अजूनकाही
बिहारमध्ये गरजू विद्यार्थ्यांना आयआयटी-जेईई अॅडमिशनकरिता मोफत कोचिंग सेवा देऊ करणाऱ्या आनंद कुमार या प्रतिभाशाली गणितज्ञ आणि शिक्षकाच्या आयुष्यावर ‘सुपर ३०’ आधारित आहे. तसं पाहिल्यास आनंद कुमारच्या यशस्वी घोडदौडीची कथा अगदीच साधी सोपी आहे. लेखक संजीव दत्ता आणि दिग्दर्शक विकास बहल चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात ती तितक्याच साध्या सोप्या तऱ्हेनं समोर आणण्याचा प्रयत्नही करतात. मात्र, असं करताना लवकरच आनंद कुमारच्या प्रेरणादायी कथेची बीजं, त्यातील सहजता मागे पडते आणि त्याची जागा वैचित्र्यपूर्ण, काल्पनिक, कृत्रिम अशी कथा घेते. परिणामी जेव्हा ‘सुपर ३०’च्या प्रभावाचा विचार करायची वेळ येते, तेव्हा तो असा चरित्रपट ठरतो, ज्याच्या खुद्द निर्मात्यांनाच त्यांच्या चरित्रनायकाच्या कर्तृत्वावर पुरेसा विश्वास नसल्याचं दिसतं.
साल आहे १९९७. आनंद कुमार (हृतिक रोशन) पटनामध्ये ‘ह्युमन कॅल्क्युलेटर’ म्हणून ओळखला जातो. केंब्रिज किंवा तत्सम परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळवण्याची, नवनवीन शोध लावण्याची महत्त्वाकांक्षा तो बाळगतो. त्याच्या हुशारीची चुणूक ‘द मॅथेमॅटिकल गॅझेट’चा अंतर्भाव असलेल्या एका दृश्यातून समर्पकरीत्या दिसते. सोबतच आई-वडील आणि एका भावाचा, प्रणव (नंदिश सिंग) समावेश असलेलं त्याचं चौकोनी कुटुंब त्याच्या या स्वप्नात त्याला पुरेपूर साथ देत असल्याचंही दिसतं. त्याची प्रेयसीदेखील (मृणाल ठाकूर) अजय-अतुलच्या मधुर, तरल संगीताच्या पार्श्वभूमीवर समोर येते. आनंदची महत्त्वाकांक्षा, स्वप्नं यासोबतच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी गजबजलेलं, कुणालाही हेवा वाटावंसं आयुष्य मोजक्याच दृश्यांमध्ये समोर मांडलं जातं.
आपल्या बापाला त्याच्या नावानंच- ईश्वर (वीरेंद्र सक्सेना) - पुकारणाऱ्या आनंद आणि ईश्वरमधील नातंही अगदी अलवारपणे उलगडत जातं. वीरेंद्र सक्सेना या उत्कृष्ट नि अनुभवी अभिनेत्यानं साकारलेलं हे पात्र केवळ भावनिक गुंतवणुकीसाठी गरजेचं पात्र उरत नाही, तर हे पात्र चित्रपटाला (आणि आनंदलाही) एक ठोस असं नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देतं. ‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा’ म्हणत काळ कसा बदलला आहे, याबाबत बोलणारा ईश्वर आनंदला केंब्रिजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर कसा आणि किती आनंदित होतो हे पहावं. किंवा हरप्रयत्न करूनही आर्थिक कारणांमुळे आनंदचं केंब्रिजला जाणं शक्य नाही, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी हतबलता पाहावी. ‘सुपर ३०’ जर भावनिक पातळीवर अपेक्षित ते काम करत असेल तर त्याचं श्रेय सर्वस्वी या पात्राकडे आणि ते साकारणाऱ्या सक्सेनांकडे जातं. पात्र सोडा, अगदी त्याची निर्जीव सायकलसुद्धा कथनामध्ये किती महत्त्वाची ठरते, यावरून त्या पात्राच्या प्रभावाची कल्पना करता येईल.
आनंद इंग्लंडला जाण्यात अपयशी ठरलेला असतानाच या कुटुंबावर दुःख आणि गरिबीचं आधी होतं त्याहून अधिक गडद सावट पसरतं. अशा वेळी लल्लन सिंगच्या (आदित्य श्रीवास्तव) रूपात एक मदत करणारी, पण सोबतच कोचिंग इन्स्टिट्यूटच्या रूपात शिक्षणाचा बाजार मांडून बसलेली मातब्बर व्यक्ती त्याच्या आयुष्यात येते. हळूहळू ‘सुपर ३०’ची पटकथा किती मोजूनमापून आणि रटाळ स्वरूपात रचलेली आहे, याची कल्पना येऊ लागते. सत्तर-ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटांच्या शैलीत कथेची वाटचाल होत राहते. नायकाच्या मनामध्ये नैतिक द्वंद्वाची सुरुवात होण्यासाठी केवळ काही मिनिटं, एखाद-दोन गीतं आणि ईश्वरच्या रूपात पेरून ठेवलेलं उत्प्रेरक पुरेसं ठरतं. आनंद कुमार कोचिंग इन्स्टिट्यूटच्या प्रस्थापित व्यवसायाच्या आणि लल्लन सिंगच्या विरुद्ध जात आपलं स्वतःचं कोचिंग सेंटर उघडतो. आणि तो पुढे जाऊन ज्यासाठी नावाजला जाईल, त्या ‘सुपर ३०’ या कार्यक्रमाची सुरुवात करतो.
हे सेंटर सुरू केल्यावर मात्र चित्रपटाला प्रकाश झाच्या ‘आरक्षण’च्या (२०११) धर्तीवर कोचिंग इन्स्टिट्यूटमधील स्पर्धेचं वळण प्राप्त होतं. आनंद कुमारची प्रेरणादायी कथा मागे पडते आणि लेखक-दिग्दर्शक कल्पनेच्या भराऱ्या घेत राहतात. असं करत असताना त्यांना वास्तवाचा विसर पडतो आणि प्रकरण भलतंच कृत्रिम आणि अप्रभावी बनत जातं. चित्रपटाची साधी सोपी रचना असलेली कथा-पटकथा उत्तरोत्तर अधिकाधिक रटाळ आणि दोषपूर्ण होते. चित्रपटाचा शेवट तर ‘होम अलोन’ (१९९०) चित्रपटाच्या धर्तीवर घडून येतो. एव्हाना चित्रपटकर्त्यांना आनंद कुमारची प्रेरणादायी गोष्ट सांगायची आहे की, ‘आरक्षण’/‘होम अलोन’चं पुनर्निर्माण करायचं आहे, हे यातील रेषा धूसर होतात.
हृतिक रोशनच्या वाईट बिहारी उच्चारणाकडे दुर्लक्ष करणं जमल्यास त्याची एकूण कामगिरी ‘इतकीही वाईट नाही’ प्रकारात मोडते. वीरेंद्र सक्सेना, आदित्य श्रीवास्तव, पंकज त्रिपाठी हे सहाय्यक भूमिकांमधील कलाकार त्याहून अधिक प्रभावी कामगिरी करतात. बाकी मृणाल ठाकूरला आनंदच्या प्रेमिकेच्या रूपात फारसा वाव नाही.
अजय-अतुलचं ऑर्केस्ट्रल संगीत आनंदच्या महत्त्वाकांक्षी, काहीशा स्वप्नवत विश्वाला तितकंच स्वप्नवत स्वरूप प्राप्त करून देणारं आहे. अर्थात हे संगीत चित्रपटास पूरक ठरतं की, नाही हा भाग व्यक्तिसापेक्ष असला तरी त्यांचं संगीत सुंदर, तरल आणि अलवार आहे, हे नक्कीच म्हणता येईल.
थोडक्यात सांगायचं झाल्यास ‘सुपर ३०’ हा महत्त्वाकांक्षी लोकांवर बेतलेला एक तितकाच महत्त्वाकांक्षी, मात्र काही प्रमाणात फसलेला चित्रपट आहे. त्याचा सकारात्मक प्रभाव मुख्यत्वे त्याचा उत्तम पूर्वार्ध आणि संभाव्य भावनिक परिणामातून येणारा आहे. अनेकदा सिनेमाचा एकूण प्रभाव हा त्याच्या भावनिक गुंतवणुकीवर आणि परिणामावर अवलंबून असतो, ‘सुपर ३०’ही अशाच सिनेमांमध्ये मोडतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment