अजूनकाही
केवळ एखादी कथा सुचली म्हणून त्यावर सिनेमा बनवण्याची हौस कधी कधी दिग्दर्शकाच्या अंगलट येते. मग भलेही विषय जगाला पुरून उरणाऱ्या अभिमानी वृत्तीच्या ‘६६ सदाशिव’ पेठेचा का असेना!
काही व्यक्ती आणि त्यांचे स्वभाव हे त्या विशिष्ट भागातील माणसांचं वैशिष्ट्य म्हणता येतं. सरळ, मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या आयुष्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात एक प्रतिमा घट्ट बसलेली असते. राग, लोभ, प्रेम हे क्षणिक आणि भावनिक प्रवाह असतात. या प्रवाहांना विविध बाजू असतात. त्याच्या आत अनेक पदरांचा गुंता झालेला असतो. त्यामुळे अशा वेळी एकाच ठाम निष्कर्षावर येण्याची घाई माणसं करतात. पण ही घाई घातक असते. कारण त्यातून तशाच पद्धतीचा निष्कर्ष कळत-नकळत काढला जातो. हे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी ‘६६ सदाशिव’ या सिनेमातून केला आहे. मात्र कथा आणि तिची मांडणी यांचा मेळ घालताना दिग्दर्शकाची झालेली तारांबळ पडद्यावर लपून राहत नाही.
परिणामी हा सिनेमा एका अपूर्ण कलाकृतीचा ओढूनताणून बनवलेला सावळागोंधळ ठरतो. सिनेमा नेमकं काय मांडू पाहतो हे तो संपेपर्यत लक्षात येत नाही. कथेला दिलेली वळणं ही निव्वळ गंमत वाटते. हा सिनेमा गंमतीदार आणि खुशखुशीत व्हायला हवा होता, पण ती अपेक्षा दिग्दर्शक पूर्ण करू शकलेले नाहीत. किमान एक प्रकारे सिनेमा पेठेतल्या लोकांच्या जगण्याविषयी आणि त्यांच्या स्वभावाविषयी वरवरचे अंदाज दाखवण्याचा प्रयत्न करतो.
त्याचबरोबर सिनेमातले चढउतारही कृत्रिम आहेत. सिनेमा कुठल्या गृहीतकाला सिद्ध करू पाहतो, याचा शोध घेताना गोंधळ उडतो. बारिक बारिक गोष्टी टिपण्याच्या नादात बऱ्याच मोठ्या आणि परिणामकारक ठरतील अशा गोष्टींकडे दिग्दर्शकाचं दुर्लक्ष झालं आहे.
सिनेमाची कथा स्वतःचं गृहीतक सिद्ध करू शकत नाही. सिनेमाची विशेष महत्त्वाची आणि मजबूत अशी कुठलीही बाजू नाही. सिनेमाला पुढे घेऊन जाण्यासाठी उसना आव आणून कथा नागमोडी वळणानं पुढे जाते. त्याचा परिणाम म्हणजे सिनेमा नीरस वाटतो.
आधी घडलेल्या गोष्टींचा पुढे घडणाऱ्या गोष्टींशी संबंध जुळत नाही. कथा विस्कळीतपणे जोडली गेल्यामुळे त्यातला प्रत्येक भाग व्यर्थ आणि अनावश्यक वाटतो. कथेचंच कंबरडं मोडलेलं असल्यामुळे सिनेमा उभा राहण्याअगोदरच ढासळत राहतो.
सिनेमाची कथा दिग्दर्शकाला वपु आणि पु.ल. यांच्या काही नाटकांवरून सुचली आहे. त्यामुळे कुठेतरी पेठेतला अस्सल पुणेरी बाणा सिनेमाच्या कथेचा पाया असूनही त्यावर दिग्दर्शकाची पकड दिसत नाही. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या चारही गोष्टी योगेश देशपांडे यांनीच सांभाळल्या आहेत. मात्र त्यामुळेच या चारही पातळीवर सिनेमा धड उतरत नाही.
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची जुळवणी करताना अनावश्यक गोष्टींवर भर दिला आहे. सिनेमातल्या ‘फ्रेम’ अगदीच साधारण पद्धतीच्या आहेत. गाणी हा सिनेमाला स्पर्श न करणारा घटक आहे, तर तांत्रिक बाजू खचलेली आहे. अभिनयाच्या दृष्टीनं मोहन जोशी आणि वंदना गुप्ते हे दोघंच प्रभावी ठरतात. मात्र त्यांच्या व्यक्तिरेखांना साजेसे संवाद नाहीत.
थोडक्यात, ‘६६ सदाशिव’ हा सिनेमा दिग्दर्शकाच्या डोक्यातील गोंधळाची तयार झालेली कथा आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment