अजूनकाही
१९व्या शतकाच्या उत्तर्धात स्त्रीशिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करून त्याला कृतीची जोड देणाऱ्या सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या दाम्पत्याने कित्येक वर्षं दाबल्या गेलेल्या, शोषित, पीडित स्त्रियांना गुलामगिरीच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी केलेलं कार्य अत्यंत महत्त्वाचं ठरलं. फुलेंनी स्त्रीशिक्षणाचं जे कार्य हाती घेतलं, त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्याची नव्यानं ओळख होऊ लागली. त्याचीच परिणती म्हणजे समाजात स्त्रीशिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण होऊ लागली. मात्र स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती.
या मर्यादित कक्षा विस्तारण्याचं काम पुढे अनेकांनी केलं, त्यासाठी त्यांना वेळप्रसंगी सामाजिक बहिष्काराच्या अग्नितून अनवाणी पायानं चालत जावं लागलं. अनेकदा अपमान वाट्याला आला. मात्र जे ध्येयवादानं पछाडलेले होते आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत प्राणाची आहुती देण्याची तयारी ठेवून होते, अशी मंडळी मागे सरली नाही. इतिहास अशा लोकांना अजरामर करतो आणि त्यांच्या कामाची योग्य ती पावती देतो.
यामध्ये एका नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, ते नाव म्हणजे ‘डॉ. आनंदी गोपाळ जोशी’. ‘भारतातली पहिली महिला डॉक्टर’ अशी त्यांची ओळख. प्रचंड इच्छाशक्ती आणि पती गोपाळराव यांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी डॉक्टर ही पदवी मिळवली. तो काळ लक्षात घेता त्यांचं महत्त्व सहज लक्षात येतं.
२६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘आनंदी गोपाळ’ हा सिनेमा आनंदीबाईंच्या आयुष्याची संघर्षमय वास्तव कहाणी सांगतो. त्यासाठी सिनेमाचे दिग्दर्शक समीर विद्वांस अभिनंदनास पात्र आहेत. आत्मचरित्रावर आधारित सिनेमा करणं तसं जिकिरीचं काम. मात्र समीर विद्वांस यांनी ते क्षमतेनिशी पार पाडलं आहे. सिनेमात तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा पुरेपूर वापर त्यांनी केला आहे.
आनंदीबाईंचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात झाला. तत्कालीन सामाजिक प्रथेनुसार त्यांचा गोपाळराव जोशी यांच्याशी बालविवाह झाला. गोपाळरावांची पहिली पत्नी आजारानं निधन पावली होती. त्यानंतर त्यांनी आनंदीबाईंशी विवाह केला. विवाहाच्या वेळी गोपाळराव आनंदीबाईंपेक्षा २० वर्षांनी मोठे होते. ते पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते. त्यांना वाचनाची आवड होती. शिक्षणावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. मुळात स्त्री शिकली तर सामाजिक स्वास्थ्य टिकून राहिल. या विचारावर त्यांची श्रद्धा होती. त्यांनी विवाहानंतर पत्नी आनंदीबाईंना शिकवण्याचा ध्यास धरला. त्यासाठी ते आनंदीबाईंच्या पाठीशी ठाम उभे राहिले. प्रसंगी अनेक गोष्टींचा त्याग केला. आनंदीबाईंना जेमतेम २२ वर्षाचं आयुष्य लाभलं. त्यात प्रचंड चढउतार आले. मात्र इतक्या कमी कालावधीत त्यांनी जो आदर्श उभा केला, तो भारतीय स्त्रियांना आजही प्रेरणादायी ठरावा असाच आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात एकीकडे राजकीय सुधारणा विरुद्ध सामाजिक सुधारणा असं द्वंद होतं. तर दुसरीकडे व्यक्तिगत पातळीवर छोटे-मोठे जातीय, धार्मिक संघर्ष सुरू होते. अशा वेळी सामाजिक सुधारणांचं महत्त्व गोपाळरावांनी ओळखलं. इंग्रज सरकार इतक्या लवकर भारताला स्वातंत्र्य देणार नाही, याची त्यांना जाणीव होती. अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यात गुंतलेल्या स्त्रियांना मुक्त करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी पहिलं पाऊल उचलावं लागणार होतं. म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिक्षण देण्याचं ठरवलं. त्या काळी हे अर्थातच सोपं काम नव्हतं. पारंपरिक समाजात मानवी मूल्यापेक्षा परंपरांना महत्त्व दिलं जात असताना, या दाम्पत्यानं मानवी मूल्यांची वाट धरली.
तत्कालीन समाजव्यवस्थाही जात, धर्म, संस्कृती यांच्या विळख्यात कैद होती. स्त्रीला घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नसताना स्त्रीशिक्षणासाठी शाळेत जाण्याचं धाडस करणं म्हणजे जीव धोक्यात घालण्याचा निर्णय होता. पण गोपाळराव आणि आनंदीबाई मागे हटले नाहीत. अखेर समाजात होणाऱ्या त्रासाला वैतागून त्यांनी अमेरिकेतील ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’ इथं जाऊन ‘डॉक्टर’ ही पदवी मिळवली. अमेरिकेला जाण्यासाठी गोपाळराव आणि आनंदीबाई यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. एकूणच स्त्रीशिक्षण हीच स्त्रीस्वातंत्र्याची पूर्वअट आहे, हा विचार समाजात रुजवण्याचं महत्त्वपूर्ण काम या मराठी दाम्पत्यानं स्वातंत्र्यपूर्व काळात केलं. स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीला हवं तसं वाकवता येतं, त्यासाठी फक्त ठाम भूमिका घेऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते, हेच या दाम्पत्याच्या आयुष्याचं सार आहे. डॉक्टर झाल्यानंतर त्यांना काही दिवसात क्षयरोग झाला. त्यातच त्यांचं २७ फेब्रुबारी १८८७ रोजी निधन झालं.
आजही स्त्रियाकडे मोठ्या प्रमाणात ‘चूल आणि मूल’ या दृष्टीनं बघितलं जातं. ग्रामीण आणि शहरी भागात याचं प्रमाण कमी-अधिक फरकानं जाणवतं. त्यात हळूहळू बदल होत आहेत, ही सकारात्मक गोष्ट असली तरी स्त्रियांच्या एकूण सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी फक्त ‘बेटी बचाव आणि बेटी पढ़ाव’च्या घोषणा पुरेशा नाहीत. त्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही पातळीवर स्वातंत्र्यानंतरदेखील फार प्रगती झालेली नाही. आजही शिक्षणासाठी कितीतरी स्त्रियांना झगडावं लागतं. स्त्रियांच्या आरोग्यासारखा ज्वलंत प्रश्न आजही पिच्छा सोडत नाही.
थोडक्यात या सिनेमाच्या निमित्तानं पडद्यावर पुन्हा एकदा स्वातंत्र्यपूर्व काळ हुबेहूब उभं करण्याचं काम दिग्दर्शकानं केलं आहे. ‘लग्न पहावे करून’, ‘टाइम प्लीज’, ‘वायझेड’, ‘डबलसीट’ यासारख्या सिनेमानंतर दिग्दर्शक समीर विद्वांस यांची पडद्यामागची मेहनत पुन्हा बघायला मिळते. ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद या कलाकारांनी दमदार अभिनयाच्या जोरावर भूमिकेला न्याय दिला आहे. सिनेमातल्या प्रत्येक कलाकारानं जीव ओतून काम केलं आहे. संवाद इरावती कर्णिक यांनी लिहिले आहेत. अप्रतिम संवादलेखनातून एखादा सिनेमा कसा प्रभावी ठरतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आनंदी गोपाळ’. पटकथा लेखन करण श्रीकांत शर्मा यांनी नेमकं आणि सूत्रबद्ध पद्धतीनं केलं आहे. त्याचबरोबर संगीत हीसुद्धा या सिनेमाची जमेची बाजू आहे.
मराठी प्रेक्षकांच्या भेटीला अशा धाटणीचे सिनेमा क्वचितच येतात. त्यामुळे हा सिनेमा आवर्जून बघावा असा आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sanjay Pawar
Sat , 09 March 2019
आनंदीबाई पहिल्या महिला होत्या ज्यांनी वैद्यकिय पदवी मिळविली,पण प्रत्यक्ष प्रॅक्टिस करण्याआधीच त्यांचे निधन झाले. वर्षभरापूर्वी डाॅ.रखमा म्हणून अनंत महादेवन दिग्दर्शित मराठी सिनेमा येऊन गेला.त्या भारतात काम केलेल्या पहिल्या महिला डाॅक्टर होत्या.त्यांचा जीवनप्रवासही खडतरच होता.त्यांनीही परदेशात राहूनच पदवी प्राप्त केली होती.मुंबईच्या कामा हाॅस्पिटलच्या स्थापनेपासून त्या कार्यरत होत्या. अभ्यासकांना माहिती व्हावी एवढेच.