‘बदला’ : मूलतः एक चांगला रहस्य-थरारपट, मात्र तो फारसा प्रभाव पाडत नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘बदला’चं एक पोस्टर
  • Sat , 09 March 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie बदला Badla अमिताभ बच्चन Amitabh Bachchan तापसी पन्नू Taapsee Pannu सुजॉय घोष Sujoy Ghosh

‘सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ’ ही संज्ञा आणि मेंदूला चालना देणारे, प्रेक्षकांकडून सक्रिय सहभागाची अपेक्षा ठेवणारे बहुतांशी रहस्य/थरारपट यांचा घनिष्ठ संबंध आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’देखील याला अपवाद नाही. हा पाश्चात्य साहित्यातील रहस्यकथेप्रमाणे भासणारा एक खून आणि त्यातील कथित आरोपी यांच्या निमित्तानं एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या दोन पात्रांच्या संभाषणातून फुलणारा चित्रपट आहे. ज्यात खरं तर सदर पात्रांमधील संभाषण आणि त्या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा प्रवास हा मूळ उकलीहून अधिक रंजक आहे. त्यामुळे तो ‘कहानी’च्या (२०१३) दिग्दर्शकाचा रहस्यपट म्हणून असणाऱ्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण करणारा नसला तरी तो त्याच्या काहीशा वाढीव लांबीदरम्यान खिळवून ठेवत असल्यानं एक थरारपट म्हणून असलेली त्याची जबाबदारी नक्कीच पार पाडतो.

‘सच वही होता हैं, जो साबित किया जा सके’ असं म्हणणारा बादल गुप्ता (अमिताभ बच्चन) नैनाच्या (तापसी पन्नू) खटल्याच्या निमित्तानं नेमक्या अशाच सत्याचा शोध घेऊ पाहत आहे. चित्रपटाचं मूलभूत कथानक अगदीच साधं सरळ आहे. नैना सेठीचे अर्जुनशी (टोनी ल्युक) विवाहबाह्य संबंध असतात. आपली व्यावसायिक जीवनातील प्रतिमा आणि आपापलं वैवाहिक जीवन यांच्या काळजीमुळे दोघंही या प्रकरणाबाबत गुप्तता बाळगून असतात. दरम्यान अर्जुनचा खून होतो आणि बाहेर जाण्याचा कुठलाही इतर मार्ग नसलेल्या, दरवाजा आतून बंद असलेल्या हॉटेलच्या खोलीत जेव्हा त्याचा मृतदेह आढळतो, तेव्हा तिथं केवळ नैनाच उपस्थित असल्यानं साहजिकच पोलीस तिच्यावर खुनाच्या आरोपाचा खटला चालवतात. नैनाला हे आरोप मान्य नसल्यानं आणि आपल्याला कुणीतरी फसवत असल्याबद्दल तिला खात्री असल्यानं ती हे आरोप नाकारते. तिचा वकील जिमी (मानव कौल) बादल या आजवर एकही खटला न हरलेल्या (आता आपण आजवर असं म्हणणारे किती वकील हिंदी चित्रपटांत पाहिलेत हे मात्र विचारू नये!) वकिलाशी तिचा परिचय करून देतो. परिणामी सत्याचे नानाविध प्रकार सांगू शकणाऱ्या बादलवर सत्याची नैनाच्या तोंडून ऐकू येणारी आवृत्ती, खरं प्रकरण आणि तिला निर्दोष सिद्ध करता येऊ शकेलशी आवृत्ती, अशा अनेक शक्याशक्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी येऊन पडते.

हा चित्रपट ‘द इनव्हिजिबल गेस्ट’ नामक स्पॅनिश चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. कुठल्याही भाषिक चित्रपटाचा रिमेक हे मुळातच एक क्लिष्ट प्रकरण असतं. कारण एकतर त्यातील कथानक इथल्या विश्वात परकीय वाटणार नाही, अशा प्रकारे मूळ चित्रपटाचं रूपांतर केलं जाईल याची खात्री बाळगावी लागते. दिग्दर्शक घोष चित्रपटाला स्कॉटलँडमध्ये ठेवत असल्यानं हा प्रश्न तसा उद्भवतच नाही. मात्र मध्यवर्ती पात्रांच्या विश्वातील इतर पात्रंही भारतीय वंशाची दाखवत हिंदी भाषेतील संवादांवर भर दिला जातो. त्यामुळे पात्रांच्या आयुष्यातील बहुतांशी सगळी पात्रं योगायोगानं हिंदी भाषिक आहेत, हे मानण्यापासून ते बादल-नैनाच्या सत्य-असत्याचा आवृत्त्यांपर्यंत अनेक बाबतीत चित्रपट कमालीच्या ‘सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ’वर अवलंबून राहतो, असं म्हणता येतं.

रिमेकबाबत उद्भवणारा आणखी एक प्रश्न म्हणजे रूपांतरित चित्रपट हा मूळ चित्रपटातील प्रत्येक दृश्याची नक्कल असावा की, त्यात काही प्रमाणात बदलही असावेत. आता यातही पुन्हा चित्रपटकर्त्यांनी बदल केल्यावरही ते यशस्वी ठरतील अशातला भाग नसल्यानं तर हा प्रश्न अधिकच जटिल बनतो. खासकरून चित्रपट जेव्हा खुनाच्या रहस्याभोवती फिरणारा असेल, आणि त्यातही पुन्हा तो घोषसारख्या दिग्दर्शकाचा चित्रपट असेल तेव्हा तर थोड्याफार बदलांची अपेक्षा असणं स्वाभाविक असतं.

‘बदला’ मात्र कथानकाच्या पातळीवर पूर्णपणे मूळ कलाकृतीचे थेट रूपांतर करतो. असं असलं तरी मांडणीच्या पातळीवर तो इतर बऱ्याचशा चांगल्या-वाईट हिंदी चित्रपटांची आठवण करून देतो. म्हणजे प्रेक्षकापुढे रहस्याच्या उकलीच्या अनेक संभाव्य शक्यता मांडू पाहणाऱ्या त्याच्या वृत्तीमुळे ‘इत्तेफाक’ किंवा ‘व्होडका डायरीज’सारखे आपल्याच कथानकाच्या अतर्क्य गुंत्यात अडकलेले चित्रपट आठवतात. तर ‘बदला’च्या निमित्तानं (चांगल्या अर्थानं) ‘मान्सून डायरीज’ या आवर्जून पाहाव्याशा चित्रपटाचीही आठवण होते.  

अर्थात प्रेक्षकाला पूर्ण लांबीभर अनेक शक्याशक्यतांच्या जगात प्रवास घडवून आणल्यावर तो पुन्हा मूलभूत स्वरूपाच्या, आधीच भाकीत करता येणाऱ्या ट्विस्टकडे परततो, हा भाग वेगळा असला तरी तो सुजॉय घोष-राज वसंत यांचे संवाद, अमिताभ-तापसी या जोडीसोबतच इतरही लोकांचा अभिनय, अविक मुखोपाध्यायचं छायाचित्रण, पार्श्वसंगीत अशा बऱ्याच पातळ्यांवर परिणामकारक ठरतो. मुखोपाध्यायचा कॅमेरा बंद खोलीपासून ते बाहेरच्या जगातील जागा ज्या प्रकारे टिपतो, ते अगदीच मोजकी पात्रं आणि ठिकाणं असलेल्या या चित्रपटात महत्त्वाचं ठरतं.

दिग्दर्शक घोषचा ‘बदला’ हा मूलतः एक चांगला रहस्य-थरारपट आहे. मात्र तो बहुतांशी वेळ खिळवून ठेवत असला तरी आवर्जून पहायलाच हवा इतपत प्रभाव पाडत नाही.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......