‘शझॅम!’ : जुन्या वळणांनी जाणारा, सुपरहिरो चित्रपटांहून निराळा आणि ओल्ड स्कूल, पण चांगला
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘शझॅम!’चं पोस्टर
  • Sat , 06 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie शझॅम SHAZAM

कॉमिक बुक्स, चित्रपट आणि मालिका अशा विविध माध्यमांत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या ‘मार्व्हल’ आणि ‘डीसी’ दोन्ही कंपन्यांकडे काही रंजक सुपरहिरो पात्रांचे हक्क असले तरी त्या पात्रांचं विश्व, त्यांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन, तसंच चित्रपटातील त्यांचं चित्रण अशा बऱ्याच पातळीवर या दोन्ही कंपन्यांच्या भूमिका (आजवर) जवळपास टोकाच्या होत्या असं मानता येतं. ‘डीसी’ची पात्रं आणि त्यांचं एकूणच विश्व काल्पनिक आणि अलौकिक घटकांवर भर देणारं होतं, तर ‘मार्व्हल’चं विश्व आपल्या पात्रांच्या निमित्तानं काल्पनिक घटकांना खऱ्या विश्वातील नैतिक मूल्यांच्या चौकटीत आणत होतं.

शिवाय, ‘डीसी’ आणि त्यातही पुन्हा झॅक स्नायडरचं सिनेमॅटिक विश्व अधिक गडद छटा असणारं, तर ‘मार्व्हल’चं सिनेमॅटिक विश्व अधिक हलकंफुलकं आणि रंजक आहे. सध्या या दोन्ही कंपन्यांची निर्मिती असलेले चित्रपट सुपरहिरो चित्रपटांचा एकूण चेहरामोहरा बदलत असताना त्यांची निर्मिती असलेला प्रत्येक चित्रपट व्यावसायिक, तसंच कलात्मक अंगातून महत्त्वाचा आहे. ‘शझॅम!’च्या निमित्तानं ‘डीसी’नं काही प्रमाणात ‘मार्व्हल’च्या वाटेवर जात आपल्या चित्रपटांमध्ये गडद छटांच्या समावेशाचा अट्टाहास सोडून मांडणीबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे का, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.

‘‘शझॅम!’ एकूण मांडणीबाबत ‘डीसी’च्या चित्रपटांहून वेगळा असला तरी त्यात त्या विश्वातील इतर घटक मात्र तसंच आहेत. म्हणजे इथंही आदिभौतिक समस्यांनी ग्रासलेली पात्रं आहेत, आणि अलौकिक तत्त्वं आणि शक्तीच्या उगमाच्या स्थानांना आणि त्यामागील कल्पनांना एक जादुई स्वरूप लाभलेलं आहे. बिली बॅटसन (किशोरवयात असला की अॅस्नर एंजल) हा लहानपणीच आपल्या आईपासून दुरावलेला अनाथ मुलगा तिच्या शोधात आहे, आणि अनाथालयांपासून पळ काढण्याच्या भूतकाळामुळे दरवेळी नव्या ठिकाणी येऊन पोचतो आहे.

यावेळी तो वॅस्क्वेज कुटुंबाकडे येऊन पोचला असला तरी त्याचं तिथून पळ काढण्याच्या संभाव्य योजनेच्या शोधात असणं, फ्रेडी फ्रीमनसोबत (जॅक ग्रॅझर) नाईलाजानं वावरावं लागणं, या बाबी तशाच आहेत. अशातच अनेक वर्षांपासून आपल्या शक्तीचा वारसा पुढे चालवणाऱ्या योग्य व्यक्तीच्या शोधात असलेल्या ‘शझॅम’चा शोध बिलीपर्यंत येऊन पोचतो. आपल्या ‘जस्ट से द वर्ड’ या टॅगलाईनला शब्दशः खरं ठरवणाऱ्या संकल्पनेमुळे बिली नवीन ‘‘शझॅम!’ (प्रौढ रूपात असला की झॅकरी लिवाय) बनतो. अर्थात हीच टॅगलाईन त्याला त्याचा प्रतिस्पर्धीदेखील मिळवून देतेच.

डॉ. थॅड सिवानादेखील (मार्क स्ट्रॉंग) एकेकाळी ‘शझॅम बनण्याच्या मार्गावर होता. मात्र ख्रिश्चन धर्मग्रंथातही उल्लेख असलेल्या सात पापांच्या त्याच्या विचारांवर मात करण्यानं तो सदर शक्तींच्या लायक ठरत नाही. आपल्या वडील आणि भावाच्या दृष्टीनं काहीही करण्यास अपात्र असलेल्या थॅडच्या मनावर याही बाबतीत मिळालेल्या अपयशाचा खोल परिणाम होतो. तत्पूर्वी सदर मानसिक तमोगुणांचं शब्दशः प्रतिनिधित्व करणाऱ्या राक्षसांनी त्याच्याशी संपर्क साधत आपल्याला मुक्त करण्याची मागणी करतात. परिणामी शक्तीच्या आणि मान्यतेच्या हव्यासात असलेला डॉ. सिवाना त्यांच्या दृष्ट शक्तींचा भोक्ता आणि ‘शझॅम!’चा प्रतिस्पर्धी, सुपरव्हिलन बनतो. नायक आणि खलनायकाच्या आलटून-पालटून दिसणाऱ्या या कथेमुळे ही दोन्ही पात्रं प्रभावी बनतात. सोबतच चित्रपटाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होऊ लागतात.

‘शझॅम!’ संकल्पनात्मक तसंच मांडणीच्या पातळीवर जुन्या वळणांनी जाणारा, सुपरहिरो चित्रपटांच्या आताच्या चित्राहून निराळा आणि ओल्ड स्कूल स्वरूपाचा आहे. बिली (आणि फ्रेडी)चा प्रवास शक्तींच्या स्वरूपाचा शोध आणि कुटुंबाच्या महत्त्वाच्या अनुषंगानं सुरू आहे. तर दुसरीकडे डॉ. सिवानादेखील एक क्लिष्ट पात्र आहे. त्याचा आजवर झालेला प्रवास आणि आताची भूमिका ही त्याला मिळालेल्या वागणुकीचा आणि जगाकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा परिणाम आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांशी सलोख्याचे संबंध नसणं एकप्रकारे त्याच्यातील तमोगुणांना खतपाणी घालतं. ज्यामुळे आपल्या पालकांपासून शारीरिक किंवा मानसिक पातळीवर दूर असणं, आणि उपहासाचं धनी झालेलं असणं मानसिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यांना एकसारखंच बनवतं. कारण दोघं एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले असले तरी त्यांचा स्वत्वाचा शोध त्यांना अपरिपूर्ण, सदोष आणि उपेक्षित बनवत आलेला आहे. फक्त दोघंही या गोष्टीला कसं सामोरं जातात, यात त्यांच्या स्वभावातील मूलभूत फरक दडलेला आहे.

या संकल्पना आणि अधिक मोहक, रंजक आणि हलकीफुलकी मांडणी यांचा समतोल राखण्यात ‘शझॅम!’चे लेखक-दिग्दर्शक यशस्वी होतात. एकीकडे बिली-फ्रेडीचे बॅटमॅन आणि सुपरमॅनचे संदर्भ देत सुरू असलेले काहीसे मेटा-रेफरन्स प्रकारातील विनोद, त्याला नव्यानं गवसलेल्या शक्तींचं अन्वेषण आणि दुसरीकडे ‘शझॅम!’च्या विश्वाचं अधिक विलक्षण आणि काल्पनिक जग यांचा समतोल इथं राखला जातो. हा भाग काहीसा गिआर्मो डेल टोरोच्या चित्रपटांतील विश्वाची आठवण करून देईल असा आहे. ‘लाईट्स आऊट’ या आपल्या लघुचित्रपटासाठी आणि मुख्यत्वे आपल्या भयपटांबद्दल प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक डेव्हिड एफ. सँडबर्ग इथं त्याच्या पूर्वीच्या चित्रपटांहून वेगळी आणि परिणामकारक कामगिरी करतो. अॅस्नर एंजल, जॅक ग्रॅझर आणि मुख्यत्वे झॅकरी लिवाय प्रभावी कामं करतात, तर खलभूमिकेतील मार्क स्ट्रॉंगदेखील परिणामकारक ठरतो.

‘शझॅम!’ शेवटाकडे जाताना जरासा लांबला जाणारा आणि काहीसा भाकीत करता येईलसा बनत असला तरी त्यातील रंजक मूल्यं टिकून असल्यानं तो कंटाळवाणा ठरत नाही. ज्यामुळे तो स्वीकारार्ह ठरण्यापलीकडे जाऊन एक चांगला चित्रपट बनतो.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......