‘डोंबिवली रिटर्न’  : मराठी मध्यमवर्गाच्या मेंदूचं स्कॅनिंग
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अशोक राणे
  • ‘डोंबिवली रिटर्न’ची पोस्टर्स
  • Mon , 25 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie डोंबिवली रिटर्न Dombivli Return संदीप कुलकर्णी Sandeep Kulkarni राजेश्वरी सचदेव Rajeshwari Sachdev

प्रिय महेंद्र,

खरं तर चित्रपटाची समीक्षा करून काळ लोटला. या काळात अनेक सिनेमे आले, ज्यांच्याविषयी लिहावंसं वाटत होतं. पण टाळत राहिलो. आज तुझा ‘डोंबिवली रिटर्न’ पाहिला. आणि पुन्हा लिहिण्याची उबळ आली. पण समीक्षा लिहीत नाही म्हणून हे लेखवजा पत्र.  

मी नेहमीच म्हणत आलोय की, राजकारण आणि समाजकारण याप्रमाणे चित्रपटही तुमच्या आयुष्याचा भाग असतो. कधी कळत, कधी नकळत.  माझं हे मत तुझा ‘डोंबिवली रिटर्न’ अधोरेखित करतो.

नीतीमूल्यांची चाड राखत, अंथरूण पाहून पाय पसरणारा, साध्या राहणीचा मध्यमवर्ग, अशाच संस्कारात वाढलेला. गेल्या दोन दशकांत आलेल्या जागतिकीकरण आणि मुक्त बाजारपेठ धोरणामुळे मध्यमवर्गीयांचा चेहरा-मोहराच बदलला आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे तो भेलकांडला आहे. या काळात कधी नव्हे ते पैशाला आणि पंचतारांकित लाईफ-स्टाईलला खूप महत्त्व आलं. आणि गरजेपेक्षा अधिक आलेला हा पैसा माणसाला मूल्यहीन बनवत त्याचा ऱ्हास घडवून आणतो, असं मानणाऱ्या मध्यमवर्गाला नकळत पैशाची अॅलर्जी होते. आजच्या या चकचकीत मॉल संस्कृतीत तो भांबावून जाताना आपण पाहतोय. संस्कारांचं ओझं घेऊन या रेसमध्ये त्याला नीट धावताही येत नाही आणि ते ओझं तो टाकूही शकत नाही. अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या अनंत वेलणकर (या नावासंबंधी पुढे कधीतरी) या माणसाची गोष्ट, ‘डोंबिवली रिटर्न’.

...............................................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y3g5mf7t

...............................................................................................................................................................

पैसा आणि त्यातून हाती आलेली सत्ता, या दोहोंच्या विळख्यात सापडलेल्या पापभिरू समाजाचं काय होतंय हे सभोवताली दिसतंच आहे. आपल्या आधीच्या पिढीनं पैशाअभावी खाल्लेल्या खस्ता आजच्या पिढीला खायच्या नाहीत. त्याला आजच्या जगाचा मूलमंत्र ‘खा, प्या आणि मज्जा करा’ याप्रमाणे जगायचा आहे. हे वास्तव नेमकं काय आहे याचा शोध म्हणजे तुझा हा चित्रपट आहे, असं मला वाटतं.

हा तुझा पहिला चित्रपट आहे याचं मला कौतुक आहेच, पण म्हणून तुला कुठल्याही प्रकारची सूट मात्र मी देऊ इच्छित नाही. कारण चित्रपट माध्यमाबद्दलची तुझी जाण, आपल्यात झालेल्या अनेक चर्चेमध्ये आणि तू लिहिलेल्या काही समीक्षावजा लेखामुळे मला पूर्ण ज्ञात आहे. पण सूट देण्याची पाळी तू येऊ दिली नाहीस, हे बरे! ‘Nothing is perfect’ हे मान्य असलं तरी ‘Some are almost perfect’. या ‘almost’च्या जवळपास जाणारा तुझा ‘डोंबिवली रिटर्न’ आहे.

प्रथमदर्शनी या चित्रपटाचं कौतुक वाटतं, कारण सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा सामाजिक आशय असलेला चित्रपट कडेकोट वास्तववादी शैलीत करण्याचा, इतकंच नव्हे तर तो ‘Arti’ करण्याचा मोह दिग्दर्शकाला होतो. तो तुला झालेला नाही. तू मात्र तो थ्रिलर केलास. एकीकडे देशातले, विदेशातले (world cinema) अभिजात सिनेमे पाहत तू  हॉलिवुडचा सिनेमाही सातत्यानं पाहत आला आहेस. तुझा हा सिनेमा पाहताना तूच खूप वर्षांपूर्वी कथन केलेला रॉबर्ट डी निरो दिग्दर्शित ‘ब्रॉन्क्स टेल’ आठवला.

थ्रिलर जॉनरमधून सामाजिक आशय सांगणारी वर्ल्ड सिनेमात आणखीही काही उदाहरणं आहेत, पण ती मला मराठीत सापडत नाहीत. कदाचित मराठीत ‘डोंबिवली रिटर्न’नंच त्याची सुरुवात झालीय. त्यात सामान्य प्रेक्षकाला हवी असलेली रंजकता तर आहेच, पण त्याचबरोबरीनं त्यात अधोरेखित केलेला आशयही त्याच्यापर्यंत पोहोचतो. हे खरं तर तू लिहिलेल्या नेमक्या पटकथेमुळे आणि त्यात निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांमुळे तुला साध्य करता आलं आहे. कथेमधील अनेक पदर व पातळ्या तुझं पटकथेचं कसब पणाला लावतं. वास्तव हे कल्पनेपेक्षा अगम्य असतं, तर कधी कल्पनाच वास्तवात उतरल्यासारखी वाटते. रिअल आणि सर्रिअल यातला हा खेळ तू लीलया पेलला आहेस, असं मला वाटतं. कारण तो रंजकही झाला आहे. प्रेक्षकाचा एक विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर न ठेवता सर्वसामान्य माणसाला, आपल्या चिंतन-मननातून आलेला सामाजिक आशय, वेगळ्या वाटेनं मांडतानाचं आवश्यक ते भान तुझ्यात आहे आणि त्याहून महत्त्वाचं तो आत्मविश्वास तुझ्यात आहे, हेच हा चित्रपट पाहून मला जाणवलं.

‘गॉड इज इन डिटेल्स’ याचा प्रत्यय हा सिनेमा पाहताना कधी संवादातून तर कधी प्रसंगातून मला येतो. अगदी सत्तेला चेहरा नसतो, हे सांगण्यासाठी तू वापरलेली शैली ते वाम-मार्गातून आलेला पैसा हाताळताना वापरलेली काळी पिशवी, अशी कित्येक उदाहरणं यात मला सांगता येतील.  

संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेव, हृषिकेश जोशी यांना मिळालेल्या व्यक्तिरेखांचं ते सोनं न करते तरच नवल होतं, पण या चित्रपटात छोटातल्या छोट्या भूमिकेसाठी केलेली पात्रयोजनाही अत्यंत चपखल आहे. या चित्रपटातलं तांत्रिक अंग इतकं परिणामकारक आहे की, त्यानं तुझं निम्मं काम सोप्प केलंय. अर्थात दिग्दर्शक म्हणून त्यांच्यावर तुझी कमांड  असणारच. पण विशेष उल्लेख करायचा तर उदय मोहिते यांचा कॅमेरा, योगेश गोगटे व आदित्य वोरीयर यांचं संकलन व सर्वांत प्रभावी असं शैलेंद्र बर्वे यांचं पार्श्वसंगीत आणि मंदार व अनमोल यांचं साउंड डिझाईन. भाषा थोडीशी समीक्षकी होतेय म्हणून इथंच थांबतो. खरं तर या चित्रपटाचं उत्तम रसग्रहण होणं गरजेचं आहे. ते कधीतरी करेनच. पण एकाच ओळीत (One line of the story) सांगायचं तर हे ‘मराठी मध्यमवर्गाच्या मेंदूचं स्कॅनिंग’ आहे.

‘डोंबिवली रिटर्न’वर लिहावंसं वाटलं कारण तू माझा मित्र आहेस हे एक, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे नाटक आणि सिरिअल करत असूनदेखील तू पक्का सिनेमावाला आहेस. तुझा हा सिनेमा मराठीत वेगळं काही पाहणाऱ्यांनी आवर्जून पाहावा हीच सदिच्छा आणि सल्ला.  

तुला आणि ‘डोंबिवली रिटर्न’च्या टीमला खूप खूप शुभेच्छा!  

.............................................................................................................................................

लेखक अशोक राणे ख्यातनाम सिनेअभ्यासक आहेत.

ashma1895@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख