अजूनकाही
गिरीश कार्नाड (जन्म १९ मे १९३८, माथेरान; मृत्यू १० जून २०१९, बेंगळुरू) यांची ओळख नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक आणि विचारवंत अशी राहिली. आपल्या पन्नासहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केवळ कन्नडच नव्हे तर आधुनिक भारतीय नाटकाला नवी दृष्टी मिळवून दिली. नवे परिमाण दिले. त्यामुळे मोहन राकेश, धर्मवीर भारती, बादल सरकार, विजय तेंडुलकर यांच्याबरोबरीनं त्यांना ‘आधुनिक भारतीय नाटका’चे शिल्पकार मानले जाते.
साहित्य अकादमी ही अखिल भारतीय पातळीवर साहित्यासाठी काम करणारी संस्था भारतीय भाषांमधील विविध मान्यवर लेखकांवर लघुपट निर्मिती करते. त्यात त्यांनी गिरीश कार्नाड यांच्यावरही दोन भागांत लघुपट केला आहे. या लघुपटात कार्नाड त्यांचं बालपण, कुटुंब, शिक्षण, नाटकांचा प्रभाव इथपासून ऑक्सफर्डला उच्चशिक्षणासाठी जाणं, अशा विविध विषयांबाबत बोलले आहेत. कन्नड लघुपट दिग्दर्शक के. एम. चैतन्य यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बादल सरकार, विजय तेंडुलकर, मोहन राकेश, धर्मवीर भारती या आधुनिक नाटककारांच्या सोबतीनं कार्नाड यांनी आधुनिक भारतीय नाट्यपरंपरेचा पाया घातला. हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लघुपट पाहायला हवा.
कार्नाडांनी ‘ययाती’ हे नंतरच्या काळात मानदंड मानल्या गेलेलं नाटकं वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी लिहिलं. १९६२मध्ये प्रकाशित झालेलं हे नाटक त्यांनी कन्नडमध्ये लिहिलं. कार्नाडांनी ‘ययाती’द्वारे पुरुषप्रधान सत्ता व विचारसरणीवर झगझगीत प्रकाशझोत टाकला आहे. पुरुषांच्या लेखी स्त्रीचं दुय्यमत्व अधोरेखित करताना ययाती चित्रलेखेला पातिव्रत्याचा उपदेश करतो. त्याद्वारे कार्नाड हिंदू पुरुषाची दांभिकता व दुट्टपीपणावर मार्मिक टिपणी करतात. कार्नाडांनी मूळ कथेची पुनर्रचना आणि पात्रांवर आधुनिक स्त्रीच्या संवेदनशीलतेचं रोपण करून ‘ययाती’ला एक आधुनिक परिणाम बहाल केलं. कार्नाडांचं हे पहिलंच नाटक खूप गाजलं. अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. अनेक भाषांमध्येही त्याचे प्रयोगही सादर झाले. प्रायोगिक नाटकांविषयी कार्नाडांचं म्हणणं पुढील मुलाखतीमधून जाणून घेता येतं. ही मुलाखत शांता गोखले आणि सुनील शानभाग यांनी घेतली आहे.
‘तुघलक’ (१९६४), ‘हयवदन’ (१९७२) ‘तलेदंड’ (१९९०) ही त्यांची मिथकांवर आधारलेली नाटकंही गाजली. त्यांचेही अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद, प्रयोग झाले. पद्मभूषण (१९९२), कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९३), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४), कालिदास सन्मान (१९९९), ज्ञानपीठ पुरस्कार (१९९९) अशा विविध मानाच्या पुरस्कारांनी कार्नाडांना गौरवण्यात आलं. भाषा आणि संस्कृती, नाटक आणि भारतीय नाट्यपरंपरा यांविषयी कार्नाड नेहमीच तळमळीनं बोलत. प्रसंगी भूमिका घेत.
अनंतमूर्ती यांच्या ‘संस्कार’ या कादंबरीनं कन्नड साहित्यसृष्टीमध्ये खळबळ माजवली होती. ही कादंबरी वाचल्यावर कार्नाड इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी काही करून ही कादंबरी आपलीशी करायची होती. त्यातूनच त्यावरच्या सिनेमाची पटकथा त्यांनी लिहिली. दुर्वासपूर या गावात दहा ब्राह्मणांची घरं असतात. यातील नारायणप्पा वगळता इतर सर्व माध्व ब्राह्मण अतिशय कर्मठ असतात. नारायणप्पा मात्र मांसाहार करतो, दारू पितो. इतकंच काय पण त्याची चंद्री नावाची शूद्र जातीतली रखेलही असते. नारायणप्पा मरतो, तेव्हा इतर ब्राह्मणांना प्रश्न पडतो की, या जातीभ्रष्ट नारायणप्पावर अंत्यसंस्कार करावेत की नाहीत? या कादंबरीवर आधारलेल्या याच नावाच्या सिनेमाची पटकथा कार्नाडांनी १९६९मध्ये लिहिली आणि त्यात अभिनयही केला. या चित्रपटामुळे कन्नडमध्ये कलात्मक चित्रपटांची लाट निर्माण झाली असं मानलं जातं. गंमत म्हणजे सुरुवातीला या चित्रपटावर मद्रास सेन्सॉर बोर्डानं बंदी आणली होती. ती केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला हटवली. या सिनेमाचे दिग्दर्शक पट्टाभि रामा रेड्डी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आलं.
कार्नाडांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला. १९७६ सालच्या ‘मंथन’ या श्याम बेनेगल यांच्या सिनेमातली मध्यवर्ती भूमिका त्यांनी केली होती. हा सिनेमा गुजरातमधील आनंद दूध सहकारी संस्थेचे संस्थापक वर्गीस कुरिअन यांच्यावर आधारलेला होता. या सिनेमाची पटकथा, संवाद विजय तेंडुलकरांनी लिहिलेले आहेत.
‘उंबरठा’ (१९८२) या मराठी सिनेमात कार्नाडांनी स्मिता पाटील यांच्यासह काम केलं होतं. या सिनेमाची पटकथा, संवाद विजय तेंडुलकरांनी लिहिलेले आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केलं तर, संगीत दिग्दर्शन हृदयनाथ मंगेशकर यांनी.
२०१२मध्ये कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एक था टायगर’ या सिनेमात शेणॉय सरची छोटीशी भूमिका केली होती. या सिनेमात कार्नाड हे सलमान खानचे बॉस असतात. हा सिनेमा रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेतील माजी सहकारी रवींद्र कौशिक यांच्यावर आधारलेली होती. मात्र वादविवाद टाळण्यासाठी त्यात अनेक बदल केले गेले.
‘एक था टायगर’मधील अजून एक प्रसंग
‘तब्बलियु नीनाटे मगने’ (१९७७), ‘ओंदानोंदु कालदल्लि’ (१९७८) हे त्यांचे कन्नड सिनेमेही गाजले. यातील पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी बी. व्ही. कारंथ यांच्यासह केलं होतं. या सिनेमाची पटकथाही लिहिली होती. तर दुसऱ्याचं कथा, पटकथा आणि दिग्दर्शन असं सर्व कार्नाडांचं होतं.
कार्नाडांनी १९८४मध्ये ‘उत्सव’ या प्रणयप्रधान हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. याची पटकथाही त्यांचीच होती. या सिनेमाची निर्मिती शशी कपूर यांनी केली होती, तर त्यात रेखा यांनी प्रमुख भूमिका केली होती.
कार्नाड नेहमीच अन्याय, अत्याचार, जातीय द्वेष आणि सरकारी दडपशाही याविरोधात भूमिका घेत. २०१८मधील भीमा कोरेगाव प्रकरणानंतर ज्या पाच सामाजिक कार्यकर्ते, कवी आणि लेखकांना ‘अर्बन नक्सल’ ठरवत सरकारनं अटक केली होती, त्याविरोधात ते ‘Me Too urban Naxal’ असा बोर्ड गळ्यात अडकवून काही दिवस फिरत होते.
२०१५मध्ये त्यांनी टिपू सुलतानविषयी केलेल्या एका विधानामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या होत्या. टिपू सुलतानविषयी कर्नाटकात वाद चालू असताना त्यांनी म्हटलं होतं की, ‘टिपू सुलतानला कर्नाटकात ते स्थान मिळायला मिळालं असतं, जे महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांना आहे. पण तो मुस्लीमऐवजी हिंदू असता तर.’ २०१६मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करणाऱ्या, कन्हैया कुमारच्या अटकेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्च्यांमध्ये भाग घेतला होता.
अलीकडच्या काळात कार्नाड यांच्या काही विधानांमुळे वादही झाले होते. पहिला वाद झाला तो त्यांच्या रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीच्या विधानामुळे. ‘टागोर हे दुय्यम दर्जाचे नाटककार आहेत’ असे त्यांनी एका समारंभात म्हटले. त्यावरून देशभर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर २०१२मध्ये मुंबईतल्या टाटा लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांनी नोबेल विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांनी भारताचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सतत सांगितल्यामुळे आणि मुस्लिमांचं भारतातलं योगदान नाकारल्यामुळे टीका केली होती. याच महोत्सावमध्ये नायपॉल यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार होता. त्यामुळे कार्नाड यांची टीका उचित आणि तारतम्यपूर्ण नाही, अशी टीका झाली होती. पण आपल्याला वाटतं ते निर्भीडपणे सांगण्याचा कार्नाड यांचा बाणा होता. त्यात त्यांनी कधीही कुचराई केली नाही.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ashok Rajwade
Wed , 12 June 2019
गिरीश कार्नाडांच्या विषयी दोन भागातला जो माहितीपट बनवला आहे तो आताच पाहिला. उत्तम आहे. बाकीचं अजून पहायचं आहे.