‘अलिटा : बॅटल एंजल’ : आवर्जून मोठ्या पडद्यावर पहावी अशी रॉड्रिग्जची ‘आयर्न सिटी’
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘अलिटा : बॅटल एंजल’चं पोस्टर
  • Tue , 12 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie अलिटा Alita रॉबर्ट रॉड्रिग्ज Robert Rodriguez

मिलरच्या त्याच नावाच्या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित असलेला आणि एरवी फ्रॅंक मिलरची ‘सिन सिटी’ म्हणून ओळखला जाणारा चित्रपट जितका मिलरचा आहे, तितकाच रॉबर्ट रॉड्रिग्ज या दिग्दर्शकाचाही आहे. आपल्या चित्रपटांचं दिग्दर्शन, संकलन, छायाचित्रण, संगीत आणि इतरही अनेक गोष्टी स्वतःच करणारा रॉड्रिग्ज हा चित्रपट या माध्यमाविषयीचं प्रेम व कौशल्य यांचा सर्वोत्तम नमुना आहे. यावेळी तो जेम्स कॅमेरॉन या बरेच महत्त्वाकांक्षी आणि महागडे प्रोजेक्ट्स समोर आणणाऱ्या लेखक-दिग्दर्शकाचं लेखन आणि निर्मिती असलेल्या ‘अलिटा : बॅटल एंजल’च्या निमित्तानं दिग्दर्शकीय जबाबदारी सांभाळतो आहे.

रॉड्रिग्ज हा प्रामुख्यानं त्याच्या अपारंपरिक स्वरूपाचं कथानक असणाऱ्या, निओ-न्वार आणि क्राइम-थ्रिलर प्रकारांवर भर देणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. अमेरिकन साहित्यातील पल्प फिक्शनमधून दृश्यरूपात आलेली गोअर, हिंसक चित्रपटांच्या प्रदर्शनावर भर देणारी ‘ग्राइंड हाऊस’ चित्रपटगृहं आणि यानिमित्तानं निर्माण झालेला याच नावाचा एक स्वतंत्र चित्रपटप्रकार यांचा त्याच्या चित्रपटांवर मोठा पगडा असतो. त्यामुळे ‘अलिटा’ कथानक आणि मांडणीच्या पातळीवर बऱ्याच पारंपरिक आणि त्याच्या एरवीच्या चित्रपटांहून अधिक व्यावसायिक ठरणारा आहे. अर्थात त्याच्या दृश्यमांडणीत, अॅक्शन असलेल्या दृश्यांत रॉड्रिग्जची नेहमीची शैली दिसून येतेच. ज्यामुळे हा केवळ व्यावसायिक आणि आर्थिक यशासाठी प्रेक्षकांच्या माथी मारण्यात येणाऱ्या चित्रपटमालिकांच्या रांगेत न बसता, कौशल्यपूर्ण लेखक-दिग्दर्शकांच्या एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिजनमधून साकारण्यात आल्याचं दिसून येतं.

काळ आहे २५६३ चा. ‘द फॉल’नामक एका भयावह युद्धानंतर पृथ्वी आणि मानवी जीवनानं आता एक प्रकारच्या डिस्टोपियन भविष्य असलेल्या वातावरणात पदार्पण केलेलं आहे. साय-फाय वातावरण आणि कायम हिंसेच्या सावटाखाली असणाऱ्या आयर्न सिटीमधील डॉ. डायसन इडो (क्रिस्टोफ वॉल्ट्झ) हा सायबॉर्ग सायंटिस्ट त्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. इडो नेहमीप्रमाणे शहराच्या जंकयार्डमध्ये जुन्या, टाकाऊ यंत्रांच्या शोधात असताना त्याला एका विलग केलेल्या स्त्री सायबॉर्गच्या धडाचे अवशेष सापडतात. ज्याचं पूर्ण शरीर जरी उपलब्ध नसलं तरी त्यातील मानवी मेंदू मात्र पूर्णतः कार्यरत असल्याचं इडोच्या लक्षात येतं. साहजिकच तो त्या सायबॉर्गला घरी घेऊन येतो आणि त्याची पुनर्निर्मिती करतो. खरं तर आपल्या मृत मुलीसाठी तयार केलेलं शरीर तो त्या मानवी मेंदूशी जोडतो. आणि त्याच्याच मुलीच्या नावावरून या स्त्री सायबॉर्गचं ‘अलिटा’ (रोजा सॅलाझार) असं नामकरण केलं जातं. सुरुवातीला तिला तिच्या भूतकाळातील काहीच नसतं. मात्र, इडोचा (बाऊंटी हंटरच्या धर्तीवरील) हंटर वॉरियर म्हणून नव्यानेच झालेला परिचय आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या एका अॅक्शन सीक्वेन्सच्या निमित्तानं तिला आपला भूतकाळ तुरळकपणे आठवू लागतो.

दरम्यान तिचा परिचय ह्युगो (कीअॅन जॉन्सन) या इडोच्या परिचयातील एका मेकॅनिक मुलाशी होतो. त्यांच्या छोटेखानी प्रेमकथेचे संकेत मिळत असताना ह्युगोच्या झालेम या स्काय सिटीवर जाण्याच्या आकांक्षा वाढत असतात. पुढे ह्युगोच्या निमित्तानं अलिटाचा मोटरबॉलशी परिचय होतो. मग आपला अस्पष्ट भूतकाळ आणि ह्युगोसोबतचं संभाव्य भविष्य या गोष्टी तिला मोटरबॉलची स्वप्नं पाहण्यास उद्युक्त करणाऱ्या ठरतात.

दुसरीकडे आपल्या मुलीच्या मृत्यूपश्चात त्याच्यापासून दूर गेलेली इडोची पूर्वाश्रमीची पत्नी, शिरेनसुद्धा (जेनिफर कॉनली) झालेमवर जाण्याच्या आकांक्षा बाळगून असते. ज्यासाठी ती मोटरबॉल नामक जीवघेण्या खेळाचा निर्माता आणि सर्वेसर्वा असलेल्या व्हेक्टरच्या (महर्शला अली) संपर्कात असते. व्हेक्टर हा झालेमचा शास्त्रज्ञ, नोव्हाच्या (एडवर्ड नॉर्टन) प्याद्यांपैकी एक असतो. ज्यामुळे एकमेकांना जोडणारे हे सगळे धागे एकत्र येऊन ‘अलिटा’चा भूतकाळ, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांशी जोडले जाऊ लागतात आणि चित्रपट पुढे वाटचाल करत राहतो.

आयर्न सिटी हे समाजातील दुय्यम, शोषितांचं शहर; तर झालेम म्हणजे उच्चवर्गीय, कनिष्ठांना निषिद्ध असलेलं शहर ही काही प्रमाणात फ्रिट्झ लँग या जर्मन चित्रपटनिर्मात्याच्या ‘मेट्रोपॉलिस’च्या धर्तीवर समाजातील वर्गभेद, शोषण या बाबींचे संदर्भ घेत ही रचना केल्याचं दिसून येतं. अर्थात यापलीकडील मूलभूत कथानकातील घटकही बरेच पारंपरिक स्वरूपातील आहेत, जे याआधी रिडली स्कॉट दिग्दर्शित ‘ब्लेड रनर’ (१९८२) ते स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ‘रेडी प्लेयर वन’पर्यंत (२०१८) दिसून आले आहेत असं म्हणता येईल. अर्थात या चित्रपटात आणि रेडी प्लेयर वनच्या दृश्य स्वरूपात साम्यस्थळं असली तरी दोन्ही चित्रपट साधारण एकाच काळात प्रसिद्ध झालेले असल्यानं अशी तुलना करणं उचित ठरणार नाही.

चित्रपटाची बरीच विस्तृत अशी कलाकारांची फौज त्याच्या परिणामात भर घालते. अर्थात, क्रिस्टोफ वॉल्ट्झ आणि महर्शला अली हे त्यांच्या भूमिकांना न्याय देत असले तरी ते काही प्रमाणात लिखाणातच प्रभाव पाडण्यात कमी पडतात. रोजा सॅलाझार ही प्रमुख भूमिकेतील अभिनेत्री प्रभावी कामगिरी करते. एडवर्ड नॉर्टनचं सदर चित्रपटातील पात्र विस्तृत नसल्याचं कारण म्हणजे मुळातच तो केवळ या चित्रपट मालिकेतील पुढील भागातील महत्त्वाच्या पात्रांपैकी एक ठरण्याचे संकेत देण्यासाठी येतो.

एकीकडे मार्व्हल आणि इतर स्टुडिओज थ्रीडीमध्ये चित्रण करणं जणू बंधनकारक आहे असा आव आणत, त्या प्रकाराला फारसं सर्व सामर्थ्यानिशी एक्सप्लोर न करताना दिसत असताना ‘अलिटा : बॅटल एंजल’सारखे प्रयत्न त्यांच्या थ्रीडीमधील चित्रणाबाबत कौतुकास्पद ठरतात. आणि त्यामुळेच तो मोठ्या पडद्यावर आवर्जून पहावा असा बनतो.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख