अजूनकाही
चांगली कलाकृती तयार करण्यासाठी त्यामागचा विचार स्पष्ट असणं महत्त्वाचं असतं. जेणेकरून त्या कलाकृतीद्वारे जे काही मांडायचं आहे, ते रसिकांपर्यंत सहजरीत्या पोहचू शकेल. ‘आम्ही बेफिकर’ हा सिनेमा नेमकं काय मांडू पाहतोय, हेच दिग्दर्शकाला सांगता आलेलं नाही.
सिनेमाची कथा आजच्या तरुण पिढीवर आधारित आहे. मात्र त्यात एकाच वेळी अनेक उप-विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे सावळागोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सिनेमा पूर्णतः गंडलाय असं वाटतं.
ही चार महाविद्यालयीन तरुणाची कथा आहे. या तरुणांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. मात्र त्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं. ही चारही तरुण म्हणजे वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत. तरुणपणातलं झपाटलेपण त्यांच्या अंगात आहे. हे तरुण सिनेमा निर्माण करण्याचं स्वप्न पाहतात. मग त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यांची जिद्द, असं काहीसं कथानक उभं करण्याचे दिग्दर्शक कवीश्वर मराठे यांचे प्रयत्न समाधानकारक ठरत नाहीत.
कारण मैत्री, प्रेम, पैसा, नाती यांच्यात गुंतलेला सिनेमा पारंपरिक पद्धतीनं पुढे रेटला आहे. सिनेमाची कथा चांगली असली तरी त्यावर आणखी मेहनत घेणं आवश्यक होतं. पडद्यावर नेमकं काय सुरू आहे हेच कळत नाही.
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांच्यात ताळमेळ लागत नाही. कथा बरी असली तरी सिनेमाची मांडणी असमाधानकारक आहे. कथेत येणारे चढउतार लय सोडतात. नको तिथं गडद आणि भडक केलेले संवाद नीरस आहेत. सिनेमाचं चित्रीकरण हीदेखील कच्ची बाजू आहे. एडिटिंगमध्ये राहिलेल्या उणिवा पडद्यावर सहज उमटून दिसतात.
दिग्दर्शकाचा हा पहिला प्रयत्न आहे. त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरी सिनेमातील तांत्रिक गोष्टी पिच्छा सोडत नाहीत. अभिनय हा सिनेमाचा महत्त्वाचा घटक असतो. मात्र या सिनेमात नवख्या कलाकारांचा अभिनय निराशाजनक आहे. सुयोग गोऱ्हे, स्वप्निल काळे, अक्षय हडके या नवीन कलाकारांनी चांगला प्रयत्न केला आहे. ‘उर्फी’ या सिनेमानंतर मितली मयेकर यात अभिनय करताना दिसते. मात्र तो साधारण आहे.
दिग्दर्शकानं केलेला प्रयत्न नक्कीच चांगला आहे. मात्र सिनेमा विषयाच्या केंद्राभोवती फिरत नाही. कथा कोलांटउड्या मारत राहते आणि मूळ विषय बाजूला पडतो. एक विषय प्रेक्षकांसमोर उलगडण्यापूर्वीच दुसऱ्या विषयाला हात घातला जातो. त्यामुळे सबंध सिनेमात ठाम असं काहीच राहत नाही. सिनेमा ‘बेफिकर’ तरुणांची कथा मांडत असला तरी कथेबाबत दिग्दर्शकानं केलेली ‘बेफिकरी’ सिनेमाच्या मुळावर उठते.
थोडक्यात सिनेमा दिग्दर्शन, पटकथा, संवाद, अभिनय आणि संगीत या पाचही स्तरावर कमी पडतो. तांत्रिकदृष्ट्या सिनेमात वापरण्यात आलेल्या ‘फ्रेम’ फार प्रभावी नाहीत. सिनेमाचं संगीत ठीकठाक आहे, तर संवादात लयबद्धता नाही. कथा ताणून सिनेमा लांबलचक केला आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांची एक प्रकारे परीक्षाच पाहतो.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment