अजूनकाही
नातेसंबंध हा गुंतागुंतीचा आणि एकमेकांकडून नकळत अपेक्षा ठेवणारा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू. या गुंत्यातून बाहेर पडावंसं वाटतं नाही आणि एका विशिष्ट टप्यानंतर हे अपेक्षांचं ओझंही पेलवत नाही. अशा द्विधा मन:स्थितीत जगणाऱ्या एका तरुणाची कथा श्राबनी देवधर यांनी ‘मोगरा फुलला’ या सिनेमात मांडली आहे.
सिनेमाचा केंद्रबिंदू सुनील नावाचा एक मध्यमवर्गीय तरुण आहे. आईचा पदर धरून लहानाचा मोठा झालेला सुनील व्यवसायानं इंजिनियर असतो. कुटुंबात तो, आई आणि दोन विवाहित भाऊ. वडील लहानपणी वारलेले. त्यानंतर आईनं सगळी जबाबदारी निभावलेली. मुलांचं शिक्षण, त्यांची लग्नं हे सगळं आईनं केलेलं. मात्र मोठी दोन्ही मुलं आईला पसंत नसलेल्या मुलींशी लग्नं करतात. अर्थातच त्यांचं आईवर प्रेम नाही म्हणून त्यांनी आईचा सल्ला ऐकला नाही, अशी आईच्या मनात भावना. त्यामुळे आईचा शेवटचा आधार सुनील असतो. तो अत्यंत पारंपरिक म्हणावा इतका सज्जन असतो. तो आईचा शब्दही ओलांडत नाही. सुनीलच्या लग्नासाठी स्थळ शोधणं सुरू असतं. ३८ मुलीची स्थळं तो नाकारतो. तेही अर्थातच आईला मुली पसंत पडल्या नाहीत म्हणून. शेवटी नकळत बँकेत काम करणाऱ्या शुभांगी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि मग सिनेमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते.
या सिनेमात नातेसंबंधांतले चढउतार अत्यंत निर्मळपणे रेखाटले आहेत. त्यात ओढाताण नाही. कथा सुरुवातीपासून पारंपरिक पद्धतीनं पुढे जात असली तरी त्यातला पारंपरिकपणा कमी-अधिक प्रमाणात वास्तवाशी जुळणारा आहे. त्यामुळे भावनिकतेचा ओलावा ओतप्रोत भरलेला असूनही त्यात कुठेही ‘ओव्हर’ असं काही वाटत नाही.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4900/Smart-Nirnay-Kase-ghyawe
...............................................................................................................................................................
माणूस अनेक भावभावनांनी बनलेला असतो. त्याचा आजचा स्वभाव उद्या बदलू शकतो. या साध्या आणि तितक्याचं महत्त्वाच्या बाबीवर सिनेमा बेतला आहे. माया नातेसंबंधातील वर्चस्ववादी प्रवृत्तींना कमी करते, हे गृहीतक सिद्ध करताना कुठेही घाई केलेली नाही. त्यामुळे सिनेमा पुढे जाताना अधूनमधून मागे वळून पाहायला लावतो.
कथा पूर्वार्धात एकसंध आहे, पण अपेक्षित पद्धतीनं उत्तरार्ध समोर येत असताना त्यातला चढउतार रंजक होतो. दिग्दर्शिकेनं कथेतल्या अनेक पदरांचा गुंता अलगद सोडवला आहे.
मध्यमवर्गाच्या पठडीबद्ध जीवनावर अचूक भाष्य करताना दिग्दर्शिकेनं त्यांच्या लहान-मोठ्या पण ठळकपणे दिसणाऱ्या घटनांचा संगम घडवला आहे. उदा. आईला वाटतं, लग्नानंतर आपला मुलगा बायकोच्या हातात जाणार आणि आपण एकटे पडणार. ही भावना मध्यमवर्गातील स्त्रियांमध्ये दिसते. त्याचा परिणाम एकूण कुटुंबावर कसा होतो, हे अत्यंत सहजतेनं सिनेमात मांडलं आहे.
स्वप्नील जोशी, सई देवधर, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, आनंद इंगळे यांच्या अभिनयामुळे सिनेमा खिळवून ठेवतो. संगीत, पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिकदृष्ट्या सिनेमा चांगला आहे. संवाद निव्वळ अश्रू ढाळणारे नाहीत.
थोडक्यात हा सिनेमा अनेक अंगानं फुलत जातो. त्यातला चढउतार अंगावर येत नाही. त्यामुळे सिनेमा अचूक नाही मात्र ठामपणे विषय मांडतो. तोही त्यातल्या चांगल्या-वाईटासह. थोडक्यात हा सिनेमा आदर्श आई-मुलाचा खेळ नाही, तर त्यातल्या नातेसंबंधांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment