अजूनकाही
अलीकडच्या काळात शहरी मध्यमवर्गाच्या बदलत्या मानसिकतेला समोर ठेवून या वर्गातील कौटुंबिक पातळीवरचे चढउतार पडद्यावर मांडण्याचं काम अनेक सिनेमांनी केलं आहे. त्यातल्या मध्यवर्ती संकल्पना कुठेतरी मिळत्याजुळत्या असतात. अशा प्रकारच्या बहुतांश सिनेमांमध्ये दोन गोष्टी समान आढळतात. एक, त्यांची मांडणी भडक आणि अतार्किक असते. दोन, कथेचा आणि पडद्यावरच्या चित्रांचा संबंध जुळत नाही.
ही रेषा ओलांडणारे सिनेमे मोजकेच! ‘व्हॉट्सअॅप लव’ या सिनेमातही वर उल्लेखलेल्या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणात जाणवतात. त्यामुळे त्याच्याकडे कसं पाहायचं हा पेच निर्माण होतो. हा सिनेमा खरं तर नातेसंबंधांच्या पारंपरिक व्याखेत नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यातला विसंगतपणा या नावीन्याकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे सिनेमाच्या कथेची गत समुद्रातल्या लाटांवर हेलकावे खाणाऱ्या बंद जहाजासारखी होते- धड पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही.
आदित्य (राकेश बापट) आणि अनघा (अनुजा साठे) या नवविवाहित जोडप्याची ही कथा आहे. आदित्य एका नामांकित कंपनीत नोकरी करत असतो, तर अनघा गृहिणी असते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. एकमेकांना सांभाळून घेणं, जबाबदारीचं आणि प्रेमाचं ओझं एकमेकांवर पडू नये याची काळजी घेणं, हे व्यवस्थित सुरू असताना त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतं. त्यानिमित्तानं अनघाची मैत्रीण तिला भेटायला येते आणि बोलता बोलता एका मैत्रिणीच्या नवऱ्याच्या विवाहबाह्यसंबंधांबद्दल बोलते. त्यामुळे अनघाच्या मनात भीती निर्माण होते की, आदित्यदेखील एखाद्या बाईच्या प्रेमात पडला तर? ही भीती अविश्वास निर्माण करते. ती आदित्यवर नजर ठेवायला लागते. त्यासाठी ती एका अनोळखी नंबरवरून त्याला ‘व्हॉट्सअॅप’ मॅसेज पाठवायला लागते. त्यातून जे घडतं ते म्हणजे हा सिनेमा.
सिनेमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यात कथा सुसंगती नाही. पूर्वार्धात मुख्य पात्रांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं आहे, तर उत्तरार्ध पूर्णतः त्याउलट आहे. म्हणजे कथेतलं गृहीतक सिद्ध करण्याच्या धडपडीत नायकाच्या मनातल्या भ्रमाला सतत अधोरेखित केलं जातं. त्यामुळे सिनेमा अतार्किक आणि नीरस वाटायला लागतो. सिनेमाचं संकलन वा एडिटिंगही सफाईदार झालेलं नाही. त्याचाही परिणाम सिनेमावर झालेला दिसतो. कॅमेरा आणि इतर तांत्रिक बाबी मात्र परिणामकारक आहेत.
दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे दिग्दर्शनातल्या उणीवा काहीशा दुर्लक्षित कराव्या लागतील. हेमंतकुमार यांना संगीतक्षेत्राची पार्श्वभूमी असल्यानं यातलं संगीत हिंदी सिनेमाच्या वळणाचं आहे. गाणी आशा भोसले, श्रेया घोषाल यांसारख्या नामांकित गायिकांनी गायली आहेत. त्याचा प्रभाव पडतो.
राकेश बापटने अनेक हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे, मात्र त्याचा निखळ अभिनय या सिनेमात पाहायला मिळत नाही. अनुजा साठेची ओळख हिंदी मालिकांनी करून दिलेली आहे. तिचा अभिनय तिच्या भूमिकेला साजेसा आहे.
पटकथा आणि संवाद याबाबतीत सिनेमा पारंपरिक पद्धतीनं पुढे जातो. त्यात फारसं नावीन्य नाही. दिग्दर्शन, अभिनय, पटकथा, संवाद यांची कच्ची बाजू आणि संगीताचा भरभक्कम आधार, यांवर तोल सांभाळत उभा राहिलेला हा सिनेमा मनोरंजनात मात्र कमी पडतो.
‘व्हाट्सअॅप लव’ हा अपेक्षा उंचावणारा पण थोडासा गोंधळलेला, मात्र खाली पडता-पडता सावरलेला सिनेमा आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment