अजूनकाही
‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ साधारण नीरज पांडेच्या चित्रपटांच्या धर्तीवरील चित्रपट आहे. मुख्यतः देशाकरिता काहीही करण्यास पुढे -गे न पाहणाऱ्या लोकांची एक टीम, एक आतंकवादी आणि एक मिशन या त्याच्या स्वरूपामुळे असं भासणं साहजिक आहे. दिग्दर्शक राज कुमार गुप्ताने यापूर्वी ‘आमीर’, ‘नो वन किल्ड जेसिका’सारखे चांगले चित्रपट लिहिले आणि दिग्दर्शित केले असले तरी कालसुसंगत राहत सध्या चलती असलेल्या ‘देशप्रेम’ हा भाव केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटांच्या प्रवाहात केलेली सदर चित्रपटाची निर्मिती काही त्याच्या उत्तम चित्रपटांमध्ये मोडत नाही. कारण इथे चावून चावून चोथा झालेलं अगदीच मूलभूत स्वरूपाचं कथानक, अपेक्षित तणाव निर्माण करण्यात पटकथेला आलेलं अपयश, कथेचा (परिणामी चित्रपटाचा) नको तितका संथ प्रवास आणि मध्यवर्ती पात्रं साकारणाऱ्या अभिनेत्यांचा कामचलाऊ अभिनय या गोष्टी नक्कीच चित्रपटास अनुकूल नाहीत.
२००८ पासून भारतात जे आतंकवादी हल्ले सुरू झाले, त्यांचा सूत्रधार असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या यासीन भटकळच्या २०१३ मध्ये पकडल्या जाण्याच्या घटनेवर ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चं कथानक बेतलेलं आहे. राष्ट्रीय पातळीवरील जवळपास सर्वच गुप्तचर संस्थांनी या हल्ल्यांचा सूत्रधार असलेला, तेव्हा अज्ञात असलेला ‘घोस्ट’ दुबई किंवा तत्सम देशात असल्याचं मानलेलं असताना अगदीच अनपेक्षितपणे प्रभात कपूर (अर्जुन कपूर) आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना तो नेपाळमध्ये असल्याची बातमी मिळते. विषय संवेदनशील असल्याने केंद्रातून सहकार्य मिळत नसतानाही राजेश सिंग (राजेश शर्मा) ही टीम नेपाळला पाठवण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर अज्ञात खबरीचा मागोवा घेत स्वतःच्या जीवावर उदार होत आखल्या जाणाऱ्या योजना, त्या सफल करत गुन्हेगाराला पकडण्याचे केले जाणारे प्रयत्न अशा बाबी घडू लागतात. आणि ही टीम नेपाळमध्ये पोचल्यावर चित्रपट आधी भासत होता त्यापेक्षा जरासा अधिक रंजक बनतो.
मात्र वरवर पाहता रंजक दिसणारं हे प्रकरण बऱ्याच अंशी बाळबोधही आहे. चित्रपटातील पात्रं योजनेपेक्षा प्रयोजनावर अधिक भर देणारी आहेत. त्यामुळे ती कुठल्याही ठोस योजनेशिवाय केवळ देशप्रेमापोटी कार्य करत अतर्क्यरीत्या आपल्या जीव धोक्यात घालतात. कथानकाला पुढे नेण्यात किंचितही सहाय्यक नसलेल्या अगदीच रटाळ प्रसंगांचा चित्रपटातील समावेश त्याच्या लांबीत भर घालत चित्रपटाला कंटाळवाणा बनवण्यात नक्कीच सहाय्यक ठरतो.
नीरज पांडेच्या चित्रपटांशी, त्यातही विशेषतः अर्धाअधिक चित्रपट नेपाळमध्ये घडणं हे ‘बेबी’शी (२०१५) असलेलं साम्य स्पष्टपणे दिसून येतं. इथे ‘बेबी’मध्ये असलेल्या प्रभावी लेखन-दिग्दर्शनाचा, तितक्याच उत्तमरीत्या चित्रित केलेल्या अॅक्शन दृश्यांचा अभाव दिसून येतो. अर्थात स्वतः पांडेच त्याचा फॉर्म हरवून बसलेला असताना सदर चित्रपटाकडून अशी अपेक्षा तरी का ठेवावी म्हणा!
राजेश शर्मासारख्या इतर ज्ञात-अज्ञात कलाकारांपुढे एक विशिष्ट भाव चेहऱ्यावर घेऊन वावरणारा अर्जुन कपूर खुजा भासतो. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चा साऊंड ट्रॅक हा अमित त्रिवेदीच्या सर्वाधिक अपरिणामकारक आणि साधारण दर्जाच्या साऊंड ट्रॅक्सपैकी एक मानावा लागेल. छायाचित्रणाचा अपवाद सोडता संकलनासारख्या इतर तांत्रिक बाबीही फारशा प्रभावी नाहीत.
राज कुमार गुप्तता एक चांगला दिग्दर्शक आहे. अगदी गेल्या वर्षी आलेल्या त्याच्या एकूण अप्रभावी भासणाऱ्या ‘रेड’मध्येही त्याच्या शैलीच्या खुणा आणि काही प्रमाणात परिणामकारक अशी दृश्यं होती. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ संमिश्र भावना निर्माण करणारा असला तरी त्यामानानं काहीसा उजवा भासतो. त्यातील उणीवा मुख्यतः लेखनाच्या पातळीवरील आहेत. ज्यामुळे चित्रपटाच्या विषयाला साजेसा तणाव निर्माण करण्यात गुप्तावर काही मर्यादा येतात. इथं असलेलं लेखन अधिक सफाईदार असतं. आणि मध्यवर्ती पात्रं आणि ती साकारणारे अभिनेते दोन्हीही अधिक परिपक्व असते तर तो अधिक प्रभावी होऊ शकला असता.
सत्य घटनांवर आधारित असलेल्या आणि राष्ट्रप्रेम ही भावना उराशी बाळगून असलेल्या चित्रपटांच्या लाटेतील नको तितक्या प्रमाणात आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत राज कुमार गुप्ताचा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ जरासा उजवा भासतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment