'रोग वन : अ स्टार वॉर्स स्टोरी' : सर्जनशील कमी आणि गल्लाभरू जास्त
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
यश एनएस
  • 'रोग वन : अ स्टार वॉर्स स्टोरी’चं एक पोस्टर
  • Sun , 18 December 2016
  • इंग्रजी सिनेमा English cinema रोग वन : अ स्टार वॉर्स स्टोरी Rogue One : A Star Wars Story Felicity Jones डोन्नी येन Donnie Yen

'अल्युझ्न' हा इंग्रजी साहित्याच्या अभ्यासातला एक शब्द. अल्युझ्न म्हणजे एखाद्या पुस्तकात येणारे इतर पुस्तकांचे किंवा कलाप्रकारांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदर्भ. उदाहरणार्थ, 'रोग वन : अ स्टार वॉर्स स्टोरी' या चित्रपटात आधी येऊन गेलेल्या स्टार वॉर्स चित्रपटांचे, स्टार वॉर्स कार्टून्सचे आणि स्टार वॉर्स कॉमिक्सचे शेकडो 'अल्युझ्न्स' आहेत. जे प्रेक्षक हे संदर्भ पटकन हेरू शकतील, त्यांना संदर्भांच्या विपुलतेमुळे हा चित्रपट कदाचित खूप आवडेल किंवा अजिबात आवडणार नाही. ज्यांना आवडेल, त्यांना मागच्या वर्षीच्या 'स्टार वॉर्स : द फोर्स अवेकन्स'प्रमाणेच यातही 'स्टार वॉर्स'च्या इतिहासाचा ४० वर्षांचा उत्सव अनुभवायला मिळेल आणि ज्यांना आवडणार नाही, त्यांना एक यशस्वी 'फ्रॅंचाईझ' ४० वर्षं जुन्या इतिहासाच्या चौकटीतून काही केल्या बाहेर पडायला तयार नसल्याचं जाणवेल. बहुतांशी या दोन गटांचं प्रमाण समान असणार.

तसं बघायला गेलं, तर मागच्या पाच-सहा वर्षांमध्ये इंटरनेटच्या प्रसारामुळे भारतातल्या प्रेक्षकांचं हॉलीवुडच्या सुप्रसिद्ध चित्रपटांबद्दलचं आणि टीव्ही मालिकांबद्दलचं ज्ञान वाढलं आहे. ते आता 'आयएमडीबी'वरच्या 'टॉप २५० मूव्हीज' या यादीतले चित्रपट वेगाने क्रमवार सांगू शकतात आणि 'स्टार वॉर्स' चित्रपट-मालिकेतले ७ पैकी ४ चित्रपट या यादीत आहेत. त्यामुळे बहुतांश प्रेक्षकांना 'स्टार वॉर्स' ही चित्रपट-मालिका ऐकून तरी नक्कीच माहिती असेल. तरी अमेरिकी प्रेक्षकांना या चित्रपटांची जशी ओढ असते, तशी कदाचितच भारतातल्या प्रेक्षकांना असेल. जशी 'शक्तिमान' ही मालिका किंवा एके काळी रविवारी सकाळी दूरदर्शनवर येणार्‍या मालिका भारतातल्या एका ठरावीक पिढीच्या बालपणाचा अविभाज्य भाग आहेत, तसाच १९७७मध्ये आलेला पहिला 'स्टार वॉर्स : एपिसोड वन' हा चित्रपट अमेरीकेत महत्त्वाचा आहे. १९७७ ते १९८३मध्ये प्रदर्शित पहिल्या तीन 'स्टार वॉर्स'नी त्या काळी 'सायन्स फिक्शन' चित्रपटांच्या श्रेणीत क्रांती घडवली होती.

व्यावसायिकदृष्ट्या १९८३नंतर आलेल्या इतर 'स्टार वॉर्स' चित्रपटांप्रमाणेच 'रोग वन'मध्येही या फ्रॅंचाईझचे प्रस्थापित मानदंड आणि प्रचंड लोकप्रिय वैशिष्ट्यं वापरणं डिझनीला भागच होतं, पण नवीन चित्रपटांमध्ये या वैशिष्ट्यांबरोबरच नवीन अनुभव असणंही गरजेचं असल्याची बहुतांश व्होकल फॅन्सची मागणी आहे. त्यामुळे 'रोग वन'सारखे चित्रपट बनवणं हे तारेवरच्या कसरतीसारखं असतं. त्यात १९९९ ते २००५मध्ये आलेल्या तीन 'स्टार वॉर्स' चित्रपटांच्या अपयशाची टांगती तलवारही रोग वनवर होती. मागच्या वर्षी आलेल्या 'द फोर्स अवेकन्स'ने हे आव्हान ज्या प्रकारे पेललं, तसंच ते 'रोग वन'नेही पेललं आहे.

'रोग वन'च्या पटकथेत आकाशगंगांमधलं राजकारण, हुकूमशाही, क्रांतिकारक, अंतरिक्षातलं युद्ध, प्रमुख पात्रांचं त्यांच्या वडलांबरोबरचं नातं, रोबोट, 'द फोर्स' आणि असे अनेक ओळखीचे पैलू आहेतच. या वेळची गोष्ट या चित्रपटातलं प्रमुख पात्र 'जिन्न एर्सो' हिची आहे. चित्रपटाची सुरुवात एका छोट्या ग्रहावरच्या शेतापासून होते आणि इथेच 'ओर्सन क्रेन्निक' नावाच्या खलनायकाला बघून लगेच २००९च्या 'इंग्लोरियस बास्टर्ड्स'मधलं 'कर्नल हान्स लांडा' हे पात्र आठवतं. तिथून जिन्नची गोष्ट सुरू होऊन तिचा शेवट पहिल्या 'स्टार वॉर्स'च्या कथानकाच्या बरोबर आधी येऊन थांबतो. ही गोष्टही 'स्टार वॉर्स'च्या मूलभूत समीकरणाला अनुसरूनच आहे - एक तरुण, गरीब, निष्पाप पात्र योगायोगांमुळे अंतरिक्षातल्या राजकारणात अडकत जातं आणि शेवटी क्रांतिकारकांना सामील होऊन युद्ध करतं. 'रोग वन'चं कथानक पहिल्या भागात जास्त खिळवून ठेवतं आणि त्या कथानकात वर उल्लेख केलेले ओळखीचे पैलू जसजसे यायला लागतात, तसतसा पुढे घडणार्‍या चित्रपटाचा अंदाज सहजपणे बांधता यायला लागतो.  

या चित्रपटात जिन्न सोडून बाकीच्या पात्रांची पार्श्वभूमी किंवा त्यांच्या प्रेरणांना महत्त्व दिलं गेलेलं नाही. परिणामी, या पात्रांशी प्रेक्षक तितकासा जोडला जात नाही. त्यामुळे जेव्हा शेवटचं अटळ युद्ध सुरू होतं, तेव्हा प्रेक्षकांना त्या पात्रांची फारशी कदर वाटत नाही. तरीही या चित्रपटातल्या पात्रांच्या विविधतेला दाद दिली पाहिजे. पूर्वीच्या 'स्टार वॉर्स'मध्ये सगळी प्रमुख पात्रं कॉकेशन होती, पण आताच्या चित्रपटात मात्र वेगवेगळ्या जातींची पात्रं बघायला मिळतात आणि त्याचा चित्रपटाला निश्चितच फायदा होतो. या वैविध्यपूर्णतेत आणखी एक चांगली भर म्हणजे, 'रोग वन' आणि 'द फोर्स अवेकन्स' या दोन्हीही मोठ्या चित्रपटांमध्ये स्त्री-पात्रं प्रमुख आहेत. 'डार्थ व्हेडर' याला 'स्टार वॉर्स'मधला प्रमुख खलनायक म्हणायला हरकत नाही आणि या चित्रपटात तो क्वचितच दिसत असला, तरी त्याचा मर्यादित वावरही खूप परिणामकारक ठरतो.

'रोग वन'मध्ये 'फोरेस्ट व्हिटेकर' याने सर्वांत उत्कृष्ट अभिनय केला आहे. 'अरायव्हल'मध्ये त्याला अभिनयासाठी वाव मिळाला नसला, तरी या चित्रपटात मात्र अभिनयासाठी त्याला वाव मिळाला आहे. दुर्दैवाने त्याची भूमिका फार छोटी आहे. तरी चित्रपटात चांगल्या अभिनेत्यांची काही कमतरता नाही. 'बेन मेन्डेलसोह्न', 'मॅड्स मिक्केलझेन', 'डोन्नी येन' आणि 'वेन जिआंग' यांच्या अभिनयामुळे या चित्रपटाला नक्कीच एक उंची लाभली आहे. 'फोर लायन्स'सारख्या चित्रपटामध्ये सुंदर अभिनय करणारा 'रिझ एहमद' याने या चित्रपटातदेखील त्याच्या भूमिकेला साजेसं काम केलं आहे. चित्रपटातला 'डार्थ व्हेडर'ला दिला गेलेला 'जेम्स अर्ल जोन्स'चा मूळचा जोरकस आवाज याही चित्रपटात कायम ठेवल्याने त्या भयानक पात्रातला जिवंतपणा राखला गेला आहे. 'ग्रँड मोफ्फ टार्किन' हे पहिल्या 'स्टार वॉर्स'मधलं पात्र आणि त्याचा अभिनय करणार्‍या 'पीटर कुशिंग'चं १९९४मध्ये निधन झालं. विशेष म्हणजे, कम्प्युटर ग्राफिक्सच्या साहाय्याने त्याला 'रोग वन'मध्ये चितारून जिवंत केलं गेलं आहे.

कुठल्याही 'स्टार वॉर्स'बद्दल बोलताना त्यातल्या कम्प्युटर ग्राफिक्सबद्दल आणि स्पेशल इफेक्ट्सबद्दल बोलणं अपरिहार्य आहे. हॉलीवुडमधले अशा प्रकारचे बहुतांश चित्रपट भारतात फक्त थ्री डीमध्येच बघायला मिळतात. थ्री डी गॉगल्समधून चित्रपट बघताना चित्र जास्त अंधारं दिसत असल्यामुळे त्या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, रंग आणि स्पेशल इफेक्ट्स या पैलूंचं परीक्षण करणं आणि चित्रपट खर्‍या अर्थी अनुभवणं अवघड जातं. तरीही २००५मधल्या 'रिव्हेंज ऑफ द सिथ'पेक्षा 'रोग वन'मधले स्पेशल इफेक्ट्स खूप जास्त प्रगत असल्याचं नक्कीच म्हणता येईल. त्याची मुख्य कारणं म्हणजे, वेगाने सुधारत जाणार तंत्रज्ञान आणि ते वापरण्याची वाढत गेलेली कुशलता. मात्र तरीही स्पेशल इफेक्ट्सचा मोजका वापरच अधिक परिणामकारक ठरतो, हे नाकारता येत नाही आणि 'रोग वन'मधली काही दृश्यं हे सिद्धही करतात. अंधारात उभा असलेला 'डार्थ व्हेडर' जेव्हा एकदम त्याची लाल लाईट सेबर काढतो, तेव्हा स्पेशल इफेक्ट्सचा सुंदर उपयोग केल्याचा प्रत्यत येतो. मात्र 'ग्रँड मोफ्फ टार्किन' किंवा 'प्रिन्सेस लेया' यांना डिजीटली उभारण्यामागे खूप कष्ट आणि पैसे ओतूनही ही पात्रं खरी वाटत नाहीत. 'अनकॅनी व्हॅली' पार करून जाणं, म्हणजेच खरी वाटतील अशी डिजिटल मानवी पात्रं उभी करणं अजून तरी चित्रपटांना जमलेलं नाही, पण खरे वाटतील असे रोबोट कम्प्युटर ग्राफिक्स वापरून चित्रपटात दाखवता येतात. उदाहरणार्थ, या चित्रपटातला 'केटूएसओ' हा ड्रोईड.

लहानपणी सगळ्यांनाच दूरदर्शनवरची 'कॅप्टन व्योम' ही मालिका खूप आवडत असे. त्या काळी सायन्स फिक्शन चित्रपट किंवा सायन्स फिक्शन मालिका फारशा बघायला मिळत नसत. अजूनही 'मिलिंद सोमण' हे नाव ऐकलं की, मला पहिल्यांदा 'कॅप्टन व्योम' आठवतो. त्या काळच्या अमेरिकी मुलांवर 'स्टार वॉर्स'चा कदाचित असाच प्रभाव पडला असावा. त्या काळी 'जोर्ज लुक्स' हा एक तरुण, कल्पक आणि निर्भय दिग्दर्शक होता. जेव्हा त्याने 'स्टार वॉर्स' पडद्यावर पहिल्यांदा साकारला, तेव्हा प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडले. तो काळच वेगळा होत. आताच्या काळात बनणारे 'स्टार वॉर्स'चे प्रयोग हे सर्जनशील कमी आणि गल्लाभरू जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यात नवीन कल्पनांना, चांगल्या अभिनयाला, विलक्षण लेखनाला, दिग्दर्शनाला आणि तांत्रिक यशाला एका मुख्य ग्राहक-प्रधान ध्येयापुढे फारसा वाव मिळत नाही, आणि ते ग्राहक-प्रधान ध्येय म्हणजे - चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी लोकांच्या जुन्या आठवणी जोजवून (वापरून) त्यांना तो चित्रपट बघायला भाग पाडणं! 

लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.

yashsk@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......