अजूनकाही
‘कबीर सिंग’ हा संदीप रेड्डी वंगाच्या २०१७ मधील अल्पावधीत लोकप्रियता पावलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. स्वतः वंगानेच दिग्दर्शित केलेला ‘कबीर सिंग’ दृश्यपातळीवर ‘अर्जुन रेड्डी’चीच वाट चोखाळणारा आहे. ज्यात गैर असं काहीच नाही, कारण इथे चित्रपटकर्ता आपल्या लोकप्रिय कलाकृतीचं एका अधिक वेगळ्या प्रेक्षकवर्गाकरता पुनर्निर्माण करत आहे.
‘कबीर सिंग’चं मध्यंतर होताना पडद्यावर चित्रपटातील मुख्य पात्राचं, म्हणजेच चित्रपटाचं नाव मोठ्या अक्षरांत येतं आणि हळूहळू त्या अक्षराच्या लाल रंगामध्ये जणू दुसरं द्रव्य मिसळलं जाऊन तो रंग अधिक गडद बनतो. या एका चतुराईने दर्शवलेल्या संक्रमणातून पात्रामध्ये होत असलेला बदल समर्पकपणे दर्शवला जातो. हीच लेखक-दिग्दर्शक वंगाची खासीयत आहे. तो ज्या पद्धतीने दृश्यरचना करतो आणि समोरील दृश्यांना पूरक अशा संगीताची निवड करतो, त्यातून चित्रपट अधिक अंगावर येणारा बनतो.
राग, आत्मघातकी प्रवृत्ती या इथल्या मध्यवर्ती संकल्पना आहेत. चित्रपटातील मुख्य पात्र, कबीर सिंग (शाहिद कपूर) हट्टी आहे, आत्मघातकी आहे आणि खूप रागीट आहे. तो प्रेमात पडतो तेव्हाही त्याच्यातील हे (अव)गुण अस्तित्वात असतात. पण जेव्हा त्याचा प्रेमभंग होतो, तेव्हा मात्र या स्वभाववैशिष्ट्यांमुळे त्याची ऱ्हासाकडे वाटचाल होऊ लागते. नशेच्या गर्तेत खोल बुडालेल्या कबीरमधील राग आणि त्याचं व्यसन या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन त्याच्या आत्मघातकी कृत्यांमध्ये अधिक वाढ होते. व्यसन आणि त्याचा स्वभाव एकमेकांना पूरकपणे काम करत त्याचा अधिकाधिक घात करत जातात.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘कबीर सिंग’ची कथा साधी सोपी आणि यापूर्वीही अनेक वेळा सांगून झालेली आहे. मात्र, चित्रपटातील नावीन्य त्याच्या कथेपेक्षा तिच्या हाताळणीत अधिक आहे. कबीर सिंग एका प्रतिष्ठित दवाखान्यातील सर्जन आहे. तो हल्ली दारू आणि संभोग या दोन्ही गोष्टींसाठी कायम हपापलेला असतो. व्यसनाधीन असलेल्या कबीरची दारू पिण्याची इच्छा सहजासहजी पूर्ण होत असली तरी संभोगाबाबत मात्र त्याला अधिक कष्ट घ्यावे लागतात. आणि हे कृत्य म्हणजे त्याच्या पूर्वायुष्यातील घटना पाहता गंभीर नात्यात न अडकता केवळ शारीरिक गरजा पूर्ण करण्यावर भर देण्याच्या स्वभावातून आलं आहे. फ्लॅशबॅकमधील दृश्यांमध्ये कबीरची अवस्था अशी कशी झाली हे उलगडत जातं.
वैद्यकीय शिक्षण घेत असताना कबीर प्रीतीला (किआरा अडवानी) पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडतो. तो आपल्याला हवं ते मिळवण्याच्या दुराग्रहातून सुरुवातीला तिच्यावर स्वतःचं प्रेम आणि एकप्रकारे स्वामित्व लादू पाहतो. लवकरच तीही त्याच्या प्रेमात पडते. आता दोघांचंही एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. त्यांचं नातं मात्र दोघांकरिता जितकं सुखकारक आहे, तितकंच हानिकारकसुद्धा आहे. काहीसं अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ किंवा ‘मनमर्जियाँ’मधील अनुक्रमे देव-पारो किंवा विकी-रुमी या जोड्यांप्रमाणे. ‘देव डी’मध्ये त्यांच्यातील लव्ह-हेट स्वरूपाच्या नात्यामुळे, तर ‘मनमर्जियाँ’मध्ये विकीच्या जबाबदारी झटकण्याचा, अप्रौढ स्वभावातून त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. ‘कबीर सिंग’मध्ये हा दुरावा कबीरचे तमोगुण, त्याची स्त्रियांवर आपला स्वामित्वाचा हक्क बजावण्याची वृत्ती आणि अस्थायी स्वभावामुळे निर्माण होतो. प्रीतीला शिवीगाळ आणि काही प्रमाणात मारहाण करत अतिमर्दुमकी गाजवण्यात धन्यता मानणाऱ्या कबीरच्या कृतीमुळे त्यांच्या नात्याचा शेवट होतो. तिचं लग्न होतं आणि कबीरच्या आत्मघाताला सुरुवात होते. (मुळात गडद छटा असलेला कबीर हा अँटी-हिरो अधिक आहे.)
‘कबीर सिंग’ पूर्णतः वाईट चित्रपट नाही किंवा तो अगदी मास्टरपीसदेखील नाही. एका सदोष पात्राविषयीचा हा एक सदोष चित्रपट आहे. चित्रपटाचा नायक शिवीगाळ करणारा, स्त्रीकडे कधी उपभोग घेण्याची वस्तू म्हणून पाहणारा, तर कधी तिच्यावर हक्क सांगण्याची गरज भासणारा आहे. अर्थात पात्राचं समस्यात्मक असणं हा काही चित्रपटाचा दोष असू शकत नाही. मात्र चित्रपट त्याचं उदात्तीकरण करत असेल तर ते नक्कीच समस्यात्मक आहे. इथं नाही म्हटलं तरी नायकाच्या चुकांवर काही प्रमाणात पांघरून घालत त्याचं उदात्तीकरण होताना दिसून येतंच. (जो आरोप ‘संजू’वरही झाला होता.) चित्रपटकर्त्यांचा त्याच्या कृत्यांना वीरतापूर्ण चितारत न्याय्य ठरवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं. अर्थात ही समस्या संकल्पनात्मक पातळीवरील आणि चित्रपटकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अधिक आलेली आहे.
चित्रपटाबाबत आणखी एक समस्या अशी की, कबीर सिंग आणि इतरही बहुतांशी पात्रं एका विशिष्ट रेषेत सरळमार्गानं प्रवास करणारी आहेत. चित्रपटादरम्यान त्यांच्यात मानसिक, भावनिक पातळीवर फारसे बदल घडत नाहीत, पण त्यांचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर होतो. अगदी चित्रपटाची नायिका म्हणाव्याशा प्रीतीलाही फारसा वाव नाही. ती एक व्यक्ती म्हणून सदोष असेना का, पण ती एक पात्र म्हणून लिखाणाच्या पातळीवरही दोषपूर्ण आहे. याउलट कबीरचा मित्र शिवा (सोहम मजुमदार) त्याच्या प्रेयसीहून अधिक बोलणारा, तिच्याहून अधिक अस्सल भासणारा आहे. याखेरीज, चित्रपटाचा शेवटही एकूण चित्रपटाच्या शोकांतिकेच्या सुराशी समांतर नसल्यानं समस्यात्मक भासतो.
असं असलं तरी ‘कबीर सिंग’ हा एक उत्तमरीत्या बनवलेला चित्रपट आहे, हे नाकारता येणार नाही. दिग्दर्शक वंगा ‘अर्जुन रेड्डी’प्रमाणेच इथं मध्यवर्ती भूमिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्यांकडून प्रभावी काम करवून घेतो. चित्रपटाची लांबी लक्षात घेता शाहीद कपूरची कामगिरी ही त्याला अधिक रंजक बनवणारी गोष्ट आहे. कपूर आणि मजुमदारमधील केमिस्ट्री आणि संवाद रंजक आहेत. किआरा अडवानीला फारसा वाव नसला तरी ती आपल्या वाट्याला आलेली भूमिका करते.
‘कबीर सिंग’चा विस्तृत साऊंड ट्रॅक आणि पार्श्वसंगीत चित्रपटाच्या एकूण परिणामाला अधिक उंचावून ठेवतं. पात्रांच्या भावना, चित्रपटाचा प्रवास यादृष्टीनं ही गाणी नको तितकी परिणामकारक ठरतात. संथन कृष्णन रवीचंद्रनचं छायाचित्रण आणि दिग्दर्शक वंगा मिळून सुंदर दृश्यनिर्मिती करतात.
सदर चित्रपट संकल्पनात्मक तसंच सामाजिक-राजकीय पातळीवर सदोष आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी नायकाच्या उदात्तीकरणाच्या दृष्टीनंही तो समर्थनीय नाही. पण म्हणून तो एक चांगला चित्रपट आहे, हे नाकारणं योग्य नाही. (एकीकडे सदोष आहे असं म्हणत असलेला चित्रपट उत्तमरीत्या बनवलेला आहे, असं म्हणणं विरोधाभासी वाटत असलं तरी तसं असूच शकतं.) ‘जेंडर पॉलिटिक्स’ बाजूला ठेवत, नैतिकतेचे नियम चित्रपटातील पात्रांवर न लादता त्याकडे पाहणं अधिक योग्य राहील, नसता त्यावर चर्चांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता अधिक आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment