अजूनकाही
मला आठवतं. इयत्ता दहावीच्या मराठीच्या व्याकरणात आम्हाला अभ्यासाला 'चेतनागुणोक्ती' अलंकार होता आणि त्याचं उदाहरण म्हणून बालकवींच्या 'फुलराणी'मधल्या ओळी होत्या...
छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून... हळूच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणींना?
लाजलाजली या वचनांनी... साधी भोळी ती फुलराणी...
तारुण्यसुलभ भावनांचं इतकं तरल चित्रण त्यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं बहुधा... अलीकडे हे निसर्गचित्रण वेगळ्याच दृष्टिकोनातून मी पाहू लागलो आहे. या ओळी असोत किंवा...
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर...
हे उंबराच्या वृक्षाचं वर्णन असो... बालकवींचं हे साहित्य म्हणजे मला अॅनिमेशनपटांसाठीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज वाटतो. केवळ निर्जीव वस्तूंवर केलेलं सजीवांच्या सवयींचं रोपण म्हणून नव्हे, तर त्यातल्या भावनाही तितक्याच जिवंतपणे चितारल्या गेल्या आहेत म्हणून. अॅनिमेशनपट म्हणजे लहान मुलांची करमणूक करण्यासाठी काढलेले रद्दड आणि टाकाऊ चित्रपट, असं जे एक चुकीचं समीकरण भारतीय प्रेक्षकांच्या मनात भरवलं गेलं आहे, ते मोडण्याची योग्य वेळ येऊन ठेपली आहे.
ऑस्करविजेत्या अॅनिमेशनपटांवर एक नजर टाकली, तरी आपल्या सहज लक्षात येईल की, ‘हे येरागबाळाचे काम नोहे’. 'UP'सारख्या उत्कृष्ट अॅनिमेशनपटात फुग्यांसह घरच उडवून नेण्याची अगदी आगळीवेगळी संकल्पना असली, तरी त्यात फक्त तेवढंच नाही. एली आणि कार्ल फ्रेड्रीकसन यांची प्रेमकथा हा या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भाग आहे. इतकी तरल प्रेमकथा मी हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांमध्येही अजून पाहिलेली नाही. दक्षिण अमेरिकेचा पॅराडाईज धबधबा दाखवायला नेण्याचं वचन लहानगी एली कार्लकडून घेते, पण संसाराचा गाडा ओढताना होणाऱ्या खर्चात कार्लला त्यासाठी वेळच मिळत नाही. जेव्हा त्याला त्या वचनाची जाणीव होते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. पण एलीचं कार्लवर इतकं प्रेम असतं की, पॅराडाईज धबधब्यावर गेल्यावर करायच्या गमतीजमतींसाठी राखून ठेवलेली स्वतःच्या वहीतली पानं कार्लसोबत घालवलेल्या छोट्या छोट्या क्षणांनी तिने भरून टाकलेली असतात. इथेच 'UP' जिंकतो. मग तो लहान मुलांचा चित्रपट राहत नाही.
अशाच प्रकारचे इतर चित्रपट बनवत, केवळ लहान प्रेक्षकांना डोळ्यासमोर न ठेवता हॉलीवूडच्या अॅनिमेशनपटांनी नेहमीच सर्वसमावेशक असं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. 'Finding Nemo' या अॅनिमेशनपटामधून बापलेकाचं हृद्य नातं समोर येतं. बाबांचं न ऐकता समुद्राच्या पृष्ठभागावर येणारा निमो आपल्याला इथे भेटतो. त्याचप्रमाणे मुलगा अडचणीत असल्याचं कळल्यावर सात समुद्र ओलांडून जाणारा प्रेमळ बापही भेटतो. 'Ratatouille' ही मग केवळ एका स्वयंपाकी उंदराची गोष्ट राहत नाही, तर 'जेवण कुणीही बनवू शकतं' असा संदेश देत टीमवर्कचं महत्त्व विशद करणारी ती एक सशक्त कथा बनते. 'Wall-E'मधून एक बुलडोझर आणि एक रोबोट यांची सुंदर प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळते, तर 'Big Hero 6'मधून मानवजातीच्या कल्याणासाठी निर्मिलेल्या एका रोबोटसह सहा जणांचा गट करणारे सुपरहिरोज आपल्याला दिसतात. 'Inside Out' हा अॅनिमेशनपट खरं तर एका प्रबंधाचाच विषय व्हायला हवा. मानवी मनोव्यापारांचं गुंतागुंतीचं चित्रण यात ज्या सुंदर पद्धतीने मांडण्यात आलं आहे, त्याला तोड नाही. मानसशास्त्रासारख्या जटिल विषयावर आधारलेल्या या अॅनिमेशनपटामागे किती गहन विचार असेल, याची कल्पनाच केलेली बरी! हे झालं ऑस्कर पुरस्कारप्राप्त काही चित्रपटांविषयी.
'Inside Out' या अॅनिमेशनपटातील एक दृश्य
याव्यतिरिक्त इतर अॅनिमेशनपटांचेही काही वाखाणण्याजोगे गुणविशेष आहेतच. प्रत्येक प्राण्याला वाटणारी कुटुंबाची, समूहाची गरज उपदेशाचे कोणतेही डोस न पाजता 'Home' या अत्यंत साध्या अॅनिमेशनपटात विशद करण्यात आली आहे. व्हिडिओ गेममधल्या पात्रांवर आधारलेल्या 'Wreck It Ralph' या अॅनिमेशनपटात एका खलनायकाचा सुष्ट होण्याचा प्रयत्न आणि शेवटी त्याने स्वतःच्या दुष्ट व्यक्तिमत्त्वाचा केलेला स्वीकार असा सगळा प्रवास येतो. 'जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा' हे तत्त्व हा चित्रपट अगदी सहजपणे सांगून जातो. 'The Croods'मधून 'स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या' हा संदेश दिला आहे, तर 'Coraline' या वेगळ्याच धाटणीच्या भयपटामधून आपल्याला एका वेगळ्याच विश्वाचं दर्शन होतं. दूर कुठेतरी दुसऱ्या विश्वात आपलीच एक प्रतिकृती अस्तित्वात असेल तर! त्या विश्वाच्या काय मागण्या असतील आपल्याकडून? अशा एका संपूर्ण वेगळ्याच विषयाला हा अॅनिमेशनपट हात घालतो. टाईम मशीनच्या संकल्पनेवर आधारलेले 'Mr. Peabody and Sherman' आणि 'Meet The Robinsons' हे दोन अॅनिमेशनपट या एकाच विषयाकडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहतात. 'Mr. Peabody and Sherman' तर इतिहास, भूगोल, विज्ञान, मानसशास्त्र, फ्रेंच राज्यक्रांती, इजिप्शियन संस्कृती असा बराच मोठा पट साकारतो.
नाही म्हणायला 'Angry Birds'सारखे तद्दन टाकाऊ अॅनिमेशनपटही अधूनमधून येत असतात, पण त्यांची संख्या मोजकीच.
१९७४ साली आलेला 'एक, अनेक और एकता' हा अॅनिमेशनपट भारताच्या चित्रपट-इतिहासात एक मैलाचा दगड समजला जावा. 'सूरज एक, चंदा एक, तारें अनेक' हे त्यातले शब्द आमच्या पिढीतल्या कित्येकांच्या तोंडपाठही असतील. फिल्म्स डिव्हिजनची निर्मिती असलेल्या या अॅनिमेशनपटाला अनेक पुरस्कारही मिळाले होते. भारताच्या विविधतेतल्या एकतेचा सुंदर संदेश या अॅनिमेशनपटात होता. पण त्यानंतर काय? अॅनिमेशनपट वगळता 'करामती कोट', 'कभी पास कभी फेल', 'हेलो' अशा बालचित्रपटांचीही निर्मिती त्या काळात होत होती, पण नंतरच्या काळात मात्र अॅनिमेशनपटांच्या बाबतीतलं भारताचं चित्र फार काही आशादायी नाही. जाहिरातींसाठीच्या अॅनिमेशनक्षेत्रात भले वेगवेगळ्या नवीन कल्पनांचा उदय झालेला दिसेल, पण पूर्ण लांबीच्या अॅनिमेशनपटांबद्दल मात्र आजच्या पिढीची निराशाच व्हावी.
'एक, अनेक और एकता’मधील एक दृश्य
'हनुमान', 'बाल गणेश' हे काही अॅनिमेशनपट तिकीटबारीवर थोडेफार चालले, पण त्यानंतर मात्र दखल घ्यावा असा एकही अॅनिमेशनपट भारतात तयार झालेला नाही. मागच्या काही वर्षांपासून आपण ‘छोटा भीम’मध्येच अडकून पडलो आहोत!
चित्र तसं अगदीच निराशाजनक नाही. 'Inside Out' या ऑस्करविजेत्या अॅनिमेशनपटाच्या टीममध्ये साजन स्कारिया या केरळमधल्या तरुणाचा समावेश होता. तो पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओसाठी काम करतो. या चित्रपटासाठी त्याने कॅरॅक्टर सुपरवायझरची भूमिका बजावली होती. म्हणजेच आपल्याकडे कल्पनाशक्तीचा, हुशारीचा अभाव आहे असंही नाही. इथल्या तरुणांना पिक्सारमध्ये जाऊन काम करावंसं वाटतं, यातच सारं काही आलं.
संजय पटेल या भारतीय तरुणाने दिग्दर्शित केलेल्या 'Sanjay's Super Team' या लघुपटाला अलीकडेच ऑस्कर नामांकन मिळालं होतं. एका लहान मुलाच्या भावविश्वात देवी दुर्गा, हनुमान आणि विष्णू हे सुपरहिरोज म्हणून कसे प्रस्थापित होतात, याची कथा सांगणारा हा एक उत्कृष्ट लघु अॅनिमेशनपट होता. भविष्यात आशयघन अॅनिमेशनपट बनवू इच्छिणाऱ्यांसाठी हा लघुपट एक आशेचा किरण आहे.
'Sanjay's Super Team'चं एक पोस्टर
भारतात अजूनही थ्रीडी तंत्रज्ञान म्हणावं तसं विकसित झालेलं नाही, पण म्हणून आशयगर्भ आणि प्रभावी अॅनिमेशनपट बनवण्यातला तो अडथळा आहे, अशी पळवाट आपल्याला शोधता येणार नाही. हे तंत्र इथे प्रगत देशांइतकं विकसित व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही. मग तिथल्यासारखे चकचकीत आणि थ्रीडीचा उत्तम अनुभव देणारे चित्रपट इथेही यायला लागतील, पण मग हे अंतर्मनाचा शोध घेण्याऐवजी वरलिया रंगाला भुलल्यासारखं होईल. बिग बजेट अॅनिमेशनपट येतील, पण ते काळाच्या कसोटीवर टिकून राहणार नाहीत.
आपण ‘छोटा भीम’मध्येच अडकून पडलो आहोत!
हॉलिवूडच्या अॅनिमेशनपटांचा भर मुख्यत्वे कुटुंबव्यवस्था, स्वत्व, चिरंतन वैश्विक मूल्यं यांची जपणूक करण्यावर दिसतो. परदेशांमध्ये कदाचित या गोष्टींची जाणीव नवीन पिढीला करून देण्याची गरज जास्त भासत असेल, पण जागतिकीकरणाचे परिणाम इतर देशांबरोबर भारतही भोगतोच आहे. इथली परंपरागत मूल्यव्यवस्था टिकून असल्याचं एक गुडीगुडी चित्र रंगवण्यात एक समाज मग्न असला, तरी त्या मूल्यव्यवस्थेला इंटरनेटच्या जगात हादरे बसायला इथेही सुरुवात झाली आहे, या सत्याकडे आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. पंचतंत्र, हितोपदेश, जातक कथा अशा प्रचंड साहित्याचा खजिना आपल्यापाशी आहे; मौखिक परंपरेने चालत आलेल्या वेगवेगळ्या प्रांतांमधल्या लोककथा आहेत. रामायण-महाभारतासारखी महाकाव्यं आहेत. 'घेता किती घेशील दो करांनी' असं वाटायला लावणारी संस्कृत नाटकं आहेत. तरीही आपण कुठे कमी पडत आहोत, याचा विचार जरूर व्हायला हवा.
त्यासाठी आपला अॅनिमेशनपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं, ही प्रथम गरज आहे. ‘मिकी माऊस, टॉम अँड जेरी पाहण्याचं आपलं वय गेलं, आता काय त्यात पाहायचं!’ हा विचार आधी बदलायला हवा. वय वाढलं, तरी खोडकर, निष्पाप बालपण जपता यायला हवं. तरच आपल्या भावी पिढीबरोबर लहान होऊन आपण त्यांच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जागतिकीकरणाच्या लाटेतही शाश्वत वैश्विक मूल्यं टिकवून ठेवण्याचे संस्कार करू शकू.
लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
abhijeet bhagwat
Sat , 24 December 2016
सिनेमा मधून नेमकं काय घ्यावं किंवा काय पाहावं हे सांगण्यासाठी धन्यवाद
Bhagyashree Bhagwat
Sat , 24 December 2016
माहीत असूनही नजरेआड होत असलेले मुद्दे नेमकेपणाने अधोरेखित करणारा लेख.