‘मर्द को दर्द नहीं होता’ : पाप को जलाकर राख कर देनेवाले मर्द-औरत
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘मर्द को दर्द नहीं होता’चं पोस्टर
  • Sat , 23 March 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मर्द को दर्द नहीं होता Mard Ko Dard Nahi Hota राधिका मदन Radhika Madan अभिमन्यू दासानी Abhimanyu Dasani

नायक पाच सहा गुंडांशी लढतो आहे, इतक्यात एखादा गुंड त्याच्या पाठीवर खुर्ची किंवा तत्सम गोष्ट मारतो. खुर्ची तुटते, नायकाला काहीच झालेलं नसतं, तो शर्ट झटकून त्याही गुंडाला लोळवतो. आजवर कित्येक मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतरही भाषिक चित्रपटांत दिसलेल्या या दृश्याला वासन बाला दिग्दर्शित ‘मर्द को दर्द नहीं होता’ पुढच्या पातळीवर घेऊन जातो. तो नायकाला दुखापत झाली तरी न जाणवण्याचं शास्त्रीय कारण समोर ठेवतो, आणि त्या संकल्पनेच्या अनुषंगानं मध्यवर्ती पात्रांचं विश्व उभं करतो. या विश्वात चित्रपटांचे, त्यांतील क्लिशेजचे संदर्भ देत, त्यांची आणि ते वापरत असल्यानं अगदी स्वतःचीही खिल्ली उडवली जाते. स्टाइल आणि सबस्टन्स या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमिलाप घडवून आणत भारतीय चित्रपटांत क्वचितच दिसणारं रेखाटन केलं जातं. चावून चोथा झालेल्या पूर्वायुष्यातील कथांच्या ढिगाऱ्यातून उभी राहिलेली पात्रं त्या क्लिशेजवर मात करून वेगळी ठरतात. नायिका केवळ प्रेमकथेला पूरक न ठरता आपल्या भावना व्यक्त करत गुंडांना लोळवताना दिसते. ‘मर्द को दर्द नहीं होता’ हे वाक्य तर फक्त त्याचा एक पैलू आहे, इथली ‘औरत’देखील काही त्याच्याहून कमी नाही.

सूर्या (अभिमन्यू दासानी) हा आपला नायक आहे. तो फोर्थ वॉलची तमा न बाळगता प्रेक्षकाशी संवाद साधत शेवटच्या दृश्यादरम्यान पहिल्यापासून कथा सांगतो म्हणत भूतकाळात घेऊन जातो. काँजिनेंटल इन्सेन्सिटिव्हिटी टू पेन नामक आजार (सोप्या भाषेत - ‘इस मर्द को दर्द नहीं होता’; किंवा एक काम करा, सूर्या म्हणतो त्याप्रमाणे नंतर गुगल करा) असलेल्या सूर्याला या जगामधील इतर लोकांप्रमाणे बनवण्यासाठी त्याचे आजोबा (महेश मांजरेकर) त्याला निरनिराळ्या तऱ्हेचं प्रशिक्षण देतात. ज्यात वेदना झाल्याच्या खोट्या जाणिवेच्या निमित्तानं उद्गारायचा ‘आऊच’ हा एकमेव शब्द शिकवण्यापासून इतरही अनेक गोष्टींचा समावेश होतो. काही काळानं वडिलांकडून (जिमीत त्रिवेदी) त्याच्यावर लादल्या गेलेल्या बंधनांमुळे त्याचा बाहेरच्या जगाशी असलेला परिचय चित्रपटांतून दिसणाऱ्या विश्वापुरता मर्यादित राहतो. ब्रुस लीपासून ते जॅकी चॅनपर्यंत आणि मनमोहन देसाईच्या चित्रपटातील अमिताभ बच्चनपासून ते गोविंदापर्यंत सगळे लोक त्याचे आदर्श आहेत. त्याच्या विश्वात तो नायक आहे. ‘पाप को जलाकर राख कर दूंगा’ हे त्याचं ध्येय आहे.

सुप्री (राधिका मदन) ही त्याची मैत्रीण आणि चित्रपटाची नायिका आहे. किशोर कुमारचं ‘नखरेवाली’ पार्श्वभूमीवर सुरू असताना ती गुंडांशी मारपीट करताना दिसते. ती सौंदर्यवान आहे, मादक आहे, संवेदनशील आहे, पण तरीही स्टीरियोटिपिकल नायिकेहून वेगळी आहे. कारण मुळात ती सर्वार्थानं परिपूर्ण आहे अशातला भाग नाही. मानसशास्त्रीय आव्हानाची अनौपचारिक संज्ञा असलेल्या ‘डॅडी इश्यूज’नं (हेही नंतर गुगल करता येईल) ती त्रस्त भासते. परिणामी आपल्या आईप्रमाणेच आपल्याला नियंत्रित करू पाहणाऱ्या पुरुषांशी तिचा संबंध येतो. सूर्याच्या आयुष्यात भौतिक पातळीवरील समस्या अधिक प्रमाणात असतील तर सुप्रीच्या आयुष्यात त्या सुप्त, मानसिक पातळीवरील अधिक आहेत. तिच्या आईसोबतच्या एका महत्त्वाच्या आणि तरल दृश्यातील तिचं संभाषण याचं उत्तम उदाहरण मानता येईल.

कुठेतरी ऐकलेलं एक वाक्य आठवतं, माणसाला त्याच्यातील दोष अधिक रंजक आणि परिपूर्ण बनवतात. नसता सगळं मूलतःच परिपूर्ण असतं तर सगळं काही किती रटाळ झालं असतं! ‘मर्द को दर्द नहीं होता’मधील बरी-वाईट (बहुतांशी) सगळीच पात्रं या प्रकारात मोडतील अशी आहेत. मग अनुक्रमे बेवडा मार्गदर्शक आणि खलनायकाच्या रूपातील कराटे मणि आणि जिमी अशी दोन क्लिशे, विचारसरणीच्या पातळीवर टोकाची मतं आणि आयुष्यं असलेल्या जुळ्या भावंडांची पात्रं (दोन्ही- गुलशन देवय्या), सुप्री ते अगदी सूर्याच्या आजोबापर्यंत बऱ्याच ठिकाणी हे लागू पडतं. एरवी एका ओळीत वर्णन करता येतील अशा पात्रांच्या उणीवा, त्यांच्या समस्या आणि जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन त्यांना खोली प्राप्त करून देतात. हे सगळे पैलू (आणि  पात्रं) सूर्याच्या कथेत जोडले जाऊन चित्रपटाची कथा बनते.

चित्रपटकर्त्यांच्या चित्रपट या माध्यमाप्रती असलेल्या प्रेमाचा सदर चित्रपटाच्या ठळक वैशिष्ट्यपूर्ण शैलीत महत्त्वाचा वाटा आहे. चित्रपटात प्रासंगिक स्वरूपात येणारे अनेक संदर्भ त्याचं प्रतीक आहेत. लोकप्रिय अभिनेत्यांपासून ते विजय आनंद आणि मनमोहन देसाई अशा चित्रपट निर्मितीच्या दोन टोकांदरम्यानचे संदर्भ येतात. अर्थात ते अशा पद्धतीनं की, ते कळाले तर चित्रपटाची मजा अधिक वाढेल, आणि नाही कळाले तरी विशेष फरक पडणार नाहीच. याखेरीज चित्रपटाचं स्टायलिस्टिक चित्रण, संकलन आणि गाण्यांची निवड या गोष्टी त्याला क्वेन्टिन टॅरंटिनो, एडगर राईट, रॉबर्ट रॉड्रिग्ज या दिग्दर्शकांच्या चित्रपटांसारखी भावना निर्माण करतात. चित्रपटातील संगीत आणि नव्या-जुन्या गाण्यांच्या वापरामुळे त्याला वेळोवेळी रेट्रो प्रकारचं वैशिष्ट्य प्राप्त होतं. शिवाय, चित्रपट वेळोवेळी रेट्रोकडून समकालीन भासणाऱ्या पॉप, रॉक प्रकाराकडेही वळतो. जय पटेलचं छायाचित्रण आणि प्रेरणा सैगलचं संकलन चित्रपटाला अधिक स्टायलिस्टिक बनवण्यात सहाय्यक ठरतं.

अभिमन्यू दासानी चित्रपटांवर वाढलेल्या सूर्याच्या रूपात अॅक्शन सीन्समध्ये (आणि एकूणच चित्रपटात) शोभून दिसतो. वर हेही कमी की काय म्हणून निर्विवादपणे उत्तम अभिनयदेखील करतो. तर राधिका मदन माचो नायिका म्हणून कमाल करते. एका अप्रतिमरित्या सुंदर अशा, एखाद्या म्युजिकल चित्रपटातून आलं की काय असं भासणाऱ्या ‘ड्रीमटाइम’ या तिच्या पात्राला वाहिलेलं गाणं पहावं. गुलशन देवय्या हा भारतीय चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या काही अप्रतिम अभिनेत्यांपैकी एक का आहे, हे तो पुन्हा एकदा दाखवून देतो. महेश मांजरेकर, जिमीत त्रिवेदी हे लोक सहाय्यक भूमिकांमध्ये पूरक अशी कामगिरी करतात.

चित्रपट हे माध्यम आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व बाबी अगदीच प्रभावीपणे हाताळणारी एक परिणामकारक कलाकृती निर्माण करण्यात लेखक-दिग्दर्शक वासन बाला यशस्वी होतो. जे गाणी ते चित्रपट सर्वत्र रिमेक, रिबूट बनवणाऱ्या स्टुडिओ एक्झिक्युटिव्ह आणि मार्केटिंग तज्ज्ञांचं वर्चस्व असलेल्या उद्योगात अगदी मोजके लोक साध्य करू शकतात. परिणामी एक ‘न भूतो न  भविष्यति’ प्रकारचा अनुभव देणारा हा चित्रपट आवर्जून पहावासा बनतो!

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख