अजय देवगण २५ वर्षांनंतरही चित्रपटसृष्टीत टिकून आहे! का?
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
मंदार करंजाळकर
  • अजय देवगणच्या वेगवेगळ्या चित्रपटांतील भावमुद्रा
  • Sat , 17 December 2016
  • हिंदी सिनेमा Hindi Cinema अजय देवगण Ajay Devgan काजोल Kajol फुल और काँटे Phool Aur Kaante शिवाय Shivaay

१९९१ साली 'फूल और काँटे' या चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत धडाकेबाज पदार्पण केलेला एक सामान्य मुलगा पुढे चित्रपटसृष्टीत आपल्या अंगभूत अभिनय कौशल्याद्वारे स्वतःचे नाव निर्माण करेल यावर कुणाचाही सांगूनही विश्वास बसला नसता. तरीही नियतीने ठरवलेलंच असेल तर प्रत्यक्षात तसंच घडतं असं म्हणतात. पुढे झालंही तसंच. ‘फूल और काँटे’ प्रचंड यशस्वी झाला या चित्रपटासाठी अजय देवगणला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. जेव्हा जेव्हा अॅक्शन फिल्म्सचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा आपल्याला ‘फूल और काँटे’मधील अजयची दोन बाईक्सवरच्या एन्ट्रीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. वडील वीरू देवगण चित्रपटसृष्टीतील एक नामांकित अॅक्शन डायरेक्टर ही अजयची जमेची बाजू. तरीही प्रतिथयश रोमँटिक हिरोच्या तुलनेत छाप पडेल असं व्यक्तिमत्त्व नसतानाही इतके दिवस इथं टिकून राहणं, हे त्याच्यासाठी खरंच अवघड होतं. ९० च्या दशकात हीरो म्हणून कुठल्याही पठडीतल्या निकषांमध्ये न बसणारा अजय एक समर्थ अभिनेता म्हणून गेली २५ वर्षं आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर आजही रसिकांच्या मनावर राज्य करतोय, हे आपल्याला मान्यच करावं लागेल.

करिअरच्या सुरुवातीलाच अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्धी मिळाली असली तरीही अजयने फक्त अॅक्शनपट न करता कटाक्षानं ‘दिलवाले’, ‘दिल क्या करे’सारखे रोमँटिक, ‘इश्क’, ‘ऑल द बेस्ट’, ‘गोलमाल’ सिरीजसारखे कॉमेडी आणि ‘जखम’सारखे सामाजिक भान असलेले वास्तववादी चित्रपटही केले. त्यातून स्वतःचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केला. स्वतःचं वेगळेपण सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका करणं गरजेचं आहे, हे बहुतेक त्याला आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच उमगलं असावं. एक अभिनेता म्हणून त्याचं वेगळेपण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर भूमिकेचं आकलन करून, आपल्या मर्यादा लक्षात घेऊन, मग त्यात आपल्या ताकदीने रंग भरणं हे आहे, असं म्हणता येईल. 

‘विजयपथ’, ‘दिलवाले’, ‘दिल जले’ या चित्रपटात रोमँटिक भूमिका करताना अजय जितका सहजपणे वावरताना दिसला, तितकाच सहज तो ‘इश्क’, ‘ऑल द बेस्ट’, ‘गोलमाल’, ‘बोलबच्चन’, ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटात कॉमेडी भूमिका करतानाही वाटला. त्यामुळेच तो पडद्यावर जास्त विश्वासार्ह वाटतो. अशा सहजपणामुळेच त्याच्या भूमिकेतील पैलू जास्त टोकदारपणे समोर येतात.   

संजय लीला भन्साळीच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात अजयची भूमिका खूपच आव्हानात्मक होती. एका प्रामाणिक नवऱ्याची ही भूमिका त्याने अत्यंत मन लावून केल्याचं जाणवतं. अजयने या भूमिकेतील छटा, बारकावे आणि भाव अतिशय तरलपणे पडद्यावर साकारले आहेत. या भूमिकेत खऱ्या अर्थानं तो एक सक्षम परफॉर्मर म्हणून प्रेक्षकांसमोर आला. तर त्याच दरम्यान आलेला महेश भट्ट दिग्दर्शित 'जखम' हा एक वास्तववादी चित्रपट त्याच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला. १९९२सालच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू- मुस्लिम जोडप्याच्या अनौरस मुलाची गंभीर भूमिका अजयने यात साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं. धीरगंभीर भूमिकेतील अजयचा अजून एक चित्रपट म्हणजे राजकुमार संतोषीचा 'द लिजंड ऑफ भगतसिंग'. यात त्याने साकारलेल्या भगतसिंगच्या भूमिकेचंही बरंच कौतुक झालं. या चित्रपटासाठीही त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अभिनेता म्हणून समृद्ध होत असतानाच अजयने अॅक्शनपट करणं काही सोडलं नाही. बिहारमधील भागलपूर हत्याकांडाच्या कथानकाशी साधर्म्य असणारा प्रकाश झा दिग्दर्शित 'गंगाजल' या चित्रपटात त्याने एका इमानदार आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. पोलीस वर्दीतील स्टाईलबाज अजय जबरदस्त भाव खाऊन गेला. अजयमधील एक वेगळा अँग्री यंग मॅन या निमित्तानं पाहायला मिळाला. ‘सिंघम’सिरीजमधील अजयने प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध केलं. त्यात त्याने साकारलेल्या बाजीराव सिंघमची भूमिका अत्यंत लोकप्रिय झाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला तर कमावलाच, पण या चित्रपटामुळे त्याने खऱ्या अर्थानं स्टारडमही अनुभवलं.

अजयच्या करिअरचा विचार करायचा झाला तर काही चित्रपटांचा उल्लेख करणं नक्कीच गरजेचं आहे. 'मैं ऐसा ही हूँ' या चित्रपटात त्याने एका ऑटिस्टिक पित्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फारसा चालला नाही, पण या भूमिकेत त्याच्या अभिनयातील इंटेन्सपण पुन्हा एकदा दिसून आलं होतं. अशा भूमिका करणं म्हणजे स्वतःहून जोखीम पत्करण्यासारखं असतं. जेव्हा तुमची स्टार व्हॅल्यू फार मोठी नसते, तेव्हा तर अशा भूमिका करणं म्हणजे एक मोठं आव्हानच असतं, पण अजयने ते स्वीकारलं. त्याच्या परिणामांचा त्याने कधी विचार केला नाही. ‘दिवानगी’ या चित्रपटात स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डरने पीडित तरुणाची अशीच एक नकारात्मक भूमिका त्याने केली. या भूमिकेचं खूप कौतुक झालं आणि त्याला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचं पारितोषिकही मिळालं. रितूपर्णो घोष सोबत 'रेनकोट'सारखा आर्ट हाऊस, तर मधुर भांडारकर दिग्दर्शित 'दिल तो बच्चा है जी'सारखा वेगळ्या पठडीतलाही चित्रपट त्याने केला.

अजयच्या अजून काही उल्लेखनीय भूमिकांचा ऊहापोह करायचा झाल्यास त्याने साकारलेल्या 'कंपनी' आणि 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गुन्हेगारी विश्वातील पात्र रंगवत असतानाच यात त्याने आपल्या संयत अभिनयाचं दर्शन घडवलं. या भूमिकांना लोकप्रियताही मिळाली आणि समीक्षकांची मोहोरसुद्धा.

अभिनयात जरी कारकीर्द घडवली असली तरी त्याला कॅमेऱ्यामागे काम करायला पहिल्यापासून आवडतं असं अजय नेहमी सांगतो. आपलं अंतिम ध्येय हे अभिनय नसून दिग्दर्शन आहे हे त्याने स्वतःशी ठरवलं आहे. त्याच ध्येयाचा एक भाग म्हणून अजयने दिग्दर्शनयाचे प्रयत्नही करून पहिले आहेत. २००८ साली रिलीज झालेल्या 'युमी अँड हम' या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. अल्झायमरसारख्या गंभीर आजाराचा विषय घेऊन आपला पहिला चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठीही अंगी धाडस असावं लागतं, पण स्क्रिप्टवर विश्वास ठेवून आपल्या पहिल्याच प्रयत्नात अजयने बऱ्यापैकी दिग्दर्शकीय कौशल्य दाखवलं असं म्हणावं लागेल.

नुकताच रिलीज झालेला 'शिवाय' हा त्याने दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट. बर्फाच्छादित शिखरावरील थरार आणि त्याला मिळालेली कथेची जोड, तसंच त्यातील अॅक्शन आणि तेवढंच सफाईदार सादरीकरण याच्या जीवावर या चित्रपटानं उत्तम व्यवसाय करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. चित्रपट हे लोकांच्या मनोरंजनाचं माध्यम आहे. त्यामुळे त्यांना चित्रपटगृहात खिळवून ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे ही अजयची धारणा आहे. त्यानुसार ‘शिवाय'मध्ये मनोरंजनाचे आवश्यक ते सगळे घटक अंतर्भूत होते. म्हणूनच समोर करण जोहर बॅनरचा 'ए दिल है मुश्किल' रिलीज होत असतानाही 'शिवाय’ जास्त यशस्वी ठरला.

अजयला आपण खूप मोठा अभिनेता असण्याचा कुठलाही बडेजाव नाही. प्रसारमाध्यमांमध्येही तो फारसा कुठे दिसत नाही. त्याला 'स्टारडम' जरी नसलं तरी एक बहुरंगी अभिनेता म्हणून आपल्याला त्याची दाखल घ्यावीच लागते. कुठल्याही वादविवादात अजयचं नाव गोवल्या गेल्याचं आपल्याला आठवत नाही. काजोलसारख्या गुणी अभिनेत्रींसोबत त्याने आपला सुखाचा संसार मांडला आहे. त्याला अपयशाचं भय नाही. खरं म्हणजे त्याने केलेल्या आत्तापर्यंतच्या भूमिकांमध्ये अनेक फ्लॉप्सचाही समावेश आहे, पण म्हणून स्वतःवर प्रयोग करण त्याने कधीही थांबवलं नाही. तो स्वतःच्या क्षमता वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःशी खूप प्रामाणिक राहून काम करतो. आणि म्हणूनच २५ वर्षांनंतरही तो हिंदी चित्रपटसृष्टीत टिकून आहे!

mkaranjalkar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......