‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ : प्रेम आणि समलैंगिकतेकडे सामान्य दृष्टिकोनातून पाहणारा...
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चं पोस्टर
  • Sat , 02 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie एक लडकी को देखा तो ऐसा लगा Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga अनिल कपूर Anil Kapoor सोनम कपूर Sonam Kapoor राजकुमार राव Rajkummar Rao जुही चावला Juhi Chawla

शेली चोप्रा धर दिग्दर्शित ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा प्रेम आणि समलैंगिकता या दोन्ही बाबींच्या निमित्तानं समोरील विषयाला अधिक वैश्विक पातळीवर नेत, या टॅबू समजल्या जाणाऱ्या गोष्टीकडे अधिकाधिक सामान्य दृष्टिकोनातून पाहण्याविषयी बोलणारा आहे. त्याच्या विषयाला अधिक व्यावसायिक किंवा खरं तर प्रेक्षकांच्या दृष्टीनं अधिक सुलभ पद्धतीनं समोर मांडू पाहणारा आहे. वरवर पाहता तो काहीसा व्यावसायिक दृष्टिकोनातून बनवलेला वाटू शकतो, किंबहुना तो तसा आहेही. पण त्याच्या विषय मांडण्यामागच्या उद्देशाचाही विचार करायला हवा. त्यामुळे तो काहीसा क्लिशेड आहे, त्याचं लिखाण अपरिपक्व आहे, हे कितीही खरं असलं तरी त्याचा या विषयाकडे अधिक सामान्य नजरेतून पाहण्याविषयी सांगू पाहणारा दृष्टिकोन मात्र नक्कीच स्वागतार्ह आहे.

स्वीटी (सोनम कपूर) ही पंजाबमधील मोगा नामक गावातील उद्योगपती बलबीर चौधरीची (अनिल कपूर) मुलगी. सुरुवातीच्या काही दृश्यांत स्वीटीचा भाऊ, वीरजीच्या म्हणण्यातून असं दिसतं की, तिचं कुणा मुस्लिम मुलावर प्रेम आहे. जे मान्य नसल्यानं वीरजी (आणि घरातील इतरही लोक) तिच्या विरोधात आहेत. आपल्या प्रियकराला दिल्लीत भेटायला आलेल्या स्वीटीचा माग घेणाऱ्या वीरजीपासून पळ काढत असताना तिची भेट साहिल मिर्झा (राजकुमार राव) याच्याशी होते आणि त्याचा या चित्रात समावेश होतो. अर्थातच साहिल तिच्या प्रेमात पडतो.

साहिल हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिलाल मिर्झा यांचा मुलगा असला तरी स्वतःच्या बळावर काहीतरी करू पाहण्याच्या ध्यासामुळे सध्या त्यानं लिहिलेल्या एका नाटकाच्या प्रयोगांच्या तयारीत व्यस्त असतो. त्याच दरम्यान स्वीटीशी झालेल्या पहिल्या भेटीत त्याला तिनं केलेल्या टिप्पणीमुळे आपलं (प्रेमविषयक) लिखाण तितकंसं आकर्षक आणि खरं भासणारं नसल्याचा साक्षात्कार होतो. मग आता तिच्या गावी जाऊन, तिच्यावर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करून सदर विषयाचा थेट अनुभव घेण्याहून दुसरा उत्तम मार्ग तो काय असणार! परिणामी साहिल त्याच्या परिचयाच्या केटरर (आणि अभिनेत्री म्हणून संधीच्या शोधात असणाऱ्या) छत्रोसोबत (जुही चावला) मोगामध्ये येतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4637/Maza-Talamay-Jeevan---Zakir-Hussain

.............................................................................................................................................

एव्हाना पंजाबमधील स्थळं आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ शैलीतील ‘सरसो’ची शेतं अशा वातावरणात येऊन पोचलेली ही कथा बरीच अपेक्षित अशी वळणं घेत प्रवास करत असते. पारंपरिक विचारसरणीचं चौधरी कुटुंब (आता ‘डीडीएलजे’मधील अमरीश पुरीच्या कुटुंबाचं आडनावही चौधरी असणं हा निव्वळ योगायोग म्हणावा की, ही त्या चित्रपटाला दिलेली मानवंदना असेल?), साहिलचे खटाटोप आणि त्यानुषंगानं चित्रपटात येणारा विनोद या सगळ्या बाबी क्लिशेड पद्धतीनं समोर येत असतात. ज्यामुळे जवळपास तासाभरानं चित्रपट (आपल्याला अपेक्षित असलेला) ‘तो’ ट्विस्ट समोर आणतो. अर्थात हे काही मोठं रहस्यमय कथानक नसलं तरी या सगळ्या लांबलेल्या प्रकरणामुळे चित्रपट रेंगाळतो, इतकं मात्र नक्की.

इथून पुढे आधी उल्लेख केलेला समलैंगिक संबंध आणि त्यातही पुन्हा लेस्बियन संबंधांविषयीचं प्रकरण सुरू होतं. ‘एक लडकी को…’बाबत सर्वांत मोठी समस्या अशी की, तो फारच ढोबळ कथा तितक्याच ढोबळ मांडणीद्वारे समोर आणतो. म्हणजे यातील बलबीर चौधरी या पात्राकडे जरी पहायचं झालं तर हे पात्र आणि त्याच्या (विनोदी समजायच्या) दृश्यांचा उद्देश या दोन्ही बाबी फारच उथळ भासतात. आता या पात्राची दृश्यं आणि त्याची जडणघडण या गोष्टी नक्कीच या पात्राला अधिक व्यामिश्र बनवत असल्या तरी हे सगळं काही पडद्यावर समोर येताना मात्र अपरिपक्व आणि उथळ स्वरूप धारण करतं.

म्हणजे शेफ बनण्याचं स्वप्न पाहत मोठ्या झालेल्या आणि अगदी आजही पाककलेत प्रयोग करणाऱ्या बलबीरला त्याची आई किचनमध्ये पुरुषानं ढवळाढवळ करण्याचं काम नाही, असं वारंवार बजावताना दिसते. आता इथं काय सांगायचं आहे हे स्पष्ट आहे. मात्र हेच सारं पडद्यावर येताना जणू मांडणीत आवश्यक असलेली सूक्ष्मता वगैरे गोष्टी दिग्दर्शक-लेखकांच्या गावीच नसाव्यात.

पुढे उत्तरार्धात मध्यवर्ती भूमिकेतील साहिलच्या अनुषंगानं चित्रपटाची केली जाणारी मांडणीदेखील याच प्रकारात मोडते. इथं चित्रपटाचं स्पिरीट महत्त्वाचं आहे, हे कितीही खरं असलं तरी हे काही त्याच्या उणीवांकडे दुर्लक्ष करण्याचं कारण असू शकत नाही. सांगायचा मुद्दा हा, की चित्रपटाच्या उत्तरार्धात त्यातील लेखनाच्या पातळीवरील उणीवा अधिकच ठळकपणे दिसू लागतात.

चित्रपटाची एकूणच कास्ट ही रंजक आणि परिणामकारक प्रकारात मोडणारी असली तरी हा परिणाम त्या त्या कलाकारानुसार बदलत जातो. सोनम कपूर ही अपवाद वगळता इतर दृश्यांत साधारण दर्जाची कामगिरी करते, तर राजकुमार रावदेखील मुळातच कागदावरच फारशा प्रभावी नसलेल्या बाबी पडद्यावर आणू पाहतो. याउलट अनिल कपूर एकूण चित्रपटात वेगळा उठून दिसतो. ज्यामुळे हा चित्रपट आणि हे पात्र एकाच वेळी पारंपरिक आणि अपारंपरिक गोष्टी करताना दिसून येतात. जुही चावलाची भूमिका विस्तृत आणि बराच स्क्रीन-टाइम असलेली असली तरी लिखाणाच्या दृष्टिकोनातून तिचं पात्र फारसं वेगळं ठरू पाहत नाही.

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ शेवटी याहून अधिक चांगला होऊ शकला असता अशी भावना निर्माण करतो. अर्थात अशा वेळी त्याचं याहून चांगलं ठरणं हा मुळातच चित्रपटाच्या निर्मात्यांचा उद्देश असायला हवा. कारण इथं तरी त्याच्या निर्मात्यांचा उद्देश समलैंगिक संबंधांकडे मानवी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित करण्याचा आहे, आणि हे करताना तो क्लिशेड बॉलिवुडी वाटा चोखाळत असेल तर त्यात विशेष ते काय? कारण असं करताना त्याचा (संभाव्य) प्रेक्षक पारंपरिक भारतीय, त्यातही पुन्हा हिंदी प्रेमकथा पाहत वाढलेला असल्यानं त्या प्रेक्षकापुढे त्याच भाषेत एक टॅबू मुद्दा मांडता येईल हे तो पाहतो आहे.

खासकरून भारतात गेल्याच वर्षी समलैंगिक संबंधांना मान्यता मिळाल्याचं पाहता तर हा प्रयत्न नक्कीच स्वागतार्ह प्रकारात मोडतो. तूर्तास त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक करत, भविष्यात याहून अधिक चांगल्या रीतीनं लिहिलेले आणि बोल्ड भूमिका घेणारे चित्रपट पहायला मिळण्याची अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......