अजूनकाही
‘आर्टिकल १५’ सुरू होतो तेव्हा एका दलित वस्तीमध्ये ‘कहब तो लग जाई धक से’ हे लोकगीत सुरू असतं. या गाण्यात भारतीय समाजव्यवस्थेतील धर्माधारित वर्णव्यवस्था आणि त्यामुळे आर्थिक, सामाजिकदृष्ट्या पिचला जाणारा वर्ग यांवर ताशेरे ओढत, समाजातील विषमतेच्या दोन टोकांची तुलना केलेली आहे. दरम्यान गाण्याचं सादरीकरण होत असतानाच दुसरीकडे तीन अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराची दृश्यंही दिसू लागतात. दिग्दर्शक अनुभव सिन्हा फारसा वेळ न दवडता थेट विषयाला हात घालतो. हे दृश्य संपतं आणि इंग्रजी गायक बॉब डिलनचं ‘ब्लोइंग इन द विन्ड’ ऐकू येऊ लागतं. इथं केवळ लोकसंगीत ते इंग्रजी गीत, समाजातील दोन आर्थिक स्तर इतका साधा फरक दिसून येत नाही, तर एकेकाळी अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी उभारल्या गेलेल्या ‘सिव्हिल राइट्स मुव्हमेंट’चं अँथम बनलेल्या बॉब डिलनच्या गीताचा तितकाच समर्पक वापर करण्यामागील चित्रपटकर्त्यांची दृष्टीही दिसते.
संस्कृती, तथाकथित रूढी-परंपरांच्या आड लपत समाजातील विषमतेचं समर्थन करणं (त्यामागे नैसर्गिक/दैवी चक्र असल्याचा दावा करणं) आणि ही विषमता अबाधित राखणं हेच आपलं इतिकर्तव्य असल्याचं मानणं, हा कुठल्याही भौगोलिक प्रदेशातील मानवी समाजातील मोठा दोष मानता येईल. ही विषमता वर्ण, वर्ग, वंश, लिंग अशा कुठल्याही गोष्टींवर आधारित असू शकते. अशा वेळी पाश्चात्य देशांमध्ये वंशद्वेष दिसून येतो, तर आपल्याकडे धर्म-जातीद्वेष, इतकाच काय तो फरक. ‘आर्टिकल १५’ या भारतीय क्राइम-ड्रामाच्या केंद्रस्थानी असलेल्या गुन्हे उकलीच्या निमित्तानं नेमका हाच मुद्दा समोर मांडला जातो.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
अयान रंजनची (आयुष्मान खुराना) लालगाव या काल्पनिक गावात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली असते. सुरुवातीला ऐकू आलेलं डिलनचं गाणं तोच ऐकत असतो. सूट, सनग्लासेस घालणारा, युरोपात राहून आलेला रंजन भारतातील अंतर्गत वास्तवापासून अनभिज्ञ असतो. त्यामुळे इथल्या ग्रामीण भागातील जातीव्यवस्थेचं त्याच्या गाडीचा चालक असलेला चंद्रभानकडून (शुभ्रज्योती भारत) केलं जाणारं वर्णन आणि दलितांचा स्पर्श तर सोडाच, पण सावलीही अंगावर पडू न देण्याच्या तथाकथित उच्चवर्णीयांकडून घेतल्या जाणाऱ्या काळजीच्या घटना ऐकताक्षणी त्याला हास्यास्पद वाटतात. तो तसं आपल्या प्रेयसीला, अदितीला (इशा तलवार) मॅसेज करून कळवतही असतो. मात्र, लवकरच हे हास्य अस्वस्थतेत रूपांतरित होणार असतं. कारण भोवताल या घटनांकडे जितक्या गंभीर आणि क्रूर नजरेतून पाहत असतो, त्याचा थेट अनुभव अस्वस्थ करणाराच आहे.
पोलीस दलात कार्यरत असलेले रंजनचे कनिष्ठ सहकारीदेखील वर्णाधारित समाजव्यवस्थेचं पालन करणारे आहेत. पोलीस उपनिरीक्षक ब्रह्मदत्तपासून (मनोज पाहवा) ते जाटव (कुमुद मिश्रा) आणि रंजनचा पीए मयंकपर्यंत (आशिष वर्मा) सगळे काही ना काही कारण पुढे करत ‘जो चल रहा हैं वहीं चलने दे’ असं म्हणताना दिसतात. एका दृश्यात तर खुद्द जाटवच्या दलित असण्याचं कारण पुढे करत सवर्ण ब्रह्मदत्त सवर्ण रंजनला त्याच्या ताटातील खाद्यपदार्थ उचलण्यापासून थांबवतो. जाटवलाही त्यात काही गैर वाटत नाही. नेमका हाच ‘आर्टिकल १५’मधील महत्त्वाचा मुद्दा मानता येईल. ‘यात काही गैर नाही’ ही मानसिकता आणि विचारसरणी तर बदलण्याची गरज आहे. कारण अत्याचार करणारे आहेत, पण सोबतच तो मूकपणे सहन करणारेही आहेत. अर्थात हेही समीकरण दिसतं तितकं सोपं नाही. रंजनसारख्या तिऱ्हाईत व्यक्तीला हे चुकीचं आहे हे कळेल, पण ते तसं का आहे यासाठी अधिक खोलवर जाण्याची गरज असते. रंजन गावात आला त्यावेळी गायब असलेल्या तीन दलित मुलींपैकी दोघींचा बलात्कार आणि हत्या झाल्याच्या गुन्ह्याच्या निमित्तानं त्याला या प्रकरणाच्या अंतरंगात डोकावता येतं.
मृत मुलींवर बलात्कार झाल्याचा गवगवा होऊ न देता त्यांची हत्या म्हणजे त्यांच्याच कुटुंबीयांनी दोघींचे एकमेकांशी समलैंगिक संबंध असल्याच्या प्रकरणातून केलेली ‘ऑनर किलिंग’ आहे, असं भासवत ही केस लवकरात लवकर बंद करण्यासाठी प्रत्येक जण जीव तोडून काम करत असतो. मात्र, या प्रकरणातील अन्यायाविरुद्ध दलित चळवळीतील कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली गावात घडत असलेलं आंदोलन, डॉ. मालती (रंजिनी चक्रबर्ती), गौरा (सयानी गुप्ता) या दोघींनी ही ‘ऑनर किलिंग’ नसून सामूहिक बलात्कार आणि हत्येचं प्रकरण असल्याचं पोलिसांना सांगू पाहणं, यामुळे अखेर रंजनला या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचं लक्षात येतं. सदर गुन्ह्याची बळी असलेल्या तिसऱ्या मुलीचा शोध घेणं, गुन्ह्यात उच्चवर्णीय लोक समाविष्ट असल्यानं वरच्या स्तरावरून तपासाला विरोध होत असताना व्यवस्थेशी लढा देत तपास सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं अशा बऱ्याच गोष्टी रंजन आणि त्याच्या सहकाऱ्यांना कराव्या लागतात. अर्थात चित्रपटाला ‘दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी झगडणारा सवर्ण नायक’ असं स्वरूप प्राप्त होत नाही, कारण इथं दलित चळवळ, रंजनच्या सहकाऱ्यांचाही झगडा सुरू असतो.
‘आर्टिकल १५’ त्याच्या ढोबळ रहस्य-थरारपटवजा कथानकापेक्षा त्याचं वास्तवाच्या जवळ जाणारं चित्रण, सादरीकरण आणि समोर मांडल्या जाणाऱ्या संकल्पना प्रभावीपणे हाताळणारा चित्रपटकर्त्यांचा थेट दृष्टिकोन या बाबींसाठी कौतुक करावा असा आहे. अलीकडेच आलेल्या ‘नेटफ्लिक्स’च्या ‘दिल्ली क्राइम’ या सिरीजच्या निमित्तानं भारतीय वेब सिरीजमध्ये गुन्हे उकलीची प्रक्रिया उलगडणारा, सादरीकरणाच्या पातळीवर परिणामकारक असा क्राइम-ड्रामा पाहायला मिळालेला असताना ‘आर्टिकल १५’च्या रूपात चित्रपटांतही या जान्रमध्ये उत्तम काम निर्माण झालं असं म्हणता येईल.
‘आर्टिकल १५’ गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीनं ‘क्राइम पॅट्रोल’मधील एपिसोडवजा रटाळ सादरीकरणाच्या पुढे तर जातोच, पण सोबतच त्याच्या नावाला जागत समाजातील आर्थिक-सामाजिक-राजकीय स्तरावरील विषमता, जातिव्यवस्थेला आणि धर्माधारित राजकारणाला असलेलं महत्त्व या मुद्द्यांनाही हात घालतो. अशा वेळी लेखक-दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि सहलेखक गौरव सोलंकी कुठेही आखडता हात न घेता अगदी राष्ट्रीय स्तरावरील पक्षांकडूनही धर्म-जात हे मुद्दे कायम समाजव्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील याची काळजी कशी घेतली जाते यावर ताशेरे ओढले जातात. ‘अब फर्क लायेंगे’ ही चित्रपटाची टॅगलाइन अशा वेळी नको तितकी समर्पक ठरते.
आयुष्मान खुराना, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, नास्सर, मोहम्मद झीशान अयुब अशी अभिनेत्यांची विस्तृत फौज चित्रपटाला प्रभावी बनवण्यात महत्त्वाची ठरते. इवान मलिगनचं छायाचित्रण जितकं प्रभावी आहे, तितकंच अस्वस्थ करणारं आहे. मंगेश धाकडेचा स्कोअर चित्रपटाच्या प्रभावात अधिक भर घालणारा आहे. ‘आर्टिकल १५’मध्ये एक सुंदर सांगीतिक तुकडा आहे, जो चित्रपटभर वेळोवेळी वेगवेगळ्या वाद्यांवर वाजतो. नुसता हा तुकडाच मंगेश सध्या भारतात कार्यरत असलेल्या काही महत्त्वाच्या आणि प्रभावी अशा संगीतकारांपैकी एक का आहे, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. त्याचा स्कोअर अगदीच न्यूनतम, सुंदर आणि तरल असला तरी तितकाच हाँटिंगही आहे.
‘आर्टिकल १५’ हा सद्यपरिस्थितीत समर्पक आणि प्रभावी का आहे आणि तो आवर्जून पहावासा का आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तो आशयघन चित्रपटनिर्मितीचा एक उत्तम नमुना आहे. तो ज्या गाण्यांनी सुरुवात झाला ती, ‘कहब तो लग जाई धक से’ आणि ‘ब्लोइंग इन द विन्ड’ ही गाणी त्यातील संकल्पना आणि आशय आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी पुरेशी आहेत. खासकरून चित्रपट संपल्यानंतर ‘ब्लोइंग इन द विन्ड’मधील “Yes, 'n' how many years can some people exist before they're allowed to be free?” हा प्रश्न प्रेक्षकाला पडल्यास चित्रपटाचा उद्देश नक्कीच सार्थ होईल.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment