अजूनकाही
एखाद्या भौगोलिक प्रदेशातील सामाजिक-राजकीय संदर्भांचा विचार करता महत्त्वाच्या ठरणाऱ्या विषयाला निरनिराळ्या तऱ्हेच्या विनोदाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणणं चित्रपट या माध्यमाला नवीन नाही. भारतीय चित्रपटसृष्टीबाबत बोलायचं झाल्यास अलीकडेच प्रदर्शित झालेले ‘बधाई हो’ किंवा ‘स्त्री’सारखे चित्रपट या प्रकारच्या यशस्वी उपयोजनाचं उत्तम उदाहरण आहेत. अर्थात असं यश प्राप्त करताना सदर चित्रपटांना उत्तम कथा-पटकथेची जोड असावी लागते, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ‘लुका छुपी’मध्ये मात्र सुट्या विनोदी (असण्याची अपेक्षा असलेल्या) दृश्यांना एकत्र गुंफण्याचा प्रयत्न असून एक ढोबळ कथानक उभं राहील अशी अपेक्षा चित्रपटकर्ते बाळगतात. मात्र याच अपेक्षेमागील संकल्पनात्मक पातळीवरील आणि पटकथा-दिग्दर्शनाच्या मांडणीतील गोंधळ चित्रपटाला मारक ठरतो. ज्यामुळे कथा आणि विनोदाच्या पातळीवरही अगदीच रटाळ, आळशी आणि नावीन्याचा अभाव असलेल्या या चित्रपटाचा ऱ्हास कुणीच टाळूच शकत नाही.
मूलभूत कथानकाची रचना करत असतानाच ‘लुका छुपी’ इतका आळस करतो की, पुढे त्याच्या या आळसाची प्रेक्षकाला सवय होऊन जाईल. म्हणजे गुड्डू शर्मा (कार्तिक आर्यन) हा मथुरेतील एका स्थानिक वृत्तवाहिनीत अँकर (पत्रकार नव्हे, ते समजूतदार असतात किंवा सध्याचं चित्र पाहता असायला हवेत म्हणणं अधिक योग्य राहील!) म्हणून कार्यरत असतो. तो पारंपरिक ढंगानं विचार करणारा असतो. शहरात लिव्ह-इन रिलेशनशिपची चर्चा सुरू असते. कारण, संस्कृतीरक्षक मंडळ एका मुस्लिम अभिनेत्याच्या लिव्ह-इन संबंधांवरून गोंधळ घालतं. आणि आता संपूर्ण मथुरेत (किंवा मोठं लक्ष्य ठेवत भारतात) अशा संस्कृतीला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांना आळा घालायचं कार्य ते सुरू करतात. संस्कृतीरक्षक मंडळाचा सर्वेसर्वा असतो विष्णू त्रिवेदी (विनय पाठक), तर त्याची मुलगी असते रश्मी (क्रिती सेनन). आता सुज्ञ प्रेक्षक पुढे काय होणार याचा अंदाज लावू शकतात, आणि चित्रपटही त्यांचा मान राखत त्याच अपेक्षित मार्गावरील प्रवास सुरू ठेवतो.
साधारणतः चित्रपटातील तिसऱ्या मिनिटाला गुड्डू आणि रश्मी समोरासमोर येतात. कारण रश्मीनंही पत्रकारितेचा अभ्यास केलेला असतो. आणि आपल्या राजकारणी पित्यामुळे ती महिनाभर गुड्डू जिथं काम करतो, तिथंच इंटर्नशिप करणार असते. तर, पुढे दहाव्या मिनिटाला त्यांच्यात प्रेमाचा संवाद घडतो आणि तेराव्या मिनिटाला त्यांना आपले सूर जुळत असल्याचा साक्षात्कार झाल्यानं त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. पुढे आणखी कितव्या तरी मिनिटाला ते लग्न करण्यापूर्वी आपल्या नात्याचा आणखी एकदा फेरविचार करता यावा म्हणून एकमेकांची पारख करण्यासाठी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात.
बरं, असंही नाही की, ही त्यांच्या जीवनातील फार मोठी समस्या आहे. आणि जी आहे ती साधारण सव्वा तासात संपतेदेखील. मग उत्तरार्धातील उरलेल्या पाऊणेक तासात चित्रपटात सामाजिक-राजकीय संदर्भ घुसडत, एकाच प्रकारच्या अतर्क्य घटनाक्रमाची पुनरावृत्ती केली जाते.
इथं समोर आणलेल्या ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’च्या विषयाला फक्त वेगवेगळ्या विनोदांसाठीची पार्श्वभूमी म्हणून वापरण्यात येतं. त्यात पुन्हा सामाजिकतेचा आव आणत (अगदी अंगावर येणाऱ्या उदारमतवादी धोरणाचं स्वरूप असल्यानं) जे वळण दिलं जातं, त्यामुळे ‘निर्बुद्ध पारंपरिक स्वरूपाचे विनोद’ ते ‘उदारमतवादी, पुरोगामी विचार’ या दोन्हींमधील दरी अधिक ठळकपणे दिसून येते.
सदर चित्रपटाबाबतची सर्वांत मोठी समस्या अशी आहे की, तो वर उल्लेखल्याप्रमाणे बजरंग दलसारख्या संस्था आणि धर्म-संस्कृतीचं राजकारण अशा वास्तविक घटनांकडून प्रेरणा घेत कथानकात जे मूलभूत घटक समोर आणू पाहतो, तेच चित्रपटाच्या एकूण रचनेत, कमकुवत आणि उथळ पात्रांच्या गर्दीत हास्यास्पदरित्या खटकणारे ठरतात. शिवाय, तो एकीकडे शेवटी लांबलचक स्वगतांमधून राजकारणादि गोष्टींवर भाष्य करत असला तरी मुळातच सुरुवातीपासून लिव्ह-इन रिलेशनशिप, पात्रांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संस्कृतीरक्षक मंडळाचं वेगळं उपकथानक या सर्वच बाबींना विनोद म्हणून हाताळतो.
बरं, हा विनोदही उपहासात्मक वगैरे खोल विचार केलेला नव्हे, तर स्टीरिओटिपिकल पात्रांच्या उथळ क्रिया-प्रतिक्रियांमधून उत्पन्न होणारा असल्यानं तो विनोदही धड विनोदी म्हणता येत नाही. याखेरीज चित्रपटाच्या स्वतःच्या विश्वातील आंतरिक तर्काचाही इथं अभाव आहे. ज्यामुळे उत्तरार्धात घडणाऱ्या घटनांचे विनोदाचे रटाळ आणि उथळ प्रयत्न यापलीकडे वर्णनही करता येत नाही, आणि ते न्याय्यही ठरत नाही.
‘लुका छुपी’ हा असा चित्रपट आहे की, ज्यात उत्तर प्रदेशातील पार्श्वभूमी असलेल्या कथानकात कुठल्याही इतर मुख्य प्रवाहातील बॉलिवुडपटाप्रमाणे पंजाबी ढंगाची गाणी वाजू शकतात, आणि ज्यात पंकज त्रिपाठीसारख्या कलाकाराचाही सर्वाधिक वाईट पद्धतीनं वापर केला जाऊ शकतो. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरचा हा चित्रपट सध्या निमशहरी भागाची पार्श्वभूमी वापरून चालत असलेल्या इतर चित्रपटांच्या यशाचा आर्थिक फायदा करून घेण्याचा अतिशय उथळ, रटाळ आणि सुमार प्रयत्न आहे. ज्यात एखाद्या पात्राचं उथळ कॅरिकेचर करून सोडल्याशिवाय समोर येईल असं एक चांगलं (पक्षी : स्वीकारार्ह) विनोदी दृश्यही नजरेस पडणार नाही. याखेरीज चित्रपटात एकता कपूर स्कुलच्या मालिकांना लाजवेल असं पार्श्वसंगीतही आहेच.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment