अजूनकाही
मिलिंद लेले दिग्दर्शित ‘बंदिशाळा’ या सिनेमातून एकीकडे ध्येयवादाने झपाटलेली एक प्रशासकीय अधिकारी, तर दुसरीकडे भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या राजकीय व्यवस्थेतील पुरुष, या दोन प्रवृत्तीचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आणि त्यातून उलगडत जाणारे अनेक पदर पहायला मिळतात.
सिनेमाची नायकी माधवी सावंत तुरुंग अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यात रुजू असते. तिचं छोटं पती आणि एक मुलगी असं छोटं कुटुंब असतं. कर्तव्यदक्ष आणि भ्रष्टव्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या माधवीच्या मूल्यनिष्ठ वागण्यामुळे राजकीय व्यवस्थेतल्या स्वार्थी लोकांना तिची अडचण व्हायला लागते. “ती एक स्त्री आहे, तिने तिच्या मर्यादांची चौकट ओलांडू नये”, अशी अपेक्षा असणारे तिचे वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करून तिला गुंतवण्याचा प्रयत्न करू पाहणारीही व्यवस्थेतली माणसं शेवटी तिच्यावर सामूहिक बलात्कार करतात. तिथून पुढे तिचा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष सुरू होतो. त्यात सतत तिच्या वाटेला येतात अपमान, हीन वागणूक आणि पावलोपावली मानसिक छळाचे असंख्य प्रसंग. तो काळ तिच्या स्त्रीत्वाची परीक्षा पाहणारा असतो.
‘बंदिशाळा’ हा विषय म्हणून चांगला प्रयत्न वाटतो. मात्र सिनेमाची मांडणी तुकड्या तुकड्यात विखुरलेली आहे. त्यात एकसंधपणा जाणवत नाही. कथेचा चढउतार टिपताना अनावश्यक बाजू अधिक प्रमाणात अधोरेखित केल्या आहेत. सिनेमाच्या मध्यवर्ती संकल्पनेबाबत असाच गोंधळ उडतो. याचा एकूण परिणाम सिनेमाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांवर पडल्याचं जाणवतं. कदाचित सिनेमाची कथा आणि दिग्दर्शकाची मांडणी या दोन्हीच्या मर्यादा या सर्व प्रकाराला कारणीभूत ठरतात.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
सिनेमाचा पूर्वार्ध हा बराच घाईघाईत किंवा दिग्दर्शकाच्या मनातील गृहितकाला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात नको तितका संथ आहे. त्यामुळे मध्येच येणारे भडक प्रसंग रुचत नाहीत. कथा धाडसी प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या स्त्रीची असली तरी, त्यात जागोजागी भरलेलं तिचं स्त्रीपण सिनेमाला पठडीबद्ध चौकटीच्या बाहेर पडू देत नाही. उत्तरार्ध मात्र चांगला झाला आहे. त्यातल्या काही विसंगती दुर्लक्षित केल्या, तर सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
सिनेमाची कथा शेवटाकडे जाताना त्यात येणारे अनाठायी प्रसंग कथेवरची पकड सैल करतात. त्यामुळे कथा नेमकी कोणती बाजू स्पष्ट करते याचा अंदाज येत नाही. पटकथेतून स्त्रीत्वाचा डोंगर उभा करताना त्याचा पाया मात्र भरभक्कम करायचा राहून गेला, असं अधूनमधून वाटू लागतं. एका प्रसंगात माधवीही तुरुंगात प्रवेश करते आणि धाडधाड कैद्यांना मारत सुटते. मात्र त्यावेळी तिच्यातलं बाईपण अधोरेखित करायचं टाळलं जातं. या उलट उत्तरार्धात सिनेमा प्रत्येक प्रसंगात टोकदार भाष्य करत राहतो.
सिनेमा एकाकडे माधवीचं गौरवीकरण करतो, तर दुसरीकडे तिच्या मर्यादा दाखवताना बॉलीवुडमधल्या सिनेमाची पद्धतं ‘फॉलो’ करतो. त्यामुळे विषय गंभीर असला तरी त्यात घातलेला मसाला मध्येमध्ये पाणी ओततो. तरीही सिनेमानं केलेलं भाष्य अधिक प्रभावी आणि कालसुसंगत ठरतं.
अभिनयची धुरा मुक्ता बर्वेने उत्तम संभाळली आहे. तिच्याबरोबर कमी-अधिक फरकाने शरद पोंक्षे, उमेश जगताप, हेमांगी कवी, विक्रम गायकवाड, प्रवीण तरडे, आशा शेलार यांनीदेखील चांगलं काम केलं आहे. संगीत आणि तांत्रिक बाबी फारशा समाधनाकारक नाहीत.
थोडक्यात सिनेमा बॉलिवुड मसाला पटाचा ट्रेंड फॉलो करतो.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment