अजूनकाही
मराठी सिनेसृष्टीत अस्सल ‘कॉमेडी’वर आधारित सिनेमांची परंपरा सुरुवातीपासून आहे. त्यामुळे विनोदी सिनेमाचे प्रयोग अधूनमधून सिनेसृष्टीत होत असतात. मात्र हल्ली अशा सिनेमातून मनोरंजनच्या नावानं खपवण्यासाठी नवीन विषय दिग्दर्शकांना मिळत नाहीत आणि इथंच विनोदी ‘लेबल’खाली तयार केल्या गेलेल्या सिनेमाला फटका बसतो. दोन कलाकारांच्या संवादातून सहजरीत्या विनोद घडून यावा. म्हणजे विनोदावर प्रेक्षकांना मनमोकळ हसता येतं. मात्र याची जाणीव दिग्दर्शकांना नसली की, ‘कॉमेडी’ सिनेमादेखील कंटाळवाणा होतो. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अॅण्ड ती’ हा मराठी सिनेमा बघताना अस्सल विनोदाची कमतरता सहज जाणवते.
सिनेमातल्या एखाद्या संवादाला ओढूनताणून विनोदी रंग दिल्यानं त्या संवादातला भंपकपणा लपत नाही. अशा वेळी मूळ विनोदाची लय हरवते आणि विनोद ‘विनोद’ राहत नाही. तर एक कंटाळवाणा संवाद होऊन जातो. ‘कॉमेडी’च्या नावावर चालणारा रटाळ संवाद सिनेमात मन लागू देत नाही. ‘ती अॅण्ड ती’ सिनेमा गंडतो तो इथंच. विषयाची मांडणी आणि त्याच्यासोबत येणारे संवाद विनोदी करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगलाच फसला आहे. प्रेक्षकाला हसवण्याच्या प्रयत्नात सिनेमाची कथेवरची पकड सुटते. त्यामुळे सिनेमा मूळ विषय सोडून दुसरीकडे भरकटत जातो.
त्यात भर म्हणजे सिनेमाच्या कथेतल्या प्रेमकथेचा न उलगडणारा प्रवास नको तितका गडद करून दाखवला आहे. त्यामुळे सिनेमाची कथा नेमकी काय सांगू पाहते आहे, हेच लवकर लक्षात येत नाही. सिनेमा कथा आणि अभिनयाच्या पातळीवर समाधानकारक ठरत नाही. भावनिक आणि गंभीर अशा मोजक्या संवादालादेखील विनोदी रंग देण्याचा प्रयत्न सिनेमातला गुंता वाढवतो. त्यामुळे सिनेमातल्या कलाकारांची नावं मोठी असली तरी ती सिनेमात प्रभावी ठरत नाहीत.
सिनेमाची कथा एका अॅरेज पद्धतीनं लग्न करणाऱ्या मुलाची आहे. लग्नानंतर त्याला त्याची शाळेतली वर्गमैत्रीण भेटते. त्याला ती लहानपणी आवडायची. मात्र तिच्या वडिलांना ते शहर सोडावं लागतं आणि ती त्यांच्यासोबत लंडनला जाते. एकदिवस घरच्यांच्या सांगण्यावरून एका मुलीशी तो लग्न करतो. हनिमूनसाठी दोघं लंडनला जातात आणि तिथं त्याला त्याची बालपणची वर्गमैत्रीण अचानक भेटते. तिथून पुढे सिनेमाची कथा सुरू होते.
दोघींच्या नादात त्याची होणारी तारांबळ आणि त्यातून निर्माण झालेली कथा फार काही नवीन मांडत नाही. नवरा बायको आणि नवऱ्याचं अफेअर यावर आधारित सिनेमा या अगोदरदेखील फारसं काही परिणामकारक ठरले नाहीत. सिनेमाची कथा फार काही दमदार नाही. त्यामुळे सिनेमा सुरू होण्यापूर्वी वाटणारी उत्सुक्ता सिनेमा पाहताना फार वेळ राहत नाही. सिनेमा संगीत, अभिनय, कथा, संवाद, विनोद यांच्यावर खरा उतरत नाही.
पुष्कर जोग, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यासारखी तगडे कलाकार या सिनेमात आहेत. मात्र त्यांच्या अस्सल अभिनयाचा अंदाज सिनेमात कुठेही बघायला मिळत नाही. त्यांच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे पार पाडण्यात तेही कमी पडले आहेत. त्याचं कारणदेखील अतिरंजित विनोद हेच आहे. सोशल मीडियावर फिरणारे विनोद वाचून कंटाळलेल्या प्रेक्षकाला या सिनेमातील विनोद फार काही रूचणार नाही. ‘कॉमेडी शो’ आवडीनं बघणाऱ्या प्रेक्षकाच्या ‘कॉमेडी’कडून असणारे अपेक्षा आता वाढल्या आहेत. विनोदाच्याबाबतीत इतका चोखंदळ असलेल्या प्रेक्षकावर प्रभाव टाकण्यासाठी अस्सल आणि दर्जेदार विनोदाशिवाय पर्याय नाही.
सिनेमातला प्रत्येक सीन शूट करताना घेण्यात आलेली मेहनत मात्र वाखाणण्याजोगी आहे. कॅमेऱ्यासोबत केलेले प्रयोग सिनेमाला पुढे घेऊन जातात. बाकी संगीत, पटकथा, अभिनय, संवाद, विनोद यांच्या पातळीवर सिनेमाकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत.
दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा सिनेमा आहे. या अगोदर ‘रमा माधव’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ यासारख्या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. मात्र निखळ मनोरंजनाच्या या प्रयोगात त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. सिनेमाच्या केंद्रस्थानी विनोद आहे की कथा, असा गोंधळ निर्माण होतो. सिनेमाची विशेष जमेची बाजू तांत्रिकदृष्ट्या करण्यात आलेले प्रयोग आहेत. बाकी विनोदाच्या नावावर चालणारा गोंधळ मनोरंजन करत नाही.
थोडक्यात ‘करायला गेले गणपती आणि झाला मारोती’ या मराठी म्हणीसारखी स्थिती या सिनेमाची झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मनोरंजनची अपेक्षा पूर्णत्वास पोहचत नाही.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment