अजूनकाही
शीर्षक वाचून लगेचच क्लिक केलंत ना? असू द्या हो, लाजू नका! कुणाला स्वतःचं किंवा कुणाला आपल्या लहानग्याचं लहानपण आठवलं असेल. किंवा हा असा प्रश्न विचारून स्वतःच्या वडिलांची किंवा आपल्या मुलाने केलेली स्वतःची तारांबळसुद्धा आठवली असेल. होय ना?
पप्पानं काय उत्तर द्यावं? देव ठेवून जातो म्हणावं की, तू मोठा झाल्यावर आपोआप कळेल म्हणावं? की, डोळे वटारून 'अभ्यास कर मूर्खा, उगाच फालतू प्रश्न विचारू नकोस' असं म्हणावं? ‘मुलं म्हणजे देवाघरची फुलं, त्यांच्या जिज्ञासूवृत्तीला पोषक वातावरण द्यायला हवं, मानवी मेंदूचा विकास बालवयातच सर्वांत जास्त होत असतो,’ अशी ठोकळेबाज पुस्तकी वाक्यं कुणीही बोलून दाखवेल, पण स्वतःवर वेळ आली की, कशी तंतरते ते या बिचाऱ्या पप्पा नावाच्या व्यक्तीलाच ठाऊक.
या प्रश्नाला खूपच सुंदर उत्तर शोधलंय 'Y-Films' या युट्युब चॅनलद्वारे प्रसारित होणाऱ्या 'Sex Chat with Pappu & Papa' या वेब सिरीजने. "पप्पा 'सेक्स' म्हणजे काय हो?" या पप्पूच्या प्रश्नावर त्याला समजेल अशा भाषेतच, "मोबाईलची युएसबी कॉर्ड म्हणजे पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट आणि लॅपटॉपचे युएसबी पोर्ट म्हणजे स्त्रियांचा प्रायव्हेट पार्ट एकमेकांना कनेक्ट केले जातात. यातून जी फाईल ट्रान्सफर होते त्यास स्पर्म म्हणतात. प्रत्येक वेळी कनेक्शन फाईल ट्रान्स्फर करण्यासाठीच केलं जातं असं नाही. चार्जिंगसाठीसुद्धा हे दोन्ही कनेक्ट केले जातात. एकंदर या सर्व प्रोसेसला सेक्स म्हणतात," असं भन्नाट उत्तर देणारे पप्पा आपल्याला 'Sex Chat with Pappu & Papa' या सिरीजमध्ये दिसतात. या सिरीजमधले पप्पा पप्पूच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळत नाहीत. उलट ते त्याच्या प्रश्नांची उत्तरं कल्पकतेनं, त्याला समजेल अशा भाषेत देतात. त्यामुळे पप्पूची जिज्ञासा शमते आणि हे सर्व कुतूहल शमवण्यासाठी तो इतर कुठल्याही गैरमार्गांचा वापर करत नाही. हे असं असावं आदर्श पप्पा-पप्पूचं म्हणजे बाप-मुलाचं नातं.
हस्तमैथुन म्हणजे काय? होमोसेक्शुअल आणि होमोसेपियन यांचा अर्थ एकच का? कंडोम म्हणजे वेगवेगळ्या फ्लेव्हरचं चॉकलेट असतं का? नॅपकीनसमोर सॅनिटरी जोडला म्हणून काय झालं, ते नाक पुसण्यासाठी का वापरत नाहीत? पप्पूच्या अशा विविध प्रश्नांची उत्तरं तेवढ्याच गमतीदार पद्धतीने देणारे पप्पा आणि 'पारंपरिक' पद्धतीने हे असले प्रश्न कसे 'टोलवले' जावेत यांची उदाहरणं देणारे पप्पूचे आजोबा आपल्याला या सिरीजमध्ये सतत भेटतात.
सेक्स हा अस्पृश्य मानला गेलेला विषय 'Sex Chat with Pappu & Papa' या वेब सिरीजमध्ये खुसखुशीत, विनोदी अंगाने यशस्वीपणे हाताळला गेला आहे. हा विषय खरं तर एव्हाना टेलिव्हिजनवर यायला हवा होता, पण भारतीय टीव्ही मालिका अजूनही सास-बहु-साजिशच्या पारंपरिक मानसिकतेतून पूर्णतः बाहेर आलेल्या नाहीत. चित्रपटमाध्यमाची तर चित्रणापासून वितरणापर्यंतची आर्थिक गणितं जुळवणं आजघडीला अडचणीचं होऊन बसलं आहे. त्यामुळे नव्याने उपलब्ध झालेला, तुलनेनं बराच कमखर्चिक असणारा वेब सिरीजचा पर्याय तरुण फिल्ममेकर्स हाताळताना दिसत आहेत.
जसं फेसबुकनं आपल्याला व्यक्त होण्यासाठी आपल्या ओळखीच्या(?) लोकांना जोडणारं विनाशुल्क जाळं उपलब्ध करून दिलं, तसंच एक जाळं युट्युबने उपलब्ध करून दिलं आहे. ज्यावर आपण दृकश्राव्य माध्यमाद्वारे म्हणजेच व्हिडिओद्वारे जगाशी जोडले जाऊ शकतो. या माध्यमाचा विकास होत गेला आणि व्ही-लॉग्ज, वेब शोज, वेब सिरीज या संकल्पना उदयाला आल्या. वरवर पाहता या तिन्ही गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची वेगवेगळी शास्त्रीय व्याख्या नाही. परंतु प्रेक्षकांनी स्वतःच्या सोयीसाठी व्याख्या केल्या आहेत. उदा. -व्हिडीओ ब्लॉग्ज. याचं छोटेखानी नाव म्हणजे व्ही-लॉग्ज. या व्ही-लॉग्जमध्ये अनेक छोटे-मोठे प्रँक किंवा थेट रस्त्यावर उतरून विनोदी पद्धतीने घेतलेल्या मुलाखती वगैरेंचा समावेश असतो. वेब शोमध्ये स्टुडिओत बसून घेतलेल्या सेलिब्रिटीजच्या मुलाखती, पाककृतीचे कार्यक्रम, अभ्यासाचे व्हिडिओ असे एका विषयाला धरून रचलेले कार्यक्रम असतात. आणि वेब सिरीज म्हणजे मालिका. एका विषयाला मध्यवर्ती ठेवून, आधीच संहिता लिहून, काल्पनिक कथानकाची गुंफलेली शृंखला म्हणजे वेब सिरीज.
स्मार्ट फोन वापरकर्ते दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापरसुद्धा वाढत चालला आहे. म्हणूनच वेब सिरीज या प्रकारास चांगले दिवस येत आहेत. 'Sex Chat with Pappu & Papa' या वेब सिरीजने जसा लैंगिक शिक्षण हा विषय मांडला, तशीच अजूनही काही लोकप्रिय युट्यूब चॅनेल्स आहेत. त्यांनी असे विषय हाताळले आहेत, जे पारंपरिक टीव्ही सिरिअल्सद्वारे मांडण्यास अजूनही मुभा नाही. लिव्ह-इन रिलेशनशिप, समलैंगिक संबंध, पालकांची लैंगिकता इत्यादी अनुल्लेखाने मारलेले विषय असोत किंवा अशा काही राजकीय-सामाजिक घटना ज्यावर वृत्तवाहिन्यासुद्धा आंतर्बाह्य दबावामुळे प्रखर भाष्य करू शकत नाहीत. असे सर्व विषय वेब सिरीजमध्ये हाताळले जात आहेत. कारण अजून तरी सोशल मीडियावरील अभिव्यक्तीवर फारसा राजकीय वा इतर हस्तक्षेप होताना दिसत नाही. सद्यस्थितीत ही गोष्ट खूपच आशादायी आहे.
विदेशात बऱ्याच आधीपासून लोक वेब सिरीजकडे वळले आहेत. भारतातही आता इंग्रजी-हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा वेब सिरीज तयार होताना दिसत आहेत. मराठीमध्ये ‘Struggler Saala’ आणि ‘Back benchers’ या वेब सिरीज, ‘Casting Couch with Amey and Nipun’ आणि ‘पोपकॉर्न पे चर्चा’ हे वेब शो चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.
वेब सिरीज प्रकारात विनोद, व्यंग, प्रहसन या प्रकाराची मागणी जास्त आहे. जण म्हणून फक्त विनोदासाठी वेब सिरीज बनवल्या जात नाहीत. किंबहुना फक्त विनोद, तोही कमरेखालचा करून आपण सहज यशाची शिखरं गाठू अशा भ्रमात असणारे ‘AIB - All India Backchod’ हे वेब चॅनेल अश्लीलतेमुळे पसंतीक्रमात घसरलेलं दिसून येतं. या उलट ‘TVF - The Viral Fever’ हे वेब चॅनेल विषयांच्या वैविध्यतेमुळे सर्वांत जास्त लोकप्रिय ठरलं आहे.
हिंदी-इंग्रजी भाषेतील लोकप्रिय वेब चॅनेल सामाजिक-राजकीय विषय घेऊन त्यावर विनोदाचा तडका मारून प्रेक्षकांसमोर मांडत आहेत. त्यांनाही ते आवडत आहे. मराठीमध्ये वर उल्लेख केलेल्या वेब सिरीज/शोज लोकप्रिय होत आहेत, परंतु अजूनही मराठी प्रेक्षकाला सामाजिक-राजकीय प्रश्नांवर हलक्याफुलक्या पद्धतीनं का होईना पण भाष्य करणाऱ्या वेब सिरीजची अपेक्षा आहे.
मराठी निर्माते प्रगल्भ होतील, दृक्श्राव्य माध्यमांत काम करणं सर्वार्थानं अभिमानास्पद होईल, जाहिरातदारांना मराठी ग्राहकसुद्धा स्मार्टफोन वापरू शकतो हे पटेल, टीव्ही प्रेक्षक ‘जान्हवी’नंतर ‘मोनिका’च्या बाळंतपणाचे महिने मोजण्याऐवजी अमुक अमुक वेब सिरीजचा पुढचा सिझन केव्हा येईल याची वाट पाहील, तेव्हा मराठीमध्येसुद्धा कुणा पप्पू-पप्पामधील सेक्सॉलॉजीच्या गमतीदार गप्पा ऐकायला मिळतील!
लेखक मराठी चित्रपट व लघुपटांसाठी पटकथा लेखन करतात.
maheshmunjale@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ashutosh
Sun , 18 December 2016
पप्पू आणि पापा हि वेब सिरीज खूपच मस्त आहे. त्यावरील काहीतरी वाचायला मिळावं असं सारखं वाटत होतं. आणि आज हे आर्टिकल दिसल्याबरोबर लगेच वाचायला घेतलं. पण काहीसं मिस लिडिंग वाटलं. पप्पू आणि पापा बद्दल बोलण्यासारखं बरंच होतं. ती खोली इथं जाणवली नाही. विषय काही वेळातच यु ट्यूब आणि इतर वेब सिरीज कडे वळला. आणि हो TVF मस्तच आहे. पण काही दिवसांपूर्वीच AIB चा आलेला नवीन वेब शो नक्की पाहावा.