‘वामन तावडे’ नावाचा माझा एक ‘अल्टर इगो’ तयार झाला होता!
कला-संस्कृती - नाटकबिटक
महेंद्र तेरेदेसाई
  • नाटककार वामन तावडे (निधन - ७ मे २०१९)
  • Tue , 14 May 2019
  • कला-संस्कृती नाटकबिटक वामन तावडे Vaman Tawade

वामन तावडे गेल्यावर अनेकांनी मला विचारलं- तू केव्हा लिहितोयस त्याच्यावर?

माझी गोची दुहेरी होती. कोणी गेल्यावर त्याच्यावरच्या लेखात लिहिणाराच जास्त डोकावतो. जे मला कधी आवडत नसे. आणि नेमकी तीच शक्यता वामनवर लिहिताना मला टाळता येणारी नव्हती.

आणि दुसरी गोची मी लिहिलेलं चांगलं झालंय का, हे सांगणारा तोच ते वाचू शकणार नव्हता. त्यामुळे माझं डेअरिंग होत नव्हतं.

काही दिवस जाऊ दिले आणि ठरवून लिहायला बसलो.

एकदा तो, मी नि मेघना पेठे तिच्याच दहिसरच्या की कुठल्या तरी घरी बसलो होतो. (तिला ‘रज्जू’ खूप आवडलं होतं. अर्थात नाटक. प्रयोगाबद्दल ती काहीच बोलली नव्हती.) बोलत ते दोघंच होते. मी श्रोता. मेघना तेव्हा असं काहीतरी म्हणाली होती की, “वर्तमानात जगता आलं पाहिजे...”  वामनने आपल्या डोक्यावरून हात फिरवत मिश्किल हसत होकार दिला होता. तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं. पण कालांतरानं एक पक्कं जाणवलं की, वामन कधीच आठवणीत रमत नव्हता. मला भेटला तेव्हा त्याचा ‘गोल्डन पास्ट’ सरूनही काळ लोटला होता. त्याने नुकत्याच लिहिलेल्या ‘रज्जू’ने मला ग्रासलं होतं. मी त्या (नाटक व वामन तावडे) दोघांच्या प्रेमात होतो. मी ते नाटक जसच्या तसं (verbatim) बसवलं. अशोक राणे, संजय पवार दोघांनी मला तेव्हा सोलून काढला होता. मी माझ्याच मस्तीत होतो. नाटकाला काहींनी उत्तम म्हटलं, तर काहींनी बेक्कार झोडपलं. टवाळखोर नाडकर्णींनी - नेहमी समीक्षेच्या नावानं करतात तशी - टवाळी केली. निर्माता बिथरला, नाटक बंद पडलं. पण तोपर्यंत वामन तावडे नावाचा माझा एक ‘अल्टर इगो’ तयार झाला होता.

माझ्या मेंदूचा एक भाग म्हणूनच वामन विकसित होत होता. कालांतरानं माझ्यासाठी तो नाटककार किंवा लेखक वामन तावडे म्हणून उरलाच नाही. आम्ही जे वाचायचो-लिहायचो ते एकाच हार्ड डिस्कमधून येत-जात होतं. फक्त आमच्या दोघांची शैली वेगळी. नंतर माझ्या शैलीला साजेल असं ‘चौकोन’ मी त्याच्याकडून लिहून घेतलं. कंटेन्ट त्याचा, क्राफ्ट माझा. बारबालांच्या आयुष्यावरचं ते नाटक आर.आर. पाटलांपर्यंत पोहोचलं. पुढेही आम्ही काही सिरिअल, टेलिफिल्म लिहिल्या.

पण हे सगळं होत असताना एक गोष्ट मला जाणवत होती. वामन त्याच्या वाचन, चिंतन-मनन यात खोल खोल रुतत होता. नंतर कधीतरी बोलताना विषय तो लिहीत असलेल्या नवीन नाटकानं सुरू व्हायचा, पण क्षणात नाटक बाजूला होई नि त्या संदर्भात त्याचं जे वाचन होतं, त्यावरच आम्ही खूप बोलत बसू. माणसाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, ऑस्कर वाईल्ड, गांधी, काम्यू, साने गुरुजी, रवींद्रनाथ टागोर, अभय बंग, विनोबा भावे, इरावती कर्वे, अमिश त्रिपाठी, देवदत्त पटनायक, दुर्गा भागवत, साधना, असं आडवंतिडवं जे वाचायचा त्यावर बोलायचा. पटलं तर चांगलं बोलायचा, नाही पटलं तर अस्खलित मालवणी शिव्या हासडायचा. मी ते सगळं ऐकत राहायचो. मी जणू त्याची ‘पंचिंग बॅग’ झालो होतो. ते टाळण्यासाठी मग मीही वाचू लागलो (त्यातही तो मदत करत होताच) नि हा मामला दोन्हीकडून सुरू झाला. यात त्याचं नाटक मात्र मागे पडत राहिलं.

मी शेवटी त्रासून त्याला विचारलं, याचा तू लिहीत असलेल्या नाटकाशी काय संबंध ते सांग. तो गप्प व्हायचा. त्याला सांगायचो - आधी शांतपणे, नंतर नंतर चिडून - नाटक पूर्ण कर. फार खोलात नको जाऊस. मग तो माझ्यावर चिडे, ‘असं कसं बोलतोस?’ मी म्हणायचो, ‘जितका खोल जाशील तितक्याच उंचीचा प्रेक्षक लागेल तुला.’ त्यावर मला दटावायचा, ‘प्रेक्षकांची चिंता करू नकोस, त्यांचा सन्मान कर.’ पण त्याने स्वतः तो कधीच केला नाही. त्याला आताच्या प्रेक्षकांबद्दल जराही आदर नव्हता. तो नेहमी म्हणे- मराठी नाटकांचा खरा प्रेक्षक आता क्वचितच येतो. त्याचं कारणही तो देई. आपण बनचुके झालोत… जी इंटिग्रिटी बाहेरच्या रंगकर्मींमध्ये दिसते, ती पुण्या-मुंबईच्यांकडे दिसत नाही. जे मला कधीच पटलं नाही. त्याचं साधं कारण, भूगोल. ते सांगितल्यावर मग तो थोडा निरुत्तर व्हायचा.  

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4813/Hindu-Dharmache-shaiv-rahasya

.............................................................................................................................................

लेखक या जमातीविषयी मात्र त्याला कमालीचा आदर. एका कुठल्यातरी चर्चेत अमोल पालेकर यांनी काहीतरी लेखक-विरोधी विधान केलं होतं. म्हणजे दिग्दर्शकापेक्षा लेखकाला दुय्यम मानणारं. वामननं ते पेपरमध्ये वाचलं. भयंकर भडकला होता तेव्हा. मला म्हणाला, ‘दिग्दर्शकाला पूर्वी ‘तालीम मास्तर’ म्हणत तेच बरोबर होतं.’  मी मग उगाच मध्ये ‘पण interpretation...?’ त्यावर मग तो अधिक उसळत ‘झाxxx interpretation... त्या बापाला (शेक्सपियर) सांगा... अरे ते सगळं त्याच्यातच असतं ना? फणसाच्या गऱ्यातली बी पण उकडून खायची नि त्याला हे  इंटरप्रेटेशन म्हणणार.’ मग माझ्यातला दिग्दर्शक जागा होई, ‘पण काही लेखकच काही गोष्टी दिग्दर्शकाला करण्यासाठी मोकळ्या सोडतात.’ त्यावर मग तो चरफडायचा.

विजय तेंडुलकरांशी त्याची जवळीक होती, पण त्याला दळवी, खानोलकर जास्त आवडायचे. त्याचा पिंड त्यांच्या जवळ जाणारा होता. गूढ, अनाकलनीय असं काही मिळालं की, तो खुश व्हायचा. म्हणायचा, “संस्कार नि तर्क हे मानवाच्या उत्क्रान्तीत फार उशिरा आले नि बदलतही गेले. तेव्हा नाटकातलं पात्र रंगवताना त्याचा फार विचार करू नकोस. सहजता नि सौंदर्य महत्त्वाचं. तर्काइतकी रुक्ष नि असुंदर गोष्ट नाही.”

नंतर त्याच्या आयुष्यात आयन रँड आली. माझ्या आयुष्यात ती खूप आधीच आली होती. मुग्धा कर्णिक तेव्हा ‘Atlas Shrugged’चं भाषांतर करत होती. त्याने ते वाचलं आणि तो पछाडला. मग मी त्याला ‘The Fountainhead’ वाचायला दिलं. आधीच तरारलेला त्याचा इगो आणखी शार्प झाला. बाहेरून शांत संयमी वाटणारा वामन आतून हट्टी नि आग्रही होता. पण ते त्याच्या लेखन नि विचारांबाबत. 

प्रथा-परंपरेविषयीची त्याची मतं आणि तो यात खूप फरक असायचा. हल्ली (म्हणजे गेली चारएक वर्षं) तो जानवं घालत होता. विचारलं, हे काय? तर उत्तर द्यायचं टाळायचा. तू आस्तिक आहेस का? असं कोणी विचारलं तर म्हणायचा ‘श्वास घेणारा प्रत्येक माणूस आस्तिक असतो. त्याचा देवा-धर्माशी काहीही संबंध नसतो.’ ओशो, जे. कृष्णमूर्ती तो वाचायचा, पण कधी कोट करायचा नाही. त्याच्यात बोलण्याचं articulation नव्हतं. म्हणून वाचनातले संदर्भ कारण नसताना नाटकात आणायचा. मग मी, अशोक राणे आणि संजय पवार त्याला खूप बोलायचो.

आमची चौकट अनेकदा बसायची. सिरिअस विषय निघाला की, तो फक्त ऐकायचा. संजय पवार किंवा अशोक राणे एखादा विषय व्यवस्थित मांडत आणि शेवटापर्यंत नेत. त्याला त्याचं खूप अप्रूप वाटे. पण कधी कधी त्याच्या एखाद्या साध्या प्रश्नानं त्यांचं अख्खं विश्लेषण उदध्वस्तही होताना पाहिलंय मी. पण चौकटीला खरी गंमत यायची, जेव्हा आम्ही गॉसिपिंग करायचो तेव्हा. अशोक राणे आणि माझा वावर जास्त असायचा. या गॉसिपिंगला आम्ही दोघे रसद पुरवायचो. अशोक जास्त.

एकदा मी साहित्य-सहवासातील एका प्रथितयश लेखकाच्या घरी घडलेला ‘आँखो देखा’ किस्सा सांगितला. तो लेखक भर उन्हात त्याच्या घरी आलेल्या रद्दीवाल्याशी १०-१५ पैशांच्या फरकावरून वाद घालत असल्याचा तो किस्सा. यावर वामन म्हणाला ‘यांच्याबाबतीत प्रश्न पैशाचा नसतो, तत्त्वांचा असतो.’ त्यावर संजयचा टोला, ‘पोटार्थी लेखक म्हाडा, कन्नमवार नगर (तेव्हा वामन तिथं रहायचा) नाहीतर परळ-लालबागला रहातात.’ पण आमच्या चौघांत वामन तावडेचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ अत्यंत विकेड होता, तर संजयचा शार्प. भले भले प्रथितयश ते आजचे बेगडी सेलिब्रेटीज, तावडेच्या तावडीतून सुटत नसत. एखादा सुटलाच तर संजय पवार त्याला ठेचायचा. एखाद्या समारंभात कोणी प्रथितयश किंवा सेलिब्रिटी आला, तर वामन त्याच्याकडे ढुंकूनही बघत नसे. अगदी आमच्या ओळखीचा असला तरी. माझी अवस्था अवघडल्यासारखी होई. पण त्याचवेळेस एखादा ग्रामीण भागातला छोटा रंगकर्मी त्याला लांब जरी दिसला तरी तो मला त्याच्याकडे खेचत घेऊन जाई आणि ओळख करून देई. म्हणे, ‘याला वापर. मस्त पोरगा/गी आहे.’ त्याचे आडाखे फारसे चुकत नसत.             

पुढे ‘Atlas Shrugged’वर त्यानं एक नाटक लिहिलं. पण ते गंडलं. माझ्या एक गोष्ट लक्षात येत होती. ती मी त्याला थेटपणे सांगू शकत नव्हतो. कसं सांगायचं या विचारात असताना त्यानेच तो मौका दिला. सरोजिनी वैद्य यांच्या वर्तमानपत्रात आलेल्या लेखाबद्दल मी भरभरून बोलत होतो. त्यावर तो म्हणाला, ‘मी सरोजिनी बाईंना भेटलोय. त्यांनीच बोलावलं होतं, ‘छिन्न’ पाहिल्यावर. मी विद्यापीठातल्या त्यांच्या ‘केबिन’मध्ये गेलो. भयंकर दडपण होतं.... त्या ‘छिन्न’विषयी खूप बोलल्या. मग त्यांनी मला विचारलं ‘तुम्ही काय वाचता?’ मी दडपून म्हणालो, ‘फार नाही.’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘तुम्ही काही वाचूच नका. लिहीत रहा. जर कधी काही वाचावंसं वाटलंच, तर माझ्याकडे या.’ मी वामनला म्हटलं, ‘तू त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता.’

पण वामनचं व्यक्तिमत्त्वच मुळात व्यसनी होतं. एक व्यसन सोडण्यासाठी दुसरं, मग ते सोडण्यासाठी परत पहिलं. शेवटी ते सगळं सोडण्यासाठी तो वाचन नि अध्यात्मच्या आहारी गेला. या सगळ्यात त्याचं क्राफ्ट मात्र हरवत चाललं होतं. याची जाणीव त्याला कदाचित होत असावी. पूर्वी नाटक लिहिण्यासाठी तो वाचन करायचा, नंतर वाचण्यासाठी नाटकाचं निमित्त करत असावा का? मला संशय यायचा. आत भरपूर काहीतरी साठलेलं ते व्यक्त होण्यासाठी एकेकाळी त्याचा हातखंडा असलेलं नाटक त्याच्यापासून दुरावत गेलं. फेसबुकवर ब्रह्मनाळकर महाराजाच्या निमित्तानं ती वाफ थोडी थोडी बाहेर निघत होती. कमीत कमी शब्दांत (मिताक्षरी) जास्तीत जास्त आशय मांडण्याचं त्याचं कसब आणि शैली इथं कामी येत होती. पण ती पुरेशी नव्हती. म्हणून की काय तो रेखाचित्रं काढू लागला. तिथंही कमीत-कमी रेषांतून व्यक्तिचित्रं रेखाटन करी. तो अनेक मार्गानं व्यक्त होण्याचे प्रयत्न करत होता. 

शेवटी डॉक्टर म्हणाले, त्याला श्वास घेता येतोय, पण सोडण्याचं त्राण उरात नाहीत. त्यामुळे शरीरातल्या carbon dioxide ची लेव्हल वाढत चालली आहे. ती कृत्रिमरीत्या काढावी लागणार. तो कोंदटत होता. आधी मानसिकरीत्या आता शारीरिक. आमच्याबरोबर केलेल्या चर्चांतून त्याचं कोंडलेपण थोडं-फारच कमी होई. कुठल्याही कलाकाराचं ते त्याच्या कलाकृतीतूनच होत असतं. आणि ते त्याचे प्रयत्न शेवटपर्यंत चालू होते. तो जाण्यानं नाट्यसृष्टीत पोकळी निर्माण होईल की नाही हे त्या सृष्टीनं ठरवावं, पण माझ्या मेंदूचा एक कोपरा मात्र कायमचा बधिर झाला आहे.        

.............................................................................................................................................

लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

­­­­­­­­­­­­­­­­­­­

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख