अजूनकाही
सरळ-सोप्या वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा प्रचंड गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट असतात. अशा गोष्टीचा एक पदर उलगडून बघताना दुसरा पदर आपोआप समोर येतो. मग पुन्हा तिथून एक अनपेक्षित गोष्ट सुरू होते. अशा अनेक घटना-घडामोडीचं चक्र सतत आसपास फिरत असतं. डोळे उघडे ठेवून त्या घटनांचा अन्वयार्थ लावता आला की, क्लिष्ट गोष्टी नकळत सोप्या होत जातात. इथं सोपं आणि क्लिष्ट असं द्वंद चालू असतं. या द्वंदातून पुढे येते ती सत्याची झाकलेली बाजू. अशा वेळी शोध, धडपड, स्वत्व, संघर्ष, आव्हान हे सगळी फक्त शब्द राहत नाहीत, तर आयुष्याचं वास्तव बनतात.
‘सावट’ हा एक असाच सिनेमा आहे, ज्यात सामाजिक वास्तव मांडलं आहे. दिग्दर्शक सौरभ सिन्हा यांचा हा सिनेमा पूर्ण दोन तासांचा चित्तथरारक प्रवास आहे. समाजात असलेल्या अंधश्रद्धा हा सिनेमाच्या कथेचा विषय आहे. सिनेमाची कथा निव्वळ मनोरंजनात्मक नाही, तर सामाजिक वास्तव आहे. अंधश्रद्धाचा पहिला बळी असते ती स्त्री. २१व्या शतकातही समाज अंधश्रद्धाच्या विळाख्यात बंदिस्त आहे. ‘करणी’, ‘भानामती’, ‘चेटकीन’ यांसारख्या अंधश्रद्धा समाजात पाय रोवून बसलेल्या आहेत. ग्रामीण भागात अंधश्रद्धाचे निष्पाप जीव मोठ्या प्रमाणात बळी ठरतात. मात्र जेव्हा या अंधश्रद्धाचा उलगडा होत जातो, तेव्हा त्यामागची वास्तव परिस्थितीसमोर येते. अंधश्रद्धाचा वापर कशा पद्धतीनं केला जातो. त्यामागची कारणं काय असतात, यावर सिनेमा अचूक आणि परिणामकारकरीत्या भाष्य करतो.
सिनेमाची कथा कालसुंसगत आहे. ती रहस्यमय पद्धतीनं पुढे सरकत जाते. त्याचाही सिनेमावर सकारात्मक परिणाम होतो. कथेची मांडणी सिनेमाचा तोल सुटू देत नाही. त्यामुळे सिनेमात कंटाळवाणं असं काही नाही. स्त्री आणि अंधश्रद्धा यांचा संबंध दाखवताना दिग्दर्शकानं अतिशयोक्ती टाळली आहे. सिनेमाची कथा अंधश्रद्धावर आधारित असली तरी त्याला जोडून येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परिघावर फिरते. म्हणून पडद्यावरचं मनोरंजन आणि वास्तव यांच्यात गुंफलेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
सिनेमातले संवाद अधिक प्रभावी आहेत. रोमांचक कथेला अधिक रोमांचक करणारे आणि त्याचवेळी व्यवस्थेला प्रश्न विचारणारे हे संवाद चपखल आहेत. मात्र तांत्रिक बाबीमध्ये असलेला गडदपणा अनेकदा निरस वाटतो. सिनेमात गाणी नाहीत, मात्र त्याचा परिणाम कथेवर जाणवत नाही. कथेची लयबद्धता टिकून ठेवण्यात दिग्दर्शक आणि पटकथा लेखकानं घेतलेली मेहनत चढउतारासहित दिसून येते.
पूर्वार्धात कथा थोडी डगमगते. कलाकारांचा अभिनय कथेला सावरून घेतो. उत्तरार्धातदेखील कथा थोडी लय सोडते. पण अभिनय ही सिनेमाची मजबूत बाजू आहे. श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे या कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. स्मिता तांबेची सशक्त भूमिका सिनेमाला चार चाँद लावते. तिचे संवाद आणि अभिनय गुंतवून ठेवतात. स्त्रीप्रधान सिनेमे सिनेसृष्टीत अधूनमधून येत असतात. मात्र ‘सावट’ या स्त्रीप्रधान सिनेमाचं वेगळंपण म्हणजे मुख्य भूमिकेत असलेली स्त्री ही शोषणाला विरोध करणारी प्रवृत्ती आहे. ती सामाजिक वास्तवाशी परिचित आहे. पण तिला मिळालेल्या अधिकारांमुळे तिच्या अंगी तितकाच कणखरपणा भरलेला आहे.
दिग्दर्शक सौरभ सिन्हा आणि सिनेमाची निर्माती टीम यांचा हा प्रयोग अनेक विषयांना एकत्रपणे पडद्यावर मांडतो. रहस्यमय पद्धतीनं रंगवलेली कथा आणि दिग्दर्शकाच्या सामाजिक जाणिवा आपल्याला खिळवून ठेवतात.
मराठी सिनेमात असे विषय हाताळले जाणं ही काळाची गरज आहे. सिनेमा एक मोठं माध्यम आहे ज्यामुळे कुठलाही विषय समाजापर्यंत सृजनशील कलाकृतीच्या माध्यमातून मांडता येऊ शकतो. या माध्यमाच्या मर्यादा असल्या तरी त्याची शक्तीस्थळं ओळखून अधूनमधून असे ज्वलंत आणि वास्तवाजवळ जाणारे विषय हाताळले पाहिजेत. या मार्गावर जाणारा ‘सावट’ हा एकदा बघावा असा सिनेमा आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment