अजूनकाही
‘स्पायडर-मॅन’ पात्राचं मानसिक-भावनिक द्वंद्व, त्याच्या आयुष्यातील समस्या या मार्व्हलच्या इतर पात्रांच्या (इतरही सुपरहिरोंच्या) तुलनेत अधिक वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. शिवाय, ‘अॅव्हेंजर्स’ चित्रपटांतील भाग सोडल्यास पीटर पार्कर कायमच ‘फ्रेंडली नेबरहूड’ स्पायडर-मॅन राहिलेला आहे. वयानं, अनुभवानं प्रौढ लोकांच्या विश्वात हा किशोरवयीन मुलगा सुपरहिरो बनलेला आहे. त्याला पौगंडावस्थेतच ‘विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी’ हे शब्द लक्षात घेत त्यांचा अवलंब करावा लागतो. अकाली प्रौढ बनत वैयक्तिक आयुष्यातील समस्यांशी झगडण्यापासून ते सुपरव्हिलन्सशी लढण्यापर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात. दिग्दर्शक सॅम रेमीच्या स्पायडर-मॅन चित्रत्रयीतील (२००२-२००७) चित्रपट सुपरहिरोपट म्हणून ग्रेट असतील किंवा दिग्दर्शक मार्क वेबची ‘द अमेझिंग स्पायडर-मॅन’ चित्रद्वयी (२०१२-२०१४) दृश्यपातळीवर प्रभावी आणि वास्तववाकडे झुकणारी असेल, मात्र स्पायडर-मॅन या ‘पात्रा’ला पुरेपूर न्याय देणारे चित्रपट जॉन वॉट्सचे आहेत, हे त्यानं ‘स्पायडर-मॅन : फार फ्रॉम होम’च्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
‘मार्व्हल’चा लोगो आणि त्यामधील सुपरहिरो पडद्यावर अवतरत असताना पार्श्वभूमीवर व्हिटनी ह्युस्टनचं ‘आय विल आल्वेज लव्ह यू’ हे क्लासिक गाणं सुरू असतं. त्यानंतर ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’मध्ये मृत झालेल्या लोकांना पुन्हा अस्तित्वात आणलं असलं तरी त्यादरम्यान पाच वर्षांचा कालावधी व्यतीत झालेला असल्यामुळे काही भलत्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावेळी नाहीसे न झालेले लोक एव्हाना पाच वर्षांनी मोठे झाले आहेत, तर पुन्हा जिवंत केलेल्या लोकांचं वय पूर्वी होतं तेच राहिलं आहे, अशी काहीशी विचित्ररीत्या विनोदी परिस्थिती आहे. (अर्थात तिचा केवळ ओघवता उल्लेख केला जाऊन मूळ कथेला सुरुवात होते.) ‘द ब्लिप’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही घटना घडून आता आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. हे ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’नंतरचं विश्व आहे. सामान्य लोकांचं दैनंदिन आयुष्य पुन्हा सुरळीतपणे सुरू झालं असलं तरी जगानं काही महत्त्वाचे सुपरहिरो गमावले आहेत. आता बहुतांशी ‘अॅव्हेंजर्स’ एकतर अस्तित्वात तरी नाहीत किंवा मदतीसाठी उपलब्ध तरी नाहीत. ‘शिल्ड’देखील अजून पूर्ववत झालेली नाही. अशा वेळी पीटर पार्कर ऊर्फ स्पायडर-मॅनवर (टॉम हॉलंड) त्याच्या (दृष्टीनं स्वतःच्या) आवाक्याच्या बाहेर असलेल्या समस्यांचा सामना करायची वेळ आली आहे.
असं असलं तरी पीटर मात्र अजून टोनीला गमावण्याच्या दुःखातून सावरलेला नाही. आधी म्हणाल्याप्रमाणे त्याच्या समस्या या जगाला वाचवण्यापेक्षा सूक्ष्म, अधिक वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. त्याचा आदर्श, त्याचा मार्गदर्शक असलेला टोनी आता अस्तित्वात नाही, आणि हे जग टोनीची जागा घेण्याची अपेक्षा ठेवत आहे, या कल्पनाच त्याला अधिक अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्याला आपल्या सामान्य जीवनाकडे परतत, छोटेखानी समस्या सोडवण्यात अधिक रस आहे. अशा वेळी एलिमेंटल्स नामक खलप्रवृत्तींचा सामना करायची त्याची इच्छा नाही. दरम्यान क्वेंटिन बेक ऊर्फ मिस्टिरिओ (जेक जिलनहाल) या नवीन सुपरहिरोच्या रूपात त्याला या समस्यांचा सामना करेल, आणि त्याच्या आयुष्यातील टोनीची कमतरता पूर्ण करू शकेल, अशी व्यक्ती गवसते. निक फ्युरी (सॅम्युएल एल. जॅक्सन) आणि एलिमेंटल्समुळे त्याची (पुन्हा एकदा) अर्धवट राहिलेली ट्रिप पूर्ण करायची त्याची इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग खुले होण्याची शक्यता निर्माण होतेय, असं वाटत असताना प्रत्यक्षात मात्र भलत्याच समस्येची उत्पत्ती झालेली असते.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
तो स्पायडर-मॅन असल्याचं माहीत असलेल्या नेड (जेकब बॅटलन) या मित्रासोबत धमाल करणं, किंवा व्हेनिस-पॅरिससारख्या रोमँटिक ठिकाणी एम. जे. जवळ (झेंडाया) आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची इच्छा मनात असणं या छोट्या छोट्या बाबी पीटरला अधिक मानवी आणि अधिक अस्सल बनवणाऱ्या आहेत. तो आधी एक किशोरवयीन मुलगा आहे, ही भावना लक्षात ठेवणाऱ्या आहेत (ज्याला दिग्दर्शक रेमी किंवा वेबच्या चित्रपटांमध्ये तितकं महत्त्व असल्याचं दिसलं नव्हतं). खलप्रवृत्तींचा सामना करणं, ते करत असतानाही आपल्या मनाची निर्मळता जपणं, यासोबतच आपल्यालाही वैयक्तिक आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे, या भावनांचं इथं असलेलं अस्तित्व सदर पात्राला अधिक गहिऱ्या छटा प्राप्त करून देणारं आहे.
‘स्पायडर-मॅन : होमकमिंग’ (२०१७) हा या चित्रपट मालिकेतील यापूर्वीचा भाग असो किंवा हा चित्रपट असो, या दोन्ही चित्रपटांमध्ये खलनायक उभे करताना त्यांना परग्रहवासी किंवा दुर्घटनेतून निर्माण झालेले जीव म्हणून उभं करण्यापेक्षा (स्वतःहून नायकत्व पत्करणारे ‘अॅव्हेंजर्स’ अस्तित्त्वात असणाऱ्या विश्वात) काही ना काही ठोस कारण आणि भूमिकेपायी आपणहून खलनायकत्व पत्करलेले लोक म्हणून चितारलं आहे. ज्यामुळे त्यांना विचारी नायकांना विरोध करणाऱ्या निर्बुद्ध/अपघाती खलनायकांचं स्वरूप प्राप्त होत नाही. त्याऐवजी मूलतः काहीतरी विशिष्ट हेतूने प्रेरित असलेल्या तितक्याच विचारी खलप्रवृत्ती इथं दिसतात. त्यामुळे ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’मधील थॅनोसप्रमाणे इथंही प्रभावी खलनायक दिसून येतात.
टॉम हॉलंड आणि झेंडाया ते साकारत असलेल्या पात्रांमधील काहीशा ऑकवर्ड केमिस्ट्रीला परिणामकारक रूपात पडद्यावर आणतात. तर जेक जिलनहाल, सॅम्युएल एल. जॅक्सन, मॅरिसा तोमेई, जॉन फॅवरू असे सारेच कलाकार प्रभावी कामगिरी करतात.
चित्रपटातील ट्विस्ट्स भाकित करता येण्यालायक असले तरी ती त्याची उणीव मानायला हा काही रहस्यपट नाही. क्रिस मॅकेना-एरिक सॉमर्स यांचं लेखन ‘स्पायडर-मॅन : होमकमिंग’ इतकं ग्रेट नसलं तरी साधंसोपं आणि परिणामकारक नक्कीच आहे. जॉन वॉट्सचं दिग्दर्शन प्रभावी आणि दृश्यपातळीवर रंजक आहे. तो या पात्राला, त्याच्या भावविश्वाला खुलवण्यात अधिक सहाय्यक ठरेल अशी हाताळणी करत असल्याने या चित्रपट मालिकेचा परिणाम द्विगुणित होतो, जे लेखकांसोबत दिग्दर्शक म्हणून त्याचंही यश आहे. मायकल जकिनोचं संगीत नेहमीप्रमाणेच प्रभावी आहे.
एकूणच, ‘स्पायडर-मॅन : फार फ्रॉम होम’ मूलतः एक प्रभावी चित्रपट आहे, तो ‘स्पायडर-मॅन : होमकमिंग’ सीक्वेल म्हणून शोभणारा, आणि त्यात उभ्या केलेल्या पात्रांना, त्यांच्या भावविश्वाला अधिक रंजकतेनं फुलवणारा आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment