‘मणिकर्णिका’ : हा कंगनाचा ‘वन वुमन शो’ वेळोवेळी उणीवांकडे दुर्लक्ष करता प्रभावी ठरतो!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘मणिकर्णिका’चं पोस्टर
  • Sat , 26 January 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मणिकर्णिका Manikarnika कंगणा राणावत Kangana Ranaut

‘मणिकर्णिका’च्या पूर्वार्धाच्या शेवटी एका घटनेनंतर कंगना राणावतचं पात्र राजवाड्यातील व्हरांड्यात आक्रोश करत धावत असतं, तर इतर पात्रं तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी ती जितकी लाऊड आणि कुणाचंही न ऐकणारी झालेली असते, तसंच काहीसं हा सिनेमा आणि यातील तिचा सहभाग याबाबत झालं आहे. ती एक चांगली अभिनेत्री आहे यात शंका नाही. मात्र इथं तिच्यातील मिस. परफेक्शनिस्ट तिच्यातील अभिनेत्रीला झाकोळून टाकते. कारण या सिनेमाचा (पूर्वाश्रमीचा) दिग्दर्शक राजा कृष्ण जागरलामुदी उर्फ क्रिशसोबत झालेले वाद-मतभेद आणि त्याच्या कामात केलेला हस्तक्षेप, यामुळे त्यानं हा प्रकल्प अर्ध्यात सोडल्यानं ती दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसते. त्यामुळे दिग्दर्शन ते अभिनय आणि इतरही बाबींवर तिचंच नियंत्रण असल्यानं चित्रपटाचा कथा सांगण्याचा उद्देश मागे पडतो. त्याऐवजी एक ‘लार्जर दॅन लाईफ’ व्यक्तिरेखा रेखाटली जाते किंवा किमान तसा प्रयत्न तरी होतो. अर्थात शेवटी हा प्रयत्न बराच चांगला म्हणता यावा असा असला तरी त्यामुळे व्यक्तिरेखेत फारशी न शोभणारी मुख्य अभिनेत्री ते चित्रपटाची सदोष पटकथा, या उणीवा तशाच राहतात.

राणी लक्ष्मीबाईची (कंगना राणावत) कथा बहुतेकांच्या परिचयाची असावी. १८५७ च्या उठावात सहभागी इतर क्रांतिकारकांपासून प्रेरणा घेत आपला स्वाभिमान आणि झाशीप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम यामुळे राणी लक्ष्मीबाईनं १८५८ मध्ये इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता, ज्या लढाईदरम्यान ती रणांगणावर धारातीर्थी पडली. ‘मणिकर्णिका’ साधारण हीच कथा सांगतो. चित्रपटाची मूळ कथा मणिकर्णिकाच्या उर्फ मनूच्या जन्मापासून, तिचा विवाह झाशीचा राजा गंगाधर रावशी होण्याच्या काही काळ आधी गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या वाघाला पकडण्याच्या तिच्या कामगिरीपासून सुरुवात होते.

एक गोष्ट स्पष्ट आहे की, शूर, सौंदर्यवान आणि स्वाभिमानी मणिकर्णिका एक प्रखर स्त्रीवादी आणि सोबतच राष्ट्रप्रेमी व्यक्तिरेखा म्हणून आदर्श मानावी अशी आहे. अगदी चित्रपटही तिच्यातील हे सर्व गुण ठळकपणे अधोरेखित करतोच. परिणामी आपल्याला बऱ्याचशा पातळीवर एक नो-नॉनसेन्स नायिका पहायला मिळते.

गंगाधरचा भाऊ सदाशिवला (मोहम्मद झीशान अयुब) झाशीच्या गादीवर बसता न आल्यानं त्याचं इंग्रजांशी हातमिळवणी करत सुरू असलेले राजकीय डावपेच आणि ईस्ट इंडिया कंपनी-ब्रिटिश सरकारच्या संभाव्य, तसंच प्रत्यक्ष कारवाया अशा अनेक पातळ्यांवर लक्ष्मीबाईचा लढा सुरू असतो. ही सगळी पात्रं आणि घटना मूलभूत कथेच्या स्वरूपात जरी प्रभावी वाटत असल्या तरी मूळ चित्रपटात मात्र अविकसित पात्रं आणि एकसंधतेचा अभाव असल्यानं हा परिणाम दिसत नाही. चित्रपटाची मांडणी, सादरीकरण यांवर संजय लीला भन्साळी-एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटांचा ठळक प्रभाव दिसून येतो. ज्याचं एक कारण बाहुबलीचा सहलेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसादची पटकथा हे असू शकतं. मात्र, तांत्रिक बाबींमधील सफाईदारपणा आणि उपरोक्त दिग्दर्शकांच्या चित्रपटातील कलाकारांप्रमाणे प्रभावी अभिनय यांचा इथं काहीसा अभाव असल्यानं या बाबी चित्रपटाच्या एकूण परिणामावर फरक पाडतात. पटकथेत बरीच दृश्यं कुठल्याही संदर्भ आणि ठोस कारणांशिवाय समोर येतात आणि संपतात. ज्यामुळे लेखनातील उणीवा अगदीच ठळकपणे जाणवतात. याखेरीज सदर चित्रपट भलताच लांबलेला आहे.

प्रसून जोशीचे संवाद जेव्हा यमक जुळवण्याच्या कामात व्यस्त नसतील तेव्हा अपेक्षित ती कामगिरी करतात. त्याच्या संवादांतून आक्रमक, पण पात्राच्या विश्वात फारसा न खटकणारा राष्ट्रवाद डोकावतो, तर शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत अपेक्षित तो परिणाम साधतं.

कंगनाचा आवाज आणि पडद्यावरील एकूणच वावर या गोष्टी समोरच्या कथानकाला पूरक ठरत नाहीत. परिणामी ती काही वेळा परिणामकारक वाटते, तर काही वेळा लाऊड ठरते. जिशु सेनगुप्ता, अतुल कुलकर्णी, डॅनी डेन्झोन्गपा, कुलभूषण खरबंदा, मोहम्मद झीशान अयुब अशी सहाय्यक मंडळी असली तरी त्यांना तसा फारसा वाव नाहीच. आणि तो असावाही का? कारण कथानक ते पडद्यामागील कामगिरी पाहता हा कंगनाचा ‘वन वुमन शो’ आहे. जो वेळोवेळी उणीवांकडे दुर्लक्ष करता प्रभावी ठरतो. अंकिता लोखंडेचं पात्र आणि त्याचं महत्त्व पटकथेत फारसं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्या पात्राचं आणि पात्राशी संबंधित दृश्यांचं प्रयोजन कल्पनेच्या पलीकडील आहे. शिवाय, अंकिताचा अभिनय फारच उथळ आणि लाऊड स्वरूपाचा आहे, जे या दृश्यांना अधिकच अप्रभावी बनवतं.

एकूणच ‘मणिकर्णिका’ हा त्यात एकसंध पटकथा, निर्णयाचं एकच केंद्र, उच्च निर्मितीमूल्यं या गोष्टींची कमतरता असल्यानं बऱ्याचशा उणीवा असलेला तरीही काही प्रमाणात परिणामकारक ठरणारा सिनेमा आहे. अर्थात अलीकडे भन्साळी-राजामौलीचे चित्रपट पाहायला रुळलेल्या प्रेक्षकांना तो कसा वाटेल, हे व्यक्तिसापेक्ष बदलत जाईल.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख