‘गॉडझिला : द किंग ऑफ द मॉन्स्टर्स’ -  निराशाजनक नसला तरी लिखाणाच्या पातळीवर सदोष
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘गॉडझिला : द किंग ऑफ द मॉन्स्टर्स’चं पोस्टर
  • Sat , 01 June 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie गॉडझिला : द किंग ऑफ द मॉन्स्टर्स Godzilla : King of the Monsters

‘गॉडझिला’ ही चित्रपट-मालिका १९५४ मधील पहिल्या जपानी चित्रपटापासून सुरू होत अजूनही वेळोवेळी अद्ययावत होत असलेली जगातील सर्वाधिक मोठी फिल्म फ्रँचाइज आहे. ही आख्यायिका अस्तित्वात येण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच जगभरात तिची रूपांतरं व्हायला सुरुवात झाली. कालांतरानं बऱ्याच वेगवेगळ्या  चित्रपट निर्मिती कंपन्यांनी ‘गॉडझिला’च्या निर्मितीचे हक्क मिळवले. एकंदर काही वर्षांनी तिचे नवीन रिमेक्स/रिबूट्सची निर्मिती केली जात असताना त्यात कथानकाच्या किंवा आशयाच्या पातळीवर आधीच्या चित्रपटांहून वेगळे असे विशेष बदल घडतात असं नाही. याआधी आलेले (आणि भविष्यातही येऊ घातलेले) मूळ जपानी ‘गॉडझिला’ चित्रपट-मालिकेवर आधारित रिबूट्स पाहताना त्यांच्या हाताळणीची नवीन शैली आणि चित्रपट निर्मितीच्या स्तरावरील नवीन दृष्टिकोन इतकंच काय ते नवीन मिळेल हे लक्षात घ्यायला हवं. जर या मर्यादित अपेक्षा मनात ठेवत ‘मॉन्स्टरव्हर्स’कडे पाहिलं तर हे चित्रपट निराश करत नाहीत. पण त्यांचं केवळ निराशाजनक नसणं त्यांना चित्रपट म्हणून उत्तम बनवतं अशातला भाग नाही.

‘गॉडझिला : द किंग ऑफ मॉन्स्टर्स’ हा लिजंडरी पिक्चर्स या चित्रपट निर्मिती कंपनीच्या ‘मॉन्स्टरव्हर्स’ मालिकेतील तिसरा चित्रपट आहे, तर ‘गॉडझिला’ (२०१४) या चित्रपटाचा पुढील भाग आहे. २०१४ मध्ये गॉडझिलाच्या अस्तित्वात येण्यानं बरीच जीवित आणि वित्तहानी झाली होती. या विध्वंसात एमा (वेरा फार्मिगा) आणि मार्क (काइल चँडलर) या जोडप्यानं त्यांचा मुलगा, अँड्र्यू गमावलेला आहे. एमा आणि मार्क विभक्त झाल्यानंतर त्यांची मुलगी मॅडिसन (मिली बॉबी ब्राऊन) एमासोबत राहते. पूर्वी ते दोघेही मोनार्क या काळाच्या ओघात लुप्त झालेल्या प्राण्यांचा शोध आणि अभ्यास करणाऱ्या संस्थेत काम करत असले तरी अँड्र्यूच्या मृत्यू पश्चात मार्कने तिथं काम करणं बंद केलं आहे. एमा मात्र अजूनही या प्राण्यांना पुन्हा अस्तित्वात आणण्याचं काम करत असते.

‘गॉडझिला’ तर अस्तित्वात आहे, पण मोनार्कनं आता इतरही बरेच विलुप्त झालेले अवाढव्य जीव पुन्हा अस्तित्वात येतील याची व्यवस्था केली आहे. या प्राण्यांचा जैविक हत्यारं म्हणून वापर केला जाण्याची शक्यता लक्षात घेता या सगळ्या प्रकरणाला सरकारचा विरोध आहे. त्यावरील कारवाई सुरू असतानाच मोथरा या अवाढव्य जीवाच्या अस्तित्वात येण्याची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र लागलीच अॅलन जोराच्या (चार्ल्स डान्स) नेतृत्वाखालील एक अतिरेकी संघटना एमा, मॅडिसन यांचं अपहरण करत या सर्व अक्राळविक्राळ प्राण्यांना नियंत्रित करणारं ‘ओक्रा’ हे उपकरण हस्तगत करतात. त्यानंतर चित्रपट एमा-मॅडिसन यांची सुटका करणं आणि गॉडझिलासोबतच इतर तब्बल सतरा प्राण्यांचा पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांतील विध्वंसक वावर थांबवणं अशा दोन पातळ्यांवर सुरू राहतो.

तर प्राचीन जपानमध्ये या प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, इतर विध्वंसक प्राण्यांचा संहार करणाऱ्या गॉडझिलाकडे मानवजातीचा एक प्रकारचा मित्र म्हणून पाहणं, या ‘गॉडझिला’ चित्रपट-मालिकेशी निगडित संकल्पना डॉ. इशिरो सेरिझावाच्या (केन वॉट्नाबे) माध्यमातून दिसून येतात.

‘गॉडझिला : द किंग ऑफ मॉन्स्टर्स’मधील उणिवा या मुख्यत्वे लिखाणाच्या पातळीवरील आहेत. ज्यामुळे लिखाणाच्या दृष्टिकोनातून सदोष आणि अविकसित असलेली पात्रं, कथानकातील एकसंधतेचा अभाव या गोष्टी ठळकपणे जाणवतात. चित्रपटातील बहुतांशी कलाकारांची कामगिरी चांगली असली तरी चार्ल्स डान्स, सॅली हॉकिन्ससारख्या अभिनेत्यांना क्षुल्लक भूमिकांमध्ये जवळपास वाया घालवलं आहे.

दिग्दर्शक मायकल डोगर्टीचं दिग्दर्शन नेटकं आहे. लिजंडरी पिक्चर्सच्या ‘मॉन्स्टरव्हर्स’मधील चित्रपटांचे दिग्दर्शक आणि एकुणातच हॉलिवुडमधील इतरही मॉन्स्टर फ्रँचाइजचे अलीकडील काळातील दिग्दर्शक पाहता प्रॉडक्शन स्टुडिओज इंडी चित्रपटांच्या आणि त्यातही पुन्हा भयपटांसाठी नावाजल्या गेलेल्या दिग्दर्शकांवर भर देत असल्याचं दिसून येतं. ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटविश्वातल्या ‘ज्युरासिक वर्ल्ड’ चित्रत्रयीच्या दिग्दर्शकांची नावंदेखील याकडेच इशारा करतात. ‘ज्युरासिक वर्ल्ड : द फॉलन किंगडम’चा उत्तरार्ध एखाद्या छोटेखानी भयपटासारखा वाटतो, यामागेही त्याचा दिग्दर्शक जे. ए. बायोना याचा महत्त्वाचा वाटा आहे.

‘मॉन्स्टरव्हर्स’मधील चित्रपटांचा विचार करता ‘गॉडझिला’ (२०१४), ‘काँग : स्कल आयलंड’ (२०१७) आणि आता ‘गॉडझिला : द किंग ऑफ मॉन्स्टर्स’ या तिन्ही चित्रपटांमधील रंगपटलासारख्या बाबींवर विचारपूर्वक काम केल्याचं दिसतं. पूर्वीच्या दोन्ही चित्रपटांत लाल-नारंगी रंगांच्या छटांवर भर देण्यात आला होता, तर इथं चित्रपटभर निळा रंग कायम राहील असं पाहिलं जातं. त्यातही पुन्हा निरनिराळ्या मॉन्स्टर्सच्या अनुषंगानं निळसर ते नारंगी/पिवळसर अशा तऱ्हेचे रंग दिसतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन, छायाचित्रण, अॅनिमेशन, इत्यादी विभागातील कामगिरी लिखाणापेक्षा अधिक सरस आहे.

एकूणच ‘गॉडझिला : द किंग ऑफ मॉन्स्टर्स’ हा सर्वस्वी वाईट किंवा निराशाजनक चित्रपट नसला तरी तो लिखाणाच्या पातळीवर सदोष नक्कीच आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख