‘गली बॉय’ : अभिव्यक्तीचे स्फोटक सुरुंग आणि अख्तरचा सिनेमॅटिक ब्रिलियन्स
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘गली बॉय’चं पोस्टर
  • Sat , 16 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie गली बॉय Gully Boy रणवीर सिंग Ranveer Singh आलिया भट Alia Bhatt Zoya Akhtar झोया अख्तर

‘गली बॉय’चं मूलभूत कथानक हे बऱ्याच स्टॅंडर्ड ‘रॅग्स टू रिचेस’ स्वरूपाचं आहे. त्यामुळे या टेम्प्लेटभोवती कथेची वीण घालत असताना तो उपकथानकं आणि पात्रांच्या संभाव्य कृती यांबाबत पारंपरिक वाटा चोखाळताना दिसतो. मात्र, असं करताना कथानकात घटनांच्या अपेक्षितपणे होणाऱ्या वाटचालीची उणीव खिळवून ठेवणाऱ्या मांडणीच्या माध्यमातून भरून काढली जाईल, याची काळजी दिग्दर्शिका झोया अख्तर आवर्जून घेते. मग अशा वेळी पात्रांचं वास्तव आणि त्या वास्तवापासून कैक मैल दूर असलेली त्यांची स्वप्नं, त्यांच्या महत्त्वाकांक्षा यांच्यातील विरोधाभास वेळोवेळी पडद्यावर दिसत राहतो. त्यातील गाण्यांतून रेजोनेट होत राहतो.

मुराद शेख (रणवीर सिंग) हा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी. धारावीतील छोटेखानी घरात आधीच पाच लोक राहणाऱ्या मुरादचे वडील, आफताब (विजय राज) दुसरं लग्न करतात. आई, आफरीन (अमृता सुभाष) आणि वडिलांमधील संबंध आणि वडिलांशी फारसं न पटणाऱ्या मुरादच्या आयुष्यातील घटना त्याच्या मनावर खोलवर परिणाम करत असतात. पुढे जाऊन श्रीकांत ऊर्फ एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) या रॅपरशी सलोख्याचे संबंध निर्माण झाल्यावर तो म्हणतो - ‘तेरे अंदर लाव्हा हैं, उसे बाहर आने दे’. हे शब्द तसे खरेच आहेच. कारण, शेरशी भेट होण्याआधी त्याची ही आंतरिक अस्वस्थता कवितेच्या रूपात बाहेर पडत असते. शेरशी भेटल्यावर या कविता रॅपचं रूप धारण करतात. अभिव्यक्तीच्या विस्फोटाची, मुरादच्या संघर्षाची ही केवळ सुरुवात असते.

नेझी या भारतीय रॅपरच्या आयुष्यावर स्वैरपणे आधारित असलेला सदर चित्रपट मुख्यतः धारावीच्या पार्श्वभूमीवर उभा राहतो. हळूहळू त्यातले मुंबईतील सामाजिक, आर्थिक स्तरावरील वर्गभेद चित्रित करणारे संदर्भ अधिकाधिक तीव्र होत जातात. ही दृश्यं केवळ काहीतरी संवेदनशील, सहानुभूती निर्माण करण्यासाठी म्हणून समोर आणली जात आहेत, अशा स्वरूपाची ठरत नाहीत. उदाहरणार्थ, मुराद आणि सफीना (आलिया भट) यांच्यातील आपल्याला दिसणारी पहिली भेट म्हणजे मुंबई नामक गर्दीनं वेढलेल्या शहरातील एकांताच्या अभावाची खूण ठरते. बसमध्ये उभी असणारी सफीना मुरादच्या शेजारची सीट रिकामी झाल्यावर तिथं जाऊन बसते. त्याच्या डाव्या कानातील इअरबड आपल्या उजव्या कानात घालते. हे दृश्य काही प्रेक्षकांसाठी हसण्याचं निमित्त होईल. इतरांकरिता पडद्यावरील पात्रांप्रमाणेच टोचणारं कटू वास्तव असेल.

पुढे शोफर म्हणून काम करत असताना या वर्गभेदाच्या चित्रणाची आणि विरोधाभासाची परिसीमा गाठली जाते. अंगावर येणाऱ्या फ्रेम्ससोबत ‘दूरी’ गाण्याचे बोल कानांवर पडत राहतात. पडद्यावरील पात्रांमधील अंतर कमी अधिक होत असताना चित्रपट आणि प्रेक्षकातील अंतर मात्र त्याच्या भावनिक, सिनेमॅटिक परिणामामुळे दर क्षणांगणिक कमी होत जातं.

सिनेमा, साहित्य, संगीत ही वेळोवेळी त्या त्या पिढीसाठी वास्तवापासून दूर नेणारी माध्यमं राहिलेली आहेत. हेच अगदी अचूकपणे दाखवणाऱ्या एका दृश्यात मुराद त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नातील गोंधळाच्या वातावरणादरम्यान भिंतीला टेकून ‘एव्हरीडे’ ऐकत असतो. बाप जवळून जात असताना त्याच्या कानातील इअरबड खेचतो, हा निर्विकारपणे पुढच्याच क्षणी ती पुन्हा कानात घालतो. एकीकडे चित्रपटातील मध्यवर्ती पात्रं वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे चित्रपट त्यांचं वास्तव आपल्यासमोर मांडत जातो. विरोधाभासी वाटणाऱ्या गोष्टींची इतकी चतुर मांडणी क्वचितच पहायला मिळते. पण या विरोधाभासातच चित्रपटाचं मर्म असावं. त्यामुळेच तो वास्तवापासून आयुष्यभर पळ काढण्यापेक्षा एकदाचा त्याचा स्वीकार करत त्याला सामोरं जाणं सुचवत असावा.

रणवीरनं साकारलेला मुराद हा त्याच्या आजवरच्या मोजक्याच संयत आणि प्रभावी परफॉर्मन्सपैकी एक, आणि कदाचित सर्वोत्कृष्ट म्हणावासा आहे. झोयाला त्याच्या एरवी ऑन आणि ऑफ स्क्रीन अशा दोन्ही स्तरांवर ओव्हर द टॉप ठरणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला नियंत्रित करणं उत्तमरीत्या जमतं, हे तिनं आधीही ‘दिल धडकने दो’मध्ये दाखवून दिलं आहेच. तो मुरादच्या बापाची प्रत्येक कृती आणि आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांदरम्यान कायम शांत राहणं, ते सगळं काही असह्य होऊन बंड पुकारणं, या दोन टोकांदरम्यान तितक्याच तरलपणे वावरतो. सफीना हे पात्र ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’मधील सेक्सचा भाग वजा करत, मात्र पितृसत्ताक समाजातील सामाजिक-धार्मिक परंपरांपासून सुटका करून घेण्याची ती मनोभावना कायम ठेवत लिहिलेल्या पात्राप्रमाणे भासते. चित्रपटातील एक पात्र तिला ‘वो बहुत तोडफोड हैं यार’ म्हणत जे वर्णन करतं, आलियाची कामगिरीदेखील त्या वर्णनाला पात्र ठरेल अशीच आहे.

चित्रपटाच्या इतर विस्तृत कास्टमध्ये किती लोक परिणामकारक ठरतात याची तर गणतीच करायला नको. विजय वर्मानं साकारलेला मोईन आणि चतुर्वेदीचा शेर हे दोघंही त्याचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हणून दिसतात. ‘शेर आया शेर’ म्हणत चतुर्वेदीनं केलेल्या पदार्पणानं त्याच्या गाण्याच्या बोलांना दाद द्यायला भाग नाही पाडलं तरच नवल. अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष या दोघीही नेहमीप्रमाणे चोख भूमिका बजावतात. कल्की कोचलीनचं पात्र लिखाणात काहीसं कमकुवत असलं तरी ते पडद्यावर समोर येताना मात्र प्रभावी ठरतं.

मात्र या सर्वांवर कुणी मात करत असेल तर तो म्हणजे त्याच्या वडिलांच्या भूमिकेतील विजय राज. म्हणजे त्याचं पात्र जितक्या प्रभावीपणे लिहिलेलं आहे, त्याला पडद्यावर आणताना विजयची संवादफेक अतुलनीय ठरते. उत्तरार्धातील त्याचं आणि रणवीरचं चित्रपटातील सर्वोच्च क्षणांपैकी एक आहे. हे दृश्य केवळ दोन पात्रांमधील संवाद/विसंवाद नाहीये, तर दोन पिढ्यांमधील टोकाचं मूर्तीमंत रूप आहे. अर्थात, सदर चित्रपटात तरी अशा दृश्यांची कमी नाही.

विजय मौर्यचे संवाद एकाच वेळी टाळ्या खेचत, सिनेमॅटिक अनुभव देणारे आणि सोबतच वास्तववादी छटा असलेले संवादलेखनाचे मापदंड ठरायला हवेत असे आहेत. झोया अख्तर आणि रीमा कागतीच्या पटकथेला मौर्यचे संवाद अधिक उंचावून ठेवतात. कथानकाला अगदीच अचूकपणे पूरक ठरणारं कर्ष काळेचं पार्श्वसंगीत आणि जय ओझाचं छायाचित्रण चित्रपटाच्या महत्त्वाच्या अंगापैकी एक आहेत. संकलन अतिशय परिणामकारक आणि चित्रपटातील दोन दृश्यांतील विरोधाभासाची तीव्रता कैकपटींनी वाढवणारं आहे.

पन्नासहून अधिक कलाकारांच्या एकत्र काम करण्यानं बनलेला चित्रपटाचा विस्तृत आणि वैविध्यपूर्ण साऊंडट्रॅक या वर्षीची एक उत्तम सांगीतिक सुरुवात करून देतो. जावेद अख्तरच्या कविता आणि काही निवडक गाणी चित्रपटाला चार चाँद लावतात. आपले समकालीन लोक केव्हाच आऊटडेटेड झालेले असताना अजूनही नाविन्यपूर्ण तऱ्हेनं लिहिणं केवळ त्यांना आणि गुलज़ारनाच जमतं. चित्रपटातीलच गाण्यातील शब्द उसने घेत म्हणायचं झाल्यास ‘जावेद भाई जैसा कोई हार्डीच नहीं हैं’ इतकंच म्हणता येईल.

चित्रपटाचा नायक ज्या आफ्रिकन-अमेरिकन रॅपर्सना ऐकतो, त्यांची निर्मिती असलेल्या आणि एकूणच हिप-हॉप संगीतावर वेळोवेळी समकालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीचा प्रभाव पडला आहे. आणि त्यास आफ्रिकन-अमेरिकन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. चित्रपटाचा एकूण आशय त्यांच्या गाण्यांतून प्रतिबिंबित होणाऱ्या आशयाइतका तीव्र नसला तरी तो अगदीच उथळही नाही. फक्त त्याचं स्वरूप त्याच्या गाण्यांच्या स्फोटक बोलांपेक्षा काहीसं सौम्य आहे, इतकंच. खासकरून सामाजिक-राजकीय परिस्थितीवरील भाष्य चित्रपटातील विस्तृत अशा साऊंडट्रॅकमधून प्रतिबिंबित होत असताना पडद्यावर मात्र ते वर्गसंघर्षाच्या रेखाटनापुरतं मर्यादित राहतं. अर्थात, त्यामुळे चित्रपटाचं महत्त्व कमी होतं अशातला भाग नाही. कारण, तो आपल्या नायकाची जी काही कथा रेखाटू पाहतो, तिला मर्यादित तरीही परिणामकारक अशा दृकश्राव्य रूपकांची साथ लाभते. याखेरीज समोर येणारी कधी पार्श्वभूमीवर चालणारी, तर इतर वेळी म्युजिक व्हिडिओचं स्वरूप लाभणारी गाणी खूप काही सांगू पाहतात. परिणामी चित्रपटात संगीत, भावना पुढाकार घेतात. सोबतीला दिसणारा ‘लार्जर दॅन लाइफ’ न भासणाऱ्या पात्रांचं रेखाटन कथानकाच्या मर्यादांवर मात करतं. त्यामुळे शेवटी ‘गली बॉय’ केवळ गलीपुरता मर्यादित राहत नाही, किंबहुना तो तसा राहूच शकत नाही. कारण एव्हाना आकाशाला ठेंगणं ठरवणाऱ्या त्याच्या स्वप्नांच्या पूर्तीचा त्याचा ‘टाइम’ आलेला असतो.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख