेले पदर उलगडताना वापरलेली ‘फिलॉसफी’ जाणिवा प्रगल्भ करणारी आहे. नातेसंबंध, प्रेम, जबाबदारी आणि मैत्री यांचं मिश्रण सिनेमाला अधिक सकारात्मक बनवतं. त्यामुळे पाहणाऱ्याला ही कथा आपलीच वाटायला लागते.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment