अजूनकाही
कुठलीही कलाकृती ही सृजनाची भाषा करते. त्यात समाजाचं प्रतिबिंब पडलेलं असतंच. किमान त्यामध्ये कमी-अधिक फरकानं मानवी संस्कृतीच्या खुणा उमटत असतात. म्हणूनच इतिहास अशा कलाकृतीची नोंद घेतो\ठेवतो. कुठल्याही कलाकृतीचा चांगला-वाईट परिणाम मोजण्याची गणितीय पद्धत अस्तित्वात नाही. त्यामुळे या सृजनाच्या माध्यमांवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृतीवर जनसामान्यांचं काय किंवा तज्ज्ञांचं काय, एकमत असणं जवळपास अशक्य आहे. कला एक सांस्कृतिक घटक आहे. कलेची दालनं मुक्त असतात. त्यामुळे सापेक्ष निकष लावून कलेला चौकटीत बंदिस्त करणं म्हणजे या सांस्कृतिक सृजनाचा मार्ग अरुंद करण्यासारखं आहे.
मनोरंजन हाच उद्देश पुढे घेऊन जाणारा सिनेमादेखील अशाच सृजनाची भाषा जन्माला घालत असतो. मग याकडे प्रेक्षकांनी कसं पाहायचं? सिनेमाची समाजमनावरची पकड खरंच घट्ट असते का? जेणेकरून त्याचा व्यापक अर्थानं समाजमनावर दीर्घकाळ परिणाम टिकून राहील? सापेक्ष असलेल्या नैतिक-अनैतिकतेची मोजमापं सिनेमाला लावणं अन्यायकारक ठरतं का? अशी मोजमापं लावायची झालीच, तर त्याचं स्वरूप कोण ठरवणार? या सर्व प्रश्नांवर अनेकदा जाणत्या व्यक्तींचंही एकमत नाही. मग हा तिढा नेमका सोडवायचा कसा?
‘कबीर सिंग’ हा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला आणि त्या अनुषंगानं समाजमाध्यमांवर विचारमंथन होऊ लागलं. एखाद्या सिनेमावर असं विचारमंथनं होणं ही चांगलीच बाब आहे. याचाच एक अर्थ सांस्कृतिकदृष्ट्या समाज प्रगल्भ होतोय, असाही घेता येईल. मात्र या विचारमंथनाचा निष्कर्ष काय याबाबत अजूनही संभ्रमाची अवस्था दिसून येते. ‘कबीर सिंग’च्या निमित्तानं घडून आलेल्या या विचारमंथनाच्या मुळाशी प्रामुख्यानं चार मुद्दे राहिले आहेत. ते असे -
१. ‘कबीर सिंग’ तरुण पिढीमधल्या व्यसनांचं उदात्तीकरण करतो.
२. ‘कबीर सिंग’ वर्चस्ववादी पुरुषसत्ताक पद्धतीची री ओढणार सिनेमा आहे.
३. ‘कबीर सिंग’ कुठल्याही घटनांचं उदात्तीकरण करत नसून सामाजिक व्यवस्थेचं वास्तव प्रतिबिंब आहे.
४. ‘कबीर सिंग’ प्रेमाची नवीन भाषा निर्माण करणारा सिनेप्रयोग आहे.
वरील मतांतरं एक तर आक्षेप नोंदवतात किंवा सिनेमाचं समर्थन करतात. त्यातली अनुक्रमे एक व दोन क्रमांकाची मतं ही आक्षेप नोंदवणारी आहेत; तर अनुक्रमे तीन व चार क्रमाकांची मतं सिनेमाचं समर्थन करणारी आहेत. या चारही प्रतिक्रिया वेगवेगळ्या वयोगटांतून आलेल्या आहेत. मात्र त्यामध्ये एका बाजूचा उल्लेख दिसत नाही. तो म्हणजे सिनेमा हे सांस्कृतिक कलेचं माध्यम आहे आणि त्याची काही आर्थिक गणितंही असतात.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
सिनेमाकडे नेमकं कसं पाहायचं याबाबत ज्येष्ठ साहित्यिक संजय भास्कर जोशी म्हणतात, “ ‘कबीर सिंग’ हा सिनेमा आपल्या भवतालाचा आरसा आहे काय, हा प्रश्न सिनेमा पाहून आपल्याला पडतो? या प्रश्नाच्या उत्तरात या सिनेमाचं कलात्मक यश दडलेलं आहे. कारण ज्यांची उत्तरं सापडणं अवघड किंवा अडचणीचं ठरावं असे प्रश्न निर्माण करणं हे कलेचं एक महत्त्वाचं प्रयोजन आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा दाक्षिणात्य चित्रपट काय किंवा त्याची सेम टू सेम हिंदी आवृत्ती ‘कबीर सिंग’ काय, हे चित्रपट एक कलाकृती म्हणूनच पाहायला हवेत, हे सर्व प्रथम लक्षात घ्यायला हवं. समाज प्रबोधन हे कलेचं उद्दिष्ट असू शकतं, पण ते असायलाच हवं ही काही पूर्वअट नव्हे. किंबहुना प्रबोधनाच्या हेतूनं जखडलेली कला दुय्यम कलाकृती असण्याची शक्यता अधिक असते.”
‘कबीर सिंग’ एकीकडे वादग्रस्त ठरत असताना बॉक्स ऑफिसवर मात्र चांगलीच कमाई करत आहे. दिग्दर्शक निखिल महाजन यांच्या मते, “ ‘कबीर सिंग’ हा ‘मास ऑडियन्स’ला भावतो. त्याचं कारण या सिनेमानं या वर्गाच्या भावनेला हात घातला आहे. अशी माणसं समाजात आहेत. सामाजिक प्रबोधन हा भारतीय सिनेमाचा कधीच उद्देश राहिलेला नाही. सिनेमाचा मूळ उद्देश मनोरंजन हाच आहे. दिग्दर्शकांनी सामाजिक भावना जपण्याचा ठेका घेतलेला नाही. त्यामुळे सिनेमातलं पात्र बायकांबरोबर कसं वागतं, यावरून सिनेमा कसा आहे, ते ठरवता येत नाही.”
‘कबीर सिंग’च्या नैतिक-अनैतिकतेबाबत ते म्हणतात, “दिग्दर्शकानं कुठेही त्या पात्राचं समर्थन सिनेमात केलेलं नाही. दिग्दर्शक म्हणून जे काही सांगायचं, त्याची मुभा दिग्दर्शकाला असतेच. कुठलीही कलाकृती ही निरनिराळे मतप्रवाह निर्माण करत असेल तर ती कलाकृती यशस्वी झाली आहे, असं मला वाटतं. त्यामुळे हा वाद निर्रथक आहे.”
निखिल महाजन हे कबीर सिंगचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी ‘अर्जुन रेड्डी’ (मूळ तेलगु) हा सिनेमा तयार होतानाची प्रक्रिया जवळून पाहिली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका मराठी दिग्दर्शक आणि संदीप रेड्डींचे मित्र अशा दोन्ही बाजूंनी लक्षात घेण्यासारखी आहे.
‘कबीर सिंग’मधून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला खतपाणी मिळतं का, याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अलका गाडगीळ म्हणतात, “बॉलिवुडमध्ये स्त्रियांच्या छळाला बळ देणारे सिनेमा तयार करण्याचा पायंडा पडलेला आहे. नायकानं तिची वाट आडवायची, तिचा पाठलाग करायचा, हे सिनेमात होत आलेलं आहे. त्याला प्रेक्षक म्हणून आपण ‘प्ले फुलनेस’ पद्धतीनं स्वीकारत आलो आहोत. मागच्या दहा वर्षांत ही मांडणी अधिक तीव्र होत चालली आहे. एकीकडे बॉलिवुडमध्ये स्त्रियांच्या छळाला विरोध करणारे सिनेमे येत असताना ‘कबीर सिंग’सारखा सिनेमा यावा आणि त्याला लोकांनी डोक्यावर घ्यावं, हे खरं तर भयानक आहे. ज्या पात्राला स्त्रियांच्या मुस्कटात मारणं, स्त्रियांचे कपडे फाडणं यांची शरम वाटत नाही, अशा पात्राचं समर्थन करताना सिनेमागृहात पुरुष टाळ्या आणि शिट्ट्या वाजत प्रतिसाद देतात आणि सिनेमा हिट होतो, ही प्रवृत्ती भीतीदायक आहे.”
या सिनेमाचा समाजावर किंवा तरुणांवर काय परिणाम होईल? यावर पुढे त्या सांगतात, “स्त्री हिंसा ही ‘सो कॉल्ड’ प्रायोगिक सिनेमांतूनही होत आलेली आहे. परिणामी बलाढ्य पुरुष आणि दुबळी स्त्री अशा मांडणीला जोर मिळाला आहे. फिल्ममेकर म्हणून दिग्दर्शकांची जबाबदारी आहे की, आपण काय दाखवतो, त्याचा परिणाम समाजमनावर काय होणार, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. याचा अर्थ सिनेमाचं उद्दिष्ट हे सामाजिक प्रबोधनच असावं असं नाही. मात्र त्याचा परिणाम लक्षात घ्यावा. सामाजिक-राजकीय वातावरण ‘टॉक्सिक मस्क्युलिनीटी’चं असताना आणि स्त्रियांना कवडीमोल महत्त्व असताना असा सिनेमा येणं भयानक आहे. आपण कुठल्या दिशेनं वाटचाल करतोय, याची तपासणी करून पाहण्याची वेळ आली आहे.”
सिनेमातलं कबीर सिंगचं पात्र, त्याचा लुक, अभिनय आणि प्रेमात झोकून देण्याचा अंदाज तरुणांना आवडल्याचं दिसतं. सिनेमा पाहून बेफिकीर होऊ पाहणाऱ्या तरुणांबद्दल मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणतात, “आपल्याकडे असलेलं सर्व काही उधळून टाकावं, अशी भावना निर्माण करणाऱ्या प्रेमाचं मानवी मनाला आणि खासकरून तरुणाईला नेहमीच आकर्षण राहिलं आहे. असं असलं म्हणून कबीर सिंगचं सर्वच वागणं अनुकरणीय ठरत नाही. आपली समवयस्क मुलींसोबतची वर्तणूक अथवा प्रेमातील अडथळ्यांना सामोरं जाताना केलेलं व्यसन, स्वभावातील हेकेखोरपणा, आयुष्याच्या जोडीदाराची निवड करण्याची ‘कबीर सिंग’मधील पद्धत यामधील कोणतीच गोष्ट ही विचारी पद्धतीनं जोडीदाराची निवड करायची असेल तर खूपच सदोष म्हणावी लागेल. ‘लिव्ह इन रिलेशन’पासून ते आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहाच्या शक्यता अजमावणारी पिढी ‘कबीर सिंग’च्या निमित्तानं परत मोकळेपणानं ही चर्चा करते आहे, हे लक्षण मला आश्वासक वाटतं.”
आजवर हिंदी किंवा एकंदर भारतीय सिनेमा सामजिक अंगानं कसा होता त्याची कारणमीमांसा मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र ‘कबीर सिंग’बाबत सिनेमाच्या अभ्यासकांची भूमिका काय आहे, हे समजून घेणं अधिक समंजसपणाचं ठरू शकतं. सिनेमा-अभ्यासक अमोल उदगीरकर म्हणतात, “मागे एकदा दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाला होता की, आपले प्रेक्षक प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा सिनेमाला जास्त सिरिअसली घेतात. आजकाल दर आठवड्याला एखाद्या सिनेमावरून निरर्थक वाद उकरून काढण्यात येत आहेत आणि नागराजच्या विधानाची यथार्थता अजूनच पटत आहे. आपल्याकडे गेल्या काही वर्षांत प्रत्येक छोटा मोठा विषय ‘Over Intellectualize’ करण्याचा पायंडा पडला आहे. त्यामुळे मनोरंजन हा सरधोपट हेतू डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या सिनेमांचं गरजेपेक्षा जास्त विश्लेषण केलं जात आहे.”
हा लेख लिहीत असताना डॉक्टरांच्या संघटनेनं ‘कबीर सिंग’वर बंदी घालण्याची मागणी केल्याची बातमी आली. त्यावर उदगीरकर म्हणतात, “या सिनेमावर वैद्यकीय पेशाचा अवमान केल्याचा आरोप, स्त्रियांचं अवमूल्यन केल्याचा आरोप, व्यसनांचं उदात्तीकरण केल्याचा आरोप असे अनेक आरोप एकाच वेळेस लागत आहेत. मागे ‘संजू’ या सिनेमाच्या वेळेस असाच वादाचा धुरळा उडाला होता. सिनेमातले ‘Characters’ नैतिकतेचे पुतळे नसतात आणि ते ‘Flawed’ असतात म्हणूनच सिनेमाचं कथानक तयार होतं. पात्रांच्या नैतिकतेच्या निकषावर अशोककुमार यांच्या ‘किस्मत’पासून ते अगदी कालच्या ‘अंधाधुन’पर्यंतचे सगळे सिनेमे मोडीत निघतील. बाकी यापुढे लेखक-दिग्दर्शकांना आपल्या पात्राचं नाव काय असावं, आडनाव काय असावं, त्याचा व्यवसाय काय असावा, त्याच्या सवयी काय असाव्यात, वर्तणूक कशी असावी याबद्दल प्रचंड विचार करावा लागणार आहे, याची लक्षणं ‘कबीर सिंग’च्या निमितानं दिसायला लागली आहेत, असं मला वाटतं.”
‘कबीर सिंग’बाबत वरील पाचही अभ्यासकांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. मात्र या सर्व प्रतिक्रियांकडे समग्रपणे पाहता हे लक्षात येतं की, या सिनेमाच्या निमित्तानं जे काही प्रश्न निर्माण झाले, त्यावर साधक-बाधक चर्चा होणं, हे सांस्कृतिक मागासलेपण दूर करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल ठरू शकतं. ज्यातून कला ही माणसांसाठी की सांस्कृतिक उन्नतीसाठी, या प्रश्नाकडे अधिक सकारात्मक दृष्टीनं पाहता येईल, असा आशावाद निर्माण होतो.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment