अजूनकाही
‘आखरी शमा’ हे उर्दूतील नाटक बघताना या भाषेचं खानदानी, दरबारी सौंदर्य तर जाणवतंच, शिवाय तो काळही जिवंत होतो. मुगल साम्राज्याच्या काळात दिल्लीतील लाल किल्ल्यात दरवर्षी ‘मुशायरा’ होत असे. आपल्याकडील कवीसंमेलनासारखा हा प्रकार असतो. मात्र १८५७ साली जेव्हा बंड सुरू होतं, तेव्हा या वार्षिक परंपरेत खंड पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. शेवटचा मुगल बादशहा आधीच सत्ताहीन झाला होता. त्यामुळे मुशायरा होणार नाही असं वातावरण निर्माण झालेलं असतं. मात्र हे मौलवी करीमुद्दीनला सहन होत नाही. काहीही झालं तरी मुशायरा भरवायचाच या जिद्दीनं तो सर्व संबंधितांना भेटतो आणि मुशायरा भरवतो. या सर्वांची कहाणी म्हणजे ‘इंडियन पीपल्स थिएटर्स असोसिएशन’नं (इप्टा) सादर केलेलं ‘आखरी शमा’ हे उर्दू नाटक.
मिर्झा फर्तुल्लाह बेग (१८८३-१९४७) यांच्या ‘दिल्ली का यादगार मुशायरा’ या कथेच्या आधार घेत सुप्रसिद्ध कवी कैफी आझमी यांनी ‘आखरी शमा’ हे नाटक लिहिलं. या नाटकाचा पहिला प्रयोग १९६९ साली ‘इप्टा’तर्फे सादर झाला होता. एका अर्थानं हे वर्ष या नाटकाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष ठरतं. या मागे आणखी एक ऐतिहासिक सत्य आहे, त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. या नाटकाचे लेखक कैफी आझमी (१९१९-२००२) यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणूनच या नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर गेल्या पन्नास वर्षांत या नाटकांच्या प्रयोगाशी ज्या व्यक्ती जोडलेल्या होत्या, त्यांचा सत्कार केला गेला.
या नाटकात मिर्झा गालिब हे महत्त्वाचं पात्र आहे. गालिबचा मृत्यू इ.स. १८६९मध्ये झाला. त्याचं स्मृतिशताब्दी वर्ष सुरू झालं होतं १९६९ मध्ये. याच वर्षी ‘आखरी शमा’चा पहिला प्रयोग दिल्लीतील लाल किल्ल्यात सादर झाला होता. पहिल्या प्रयोगात मौलाना करीमुद्दीनची भूमिका रमेश तलवार यांनी सादर केली होती आणि आता परवा मुंबर्इच्या रंगशारदामध्ये झालेल्या प्रयोगातही रमेश तलवार त्याच भूमिकेत आहेत.
इ.स. १८५७ च्या दिल्लीतील मुगलांच्या सत्तेला घरघर लागली होती. शिवाय वातावरणात राजकीय अस्वस्थता होती. अशा स्थितीत कोणीही मुशायरा भरवण्याची कल्पनासुद्धा करू शकत नव्हता. अशा स्थितीत मौलाना करीमुद्दीनच्या डोक्यात मुशायरा भरवण्याची किडा शिरतो. तो दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या शायरांना जाऊन भेटतो आणि मुशायऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो. काही शायर आनंदानं तयार होतात, तर काही नाराजीनं रूकार देतात. तेव्हाच्या दिल्लीत ग़ालिब, मोमीन, झौक, दाग वगैरे नामंवत शायर होते. त्यांच्यात जसा एकमेकांबद्दल आदर होता, तशीच एक प्रकारची स्पर्धा व प्रसंगी असुयासुद्धा होती. या नाटकाच्या पहिला अंक मौलाना करीमुद्दीन मुशायरा भरवण्यासाठी करत असलेली धडपड यात खर्च होतो. मुशायऱ्यात एक उर्दूप्रेमी इंग्रज अधिकारीही सामिल होतो. तो एका प्रसिद्ध शायरकडे उर्दूचे धडे गिरवत असतो. नाटकात थोडे विनोद पेरण्यासाठी या पात्राची निर्मिती केली आहे.
त्या काळच्या दिल्लीत सर्वत्र नैराश्याचं साम्राज्य पसरलेलं असतं. आपली सत्ता जवळजवळ संपुष्टात आली आहे, हे सर्व संबंधितांच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर एक जगण्याची पद्धत लयाला जात आहे, हे त्यातील संवेदनाशील व्यक्तींना, खास करून ग़ालिबच्या लक्षात येत होतं. पण काळाच्या गतीपुढे सर्वच हतबल झालेले असतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत एखादी सामान्य व्यक्ती समोर येते आणि त्या अवस्थेत तात्पुरती संजीवनी ओतते. त्या काळची अशी व्यक्ती म्हणजे मौलाना करीमुद्दीन. तो सर्व महत्त्वाच्या शायरांच्या दारात जातो व त्यांना मुशायऱ्यात सामिल (शरीक) होण्याची विनंती करतो. ‘हो’, ‘नाही’ करता करता सर्व महत्त्वाचे शायर तयार होतात.
करीमुद्दीनच्या लक्षात यायला लागतं की, असा मुशायरा व तोही एवढ्या मोठ्या पातळीवर आयोजित करणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही. तो कसा तरी बादशाह सलामतपर्यंत पोहोचतो आणि मुशायरा ‘दिवाण-ए-आम’मध्ये भरवण्याची परवानगी मिळवतो. म्हणून याला ‘लाल किले का आखरी मुशायरा’ असंही म्हणतात. अशा मुशायऱ्यात जसं नेहमी होतं, तसं या शेवटच्या मुशायऱ्यातही होतं. म्हणजे थोरामोठ्यांचे रुसवेफुगवे. या सर्वांवर मात करून मुशायरा सुरू होतो आणि तेथून रसिकांसमोर यायला लागते उर्दूची अदब व निरनिराळ्या भावना व्यक्त करण्याची लोकविलक्षण क्षमता.
या नाटकाला तसं पारंपरिक पद्धतीचं कथानक नाही, नायक-नायिका नाहीत, संघर्ष नाही. आहे तो एक काळाचा मूड व लयाला जात असलेलं एक साम्राज्य, एक संस्कृती. मुशायऱ्याला बादशहाचा प्रतिनिधी म्हणून राजपुत्र उपस्थित असतो. त्याची परवानगी घेत प्रत्येक छोटामोठा शायर आपली शायरी पेश करतो. शायरी पेश करणाऱ्या शायरसमोर एक शमा (मेणबत्ती) ठेवली जाते. त्याची शायरी सादर करून झाली की, ती शमा दुसऱ्या शायरसमोर ठेवली जाते. यात जी नज़ाकत आहे, ती प्रत्यक्ष बघण्यात आहे. हेच तर उर्दूचं वैभव आहे.
पु.ल. देशपांडे यांनी कुठे तरी म्हटलं आहे की, प्रेम करावं तर उर्दूतच. माशाल्ला, काय शब्द आहेत! ‘आँखे’, ‘नयन’, ‘दिल’, ‘हुस्न’, ‘इश्क’. मराठी भाषा भांडणं करायला ठीक आहे. कुठे ‘नयन’ तर कुठे मराठी भाषेतला ‘डोळा’! कुठे ‘शमा’ आणि तिच्यासाठी पागल झालेले परवाने आणि कुठे मराठीतील मेणबत्ती! पु.ल. देशपांडे हे नाव ज्या व्यक्तीचित्रांसाठी नंतर महाराष्ट्रातल्या घराघरांत गेलं, त्या ‘व्यक्ती आणि वल्ली’तील पहिलं व्यक्तीचित्र आहे ‘भैय्या नागपूरकर’ हे. या व्यक्तीचित्राची सुरुवातच मुळी ‘ओ पिलानेवाले, जरा नजरसे नजर मिलाके तो पिला’ या वाक्यानं होते.
‘आखरी शमा’चं दिग्दर्शन एम.एस. सथ्यू यांनी केलं आहे. रसिकांना हे नाव ‘गर्म हवा’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शक म्हणून माहिती असतं. हे नाटक तसं कोणत्याही कसलेल्या दिग्दर्शकाची परीक्षा पाहणारं आहे. मात्र मुळातच नाटकाचं कथानक असं काही गोड आहे आणि जोडीला ‘इप्टा’तील ज्येष्ठ रंगकर्मींची टीम उपलब्ध असल्यामुळे नाटकाचा प्रयोग उत्तम होतो. यात ज्येष्ठ रंगकर्मी अंजान श्रीवास्तव हे वयोवृद्ध शायरच्या भूमिकेत आहेत, तर रमेश तलवार मौलाना करीमुद्दीनच्या भूमिकेत. तलवार ही भूमिका गेली पन्नास वर्षं करत आहेत, मात्र उत्साह तसू मात्र कमी झालेला दिसत नाही.
अशा एका प्रकारच्या संगीतप्रधान नाटकात पार्श्वसंगीतला फार महत्त्व असतं. ही जबाबदारी इक्बाल कुरेशी आणि कुलदीप सिंग यांनी सांभाळली आहे. या प्रयोगाची एक वेगळीच खासीयत आहे.
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment