मरुत्ताची कथा
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • बृहस्पती यांचं एक चित्र
  • Sat , 19 January 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली मरुत्त बृहस्पती संवर्त

सत्ययुगात शक्तीशाली, धर्मनिष्ठ व शत्रुंजय असा विवस्त मनु नामक सम्राट होऊन गेला. त्याच्याच वंशात मरुत्त नामक चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या पित्याचे नाव अविक्षित असून पराक्रमांत तो इंद्र-वरुण यांची बरोबरी करणारा होता. मरुत्त तर पित्यापेक्षा वरचढ असून त्याच्या ठायी दहा हजार हत्तींचे बळ होते. मरुत्त नेहमी यज्ञयाग करून याचन व ऋत्विज यांना समाधानी ठेवत असे. त्याने यज्ञकर्मासाठी हजारो सुवर्ण पात्रे व आसने बावनकशी सुवर्णापासून बनवली असल्याने यज्ञ मंडप पितवर्णाने नुसता झळाळत असे. हिमालयाच्या उत्तर भागात मेरु नामक पर्वत होता. तिथेच त्याची यज्ञशाला होती. हे सर्व सुवर्णवैभव या राजाला कसे प्राप्त झाले याचा इतिहास मनोरंजक आहे.

प्रजापती दक्षाला देव व असुर ही संतती झाली. त्यांच्यात नित्य कलह होऊन स्पर्धा चालत. अंगिरा मुनींना बृहस्पती व संवर्त असे दोन पुत्र होते. दोघेही धर्मप्रिय व प्रगल्भ बुद्धीचे होते. पण त्या दोन भावातही वितुष्ट होते. बृहस्पती थोरला असल्याने संवर्ताला कायम छळत असे. त्या त्रासाला कंटाळून संवर्त ऐश्वर्याचा त्याग करून दिगंबर होऊन वनवासी झाला.

इंद्राने असुरांवर विजय मिळवल्यानंतर बृहस्पतीला देवांचे गुरू होण्याचा मान मिळाला. त्यापूर्वी मरुत्ताचा पितामह करंधम याचा तो गुरू होता. करंधम इतका धार्मिक व सत्वशील होता की, त्याच्या मुखावाटे निघणार्‍या उच्छ्वासातून त्याच्या इच्छेनुसार हव्या त्या वस्तू त्याला प्राप्त होत असत. उदा. सैनिक, शस्त्रे, वाहने वगैरे. मरुत्तही आपला पिता-पितामहाप्रमाणे धर्मप्रिय व लोकप्रिय होता. मरुत्ताच्या कीर्तीची चढती कमान पाहून इंद्र त्याला सतत पाण्यांत पाहात असे. त्याच्या यज्ञकार्यात विघ्ने आणत असे. बृहस्पतीला अनेक प्रलोभने दाखवून इंद्राने त्याला आपल्या पक्षात ओढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण बृहस्पती बधला नाही. इंद्र बृहस्पतीला म्हणाला, ‘‘मी तिन्ही लोकांचा व देवांचा स्वामी आहे. तो मरुत्त पृथ्वीपती असला तरी क्षुद्र मानव आहे. त्याला काय घाबरतोस? त्याचे यज्ञकर्म व श्राद्धकर्म न करता तू माझा पुरोहित हो. दोघांकडे तुला काम करता येणार नाही. मला तरी सोड किंवा त्याचा त्याग कर.’’

इंद्राचे निर्वाणीचे बोलणे ऐकून बृहस्पतीने मरुत्ताला निरोप दिला आणि इंद्राचे पौराहित्य स्वीकारले. मरुत्ताला तो टाळू लागला. मरुत्त कळून चुकला की, यापुढे बृहस्पती आपला पुरोहित नाही. कालांतराने मरुत्ताने एक यज्ञ करायचे ठरवले. शेवटचा प्रयत्न म्हणून बृहस्पतीला पाचारण केले. तेव्हा बृहस्पती म्हणाला, ‘‘मी आता देवांचेच यज्ञयाग करीन. यकिंचित मानव माझा यजमान होऊ शकत नाही. अमरत्व प्राप्त झालेल्या देवांचे कार्य करण्यात मला रस आहे. मर्त्य मानवासाठी मी श्रम घेणार नाही. राजा तू दुसरा पुरोहित शोध. मला आता पुन्हा बोलावू नकोस.’’

मरुत्ताला फार वाईट वाटले. त्याने जेव्हा पहिला यज्ञ केला तो बृहस्पतीच्या पौराहित्याखाली. राजा खिन्न होऊन परतत असता वैकुंठाहून नारद मुनी येताना भेटले. ते भगवान विष्णूंना भेटायला गेले होते. मुनींनी त्याला खिन्न होण्याचे कारण विचारले. मरुत्ताने आपली अडचण कथन केली. बृहस्पतीने त्याग केल्याने राजा निराश झाल्याचे मुनींनी ओळखले. त्याला ते दोन धीराच्या गोष्टी सांगून म्हणाले, ‘‘राजा, यांत खचून जाण्यासारखे काही नाही. बृहस्पती नसला तर त्याचा धाकटा बंधू संवर्त कांकणभर सरस व तेजस्वी आहे. त्याला पाचारण करून कार्य सिद्धीस ने.’’

त्यावर संवर्त कुठे सापडेल? कारण तो एका ठिकाणी स्थिर नसतो. सप्तपुर्‍यांमध्ये सतत भ्रमंती करत असतो. असे राजाने विचारल्यावर मुनी म्हणाले, ‘‘यावेळेस संवर्त वाराणसी नगरीत भगवान रुद्राच्या दर्शनासाठी व्याकूळ होऊन भटकत आहे. तू असे कर. नगरीच्या वेशीवर एक प्रेत नेऊन ठेव. प्रेत पाहून जो मनुष्य त्वरित मागे जाईल तोच संवर्त असे नक्की समज. त्याच्या मागे मागे जा. एकांत स्थळी त्याला शरण जा. त्याला तुझा उद्देश सांग. तो विचारेल की, माझा ठिकाणी तुला कोणी सांगितला तर माझे नाव सांग. आणि त्याने मला भेटायचे ठरवले तर मी अग्नीमध्ये प्रवेश केल्याचे (खोटेच) सांग. बरं मी निघतो. यशस्वी भव. नारायण नारायण...!’’ असे म्हणून नारद त्रिभुवनाच्या प्रवासाला निघाले.

मरुत्त लगेच काशीनगरीत आला. स्मशानातून एक बेवारशी प्रेत वेशीवर ठेवून तो संवर्ताची वाट पाहू लागला. खूप समयानंतर संपूर्ण नग्न अशी एक व्यक्ती वेशीजवळ येऊन प्रेत पाहून गर्रकन मागे वळली. खूण पटली व मरुत्त त्याच्या मागे मागे पळू लागला. कारण संवर्ताचे चालणे पळण्यासारखे होते. एक मनुष्य आपला पाठलाग करतो आहे असे संवर्ताला कळताच तो मागे वळला. त्याने राजावर धूळ, चिखल व माती फेकली. पाण्याचा चुळा टाकल्या. थुंकलासुद्धा पण राजाने माघार न घेता त्याचा पाठपुरावा केला. अखेर संवर्तानेच माघार घेतली. थकून तो एका वटवृक्षाखाली बसला. त्याने राजाला इथे येण्याचे कारण विचारून कुणाच्या सांगण्यावरून इथे आलास असे विचारले. त्याच्या प्रश्‍नांची उत्तरे राजाने दिली व हेतूही सांगितला.

संवर्त शांत होऊन म्हणाला, ‘‘राजा, माझा हा अमंगल अवतार तू बघतोसच. मी मनाला येईल तसे वेडेवाकडे वागतो. कित्येक दिवस मी स्नान करीत नाही. माझे रूप-वर्तन दोन्ही विकृत आहेत, तरीही तू माझा स्वीकार कशासाठी करतोस? माझा ज्येष्ठ बंधू बृहस्पती यज्ञयाग करण्यात तत्पर आहे. सध्या त्याने देवांचे कार्य करायचे ठरवले आहे. माझ्या मालकीचे फक्त माझे शरीर आहे. तू बृहस्पतीलाच विचार की संवर्ताने यज्ञ केला तर तुझी हरकत नाही ना? त्याने आज्ञा दिली तरच मी तुझ्याकडे येईन. अन्यथा माझा नाद सोड?’’

मरुत्ताने संवर्ताच्या सर्व शंकांचे निरसन करून म्हटले, ‘‘बृहस्पतीने मला अन्य कुठल्याही पुरोहिताची निवड करण्याची अनुमती दिली आहे. तेव्हा आपल्याशिवाय दुसरा कोणी माझ्या माहितीत नाही. आपण माझे योगकर्म पार पाडू शकाल. आपणही तितकेच समर्थ आहात. हे इंद्रादी देवांना कळू दे. आता नकार देऊन मला नाउमेद करू नका.’’

अखेर संवर्त तयार झाला. तो म्हणाला, ‘‘एक लक्षात ठेव राजन, यज्ञप्रसंगी देवांशी सामना झालाच तर माझे समर्थन तू कर. नाहीतर मी तुझे भस्म करीन. जर प्रसन्न झालो तर मी तुला श्रेष्ठोत्तम अशा धनप्राप्तीचा उपाय सांगेन. ती धनराशी पाहून देवांचे नेत्र विस्फारतील. त्या कनकलक्ष्मीचे निवासस्थान कुठे आहे ते सांगतो. ऐक.’’

संवर्त पुढे सांगू लागला. ‘‘राजा, हिमालयावर मुंजवान नामक गिरी आहे. तिथे साक्षात उमा-महेशाचे वास्तव्य आहे. भूतगण-पार्षदादीक यांनी वेढलेला तो आदिईश्वर पत्नी पार्वतीसह सुखासमाधानाने कालक्रमणा करत आहे. अप्सरा, यक्ष, विद्याधर, नाग ईश्वराच्या कृपादृष्टीचा प्रसाद घेण्यासाठी सतत ये-जा करत असातत. वृद्धत्व-भूक-तहान, थकवा न येणार्‍या प्रदेशांत नावालाही भय नाही. या पर्वताच्या चारी बाजूनी बावनकशी सुवर्णाच्या समृद्ध खाणी आहेत. पिप्पीलीका व जांबुनद सुवर्णाने युक्त असलेल्या या खाणी पिवळ्या रंगाने लखलख करत असतात. त्या गिरीवर जाऊन तू रुद्र व भवानीची स्तुतीसुमनांनी व आराधना करून पूजा कर. त्यांना  शरण जा. नंतर ती कनकलक्ष्मी तुला प्राप्त होईल. सेवक, उंट, हत्ती, खेचर, रथ, मेणे, पालख्या यावरून तू ते सुवर्ण राज्यांत आण.’’

मरुत्त संवर्ताकडून हे सर्व ऐकतानाच मंत्रमुग्ध झाला. सुवर्णलक्ष्मीच्या पदकमलातील पैंजणाचा मंजुळ ध्वनी त्याला ऐकू येऊ लागला. तिची सालंकृत सोज्वळ मूर्ती त्याच्या मनःचक्षुपुढे उभी ठाकली. त्याने विनम्र होऊन तिची चरणधूळ मस्तकी लावली. संवर्ताला प्रणाम करुन मरुत्त राजधानीत परतला. नंतर त्याने मुंजवान पर्वतावरची जाऊन शिव-शक्तीला प्रसन्न केले. सुवर्ण राजधानीत आणण्यासाठी बैल, उंट, खेचर, सैनिक नेले. त्यांच्या गर्दीने पर्वत गजबजून गेला. राजाने शिल्पकार व कारागीर बरोबर नेले होते. त्यांनी अगणित मूर्ती व पात्रे तिथेच वास्तव्य करून घडवली. पशुंच्या पाठीवर लादून सर्व सोने राज्यांत आणले. ही वार्ता देवलोकांत इंद्र व बृहस्पती यांच्या कानांवर गेली. त्या अप्रिय वार्तेने दोघे विषण्ण झाले. त्यांनी राजा व संवर्त यशस्वी होऊ नये म्हणून आपापसात विचारविनिमय केला. उपायांची देवाणघेवाण झाली. पण संवर्ताबरोबर उघड सामना करायचे धारिष्ट्य ना इंद्रामध्ये होते ना बृहस्पतीत. अखेर दोघांना बद्ध करावे असे ठरून अग्नीनारायणाला पाचारण केले. आपले दाहक नेत्रदीपक स्वरूप झळकवीत तो इंद्राकडे आला. ठरल्याप्रमाणे संदेश देऊन इंद्राने त्याला मरुत्ताला बद्ध करण्यास पाठवले. संदेश असा की मरुत्ताने संवर्ताला हाकलून द्यावे आणि बृहस्पतीच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करावा. बदल्यात अमरत्व मिळेल, नपेक्षा तुला शासन भोगावे लागेल.

इंद्राचे आज्ञापालन व बृहस्पतीचा सन्मान करण्यासाठी अग्नी धुराची ध्वजा घेऊन मार्गातील सृष्टी दग्ध करीत मरुत्ताकडे निघाला. यज्ञमंडपांत यज्ञासाठी जोरात तयारी चालली होती. राजाने अग्नीचे स्वागत करून त्याला आसन, पाद्य व अर्ध्य दिले. इंद्रादी देवांचे कुशल विचारले. थोडा इकडचा तिकडचा वार्तालाप झाल्यावर अग्नीने इंद्राचा संदेश सांगितला. राजाने संवर्ताचा त्याग करायला स्पष्ट नकार दिला, कारण त्याला धरसोड वृत्ती आवडत नव्हती. अग्नीने त्याला दिव्य लोकाची व अमृताची लालूच दाखवली, पण मरुत्त आपल्या निश्चयावर ठाम राहिला. अग्नी तरीही लोचटासारखा उभा राहिलेला पाहून संवर्त क्रोधाने पुढे झाला व ‘‘थांब. तुझेच भस्म करतो’’ असे म्हटल्याबरोबर अग्नी महाशय येताना ज्या वेगाने आला होता, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने जीव मुठीत घेऊन इंद्र घरी आला.

तिथे काय घडले ते सांगून पुन्हा जाऊन प्रयत्न करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. इंद्राने त्याला चुचकारले. फटकारले तरीही अग्नीने ‘‘जाणार नाही काय करायचे ते करा.’’ असे इंद्राला धुडकावून लावले. अग्नीने ‘‘माझ्या जीवाला धोका आहे’’ असे सांगितल्यावर इंद्राला हसू आले. त्याने अग्नीला दूषणे देऊन त्याची निर्भत्सना केली. अग्नीनेही इंद्राचा मुलाहिजा न ठेवता बर्‍याच प्रसंगात इंद्राची कशी फजिती झाली याची आठवण करून दिली.

वृत्रासुर-त्रिशीर प्रकरणी इंद्राने स्वतःला कसे लपवले; च्यवनमुनींनी त्याचा वज्रधारी हात कसा स्तंभित केला होता व गौतमपत्नी प्रकरणी गौतमांनी इंद्राचे शरीर कसे सडवले होते हे सांगून इंद्राला गप्प केले. यापूर्वी घडलेल्या गोष्टी ऐकून इंद्र मनात खजील झाला. वरवर सर्व हसण्यावारी नेऊन इंद्राने अग्नीला जरा रागातच निरोप दिला.

इंद्राने नंतर गंधर्वराज धृतराष्ट्र याला मरुत्ताकडे पाठवण्याचे ठरवले. अग्नी गेला अन् गंधर्व आला याने काय फरक पडणार होता. पण हा विषय तडीस नेण्याचे इंद्राने व गुरूने ठरवले होते. इंद्राने स्मरण करताच धृतराष्ट्र हजर झाला. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणार्‍या गंधर्वाने स्वतःच स्वतःवर आत्मस्तुतीसुमनांचा वर्षाव केला व मला कुणाच्या संरक्षणाची गरज नाही असे म्हणून एकटाच मरुत्ताकडे गेला.

मरुत्ताला गंधर्वाने इंद्राचा संदेश थोड्या चढ्या आवाजात ऐकवला. इंद्राच्या वज्र नामक अस्त्राचे भय व अमृताची लालूचही दाखवली, पण संवर्त व मरुत्त जराही विचलित झाले नाहीत. संवर्त असताना तर राजाला कळीकाळाचेही भय नव्हते. संवर्ताने इंद्रावरच स्तंभिनी विद्येचा प्रयोग केला. अस्मानी संकटापासून राजाचे संरक्षण करण्याचे वचन संवर्ताने दिले होते. मरुत्ताने यज्ञातील भाग स्वतः इंद्राने येऊन घेऊन जावा अशी इच्छा प्रगट केली. देवांना तर सोमरसपानाची इच्छाच होती. संवर्ताने प्रभावी मंत्रशक्ती स्वर्गाच्या दिशेने टाकल्याबरोबर सर्व देव इंद्रासह यज्ञस्थळी खेचले गेले. मरुत्ताने वैरभाव विसरून त्यांची अग्रपूजा केली. सोमरस दिला. इंद्रानेही जास्त ताणून न धरता मरुत्ताला आशीर्वाद दिला. सर्व देवांना भवन, सभा, रंगालयनिर्मिती करण्याची विनंती केली. अग्नीदेवाला लालवर्णाच्या वस्तू, ब्राह्मणांना निलवर्णीय वृषभ व विश्वेदेवांना विविध रंगी वस्तू दान केल्या. नंतर सर्व देवांनी मरुत्ताच्या यज्ञ पूर्ण करण्यास हातभार लावला. सर्वांना आहेर-नजराणे दिले-घेतले. मरुत्ताने ब्राह्मण व याचक यांना तृप्त होईपर्यंत सुवर्ण दिले. देऊन उरलेले कोषागारांत ठेवले. संवर्ताला निरोप घेऊन राजा समाधानाने राजधानीत परतला. हेच सुवर्ण जे उरले होते ते घेऊन पुढे पांडवांनी आपला अश्वमेध पूर्ण केला.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 20 January 2019

छान बोधकथा आहे. काय साले पराक्रमी राजे लोकं होते त्यावेळेस. हल्ली नुसती बुजगावणी!! -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......