बायकांनी, बायकांसाठी, बायकांमार्फत चालवलेले चित्रपट महोत्सव आणि त्या बायकांचे अनुभव
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मीना कर्णिक
  • ख्रेतेल इंटरनॅशनल वीमेन्स फिल्म फेस्टिव्हलच्या संस्थापक जॅकी बुये यांच्या सहकारी घैस
  • Sat , 15 June 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र फ्लाईंग ब्रूम इंटरनॅशनल वीमेन्स फिल्म फेस्टिव्हल Flying Broom International Women's Film Festival

२३ ते ३० मे तुर्कस्तानातल्या अंकारा इथे ‘फ्लाईंग ब्रूम इंटरनॅशनल वीमेन्स फिल्म फेस्टिव्हल’ झाला. महिला दिग्दर्शकांना व्यासपीठ मिळावं म्हणून गेली २२ वर्षं हा चित्रपट महोत्सव भरवला जातोय. या वेळी वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारचे महोत्सव भरवणाऱ्या काही बायका अंकाराला आल्या होत्या. काय आहेत फ्लाईंग ब्रूमचे आणि त्या बायकांचे अनुभव?

.............................................................................................................................................

महिला दिग्दर्शकांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून गेली २२ वर्षं फ्लाईंग ब्रूम संस्थेतर्फे महिलांसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जातो. १९९७मध्ये हलीमे गुनर यांनी महिलांच्या मानवाधिकारासाठीची लढाई आणि त्याबाबतची जागरूकता वाढावी म्हणून हा महोत्सव सुरू केला. आज दिदेम बाल्ताची आणि आयसेगुल ओगुज त्याचं काम सांभाळताहेत. त्यांच्या जोडीला आहेत आपल्या हक्कांबाबत आग्रही असणाऱ्या अनेक तरुण मुली आणि हा आग्रह योग्य आहे असं मानणारे काही तरुण मुलगेही.

अंकारा ही टर्कीची राजधानी आहे. त्यामुळे इथे होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बऱ्यापैकी लक्ष वेधून घेणारा असेल अशी माझी अपेक्षा होती. पण खुद्द शहरात महोत्सवाचं वातावरण फार दिसत नव्हतं. (मुंबईमध्ये मामि महोत्सव चालू असताना जसं रस्त्यावर असा काही आंतरराष्ट्रीय सिनेमांचा उत्सव शहरात चालू आहे याचा मागमूसही नसतो, अगदी तसंच.) पण गुणवत्तेच्या निकषावर मात्र हा महोत्सव दिवसेंदिवस एकेक पाऊल पुढे चाललाय. या वर्षी त्यांच्याकडे जगभरातून १७२१ एन्ट्रीज आलेल्या होत्या. याचा अर्थ तेवढ्या महिला दिग्दर्शकांनी आपली कलाकृती या महोत्सवामध्ये दाखवण्यासाठी पाठवली होती. त्यापैकी १४० डॉक्युमेंटरीज, सिनेमे, शॉर्ट फिल्म्सची निवड करण्यात आली होती.

महोत्सवाच्या दरम्यान अंकारामधल्या तरुण मुलींसाठी अ‍ॅक्टिंगचं एक आणि फिल्म मेकिंगचं एक छोटंसं वर्कशॉप घेण्यात आलं.

इतकंच नाही, तर अनेक अडचणींशी सामना करत आपण गेली वीसहून जास्त वर्षं हा महोत्सव करतोय, पण तरी आपण एकटे नाही याची जाणीव झाल्यामुळे की काय, या वर्षी पाच खंडांमधल्या आपापल्या देशांमध्ये अशा प्रकारे महोत्सव भरवणाऱ्या महिलांना त्यांनी आमंत्रित केलं आणि एक संपूर्ण संध्याकाळ या सगळ्या जणींनी आपापले अनुभव शेअर करण्यात घालवली. जगभरात सगळीकडेच सुधारणावादी, पुरोगामी विचारांच्या महिलांना किती वेगवेगळ्या स्तरांवर अडचणी येताहेत आणि तरीही पुढे चालत राहण्याचा त्यांचा निर्धार तसूभरही कमी झालेला नाही, याची एक झलक तब्बल चार तास चाललेल्या त्या गप्पांमधून ऐकायला मिळाली.

इथे एक गोष्ट कबूल करायलाच हवी. गेली अनेक वर्षं आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध महोत्सवांना मी जातेय, भारताच्या गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावतेय, पण अशा प्रकारे केवळ महिला दिग्दर्शकांसाठी जगभरात अनेक ठिकाणी इतकी वर्षं चित्रपट महोत्सव भरवले जातात, याची माहिती मला नव्हती. (भारतामध्येही इंटरनॅशनल असोसिएशन फॉर वीमेन इन रेडिओ अँड टेलिव्हिजन या संघटनेतर्फे दर वर्षी तीन दिवसांचा का होईना, पण असा महोत्सव भरवला जातो. तसंच मुंबईतही दर वर्षी असा एक महोत्सव होतो.) मुख्य म्हणजे जगातला पहिला अशा प्रकारचा महोत्सव सुरू होऊन तब्बल ४१ वर्षं झालेली आहेत. ख्रेतेल इंटरनॅशनल वीमेन्स फिल्म फेस्टिव्हल १९७८मध्ये जॅकी बुये यांनी सुरू केलाय. त्यांच्या सहकारी घैस या महोत्सवाला आलेल्या होत्या. पॅरिसच्या आग्नेय दिशेला ख्रेतेल वसलंय आणि दर वर्षी मार्च महिन्यात दहा दिवस हा महोत्सव भरवला जातो. चाळीस वर्षांपूर्वी तर महिला दिग्दर्शकांना फारशी व्यासपिठं उपलब्ध नव्हती. त्यांच्या सिनेमांचं वितरण योग्य पद्धतीने होत नव्हतं. त्यामुळे या महोत्सवाचं महत्त्व खूप जास्त होतं. पहिला महोत्सव जॅकी बोये यांनी सोअ इथे आयोजित केला होता. १९८५पासून त्याची जागा बदलली आणि ख्रेतेलमध्ये तो घेतला जाऊ लागला.

फ्लाईंग ब्रूमने आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये वयाने आणि अनुभवाने सर्वांत मोठ्या असलेल्या घैस यांच्यापासून ते कॅनडाची लेस्ली, लेबनॉनच्या डॉरीस आणि ओमेला, पोर्तुगालच्या अ‍ॅना आणि रिटा, रवांडाची फ्लोरियाना, चिलेची अ‍ॅन्टोनेला, युगांडाची सारा, स्पेनची मार्गा, फ्रान्समध्ये मार्सेला मेडिटरेनियन सिनेमाला वाहिलेला महोत्सव भरवणारी निकोला, जर्मनीच्या करीन, मारिया आणि लुसिया आणि आपल्या भारतातली नुपूर बासू अशा अनेक जणी सहभागी झाल्या होत्या. अ‍ॅना आणि रिटा यांचे महोत्सव जेमतेम दोनेक वर्षांचे आहेत. प्रत्येकीची भाषा निराळी आहे. इंग्लिशमध्ये सगळ्याजणी सहजपणे बोलू शकतात असंही नाही. पण जिद्द सगळ्यांची सारखीच. जगभरातल्या बायकांनी सांगितलेल्या गोष्टींना व्यासपीठ देण्याची तळमळही तीच.

या चर्चासत्रात प्रत्येकीने आपापले अनुभव सांगितले. विशेषत:, तरुण मुलींच्या मनात असंख्य प्रश्न होते. पुरुष दिग्दर्शकांनी केलेले पण महिलांची गोष्ट मांडणारे, त्यांना केंद्रस्थानी ठेवणारे सिनेमे आपल्या महोत्सवामध्ये असावेत की नाही? महिलांचा महोत्सव म्हटला की पुरुष तिथे फार लक्ष देत नाहीत, त्यांचा सहभाग वाढावा यासाठी काय करायला हवं? जास्तीत जास्त लोकांना अशा महोत्सवांकडे कसं आकर्षित करायचं?

पुरुष दिग्दर्शकांचे सिनेमे, मग ते महिलांविषयीचे असले तरीही असू नयेत असं बहुसंख्य बायकांचं म्हणणं होतं. जगभरात असंख्य चित्रपट महोत्सव आहेत. तिथे पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतोच की. हे व्यासपीठ खास महिलांसाठी आहे. त्यामुळे दिग्दर्शक महिलाच हवी. मग भले तिचा सिनेमा महिलांचे प्रश्न मांडणारा असेल किंवा नसेल. आपल्याला लोकांसमोर ठेवायचाय तो जगभरातल्या वेगवेगळ्या महिला दिग्दर्शकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. कोणत्याही विषयावरचा. कोणतीही समस्या मांडणारा. किंवा अगदी समस्या न मांडता त्यांना भावणाऱ्या गोष्टीतून काही सांगू इच्छिणारा. मग ती कल्पनेतून निर्माण झालेली गोष्ट असो की वस्तुस्थिती सांगणारी डॉक्युमेंटरी.

पुरुषांचा सहभाग वाढवण्याबाबतही या सगळ्यांनी खूप चर्चा केली. तरुण मुलींच्या मते आजचे मुलगे बऱ्यापैकी सहकार्य करणारे आहेत, पण तरीही ही संख्या म्हणावी तेवढी मोठी नाही. प्रेक्षकांच्या संख्येविषयीही काही जणी नाराज वाटत होत्या.

भारताच्या नुपूर बासूने आपला अनुभव सांगताना म्हटलं, ‘२००५मध्ये आयएडब्ल्यूआरटीने आशियाई महिला चित्रपट महोत्सव सुरू केला. अगदी छोट्या पातळीवर. पण हळूहळू तो वाढत गेला आणि या वर्षी २० देशांमधून आशियाई मूळ असलेल्या आणि जगात कुठेही राहणाऱ्या ५० महिला दिग्दर्शकांचे सिनेमे आमच्या महोत्सवामध्ये आम्ही समाविष्ट करू शकलो. या निवडीसाठी आमच्याकडे ७०० महिला दिग्दर्शकांचे सिनेमे आले होते.’ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने या महोत्सवाचं आयोजन होतं. इथे स्पर्धा नसते पण एक थीम मात्र असते. शिवाय एक देश निवडून तिथले काही सिनेमे दाखवले जातात. या वर्षी महोत्सवादरम्यान आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातून येणाऱ्या मुलींसाठी फिल्म मेकिंगवर वर्कशॉप घेतलं गेलं आणि जगभरात गाजलेल्या ‘मी टू’ चळवळीवर एक चर्चासत्रही आयोजित करण्यात आलं होतं.

नुपूरने या गप्पांमध्ये एक सूचनाही केली. ‘आपल्या काही महोत्सवांमध्ये दिग्दर्शकाचा पहिलाच सिनेमा दाखवू अशी जी अट असते, ती आपण काढून टाकायला हवी. जगभरातल्या बायकांनी केलेल्या चांगल्या सिनेमांना व्यासपीठ देणं एवढाच आपला उद्देश असावा. नाहीतर सगळीकडे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आणि आपल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये फरक तो काय राहणार?’

‘फेम सिने वीमेन्स सिनेमा फेस्टिव्हल’ हे नाव आहे चिलेच्या अ‍ॅन्तोनेच्या महोत्सवाचं. सॅन्तिआगोमध्ये गेली नऊ वर्षं हा महोत्सव होतोय आणि चिलेमधला अशा प्रकारचा हा एकमेव महोत्सव आहे. ‘सिनेमा करू इच्छिणार्‍या मुलींना स्फूर्ती मिळावी यासाठी एक व्यासपीठ हवं. जगभरात बायका विविध विषयांवर सिनेमे करताहेत, चांगले सिनेमे करताहेत हे या मुलींना कळावं या विचारातून आम्ही सुरुवात केली. आम्ही महोत्सवादरम्यान घेत असलेल्या वर्कशॉप्सच्या माध्यमातून त्यांचा दृष्टिकोन विस्तारला जावा हाही आमचा हेतू होता. पण नुसताच कलेचा विचार करून चालत नाही. महोत्सव आयोजित करायचा म्हणजे नेटवर्क लागतं, माणसं जमवावी लागतात. त्यातून आमचा महोत्सव पूर्णपणे मोफत आहे. कोणताही सिनेमा पहायला, वर्कशॉप किंवा मास्टरक्लासमध्ये सहभागी व्हायला आम्ही एकही पैसा घेत नाही. शिवाय, सॅन्तिआगो शहरातल्या बारा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी सिनेमे दाखवले जात असतात. त्यामुळे जगातल्या बायकांनी केलेले सिनेमे जास्तीत जास्त लोकांनी पहावेत म्हणून आम्ही आमची महानगपालिका, सांस्कृतिक संस्था यांची तर मदत घेतोच, पण आमच्या अ‍ॅक्टर्सनाही या महोत्सवाची जाहिरात करायला सांगतो. नव्या दमाच्या चिलियन फिल्म मेकर्स आम्ही निर्माण करू शकतोय असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.’

मात्र या सगळ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता पैशाचा. दिवसेंदिवस असे महोत्सव भरवणं आर्थिकदृष्ट्या कठीण जातंय हे सगळ्यांना जाणवत होतं. फ्लाईंग ब्रूमने तर सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून मिळणारं अनुदान या वर्षी पूर्णपणे थांबल्याचं सांगितलं. मग या बायकांनी एक शक्कल लढवली. अंकारामधल्या काही महिला उद्योगपतींकडे त्या गेल्या आणि तुम्ही अशा प्रकारचे महोत्सव प्रायोजित करायला हवेत हे त्यांना पटवून दिलं. अशा तीन महिलांकडून फ्लाईंग ब्रूमला यंदा बऱ्यापैकी रक्कम मिळाली. त्याचप्रमाणे काही कलाप्रेमी मंडळींनी, एम्बसीजनी, खाजगी कंपन्यांनीही मदतीचा हात पुढे केला.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4861/Kon-hote-sindhu-loka

.............................................................................................................................................

कॅनडाच्या लेस्लीने अत्यंत प्रसिद्ध अशा टोरॅन्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडे आपण गेली काही वर्षं सातत्याने सहकार्य मागत आहोत, या वेळेला त्यांनी आपल्याला भेटायला बोलावलं म्हणजे हळूहळू का होईना पण आपण एकेक पाऊल पुढे टाकत आहोत, असा आशावादी सूर काढला.

आशावाद तर या चर्चेमध्ये ठासून भरला होता. वयाच्या सत्तरीकडे आलेल्या घैस असोत किंवा पंचविशीतली डॉरीस असो, त्यांची सकारात्मकता नुसतीच दिलासा देणारी नव्हे, तर मनाला उभारी देणारी होती. फ्लाईंग ब्रूम फेस्टिव्हलच्या निमित्ताने आपण एकत्र आलो, पण यापुढेही आपल्यातला संवाद असाच सुरू राह्यला हवा याविषयी सगळ्यांचंच एकमत होतं. एकमेकींच्या अडचणी समजून घेणं, एकमेकींना आधार देणं आणि एकमेकींच्या साहाय्यानं मोठं होणं अशा सकारात्मक सूरावर हे चर्चासत्र संपलं.

तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहतच होते. त्यांची तळमळ, त्यांचा झगडा पाहून मनात आलं, अनेक माणसं लहान लहान पातळ्यांवर अनेक चांगली कामं करत असतात. त्या प्रत्येकाच्या नशिबी असा झगडा असावाच लागतो का? समाजातला एक मोठा भाग या सगळ्यापासून दूर का असतो? आपल्या परिघाच्या किंचित बाहेर पडून डोकावणं बहुसंख्य लोकांना एवढं कठीण का जातं? प्रत्येकाला काहीतरी वेगळं करणं जमतंच असं नाही किंवा स्वत:साठी वा स्वत:च्या कुटुंबासाठी कमावण्याखेरीज प्रत्येक जण वेगळं काही करू शकतेच/ शकतोच असंही नाही; पण मग अशी धडपड करणाऱ्यांच्या, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्यांच्या, स्वत:साठी नव्हे तर त्यापलीकडे विचार करून धोका पत्करणाऱ्यांच्या किमान पाठीशी उभं राहण्याची इच्छासुद्धा का होत नाही? 

.............................................................................................................................................

लेखिका मीना कर्णिक पत्रकार व चित्रपट समीक्षक आहेत.

meenakarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......