अजूनकाही
सदर लेखात ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’ या चित्रपटाच्या स्पॉयलर्स नसल्या तरी ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाच्या स्पॉयलर्स असू शकतात.
.............................................................................................................................................
चित्रपटातील गंभीर, भावनिक आवाहन करणाऱ्या क्षणांना नीरव शांतता, आणि विनोदी, आनंदजनक, समाधानाची भावना निर्माण करून देणाऱ्या क्षणांना तितकाच उत्साह या दोन्ही टोकाच्या भावनांचं संतुलन राखणं मार्व्हलने गेली काही वर्षं सातत्याने साध्य केलं आहे. गेल्या जवळपास एक तपाच्या कालावधीत ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ ऊर्फ ‘एमसीयू’ या चित्रपट मालिकेच्या विश्वाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेले एकवीस चित्रपट, या सर्व चित्रपटांच्या माध्यमातून प्रत्येक पात्राशी निर्माण झालेलं एक विलक्षण भावनिक नातं, ती पात्रं साकारणारे एकाहून एक सरस असे कलाकार आणि रुसो ब्रदर्स, जो आणि अँथनी, हे दोन अप्रतिम दिग्दर्शक या सर्व गोष्टींच्या संगमाने ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’च्या रूपात ही किमया पुन्हा साधली जाते.
‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ (२०१८) या चित्रपटाच्या शेवटानंतर अनेक प्रश्न उभे राहिले होते. थॅनोस या स्वतःला जगाचा उद्धारकर्ता समजणाऱ्या परग्रहवासीयाने पृथ्वीच नव्हे, तर एकूणच विश्वात वाढलेल्या लोकसंख्येवर उपाय म्हणून जेव्हा विश्वातील अर्ध्या लोकांचा (केवळ एक चुटकी वाजवत) संहार केला होता, त्यानंतर या विश्वाचे काय होणार हा प्रश्न सर्वांपुढे उभा ठाकला होता. अर्ध्या विश्वासोबत ‘अॅव्हेंजर्स’चे अनेक सदस्यदेखील नष्ट झालेले असल्याने तर परिस्थिती अधिकच बिकट होती. उरलेले ‘अॅव्हेंजर्स’ घडलेल्या गोष्टी बदलता येणार नाहीत या सत्याचा स्वीकार करत थॅनोस म्हणाला त्याप्रमाणे वर्तमानातील परिस्थितीशी जुळवून घेतील, की घडल्या गोष्टी बदलण्याचे प्रयत्न करतील? पण माझ्या मते इथे हे प्रश्न फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत. कारण इथे काय घडणार यापेक्षा जे काही घडतं ते पाहण्याच्या अनुभवाला, ते अनुभवताना निर्माण होणाऱ्या भावनांना अधिक महत्त्व आहे.
‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’मध्ये विश्वातील पन्नास टक्के लोकांचं अस्तित्त्व नाहीसं होण्याची संभाव्य शक्यता, आणि जांभळ्या वर्णाच्या तत्त्ववेत्ता भासणाऱ्या, पराजय करता न येणाऱ्या थॅनोसचं वैचित्र्यपूर्ण तत्त्वज्ञान या दोन गोष्टी अस्तित्त्वात होत्या. मात्र, सोबतच वैफल्य, दुःख ही भावनादेखील अस्तित्त्वात होती. कितीही नाही म्हटलं तरी थॅनोसने एकीकडे पराकोटीचं दुःख, आणि दुसरीकडे आपल्या ध्येयाच्या, नियतीच्या परिपूर्तीनंतरचं समाधान प्राप्त केलं होतं, त्यामुळे या खलनायकालाही एक परिपूर्णता बहाल झाली होती. एकीकडे आपल्या आवडत्या नायकांचा पराभव, तर दुसरीकडे थॅनोसच्या विसाव्यानंतर त्याच्यासोबतच आपल्यालाही मिळालेलं समाधान अशा संमिश्र भावनांचा कोलाहल यानिमित्ताने निर्माण झाला होता.
‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’मध्ये नेमकी दुःख ही संज्ञा आणखी वेगळ्या अंगांनी पाहिली जाऊन तिची अधिक विस्तृतपणे चिकित्सा केली जाते. टोनी स्टार्क/आयर्न मॅन (रॉबर्ट डाऊनी ज्यु.) अवकाशात काही तासांवर येऊन ठेवलेल्या आपल्या मृत्यूच्या प्रतीक्षेत आहे. पृथ्वीवर स्टीव्ह रॉजर्स/कॅप्टन अमेरिका (क्रिस एव्हान्स), नताशा रोमनॉव्ह/ब्लॅक विडो (स्कार्लेट जोहान्सन) हे लोक आपल्या वाट्याला आलेलं अपयश आणि आपण गमावलेल्या लोकांच्या दुःखात आहेत. क्लिंट बार्टन/हॉकआयने (जेरेमी रेनर) आपलं सगळं कुटुंब गमावलेलं असल्याने त्याच्या दुःखाची तीव्रता आणि परिभाषा इतरांहून खूप वेगळी आहे. थॉर (क्रिस हेम्सवर्थ) साहजिकच झाल्या गोष्टींना स्वतः जबाबदार असल्याच्या भावनेमुळे अधिक शोक आणि रागात आहे. सर्वच स्तरांवर हा एक संमिश्र भावनांचा आलेख तयार झालेला आहे. परिणामी ‘अॅव्हेंजर्स’च्या या भावनिक कोलाहलाला चित्रपटाच्या मांडणीत महत्त्वाचे स्थान आहे. इथं घडणाऱ्या सर्व घटनांच्या केंद्राशी, पात्रांच्या मानसिकतेमध्ये बदल घडण्याच्या मुळाशी पराजयाची भावना आहे. त्यामुळे जेव्हा हे दुःख आणि हा क्रोध चित्रपटाने संभाव्य दिशेने वाटचाल केल्यावर मानसिक स्वरूपावरून प्रत्यक्ष भौतिक स्वरूपाच्या संघर्षात रूपांतरित होतो, तेव्हा त्याचं परिवर्तन तीव्र क्लेश आणि वर्णन करता न येणाऱ्या हर्षोल्हासामध्ये होतं.
टोनी स्टार्क ‘अ पार्ट ऑफ अ जर्नी इज द एंड’ असं एक वाक्य म्हणतो. तेच ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’च्या रूपात मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या शेवटालाही लागू पडेल. सदर चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्येक दृश्यात एखादी भावना निर्माण करणाऱ्या अगदी अचूक तारांना छेडत एका शब्दातीत अनुभवाची निर्मिती केलेली आहे. हा अनुभव हे सिनेमॅटिक विश्व नितांतसुंदर पद्धतीने, भव्यदिव्य थाटात पूर्णत्वास नेल्याची भावना निर्माण करणारा आहे. क्रिस्टोफर मार्कस आणि स्टीव्हन मॅकफिली हे पटकथालेखक, जो आणि अँथनी रुसो हे दिग्दर्शक या चौघांनी ‘कॅप्टन अमेरिका : विंटर सोल्जर’ (२०१४), ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’ (२०१६) आणि ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या ठळकपणे उजव्या आणि परिणामकारक चित्रपटांचं क्लिष्ट विश्व उभं केलं होतं. इथेही त्यांची अनुक्रमे पटकथा आणि दिग्दर्शनावरील पकड जाणवते. रुसो ब्रदर्सने या चित्रपटांची केलेली विश्वनिर्मिती आणि मांडणी त्यांना सध्या कार्यरत असलेल्या काही उत्तम दिग्दर्शकांच्या रांगेत नेऊन बसवते. सदर चित्रपटातील अभिनेत्यांच्या कामाचं वेगळं कौतुक करण्याची वेगळी गरज मलातरी भासत नाही. इतकं नक्कीच म्हणता येऊ शकेल की, समकालीन चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या या अभिनेत्यांच्या फळीने गेल्या चित्रपटात केलेल्या कामाहूनही अधिक सरस अशी कामगिरी केलेली आहे.
अॅलन सिल्व्हेस्ट्रीच्या थीम्स आणि एकूणच पार्श्वसंगीत ‘अॅव्हेंजर्स’पासूनच (२०१२) परिणामकारक ठरत आलेलं आहे. त्याची ‘अॅव्हेंजर्स’ची मेन थीम अजूनही अंगावर काटा आणणारी आहे. त्याच्या पार्श्वसंगीताने ‘इन्फिनिटी वॉर’च्या शेवटी दुःखात बेमालूमपणे मिसळत जी हेलावून टाकणारी भावना निर्माण केली होती ती साध्य करणं सोपं नाही. इथेही दुःख, आनंद, क्रोध अशा कित्येक भावनांच्या परिणामाला अधिक उंचावण्याचं काम त्याचं अचूक असं पार्श्वसंगीत करतं. मार्व्हलचं हे विश्व आणि ‘अॅव्हेंजर्स’पटातील त्याचं संगीत या दोन्ही गोष्टी इतक्या सवयीच्या झाल्या आहेत की त्यांच्याशिवाय समकालीन पॉप कल्चरची कल्पना करणं शक्यच नाही. कदाचित त्यामुळेच ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’च्या शेवटी काहीतरी मिड/एंड क्रेडिट दृश्य घडून सिल्व्हेस्ट्रीची ‘अॅव्हेंजर्स’ची थीम वाजावी, अन् कॅप्टन अमेरिकाने ‘अॅव्हेंजर्स… असेम्बल’ म्हणावं असं राहून राहून वाटत राहतं.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment