चित्रपट समीक्षा करताना स्टार्स द्यावेत? नाही. इस नई रवायत का स्वागत हैं!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शेलार
  • चित्र ‘फिल्म कम्पॅनियन’च्या सौजन्याने 
  • Tue , 07 May 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र स्टार रेटिंग Star-Rating फिल्म कम्पॅनियन Film Companion

आपल्याकडे बराच काळ विस्तृत समीक्षा या साहित्यप्रकाराकडे गांभीर्यानं पाहिलं गेलेलं नाही. अगदी अजूनही समीक्षेकडे, मग ती एखाद्या साहित्यकृतीची असो की चित्रपट/मालिकेसारख्या कलाकृतीची -, त्यातल्या मुद्द्यांकडेही उपेक्षेनं पाहिलं जातं. वास्तव आणि काल्पनिकता यांच्यातील परस्परसंबंधांचा विचार करता समीक्षा महत्त्वाची ठरते. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनं वाईट कलाकृतीची चिकित्सा, तर चांगल्या कलाकृतीतील वैशिष्ट्यपूर्ण अंगांचं सविस्तर विश्लेषण आणि आस्वाद या दोन्ही दृष्टीनंही समीक्षा महत्त्वाची ठरते.

तूर्तास फक्त चित्रपट समीक्षेचा विचार केल्यास वृत्तपत्रीय चित्रपट समीक्षा- मग ती प्रिंट माध्यमांतील असो की ऑनलाईन माध्यमांतील, - अनेकदा रकाने भरण्याचं काम करते असं दिसून येतं. नावाजलेल्या वृत्तसंस्थांनी हौशी, मात्र प्रत्यक्ष समीक्षेच्या दृष्टीनं कामचलाऊ लिखाण करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती केल्यानं अशा व्यक्तीनं समीक्षेमध्ये चित्रपट प्रसिद्ध झाल्यादिवशीच त्याचं इत्थंभूत कथानक सांगत स्पॉयलर्स देण्यापासून ते इतरही अनेक आक्षेपार्ह घटना वारंवार समोर येत असतात. या सर्व गोष्टी भाषा-स्थळ-काळाची बंधनं ओलांडून सर्वत्र दिसून येतात. परिणामी पाश्चात्य देशात समीक्षा या साहित्यप्रकाराकडे जितक्या गांभीर्यानं पाहिलं जातं, किंवा सर्वस्वी एखाद्या माध्यमाच्या समीक्षेकरिता वाहिलेल्या वृत्तसंस्था असतात, तसा प्रकार आपल्याकडे उपलब्ध नव्हता.

इंटरनेटच्या विस्फोटानंतर मात्र हळूहळू हे चित्र बदलू लागलं. ऑनलाईन पोर्टल्स, वेबसाईट्सचा उदय होऊ लागला. त्यातूनच काही वर्षांपूर्वी अनुपमा चोप्रा, बारद्वाज रंगनसारख्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट समीक्षकांच्या पुढाकारानं ‘फिल्म कम्पॅनियन’ नामक सर्वस्वी चित्रपट समीक्षेला वाहिलेली ऑनलाईन वेबसाईट कार्यरत झाली. कालांतरानं ‘सिनेस्तान’, सर्वस्वी मराठी चित्रपटांसाठी वाहिलेली ‘मराठीस्टार्स’सारखी व्यासपीठंदेखील तयार झाली.

सांगायचा मुद्दा असा की, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चित्रपट समीक्षेला राष्ट्रीय स्तरावर नेत या साहित्यप्रकाराकडे गांभीर्यानं पाहणारी माध्यमं निर्माण झाली.

अलीकडेच ‘फिल्म कम्पॅनियन’नं चित्रपट समीक्षेकडे गांभीर्यानं पाहणारे समीक्षक आणि व्यावसायिक अंगांचा विचार करणारी माध्यमं या दोन वेगळ्या विचारसंस्थांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या निमित्तानं विभागल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर एक ठाम आणि अधिक योग्य असणारी भूमिका घेतली आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram

.............................................................................................................................................

‘चित्रपट समीक्षा करताना स्टार्स द्यावेत की नाही?’ हा वेगवेगळी उत्तरं येणारा जुनाच प्रश्न या माध्यमानं स्वतःपुरता सोडवत अखेर स्टार-रेटिंग व्यवस्थेचा त्याग केला. पाच किंवा चारपैकी स्टार्स/पॉपकॉर्न्स देत चित्रपटाचा दर्जा सांगणं सोपं असलं तरी ही पद्धती तितकीच क्लिष्टही आहे. प्रत्येक समीक्षक हा मुद्दा स्वतःपुरता सोडवत असला तरी त्यातून दोन अपरिहार्य गोष्टी टाळता येत नाहीत.

एक म्हणजे या क्लिष्ट पद्धतीपासून दूर राहत स्टार्स न देणं कुठल्याही पारंपरिक पद्धतीनं चालणाऱ्या माध्यमात कार्यरत असताना शक्य होत नाही. तर दुसरं म्हणजे वाचक लेख न वाचता फक्त दिलेले स्टार पाहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मूळ लेखात व्यक्त केलेली मतं आणि मुद्देसूद विश्लेषण दुर्लक्षित राहण्याचा धोका असतो.

छापील वृत्तपत्रात शक्य नसलं तरी ऑनलाईन माध्यमांमध्ये सविस्तर शीर्षकाच्या माध्यमातून चित्रपटाच्या दर्जाविषयीचं मत अचूकपणे प्रतिबिंबित होत असतं. परिणामी समीक्षेचा गांभीर्यानं विचार करणारी ऑनलाईन माध्यमं सहजपणे स्टार-रेटिंग व्यवस्थेचा त्याग करू शकतात. ‘मिंट’, ‘स्क्रोल’, ‘द वायर’, ‘अरे’, ‘द हिंदू’सारख्या माध्यमांनी तर हे धोरण बऱ्याच आधीपासून अंमलात आणलं आहे.

आत्मस्तुतीचा धोका पत्करत बोलायचं झाल्यास, मी ज्यासाठी सातत्यानं लिहीतो, त्यातील ‘अक्षरनामा’, आणि अगदी ‘जस्ट राईट सिनेमा’ यांनीही अगदी सुरुवातीपासूनच या व्यवस्थेचा त्याग केलेला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘इंडी जर्नल’ या द्विभाषिक संकेतस्थळानंही हेच धोरण स्वीकारलं आहे.

‘फिल्म कम्पॅनियन’च्या या भूमिकेचं इतकं कौतुक करण्याचं कारण तसं स्पष्ट आहे. हे माध्यम चित्रपट पत्रकारितेकडे गंभीर दृष्टिकोनातून पाहणारं, राष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं एक स्वतंत्र माध्यम आहे. त्यामुळे ही भूमिका म्हणजे चित्रपट समीक्षेला विविध पैलू प्राप्त करून देत, महत्त्व मिळवून देण्याच्या दृष्टीनं उचललं गेलेलं एक सकारात्मक पाऊल आहे.

ऑनलाईन माध्यमांनी वेळोवेळी अपारंपरिक भूमिका घेत, लेखन मग ते कुठल्याही प्रकारातील असो, त्याला अधिक स्वतंत्र आणि कुठलीही बंधनं नसलेलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. (अपवाद वगळता) छापील वृत्तपत्रांमधून दिसणाऱ्या आक्षेपार्ह कृतींच्या माध्यमातून समीक्षेचा दर्जा उत्तरोत्तर ढासळत असताना ऑनलाईन माध्यमांनी स्वीकारलेल्या अशा धोरणांचा पुरस्कार करणं गरजेचं आहे. ‘बायोस्कोप’ या चित्रपटाच्या कथनात गुलजार म्हणतात त्याप्रमाणे ‘इस नई रवायत का स्वागत हैं’ म्हणत वैविध्यपूर्ण लेखनासाठी यांसारख्या माध्यमांवरील लिखाण वाचत रहायला हवं.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख