भारतीय पुराणांतील मिथककथांची ओळख करून देणारं हे नवंकोरं साप्ताहिक सदर आजपासून दर शनिवारी प्रकाशित होईल. ‘Myth’ या मूळ इंग्रजी शब्दावरून मराठीत ‘मिथ’, ‘मिथक’ हे शब्द रूढ झाले. या मिथकालाच ‘प्राक्कथा’ किंवा ‘पुराणकथा’ असंही म्हटलं जातं. ज्येष्ठ समीक्षक मिथककथांना ‘व्याजविज्ञान’ म्हणतात. म्हणजे कार्यकारणभावरिहत, केवळ कल्पनेतून निर्माण झालेलं. मात्र या कथा अदभुत, अविश्वसनीय, सुरस आणि चमत्कारिक असतात. रंजकता हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य असतं. आणि तेच या सदराचंही प्रयोजन आहे.
.............................................................................................................................................
हस्तिनापुरात द्रौपदी वस्त्रहरणाचा अमंगल प्रसंग घडल्यानंतर पांडवांना कौरवांतर्फे पुन्हा द्यूत खेळण्यास मामा शकुनीनं उद्युक्त केलं. यावेळेस एकच पण ठरला. जो हरेल त्यानं बारा वर्षं वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगायचा. वनवास एक ठीक आहे, पण अज्ञातवासात ओळखू न येता वर्ष काढणं पांडवांना कठीणच होतं. शकुनीनं किती चाणाक्षपणे व धूर्तपणे हा पण ठेवला होता. जेणे करून पांडवांना हस्तिनापुरात फिरकू न देता राज्यापासून वंचित करणं हाच त्यामागे ‘उदात्त’ हेतू होता.
दुर्दैवानं फासे उलटे पडले. पांडव हरले. वास्तविक याज्ञसेनीचे इतके धिंडवडे निघाल्यावर युधिष्ठिरानं पुन्हा अक्षक्रीडा करणं सयुक्तिक नव्हतं. पण म्हणतात ना की, विनाशकाले विपरीत बुद्धी! एवढी ठेच लागूनही आपला रक्तबंबाळ अंगठा घेऊन त्यानं पुन्हा अक्षक्रीडा मंदिरात प्रवेश केला व अपयश प्राप्त केलं. वनवासात जाण्याची लगेच तयारी झाली. युवराज दुर्योधनानं पांडवांना अलंकार अनुकरण केलं. पानं, फुलं, फळं ओरबाडून घेतलेल्या वृक्षाप्रमाणे पांडव दिसत असले तरी दुर्योधनाला त्यांचं जन्मजात तेज काही हिरावून घेता आलं नाही. भरजरी वस्त्रप्रावरणांत पांडव जितके देखणे व तेजस्वी दिसत होते, तितकेच वल्कलांत दिसत होते.
वनवास काही पांडवांना नवीन नव्हता. त्यांचा जन्मच मुळी वनांत झाला होता. त्यावेळी कुंती, माद्री व धात्री आणि काही काळ पंडूचीसुद्धा सोबत होती. आता बारा वर्षांच्या वनवासात त्यांची दुसरी सावलीच अशी द्रौपदी त्यांच्यासोबत होती. कुंतीला वनवास झेपणार नाही, या कारणास्तव विदुर व त्याची पत्नी पारसवी यांच्याकडे ठेवलं. युधिष्ठिरानं पत्नी देविका व पुत्र यौधेय यांना सासुरवाडीस पाठवलं. सहदेवानं पत्नी विजयासह पुत्राला तिच्या माहेरी नेण्याची व्यवस्था केली. नकुलाचा मेहुणा धृष्टकेतू यानं भगिनी करेणुमती व भाचा निरमित्र याला नेलं. भीमाची पत्नी बलंधरा व पुत्र सुतसोम आजोळी गेले. द्रौपदी व पांडवांचे पाच पुत्र व अर्जुनाची पत्नी सुभद्रा व पुत्र अभिमन्यू अनुक्रमे पांचालदेशी व द्वारकानगरीला गेले. अशा तर्हेनं पांडवांनी आपल्या द्वितीय भार्यांना त्यांच्या पुत्रांसह सासुरवाडीला पाठवलं. एकटी द्रौपदी वनवासात निघाली.
वनवासाला निघालेले पांडव व द्रौपदी यांना वल्कलवेशांत व अलंकाराविना पाहून अवघी प्रजा शोकाकुल झाली. कौरवांना दूषणं देऊन पांडवांच्या मागे मागे गेली. त्यांची मोठ्या मिनतवारीनं समजूत काढून त्यांना परत पाठवण्यात पांडव यशस्वी झाले.
वनवासात असताना काम्यकवन, चैत्रबन, विंध्याचल प्रदेश, गंधमादन पर्वत व द्वैतरन व पुन्हा काम्यकवन अशी पांडवांची वस्तीची ठिकाणं होती. जिथं वास्तव्य असे तिथं स्वर्गतुल्य वातावरणाची निर्मिती ते करत असत. आटोपशीर कुटी बांधून राहत. धर्मराजानं यज्ञकर्म करावं. भीमार्जुनानं ऋषीमुनींचे पशुराक्षसांपासून रक्षण करावं व नकुल-सहदेवानं फुलं, फळं इंधन गोळा करून पोटपूजेसाठी शिकार करावी. द्रौपदीनं पर्णकुटीत राहून ईश्वरचिंतन करत गृहकृत्यं पार पाडावीत असं ठरवून त्यांचा दिनक्रम पार पडत असे. अविरत श्रम कष्ट, मानसिक समाधान व अनुकूल निसर्ग यामुळे संतुष्ट, तृप्त व आनंदी होते. फक्त वनवासात जाण्यापूर्वी कृष्णाची भेट झाली नाही, याचं त्यांना दुःख होई. तथापि श्रीकृष्ण त्यांना नंतर भेटून गेला.
एकदा पांडव काम्यकवनात असताना सत्यभामा व कृष्ण त्यांना भेटण्यासाठी गेले. इंद्रप्रस्थासही उभयता जात असत. पण इंद्रप्रस्थ कुबेरनगरीप्रमाणे वैभवसंपन्न होतं. काम्यकवन पांडवांच्या वनवास भोगण्यासाठीचं स्थान होतं. अन्य राण्यांनाही कृष्ण पांडवांच्या भेटीस नेत असे.
दुसरी लक्ष्मीच शोभावी अशी ती द्रौपदी लावण्यखनी होतीच, परंतु बुद्धीनं प्रगल्भ होती. निबिड व पशुपक्ष्यांनी भरलेल्या अरण्यात ती कसं बर जीवन व्यतीत करत असेल, याची सत्यभामेला नेहमी काळजी वाटत असे. कारण भरजरी वस्त्र प्रावरणांत नटून थटून मृदू शय्येवर लोळणं कुठे अन् अलंकाराविना काया वल्कलांत लपेटून कंदमुळे भक्षण करत मिळेल तो दगड उशाला घेऊन भूमीवर शयन करणं कुठे! तशात तिला पाच पती. कशी बरं ती या पाच जणांशी अनुनय करत असेल? बिच्चारी द्रौपदी! एकाच पुरुषाला अनेक पत्नी असणं वेगळं व एका स्त्रीला अनेक पती असणं वेगळं. द्रौपदीचं कुठेतरी झुकतं माप असेलच की! भामेनं बऱ्याच वेळा आपली शंका कृष्णाजवळ व्यक्त केली, पण त्यानं त्याबाबतीत आपलं अज्ञान प्रगट केलं, पण लौकरच तिला द्रौपदीला भेटायला न्यायचं ठरवलं.
सारथी दारुकानं पांढरे शुभ्र अश्व असलेला (चार) रथ सुसज्ज केला. द्रौपदीसाठी काही नव्या धाटणीचे सुवर्णालंकार व भरजरी वस्त्रं नेण्याची भामेची खूप इच्छा होती. कारण कोणत्याही स्तरातील बायका वस्त्रं व अलंकाराच्या वेड्या असतात, पण कृष्णानं मना केलं. मात्र त्यानं पांडवांसाठी जाड्या भरड्या, परंतु उबदार घोंगड्या तेवढ्या आवर्जून घेतल्या. कारण शेवटी भक्तांवर मायेचं पांघरुण देवानंच घालावयाचं असतं आणि कृष्णाचं बाळपणापासून घोंगडीशी अतूट नातं होतं.
कृष्णाच्या संगतीत प्रवास कधी संपला ते भामेला कळलं नाही. दारुकानं पांडवांच्या पर्णकुटीजवळ रथ आणून उभा केला. चारी अश्वांनी खिंकाळून कृष्ण आल्याची वर्दी दिली. परिचित ध्वनीनं पांडव कृष्णाला सामोरे गेले. पर्णकुटीच्या उंबर्यांत उभी असलेली द्रौपदीही पुढे आली. तिने कृष्णाचे चरण स्पर्श करून भामेला दृढ अलिंगन दिलं. हात धरून तिला अंगणात आणलं.
वनवासातील दगदग, हालअपेष्टा, क्लेश, विवंचना व पाच पतीदेवांची मर्जी यांनी पीडित झालेली पांचाली आपल्या दृष्टीस पडेल असा भामेचा कयास तिच्या दर्शनानं पार चुकला. दवबिंदूंनी शिडकावा केल्याप्रमाणे तिचा सावळा मुखचंद्र प्रसन्नतेचं चांदणं परावर्तीत करत होता. भामेनं चकित होऊन सभोवार कुतूहलानं नजर टाकली. कुटी ऐसपैस व भरपूर उजेड-हवा यांनी परिपूर्ण होती. आतील व बाहेरील भूमी ताज्या गोमयानं सारवली होती. कुंकुममिश्रित रंगावलीनं तिचं पावित्र्य व सौंदर्य द्विगुणित झालं होतं. पर्णकुटीचं उतरतं छप्पर शिंदी व नारळाच्या झावळ्यांनी आच्छादलेलं होतं. भिंती कुडाच्या असून काव आणि पांढरा रंग यांनी रंगवल्या होत्या. भिंतीवर स्वास्तिक-पद्मपुष्पं रेखाटली होती. खुंटाळ्यांवर धनुष्यबाण, भाते, भाले, तरवारी इ. शस्त्रं टांगून ठेवली होती. इतर नित्योपयोगी अवजारं एका कोपऱ्यात हारीनं ठेवली होती. भिंतीला असणार्या देवळीत पांडवांचे पाच शंख देवदत्त, पौड्रं, अनंतविजय, सुघोष व मणिपुष्पक व दुसर्या देवळीत मृत्तिकापात्रं चरव्या, पणत्या व इंगुदी-करंज्याचे तेल ठेवलं होतं.
पूर्वाभिमुख असलेल्या एका कोनाड्यांत मृत्तिकेच्या थाळ्यांत भगवान विष्णू, शिवलिंग व विघ्नहर्ता गणेश यांच्या मातीच्याच सुबक मूर्ती ठेवल्या होत्या. त्यांची पूजा पहाटेच झाली असून जवळच रानपुष्पांची परडी ठेवली होती. भामेनं त्यातली थोडी फुलं वाहून देवांना वंदन केलं. पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण यांनी कुटीचा एक कोपरा अडवला होता. गवताच्या चुंबळीवर मातीचे कलश पाणी भरून ठिकठिकाणी ठेवले होते. परसदारी वाळलेल्या रानशेण्यांचा ढीग व तोडलेल्या सरपणाची रास होती. वनात राहत असले तरी संसाराला काय लागत नाही? तरीही सर्वांची पूर्तता नियोजनबद्ध केलेली भामेला दिसली. पर्णकुटीच्या दर्शनी भागातह विविध वृक्षवेलींचं समृद्ध जंगल होतं. प्राणी व पक्षी यांचा मुक्त वावर होता. एकूणच ते वन नसून काम्यक नावाचं जणू नंदनवनच होतं!
पर्णकुटीच्या अंतर्भागात एका अंगाला जरा एकांत होता. एक काषाय वस्त्र आडोसा म्हणून पडद्यासारखं लावलं होतं. सत्यभामेची नजर त्यावर जाताच तिनं प्रश्नांकित मुद्रेनं द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदी एकदम लाजली व तिने बळेच भामेला परसदारी आणलं. सत्यभामेनं तिच्या शामल मुद्रेवरील लज्जेच्या गुलाबांचे खट्याळपणे अवघ्राण केलं. द्रौपदी आणखीनच लाजली व तिने दोन्ही हातांच्या ओंजळीत आपलं मुख झाकलं.
इंद्रप्रस्थाची ही महाराणी वनवासातही स्वर्ग निर्माण करते याचं भामेला अप्रूप वाटलं. राजप्रासादातील बंदिस्त जागेत फुलणार्या प्रणयापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात रंगणारा प्रणय किती हळुवार व नैसर्गिक असेल याचा भामा विचार करू लागली. राजप्रसादातील भिंतींना असंख्य नेत्र, कर्ण व जिव्हा. शिवाय सवतीमत्सर आणि इथं तर साक्षात निसर्गच रक्षक, पूजक व सखा. भामेच्या मनात किंचित् असूया दाटून आली. हस्तिनापूर, द्वारका वा इंद्रप्रस्थ येथील ऐश्वर्य, सुख व सोयी यांचा लवलेशही इथं नव्हता. साधं मुक्त व पवित्र जीवन व त्याला पोषक असं वातावरण. असूया, हेवा, द्वेष किंवा उद्वेग यांचा पुसटसा वाराही या वास्तूला वा माणसांना शिवला नव्हता. पांडवांच्या मुखावरही नाराजी नव्हती किंवा पाच भावांत एकच पत्नी म्हणून सुंदोपसुंदी नव्हती. त्यांच्या तृप्ततेचं व प्रसन्नतेच रहस्य ही द्रौपदी असून तिला नक्कीच वशीकरणाचे मंत्रतंत्र ठाऊक असावेत. एक वेळ अन्न, वस्त्र, निवारा यांत मनुष्य भागीदारी समजू वा सहन करू शकेल, पण रतीसुखांत अशी वाटणी झालेली पशुपक्ष्यांनासुद्धा खपत नाही.
भामा आल्यापासून परस्परांचं आचरण व वर्तणूक बघत होती. पतिप्रेमाचं फाजील प्रदर्शन वा पत्नीला संकेत करून बघणं-बोलणं तिला दिसलं नाही. एक गोष्ट मात्र तिनं अचूक हेरली होती की, पांडव पांचालीच्या अधिन आहेत. हे कसं काय? प्रासादांत दासदासीविना आपलं पान हलत नाही. अगदी हातप्रक्षालन करायला किंवा विंझण वारा घालायलाही दासी हवी असते अन् इथं तर कसलीही सुबत्ता व सुविधा नसतानाही ही पांचाली व पांडव सर्व कामं स्वतः करतात. तेसुद्धा खुषीनं. न थकता. न कुरकुरता. नक्कीच या मागे मंत्रतंत्र....!
थोडा वार्तालाप करून झाल्यावर युधिष्ठिराच्या सांगण्यावरून द्रौपदीनं भोजन प्रबंध केला. धर्म ज्येष्ठ पती. त्याच्या व्यतिरिक्त सर्व पांडव गृहिणीला मदत करत असल्यानं भामा स्तिमित झाली. पळसपानांचे द्रोण-पत्रावळी, मृत्तिकापात्रं, दर्भासन, मृगाजीन, व्याघ्रांबर, हस्तीचर्म मांडलेली ती गोमयानं सारवलेली भूमी खूपच मनोरम दिसत होती. सत्यभामेला चंदन-शिसवी चौरंग पाट, सुवर्ण चांदीची पात्रं व समया, विंझणवारा घालणार्या दासी उगाचच आठवल्या.
पांडव वनवासात होते तरी वनात राहणार्या ऋषीमुनींचा सतत राबता असे. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था पांडवांना करावी लागे. अतिथी, अभ्यागत व याचक यांची एकच पंगत बसली. भामा व श्रीकृष्ण या दैवी युगुलामुळे पंगतीला अवर्णनीय शोभा आली होती. सूर्यस्थाली असल्यामुळे अन्नाचा प्रश्नच नव्हता. थालीतून मिळणारं अन्न अमृत रसांत बनवल्याप्रमाणे रुचकर, सात्त्विक व साधं होतं. द्रौपदी सर्वांना मोठ्या प्रेमानं व आग्रहानं वाढत होती. ती भामेच्या पानाजवळ आली की, अन्नपूर्णा लक्ष्मीला वाढत आहे असा भास होई. कृष्णाला आज अगदी चवीनं भोजन करताना भामा पाहत होती. तिनं पसंतीची अर्थपूर्ण नजर पांचालीकडे टाकली. द्वारका, हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ एवढंच नव्हेतर अगदी भामेच्या माहेरीसुद्धा भोजनप्रसंगी असणारा थाटमाट इथं नसूनही ही पंगत भामेच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील अशीच मनोरम होती. कृष्णानं भामेला मुद्दामच पांचालीचा संसार बघायला वनात आणलं होतं. त्यापासून तिनं काही शिकावं असा त्याचा अंतस्थ हेतू होता.
हसत खेळत, श्लोक म्हणत भोजन झाल्यावर नकुल-सहदेवानं मुखशुद्धीसाठी काही फळं सर्वांना दिली. उच्छिष्ट काढण्यासाठी पुढे सरसावलेल्या कृष्णाचा हात धरून थांबवत द्रौपदी म्हणाली, ‘‘हृषीकेशा, आज हे पुण्य आमच्या गाठी असू दे. तुमचा लाभ आज पंक्तीला मिळाला. आज तू हे काम करायचं नाहीस. या पर्णकुटीत तू प्रथमच पत्नीसह भोजन केलंस, तो हा दुर्मीळ क्षण माझ्या व माझ्या पतींच्या स्मरणांत कायम राहू दे. तू अंमळ विसावा घे. पुन्हा इतक्या दूर जायचं आहे.’’ किती मधुर स्वर. विचारसुद्धा किती प्रगल्भ. जशी मूर्ती देखणी तसंच अंतःकरणही नितांत सुंदर.
‘‘द्रौपदी म्हणते ते खरेच आहे. मुकंदा, चल. तुला मी द्रौपदीनं पाळलेली हरिणी दाखवतो. भीमदादानं तिला व्याघ्रमुखातून सोडवली तेव्हा ती गर्भिणी होती. आता तिनं दोन पाडसांना जन्म दिला आहे. चला वहिनी तुम्हीही’’.
सहदेवानं द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिल्यानं कृष्णाचा नाईलाज झाला. काही वेळानं पर्णकुटीच्या अंगणांत पुरुषवर्ग धर्मविषयक चर्चा करण्यात दंग झाला. द्रौपदी भामेसह परसदारी येऊन बकुळीच्या वृक्षाखाली एका शिलाखंडावर विसावली.
‘‘हे काय पांचाली, तू नाही भोजन करणार? मी तुला वाढते. चल ना.’’ भामा तिचा हात धरून म्हणाली. त्यावर द्रौपदी म्हणाली, ‘‘भामे, मी एकदम सूर्यास्त झाल्यावरच भोजन करते. श्री भगवान सूर्यनारायणानं ही अक्षय सुवर्णथाली दिली असून दिवसभरात माझं भोजन होईपर्यंतच यातून अन्न मिळतं. इंद्रप्रस्थाप्रमाणे इथंही अभ्यागतांचा व याचकांचा राबता असतो. आमच्यावरील प्रेमामुळे सर्व येतात. त्यांना विन्मुख पाठवणं आम्हाला आवडत नाही. दिवसभर ही सुवर्णथाली आमची अन्नदात्री आहे. माझं भोजन झाल्यावरच ही विसावा घेते, ती दुसर्या दिवशीचा भोजनसमय होईपर्यंत. सर्वांना वाढूनच मी तृप्त होते अन् अन्नदान हे पुण्य देणारं व्रत आहे. तेव्हा माझी काळजी करू नकोस.’’
ऐकावं ते नवलच व पाहावं ते अतर्क्यच असं भामेला वाटलं. एवढं बोलत असताना द्रौपदीनं खाली पडलेली बकुळीची ताजी फुलं गोळा केली व ती केळीच्या दोर्यासारख्या सोपटांत ओवू लागली.
द्रौपदीला बोलती करण्याची हीच संधी आहे हे जाणून भामेनं सावधपणे मूळ विषयाला हात घातला. ‘‘प्रिय सखी पांचाली, एक प्रश्न तुला विचारला तर राग नाही ना येणार? मी मोठ्या संभ्रमात पडले आहे. तुझे सर्व पाच पती वीर्यवान, अमित पौरुष प्राप्त झालेले तेजस्वी वीर आहेत. प्रत्येकाची अभिरुची आवड, स्वभाव आणि मानसिक कल सुद्धा-अगदी नकुल-सहदेव जुळे बंधू आहेत तरीही. याच्यासारखा तो नाही असे असूनही ते तुझ्या अधिन कसे? कसली जादू वा मंत्रतंत्र विद्या तुला ज्ञात आहे? मला तरी सांग. जेणेकरून इकडची स्वारी (श्रीकृष्ण) मज एकटीचीच होईल. खरं सांगू पांचाली, स्वामी खरं प्रेम फक्त रुक्मिणीवरच करतात. मी आपली नावालाच पट्टराणी. इतर राण्यांशी कृष्ण प्रेमाचं नाटक करतात, असंच काहीसं मुनीवर नारद म्हणत होते. ते बरिक खरंच हो. कारण मजजवळ असले तरी रुक्मिणीपुराण चालूच असतं त्यांचं. ते काही नाही पांचाली. मला एखादा मंत्र सांगच कसा.’’
भामेचा उतावळा स्वभाव द्रौपदीला नवीन नव्हता. ती हसून म्हणली, ‘‘भामे, वशीकरण, जारण-मारण, गंडेदोरे हे सर्व असाध्वी स्त्रियांनी अवलंबलेले मार्ग आहेत. अशा निंद्य व अघोरी उपायांनी मी माझ्या देवतुल्य पतींना कशी बरं वश करीन? असले कुटिल उपाय मला ज्ञात नाहीत. उलट अशा स्त्रियांचा चंचलपणाचा शत्रू फायदा घेतात. घरातला कर्ता पुरुष नाशाच्या खाईत लोटला जातो, तो अशा मूर्ख बायकांमुळे. जडीबुटीमुळे पुरुष विषबाधेनं मृत्युतरी पावतो किंवा कायम विकलांग तरी होतो. अंगारे-धुपारे यामुळे त्याला क्लिबत्व येतं. अशा रीतीनं पुरुष स्त्रीच्या हातातील बाहुलं बनतो.
“माता कुंतीच्या इच्छा व आदेश यानुसार मी पाची जणांचा प्रसन्न मनाने व मनात किंतु न ठेवता स्वीकार केला. ते तर माझे पंचप्राणच आहेत. बलंधरा, विजया, सुभद्रा, देविका, करेणुमती या माझ्या सवतींशीसुद्धा मी दुजाभाव ठेवत नाही. उलूपी व चित्रांगदा यांना तर मी अजून पाहिलेलंही नाही. माझे पती सूर्याप्रमाणे प्रखर, चंद्राप्रमाणे शितल, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील, गगनाप्रमाणे उत्तुंग व सागराप्रमाणे उदात्त असल्यामुळे त्यांच्या स्वभावाला अनुसरून मी माझे वर्तन ठेवते. प्रथम त्यांचं स्नान-भोजन. नंतर माझं. मी त्यांच्यानंतर निद्रा घेते व त्यांच्या अगोदर उठते. सडासंमार्जन, देवपूजा व इतर नैमित्तिक कर्मे मी आळस न करता करते. सर्वांबरोबर धर्मविषयक चर्चा करते, पण वाद घालत नाही. उर्मट किंवा उलट भाषण करत नाही. असभ्य व दुष्ट व्यक्तींच्या वार्यालाही मी उभी राहत नाही. खोटं वा कलह निर्माण करणारं भाषण करत नाही. असभ्य वागणं-बोलणं, नेत्रसंकेत वा करपल्लवी मी करत नाही. एका पतीजवळ दुसर्या पतीचं न्यून वा स्तुती करत नाही. पती जर कामानिमित्त दूरदेशी गेले तर ते परतेपर्यंत मी व्रतस्थ राहून शृंगार-प्रसाधन करत नाही. ते आले की त्यांचं सुहास्यमुद्रेनं स्वागत करते. त्यांचा श्रमपरिहार होईल असं भाषण करते. त्यांच्या आवडीचा भोजन प्रबंध करते. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचं चिंतन करते. उपस्थितीत नित्य शूचिर्भूत राहून त्यांना रुचेल व मला शोभेल असा शृंगार करते.
“माता कुंती व माझी जननी सौत्रामणी यांनी गृहिणीधर्माचे जे जे नियम मला शिकवले आहेत, ते ते मी काटेकोरपणे पाळते. इंद्रप्रस्थी मी जरी महाराणी होते, तरीही अतिथी-अभ्यागत यांचं स्वागत, पाकसिद्धी याकडे मी जातीनं लक्ष देत होते. वडिलधार्या स्त्रियांची सेवासुश्रुषा करून त्यांच्या देखरेखीखाली सर्व कर्तव्यं मी पार पाडली. गुरुजन, पतींचे स्नेही व आप्त यांची मी त्यांच्या योग्यतेप्रमाणे उठबस केली. इंद्रप्रस्थातील ऐश्वर्य व सत्ता ही क्षणभंगूर असते. तरीही पौरुष, नीरत्व, सामंजस्य, प्रीती व निती या पैलूंनी घडलेल्या अलंकारांचा अक्षय खजिना पाच पतींच्या स्वरूपात मजजवळ आहे. कृष्णच साक्षात् माझा पाठिराखा असताना मला कशाची चिंता? त्याच्या लावण्यगुणसंपन्न आठ स्त्रिया माझ्याजवळ असताना रोग, दारिद्र्य, संकट व मृत्यू यांची तमा मी बाळगत नाही.
“भामे, माझी ही दिनचर्या व माझे विचानुरूप वर्तन वशीकरण मंत्रांपेक्षा प्रभावी आहेत. तुही याचा अवलंब कर. तो त्रिभुवनसुंदर श्रीहरी सर्वार्थानं तुझाच होईल. बाह्योपचारापेक्षा उत्तम वर्तनानं व भक्तीभावामुळे तो माधव तुझ्या मानसमंदिरात नित्य निवास करेल. भावपुष्पांची पूजा त्याला भावते. तो भावाचा भुकेला आहे. साधा भोळा निष्पाप आहे.’’
‘‘तर तर काही स्तुती करायला नको बंधूची. स्वारी महालबाड व मनकवडी आहे. पण सखी मी यापुढे असंच वागण्याचा यत्न करीन.’’
असा दोघींचा सुखसंवाद चालू असतानाच पांडव, कृष्णा तिथं आले. द्रौपदी विनयानं उभी राहिली. कृष्ण खट्याळपणे कमरेत झुकून म्हणाला, ‘‘चलाव महाराणी. रथ सज्ज आहे. दूर जायचं आहे.’’
‘‘पाहिलंस याज्ञसेनी, कुणाला वाटेल स्वारी माझ्या अगदी आज्ञेत आहे.’’ भामेनं लटका राग व्यक्त केला. द्रौपदीनं मोठ्या प्रेमानं बकुळीचे वळेसर तिच्या केशसंभारात माळले. पांडवांनी ‘‘पुन्हा या’’ असा संदेश देऊन कृष्णाला अलिंगन दिलं व भामेला नमस्कार केला. भामेनंही सुयश चिंतलं. मधल्या वेळांत दारुकानं अश्वांना खरारा करून दाणापाणी दिल्यानं ते ताजेतवाने झाले. दारुकानंही पांडव-द्रौपदीला प्रणाम करून अश्वांचे प्रतोद हाती घेतले. तेवढ्यात नकुल-सहदेवांनी सुवासिक फुलांच्या दुरड्या, पोळ्यातील मधानं भरलेली पात्रं, रानमेव्याचे हारे व केळीचे लोंगर रथाच्या मागच्या भागांत ठेवले. अर्जून म्हणाला, ‘‘कृष्णा, ही भेट आमच्या अन्य वहिनींसाठी आहे बरं का’’ उत्तरादाखल कृष्णानं स्मितहास्य केलं, पण भामा मात्र उगाच कष्टी झाली. तिची ही नाराजी कृष्णाला अपेक्षितच होती. रथ दृष्टिआड होईपर्यंत सर्व पांडव द्रौपदीसह अंगणात थांबले.
वाटेत कृष्णानं कोपरखळी मारलीच. ‘‘हं! काय म्हणत होत्या द्रौपदी वन्स? इतकं कसलं हितगुज चाललं होतं दोघींचं? कळू द्या तरी मला.’’
‘‘छे! छे! विशेष काही नाही. इंद्रप्रस्थ, द्वारका व हस्तिनापूरच्या जुन्या आठवणी व हालहवाल. आपलं इकडचं तिकडचं.’’ भामा सावधपणे म्हणाली.
‘‘हं हं म्हणजे इकडच्या स्वारीला मुठीत कसं ठेवावं याविषयीच ना?’’
कृष्णाच्या मिश्किल वक्तव्यानं भामा मनात खजिल झाली व चपापली. ती कृतक्कोपानं म्हणाली, ‘‘छे बाई! आपल्यापासून काही म्हणता काही लपून राहत नाही अन् पांचाली म्हणत होती...!”
‘‘काय म्हणत होत्या वन्स?’’
‘‘काही नाही, खरंच काही नाही’’ इति भामा
‘‘काही नाही कसं? मी सांगतो. वन्स काय म्हणत होत्या ते. सांगू?’’
उत्तरादाखल भामा कृष्णाच्या निकट सरकली. द्रौपदीसाठी आपण वस्त्रं व अलंकार आणली नाहीत, हे बरं केलं असं तिला वाटलं, कारण द्रौपदीनेच भामेला सुविचारांचा मौलिक खजिना भेट म्हणून दिला होता.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment