अजूनकाही
शेक्सपिअरच्या अजरामर नाटकांचं आज सादरीकरण करताना त्यातील संदर्भांना आधुनिक जीवनातले संदर्भ देण्याची गरज भासत नाही. मात्र विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ काय किंवा मोहन राकेश यांचं ‘आधे अधुरे’ काय, या आधुनिक काळातील अभिजात नाटकांचं आज सादरीकरण करताना प्रेक्षकांचा विचार करून त्यातील संदर्भांना, काही उल्लेखांना समकालीन रंग द्यावे लागतात. हे समकालिनीकरण जेवढं सफाईनं केलं असेल तेवढी प्रयोगाची रंगत वाढते. मागच्या आठवड्यात मोहन राकेश लिखित ‘आधे अधुरे’ हे १९६९ सालचं म्हणजे बरोबर पन्नास वर्षांपूर्वीचं नाटक बघताना हाच विचार मनात होता.
मोहन राकेश (१९२५-१९७२) हे हिंदी रंगभूमीवर आधुनिकता आणणारे महत्त्वाचे नाटककार. ४७ वर्षांच्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी नाटकं लिहिली. ‘सारिका’ या प्रसिद्ध मासिकाचं संपादन केलं. कथा लिहिल्या. अध्यापन केलं. १९५०च्या दशकात हिंदी साहित्यात ‘नई कहानी’ म्हणून जी चळवळ उभी राहिली (मराठीतील नवकथा/ नवकवितेची चळवळ), त्यातील मोहन राकेश एक बिनीचे शिलेदार . त्यांना १९६८ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला.
मोहन राकेश यांनी जरी विविध प्रकारचं साहित्य निर्माण केलं असलं तरी ते प्रामुख्यानं ओळखले जातात ते नाटककार म्हणून. त्यांचं १९५८ साली आलेलं ‘आषाढ का एक दिन’ या नाटकानं हिंदी रंगभूमीवर खळबळ माजवली. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे १९५९ साली आलेल्या ‘आधे अधुरे’नं तर इतिहास घडवला. आधुनिक दृष्टीचा नाटककार म्हणून मोहन राकेश यांचं स्थान पक्कं झालं. आजही त्यांच्या नाटकाचं प्रयोग भारतात तसंच जगभर सुरू असतात. ‘आधे अधुरे’चा नवीन प्रयोग मुंबईस्थित जेफ गोल्डबर्ग स्टुडिओनं सादर केला.
१९६० च्या दशकात भारतीय समाजात, खास करून शहरी भारतातील कुटुंबव्यवस्थेत जोरदार घुसळण सुरू होती. पती-पत्नींच्या संबंधावर विलक्षण ताण पडायला लागला होता. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत होती. परिणामी ऑफिस, तेथील उच्चपदस्थ पुरुष अधिकारी वगैरे गोष्टी कुटुंबांत वेगळ्याच समस्या निर्माण करत होत्या. त्या काळी स्त्रिया सहसा कारकून, टायपिस्ट वगैरे पदांवर असायच्या. ‘उच्चपदस्थ स्त्री’ हा अलिकडचा सामाजिक बदल. अशा कुटुंबांची स्वप्नं, त्या स्वप्नांना छेद देणारं वास्तव, बेकारी वगैरे दाहक सामाजिक परिस्थिती वगैरेंच्या संदर्भात उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध वगैरेचा या नाटकात स्फोटक वेध घेतला आहे.
नाटकाची सुरुवात होते, तेव्हा एक काळे कपडे घातलेला मध्यमवयीन पुरुष, ज्याचा चेहरा प्रेक्षकांना दिसत नाही, प्रेक्षकांशी बोलतो व सांगतो की, मी एक सामान्य माणूस आहे, जो तुम्हाला रस्त्यात भेटला असता तर तुम्ही त्याच्याशी बोलला नसता. या ‘प्रथमपुरुषी एकवचनी’ निवेदनामुळे नाटकाचा मूड पकडला जातो. नंतर नाटकाची सुरुवात होते, तेव्हा कळतं की महेंद्र-सावित्रीचं हे दोन मुली व एक मुलगा असलेलं कुटुंब आहे. या मध्यमवयीन कुटुंबाचा आर्थिक भार आता सावित्रीला सोसावा लागत आहे. एका खाजगी कंपनीत कारकून असलेल्या सावित्रीच्या तुटपुंज्या पगारात घर कसंबसं चालते. महेंद्रने दोन-चार व्यवसाय करून बघितले, पण प्रत्येकात त्याला प्रचंड अपयश आलं. आजकाल तो पूर्ण वेळ घरीच असतो. सावित्रीची मोठी मुलगी, बिन्नीचा अलीकडेच प्रेमविवाह जरी झालेला असता तरी तिचं पतीशी फारसं पटत नसल्यामुळे ती अनेकदा माहेरीच असते. मुलगा अशोकही कॉलेजच्या अनेक परीक्षा नापास झाल्यानं आता घरीच असतो. त्याला जीवनात काय करायचं आहे, हे अजूनही समजलेलं नाही. तिसरी किन्नी अतिशय फटकळ असून नववीत शिकत असते.
या कुटुंबातल्या व्यक्तींचा एकमेकांसी सुसंवाद सोडाच, साधा संवादही केव्हाच हरवून गेलेला आहे. जेव्हा केव्हा कोणी तोंड उघडतो, तेव्हा दुसऱ्याला टोमणे मारायला, जखमी करायलाच. अशाच एक संध्याकाळी सावित्री दमून घरी येते, तर तिला ग्लासभर पाणी द्यायलासुद्धा कोणी नसतं. सर्वत्र पसारा बघून चिडलेली सावित्री स्वतः चहा करून पिते, तर तिला जाणवतं की नवरा घरात शांतपणे बसून आहे. त्याचा हा वांझोटा शांतपणा बघून सावित्रीचा एवढ्या वर्षांचा दाबून धरलेला राग उफाळून येतो. पती-पत्नीत दररोज होतं तसं वाग्युद्ध सुरू होतं. त्यातून प्रेक्षकांना समजतं की, महेंद्रला कोणत्या तरी व्यवसायात मोठा तोटा झाला आहे. पैसे न मिळवणारा, अपयशी, रोज घरीच बसून असलेला नवरा दिवसभर नोकरी करून आलेल्या पत्नीला उठून ग्लासभर पाणीसुद्धा देत नाही, हे सर्व बघितल्यावर प्रेक्षकांची सहानुभूती सावित्रीच्या बाजूने झुकते.
हा वाद रंगतो तो सासरहून घरी आलेल्या बिन्नीसमोर. थोड्या वेळानं किन्नी शाळेतून येते. ती एक वाया गेलेली, उद्धट मुलगी असल्याचं प्रेक्षकांना कळतं. ती काही तरी अशोकबद्दल आईजवळ तक्रार करते, तेवढ्यात एवढा वेळ आतल्या खोलीत ‘प्लेबॉय’ चाळत बसलेला अशोक बाहेर येते. या क्षणी रंगमंचावर नाटकातली सर्व पात्रं आलेली असतात.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4809/Golda-_-Ek-Ashant-Vadal
.............................................................................................................................................
सावित्री घर आवरायला लागते व इतरांना सांगते की, तिचा बॉस सिंघानिया घरी येणार आहे. त्याच्या मदतीनं सावित्री अशोकला नोकरी लावण्याचे प्रयत्न करत असते. हा प्रकार अशोकला मान्य नसतो. त्याला आईसारखी कारकुनाची नोकरी करण्यात काही स्वारस्य नसतं. शिवाय सिंघानियाचा लोचटपणा त्यालाच काय, किन्नीलासुद्धा आवडत नाही. ते दोघं मिळून सिंघानियाची मस्त नक्कल करून दाखवतात. महेंद्र काही तरी निमित्तानं बाहेर जाण्याच्या प्रयत्न करतो. त्याला पाच लाख रुपये महिना पगार असलेल्या सिंघानिया समोर येणं अपमानास्पद वाटतं. बाहेर जाण्याआधी तो सिंघानियावरून सावित्रीला सूचक टोमणे मारतो.
सिंघानिया येतो. अशोकनं वर्णन केलेलं कमी पडेल असं सिंघानियाचं व्यक्तिमत्त्व. अशोक बाहेर पडण्याच्या बेतात, पण सावित्री त्याला हट्टानं थांबवून ठेवते. अशोक धुसमुसत करत थांबतो, पण शक्य तेव्हा स्वतःचा राग या ना त्या प्रकारे व्यक्त करतोच. सिंघानियासुद्धा अशोकऐवजी सावित्रीला नोकरी देऊ करतो. यात त्याची वासना बटबटीतपणे व्यक्त होते. सिंघानियाची भेट पूर्णपणे अयशस्वी होते. सावित्रीच्या नशिबी आणखी एक पराभव येतो.
नंतर अपेक्षेप्रमाणे सावित्री आणि बिन्नी एका बाजूला आणि महेंद्र, अशोक, किन्नी दुसऱ्या बाजूला असं महाभारत रंगतं. यात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अपयशाबद्दल इतरांना दोष देतो. आता मात्र सावित्रीचा बांध फुटतो. ती ठरवते की, यापुढे ती फक्त स्वतःसाठी जगणार आहे. तिला तिच्या तारुण्यातला प्रियकर भेटतो. ती त्याच्याबरोबर पळून जाण्याचं ठरवतं. तेवढ्यात जुनेजा त्यांच्या घरी येतो. महेंद्र व जुनेजा सावित्रीशी लग्न होण्यापूर्वीचे मित्र. एकत्र व्यवसाय करतात. जुनेजा स्मार्ट व चलाख असल्यामुळे योग्य वेळी व्यवसायातून स्वतःचा हिस्सा घेऊन बाहेर पडतो आणि सर्व तोटा महेंद्रच्या डोक्यावर येतो. आपल्याला नवऱ्याला जुनेजा सतत फसवतो, हा सावित्रीचा राग, तर सावित्री आपल्या मित्राला सुखानं जगू देत नाही हा जुनेजाचा आरोप.
आता ते समोरासमोर येतात व इतक्या क्रूरपणे एकमेकांची उणीदुणी काढतात, एकमेकांना घायाळ करतात की विचारता सोय नाही. यात मात्र सावित्रीच्या बाजूला आतापर्यंत असणारी प्रेक्षकांची सहानुभूती संपते. याचं कारण जुनेजा सावित्रीला आठवण करून देतो की, एकदा तीसुद्धा त्याच्याकडे समर्पण करण्यासाठी आली होती आणि जुनेजानं तिला नम्रपणे परत पाठवलं होतं. तेव्हा प्रेक्षकांना जाणवतं की, सावित्रीसारखी महत्त्वाकांक्षी स्त्री कोणा पुरुषावर प्रेमच करू शकत नाही. ती फक्त भौतिक यश, पैसा वगैरेवरच प्रेम करू शकते. हे सर्व तिला महेंद्र देऊ शकत नाही, म्हणून ती त्याचा सतत पाणउतारा करत असते. आता तर अशी वेळ येते आहे की, महेंद्र घर सोडून जुनेजाकडे राहायला जातो.
अशा नाटकांना पारंपरिक शेवट असूच शकत नाही. अशा टप्प्यावर नाटक संपतं, तेव्हा प्रेक्षकांच्या लक्षात येतं की, ही कथा अशीच पुढे चालू राहील. यात काही फरक होणार नाही.
मोहन राकेश यांच्या या नाटकातील संवाद कमालीचे सच्चे आणि टोकदार आहेत. हे संवाद पेलणं एक वेगळंच आव्हान आहे. अशोक पांडेंनी सर्व पात्रांकडून संवाद व्यवस्थित घोटवून घेतल्याचं जाणवतं. त्यांनी या नाटकात अनेक भूमिका केल्या आहेत. ते सुरुवातीला काळा कोट घातलेले सूत्रधार होतात. महेंद्र, जुनेजा, सिंघानिया, सावित्रीचा जुना प्रियकर जगमोहन वगैरे सर्व भूमिका पांडेंनी कमालीच्या सफाईनं पेश केल्या आहेत. या सर्व भूमिका एकच व्यक्ती सादर करताना लक्षात येतं की, रंगमंचावर जरी महेंद्र-सावित्रीच्या संसाराची कथा सादर होत असली तरी ही स्थिती घरोघरी आहे. अशा प्रकारे आतून पूर्णपणे कोसळलेली असंख्य कुटुंबं आपल्याला आजही आजुबाजूला दिसतात. अशोक पांडेंनी या सर्व भूमिका सादर करण्याचं आव्हान लीलया पेललं आहे. त्यातही त्यांनी हताश, पराभूत आणि त्यामुळेच एक प्रकारे विकृत झालेला महेंद्र सादर केला आहे. त्याला तोड नाही. महेंद्रचं चालणं, खांदे पाडून उभा राहणं वगैरे बारकाव्यांमुळे हे पात्र लक्षात राहतं.
अर्जुन तनवर (अशोक), अफशान खान (बिन्नी), ऊर्वाजी कोतवाल (किन्नी) या तिघांनी उत्तम साथ दिली आहे. अमित पाटील (प्रकाश योजना व ध्वनी संयोजन), राज छाब्रिया (नेपथ्य) यांनी नाटकाचा परिणाम वाढवण्यात योगदान दिले आहे.
अशीच तारीफ सावित्री झालेल्या कोमल छाब्रिया यांची करावी लागते. अपयशी संसाराचा गाडा ओढून अनेक पातळींवर दमलेली सावित्री त्यांनी फार मनापासून साकार केली आहे. अनेक प्रसंगी तर त्या भूमिकेत अशा काही शिरतात की, त्यांचे संवाद ऐकतांना, त्यांची देहबोली बघताना आपलं भान हरपतं. विशेषतः प्रियकर जगमोहनबरोबर पळून जाण्याचा प्रसंग. पळून जाण्यासाठी बॅग भरून तयार असलेली, मेकअप करून बसलेली सावित्री जेव्हा जगमोहन समोर ठाकतो, तेव्हा मात्र हातपाय गाळते.
सुमारे पंचवीस वर्षापूर्वी मी हाच प्रयोग बघितला होता, ज्यात कै. दिनेश ठाकूर व सुनिला प्रधान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तेव्हा नाटक बघून झाल्यावर विलक्षण अस्वस्थ वाटलं होतं. मात्र तेव्हा असं वाटलं होतं की, सावित्री-महेंद्रसारखी दुःखी जोडपी अपवादभूत असतील. आता जेव्हा हा प्रयोग बघून बाहेर पडत होतो, तेव्हा किती तरी महेंद्र-सावित्री आजुबाजूला असल्याचं जाणवत होतं. त्या काळच्या सावित्रीला म्हणायला आर्थिक सुबत्ता नव्हती. आजच्या सावित्रीला तर भरपूर पगार आहे. तरीही चेहरा सतत आक्रसलेला का असतो? वागण्याबोलण्यात सतत चिडचिड का दिसते?
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment