अजूनकाही
भारतीय पुराणांतील मिथककथांची ओळख करून देणारं हे नवंकोरं साप्ताहिक सदर आजपासून दर शनिवारी प्रकाशित होईल. ‘Myth’ या मूळ इंग्रजी शब्दावरून मराठीत ‘मिथ’, ‘मिथक’ हे शब्द रूढ झाले. या मिथकालाच ‘प्राक्कथा’ किंवा ‘पुराणकथा’ असंही म्हटलं जातं. ज्येष्ठ समीक्षक मिथककथांना ‘व्याजविज्ञान’ म्हणतात. म्हणजे कार्यकारणभावरिहत, केवळ कल्पनेतून निर्माण झालेलं. मात्र या कथा अदभुत, अविश्वसनीय, सुरस आणि चमत्कारिक असतात. रंजकता हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य असतं. आणि तेच या सदराचंही प्रयोजन आहे.
.............................................................................................................................................
पुराणकाळात भरतवंशांत गाधी नामक धर्मपरायण व प्रजाहीत दक्ष राजा होऊन गेला. त्याने धर्मवृत्तीने पृथ्वीचे पालन केले. सुखसमृद्धीने युक्त असलेल्या राजाला अपत्य नसल्याने दुःख झाले. व्रतवैकल्ये, दान धर्म व तीर्थयात्रा करूनही संसारवेलीवर फूल उगवले नाही, तेव्हा त्याने पत्नीसह वनवास पत्करला. वनवासात मात्र त्याची इच्छा फलद्रूप होऊन त्याच्या राणीने सुलक्षणी व रूपवान कन्यारत्नास जन्म दिला. राजा आनंदाने राज्यात परतला. कन्येचे नाव सत्यवती ठेवले. ती उपवर झाल्यावर राजाला तिचा विवाह च्यवनमुनींच्या ऋचिक नामक पुत्राशी करून द्यावा लागला. सत्यवतीच्या तोलामोलाचे स्थळ न मिळाल्याने राजाला फार दुःख झाले. पण याच जावयाच्या कृपाप्रसादाने गाधीला उतारवयात एक पुत्र झाला, तोच विश्वामित्र तथा देवरात होय.
विश्वामित्राला गाधीने राजपुत्राला उचित असे सर्व शिक्षण दिले. विश्वामित्र उंचापुरा, देखणा, सशक्त व वीर्यशाली योद्धा होता, परंतु शीघ्रकोपी व अहंमन्यही होता. जेवढा गाधीविषयी प्रजेला आदर होता, तेवढीच किंबहुना जास्तच विश्वामित्राविषयी भीती वाटत असे. प्रजा नेहमी त्याला वचकून असे. उतारवयात झालेला पुत्र म्हणून तो राजा-राणीचा लाडका होता. तो वयात येताच राजाने त्याला राज्याभिषेक करून राज्याची धुरा त्याच्या खांद्यावर सोपवली. राजाराणीने वानप्रस्थाश्रम स्वीकारला.
एकदा ग्रीष्म ऋतूत वैशाख महिन्यात विश्वामित्र मोठ्या लव्याजम्यासह शिकारीस निघाला. गिरीकंदरांत व जंगलांत हिंडत असताना सूर्य माथ्यावर आला तरी त्याला वाघ-सिंहादी पशूच काय पण साधा पिटुकला ससासुद्धा मिळाला नाही. तहान-भूक यांनी सैनिक क्लान्त झाले, पण एखाद्या ओढ्याकाढी जाऊन पाणी प्राशन करण्याचे धाडस कुणीही केले नाही, कारण विश्वामित्राचा दराराच तसा होता.
त्याच जंगलात वसिष्ठमुनींचा आश्रम होता. आश्रम सदाहरित वनराईने नटला होता. मुनी वसिष्ठ वरुणदेवाचे पुत्र असल्यामुळे सर्व ऋतूंची त्यांच्यावर कृपादृष्टी होती. भोवतालची वनश्री विविध रंगांचं अपूर्व लेणं ल्यायली होती. लतावेली आपल्या पुष्पकळ्यांच्या गंधमय वैभवासह प्रचंड वृक्षांना बिलगल्या होत्या. निर्झर, ओहोळ निर्भरपणे खळाळून वाहत होते. पर्वतकड्यावरून निर्मळ पाण्याचे प्रवाह बेदरकारपणे दर्यामंध्ये कोसळत होते.
शिकार न मिळाल्यामुळे व नाहक शारिरीक कष्ट झाल्यामुळे वैतागलेल्या विश्वामित्राने मुनींच्या आश्रमात प्रवेश केला. प्रखर उन्हाळा असतानाही आश्रमांतील थंडगार वातावरण पाहून विश्वामित्राला नवल तर वाटलेच, पण थोडी असूयाही वाटली. विश्वामित्रांचे मुनीनी सहर्ष स्वागत केले. अल्पावधित भोजनप्रबंध होईल तोपर्यंत हात-मुख प्रक्षालन करून थोडा विसावा घेण्यास त्यांनी प्रेमाने सांगितले. भोजन म्हणजे कंदमुळे, फळे, मध व फार फार तर गोरस या पलीकडे ते काय देऊ शकणार, असा विचार विश्वामित्राच्या मनात आला. त्याने शस्त्रे अंगावेगळी केली. थंड पाण्याने आपला शीण हलका केला. काही वेळाने मुनींच्या शिष्यांनी भोजनासाठी पाचारण केले.
पत्रावळी-द्रोण व मृत्तिकापात्रे यातूनच आज भोजन करावे लागणार असे मनात येऊन हेही नसे थोडके असे म्हणणारा विश्वामित्र प्रत्यक्ष भोजनप्रबंध पाहून अवाक झाला. चांदीच्या ताट-वाट्या, तांब्या-भांडी यांनी पंगत सजली होती. जोडीला समयाही होत्या. रांगोळ्यांनी पंगत सुशोभित दिसत होती. आश्रमांत विरागी वृत्तीने राहणार्या मुनींनी राजाच्या तोडीस तोड असा प्रबंध कसा काय केला असावा, याचे विश्वामित्राला कुतूहल वाटले. या सर्व नेत्रदीपक आदरातिथ्यामागे नंदिनी नामक कामधेनू कृपाशील आहे असे त्याच्या निदर्शनास आले. त्याच्या मनातील शंका जाणून मुनींनी कौतुकाने नंदिनीचे गुणवर्णन केले. भोजन अत्यंत रुचकर, सात्त्विक आणि खुमासदार होते. पण विश्वामित्राचे जेवणात लक्ष नव्हते. तो मनात वेगळेच गणित करत होता. आपल्याला खिजवण्यासाठी वसिष्ठ वारंवार नंदिनीचे वर्णन करत आहेत असे त्याला वाटले. मनात एक निर्धार करून त्याने भोजन आटोपते घेतले. तो उठताच इतर सैनिकही उठले.
विश्वामित्राच्या डोक्यात विचारांची चक्र वेगाने आवर्तने घेऊ लागली. नंदिनी म्हणजे सुकाळच सुकाळ हे सोपे सुलभ गणित त्याने सोडवले. कशीची वाण नाही. दुर्भिक्ष्य नाही. बस. फक्त नंदिनीची मागणी करावी, या अंतिम निर्णयाप्रत तो आला. ब्राह्मण धनाचा लोभी असतो असे जाणून त्याने करोडो सवत्स व सालंकृत गायी देण्याचा प्रस्ताव मांडून नंदिनीची मागणी केली. राज्य व धनाचे भांडारही त्याने देऊ केले. वरवर शांत दिसणार्या गाधीसुताच्या मनात नंदिनीचे विचार खळबळत आहेत, असे समजल्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवून ‘देणार नाही’ असे स्पष्ट सांगितले. पण तो मागत राहिला व मुनी नकार देत राहिले.
राजाच्या विनंतीचा अव्हेर, हा विचारच विश्वामित्राला सहन झाला नाही. त्याची क्षत्रिय वृत्ती जागृत झाली. अहंकाररूपी नागाच्या फण्यावर दहाचा आकडा स्पष्ट दिसू लागला. वसिष्ठांचा मेरु पर्वत झाला होता. विश्वामित्राच्या क्रोधाचा कडेलोट झाला. तो त्या तिरीमिरीतच आश्रमामागील गोशाळेत गेला. विश्वामित्राचा आवेश बघून सैनिक व शिष्यही धास्तावले. पण मुनी मात्र शांत राहिले.
ती गोशाला प्रशस्त, हवेशीर व स्वच्छ होती. २०-२५ गाईगुरांचे खिल्लार सहज राहू शकेल असे त्याचे स्वरूप होते. ते गोधन खरंच धन वाटावे असे वैभवशाली व उमदे होते. प्रत्येक गुराच्या चारापाण्याची स्वतंत्र सोय केली होती. वृषभ-गाई व वासरांच्या मानेच्या हालचालीमुळे त्यांच्या गळ्यांतील सुवर्ण घंटिकांचा मंजुळ नाद कर्णेंद्रियांना सुखवत होता. ठिकठिकाणी मोठाले हारे-टोपल्या व दूध काढण्यासाठी लागणारी मृत्तिका पात्रे व्यवस्थित ठेवली होती. वाळलेल्या गोवर्यांची रचलेली रास आश्रमवासियांचा नीटनेटकेपणा दर्शवत होती. एकंदरीत मन व नेत्र प्रसन्न करणारे गोशाळेचे स्वरूप होते.
पण या सौंदर्याकडे लक्ष द्यायला व त्याचे कौतुक करायला त्याला वेळही नव्हता व त्याची मन:स्थितीही नव्हती. त्याचे मनःस्वास्थ्य दोलायमान करणारी ती स्वर्गीय तेजःपुंज नायिका नंदिनी स्वस्थचित्ताने डोळे मिटून रवंथ करत होती. गोशाळेत अनेक गायी-वासरे व वृषभ होते, पण या सर्वांत नंदिनीचे रूपच न्यारे. हरिणींच्या कळपांत नीलगाय दिसावी, तशी ती नजरेत भरत होती. मुक्या प्राण्यांना सहावे इंद्रिय असते की काय न कळे. विश्वामित्राच्या रूपांत संकट आपल्या दिशेने येत असल्याचे जाणवताच नंदिनी चारी खुटांवर ताडकन उभी राहिली. त्याबरोबर भोवतालच्या गाईसुद्धा उभ्या राहिल्या. नंदिनी उभी राहताच तिचे नखशिखांत लावण्य दृष्टीगोचर झाले. तिचा वर्ण दुधाप्रमाणे वा हिमाप्रमाणे धवलशुभ्र होता. शेपटीचा काळाभोर झुबका सोडला तर शरीरावर कुठे तीळमात्र अन्य वर्णाचा डाग नव्हता. शिंगे अत्यंत आखूड व प्रमाणबद्ध असून त्यावर पाणीदार मोत्यांचे घोस लावलेली सुवर्णाची रत्नजडीत टोपणे लावली होती. तिचे नेत्र टपोरे व अनोखे तेजस्वी होते. कान मध्यम आकाराच्या केवड्याच्या पानांप्रमाणे होते. गळ्याखालच्या पोळीवर सुवर्णघंटिकांचा व इतर सुवर्णमोत्यांचे हार रुळत होते. पाठीवर मखमली लाल वर्णाची कशिदा काढलेली मोती जडवलेली झूल होती. चारी पायांत चांदीचे भरीव तोडे असून त्याला सुवर्णाचे घुंगर लावले होते. पायांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी श्रवणीय वाटत होता. धक्का लागला तरी दूध सांडेल अशी तिची कास होती. चारी सड गुलाबी वर्णाचे असून दुधाने तटतटले होते.
तिचे ते नेत्र विस्फारीत करणारे दैवी स्वरूप पाहून विश्वामित्र काही क्षण मंत्रमुग्ध झाला. पण नंतर भानावर येऊन तो पुढे झाला व त्याने नंदिनीचे रेशमी गोंडे लावलेले मजबूत दावे खसकन तोडले. षड्रिपुतील क्रोध व लोभ या रिपुंनी राजाच्या मनाचा व बुद्धीचा पूर्ण ताबा घेतला. आपला अधिकार, मर्यादा व संस्कृती सोडून आपण हे काय करतो आहोत, याचा त्याला पूर्ण विसर पडला. ब्राह्मण व गोमाता यांना क्षती न पोहोचवण्याचे त्याचे पिढीजात ब्रीद विश्वामित्र विसरला. दाता व याचक यांना समाधान देणारे दान असेल तरच ते देण्या-घेण्याला अर्थ आहे, हे त्या अहंमन्य क्षत्रियाच्या ध्यानात आले नाही व इथेच त्याचे चुकले.
दावे तोडल्यावर नंदिनीच्या गळ्यांतील घंटिका आवेशाने किणकिणल्या कारण विश्वामित्र तिला बळजबरीने ओढत होता आणि ती चारी खूर भूमीत रोवून निषेधात्मक मान हलवत होती. तो खवळला. मुके, दुबळे जनावर आणि ही मिजास! कितीही बळ दाखवले तरी गाईची वाघीण थोडीच होणार आहे! राज्याच्या क्रोधाचा ज्वालामुखी जागृत झाला व उद्रेकही झाला. राज्याच्या पाठोपाठ आलेल्या वसिष्ठांकडे नंदिनीने करुण दृष्टीने पाहिले. अगतिकपणे ती हंबरली. तिच्यावरचे संकट पाहून इतर गुरेही उभ्या जागी थयथयाट करू लागली. पुन्हा नंदिनीने मुनींकडे पाहून हंबरडा फोडला. जणू तिला म्हणायचे होते की, काहीही झाले तरी या आश्रमांतून मला जायचे नाही. माझी माता सुरभिचीसुद्धा हीच इच्छा आहे. तिचे मनोगत जाणून मुनी शांतपणे म्हणाले, ‘‘हे कल्याणमयी माते, क्षत्रियांचे बळ तेज आहे आणि माझे बळ क्षमा आहे. राजाही तुला सांभाळू इच्छितो, पण मी तुझा त्याग करू इच्छित नाही. पण तुझ्या स्वर्गिय रूपगुणांमुळे माझ्या पर्णकुटीपेक्षा राजप्रसाद योग्य आहे, असे तुला नाही का वाटत? तुझ्या मनाला येईल तिथे तू वास्तव्य करू शकतेस.’’ मुनी वसिष्ठांचे निर्वाणीचे शब्द ऐकून नंदिनीने आपली सारी शक्ती पणाला लावून दाव्याला जोराचा हिसडा मारल्याबरोबर बेसावध व स्वतःच्या बळाचा गर्व असलेला राजा भूमीवर कोलमडला. आपले रक्षण आता आपणच केले पाहिजे, हे त्या गरीब गाईने जाणले.
नंदिनीच्या अंगात हजारो रेड्यांचे बळ संचारले. बेभान होऊन ती आश्रमभर पळू लागली. बरे तर बरे विश्वामित्राने तिचे दावे हातावेगळे केले होते, नाही तर त्या नरव्याघ्राची दुबळ्या गाईने चांगलीच फरफट केली असती. शेपूट, शिंगे व खूर यांनी तिने शत्रूला पळता भुई थोडे केले. शेण व मूत्राचा सडा सर्वत्र घातला. शेण-मूत्र, तोंडाचा फेस, शेपूट व खूर यांपासून म्लेछ, यवन, किरात, बर्बर, शबर, दरद व सिंहल या मानवजातीची सशस्त्र निर्मिती झाली. सर्व जातींनी एकत्र येऊन क्षत्रिय कुलोत्पन्न गाधीसुत विश्वामित्राचा पराभव केला. आश्चर्याची गोष्ट अशी की, या धुमचक्रीत वसिष्ठ व त्यांचे शिष्य यांच्या केसालाही धक्का लागला नाही.
खाली मान घालून उभ्या असलेल्या पराभूत विश्वामित्राला नंदिनी मनुष्यवाणीने म्हणाली, ‘‘राजा विश्वामित्रा, गाय ही साक्षात अमृतमंथन प्रसंगी निर्माण झालेली पूजनीय देवता आहे व पृथ्वीतलावरील परम दैवत आहे. वेळ आली की दुबळी गायसुद्धा वाघीण बनते, हे तुझ्या प्रत्ययाला आलेलेच आहे. दुबळे, गरीब, ब्राह्मण व स्त्री यांचे रक्षण करणे हे खरे क्षत्रियांचे कर्तव्य. पण तू ते अव्हेरलेस. गाईच्या शिंगापासून शेपटी व खुरापर्यंत प्रत्येक गात्रांत ब्रह्मा-विष्णू-महेश, इंद्र, चंद्र-सूर्य, गरुड-सर्प अश्वीनीकुमार व समुद्र यांचे वास्तव्य असते. गोमय व गोमूत्र यांतही पार्वती व लक्ष्मी यांचा निवास असतो. हे यापुढे विसरू नकोस. जा.’’
विश्वामित्र खजील झाला, कारण नंदिनीने त्याची जागा दाखवून दिली होती. त्याच्या मनात मात्र वसिष्ठांविषयी कायमची तेढ निर्माण झाली. संधी मिळेल तेव्हा त्यांचा सूड घेण्याची खूणगाठ मनात बांधून तो उरलेल्या सैन्यासह राज्यात परतला.
त्यानंतर नंदिनीने सार्या आश्रमभर व भोवताली आपली कृपा दृष्टी फिरवली. आश्रम पूर्ववत स्वच्छ व पवित्र झाला. गोशाळेजवळच पद्मासन घालून बसलेल्या मूर्तीमंत क्षमाच अशा वसिष्ठांपाशी ती गेली व तिने लडिवाळपणे आपले मस्तक त्यांच्या पाठीवर घासून त्यांचे मुख चाटून आपली कृतज्ञता व्यक्त केली. मुक्या जनावरांची माया व प्रेम जाणून मुनींचे नेत्रही पाणावले. त्यांनी उठून तिला नमस्कार केला. तिला खुंटीला बांधले. काही वेळापूर्वी आपल्यासाठी इथे रण माजले होते, हे विसरून वसिष्ठांनी पुढ्यांत टाकलेला हिरवागार लुसलुशीत चारा नंदिनी स्वस्थ चित्ताने खाऊ लागली.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 30 March 2019
आयशप्पत, हे बरंय! स्वत: नसती मस्ती करायची. मग स्वकर्माने स्वत:चाच नक्षा उतरल्यावर राग मात्र वासिष्ठांवर धरायचा. विश्वामित्रांचं हे वर्तन बरोबर नाही. -गामा पैलवान