अजूनकाही
देशांतर्गत सोशिओ-पॉलिटिकल संदर्भ, एकूणच राष्ट्रीय पातळीवरील गढूळ वातावरण या गोष्टी पुढेही ‘पिफ’मधील चित्रपटांत दिसून येतात.
‘क्रॉस माय हार्ट’
लुक पिकार्ड दिग्दर्शित ‘क्रॉस माय हार्ट’मध्ये १९७० च्या वेळच्या माँटरीलमधील राजकीय अस्थैर्य, शहरात लष्कराच्या छावण्या लावण्यापर्यंत टोकाला गेलेले राष्ट्रीय पातळीवरील तणावाचे वातावरण अशा पार्श्वभूमीवरील कॅनडाच्या एकूणच सामान्य नागरिकांच्या जीवनावर पडत असलेला परिणाम दिसून येतो. ज्यात मॅनन आणि मिमी या दोन बहीण भावांचं कुटुंब विभागलं जाण्याच्या मार्गावर असतं. आजारी असलेले वडील आणि आर्थिक अस्थैर्य असल्यानं हतबल असलेली आई या दोघांनाही वेगवेगळ्या कुटुंबांत संगोपनासाठी दत्तक देण्याच्या विचारात असते. या गोष्टीची माहिती मिळाल्यानं मॅनन तिच्या दोन चुलत भावंडांच्या, मार्टिन आणि डेनिसच्या, मदतीने एका वृद्ध महिलेचं अपहरण करून आपल्या भविष्याशी निगडित निर्णय स्वतः घेण्याची मागणी करण्याची योजना आखते.
साम्यवादी विचारसरणीच्या लोकांच्या पूर्णतः विरोधात असलेले सत्ताधारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा मॅननच्या योजनेच्या मुळाशी असतो. ‘दे अॅक्ट लाईक वुई डोन्ट हॅव्ह ओपिनियन्स’ असं म्हणत प्रौढ लोकांच्या बेजबाबदार वाटणाऱ्या कृतींकडे या चौघांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. ओपनिंग फिल्म ‘डॅम किड्स’प्रमाणे यातही वर उल्लेखलेली राजकीय-सामाजिक परिस्थिती, सोबतीला हजरजबाबी अशा पात्रांचे विनोदी संवाद आणि चतुराईनं लिहिलेली दृश्यं दिसून येतात. याखेरीज मध्यवर्ती पात्रांमधील भावनिक नातं उत्तमरीत्या निर्माण केलं जातं. ज्यामुळे या सर्व बाबींचा एकत्र परिणाम चित्रपटाच्या उत्तम असण्याच्या रूपात दिसून येतो.
‘द मॅन विद द मॅजिक बॉक्स’
बोडो कॉक्स दिग्दर्शित अतिशय सुंदर चित्रपट ‘द मॅन विद द मॅजिक बॉक्स’देखील १९५२ आणि २०३० अशा दोन कालखंडांच्या निमित्तानं स्टॅलिन सत्तेत असतानाच्या आणि नंतर सातेक दशकांनंतरच्या, अनेक सामाजिक-आर्थिक बदल घडलेल्या अशा पार्श्वभूमींच्या माध्यमातून एक वेगळंच विश्व उभं करतो. २०३० सालातील वॉरसॉ शहराजवळ अॅडम कुणा गुप्तसंस्थेच्या माध्यमातून एका ऑफिसमध्ये सफाई कामगाराची नोकरी करू लागतो. संस्थेकडून काही काळ मोफत राहण्याची व्यवस्था असलेल्या घरात पन्नासच्या दशकातील संगीत ऐकत बसणारा रोमँटिक प्रवृत्तीचा अॅडम ऑफिसमधील उच्चपदस्थ अधिकारी, गोरियाच्या प्रेमात पडतो. सुरुवातीला त्याच्या भावनांची कदर न करणारी, नंतर आपण या सगळ्या युद्धासम अस्थैर्य असलेल्या वातावरणात केवळ शारीरिक संबंध ठेवायला हवेत असं मत व्यक्त करते. ज्यावर सहमत असलेल्या अॅडमला त्याच्या घरातील ‘मॅजिक बॉक्स’ म्हटलेल्या रेडिओच्या रूपात मात्र काहीतरी अचाट शोध लागल्याची जाणीव होते, आणि इथूनच या काहीशा पारंपरिक वाटणाऱ्या प्रेमकथेचा अपारंपरिक स्वरूपाचा प्रवास सुरू होतो.
‘द मॅन विद द मॅजिक बॉक्स’
‘मेन इन ब्लॅक’ आणि इतरही चित्रपटांचा कधी उल्लेख करत तर कधी उल्लेख न करताही त्यांच्याशी समान चित्रण आणि संकल्पनांचा आधार घेत ‘द मॅन विद द मॅजिक बॉक्स’चा सायन्स-फिक्शन प्रकारातील प्रवास घडत असतो. बोडो कॉक्सच्या पटकथेत ‘फाइट क्लब’मधील दृश्यं ते ‘बीइंग जॉन माल्कोविच’सारख्या संकल्पना दिसतात. मात्र त्यांना केवळ उचलेगिरीचं स्वरूप न लाभता कधी ट्रिब्यूट, ते कधी आधी अनेकविध चित्रपटांतून दिसणाऱ्या बाबींचा केलेला कल्पनाविस्तार असं स्वरूप प्राप्त होतं. ज्याला नितांतसुंदर छायाचित्रण आणि तितकंच सुंदर आणि पूरक पार्श्वसंगीत यांची साथ लाभते. याखेरीज उत्तम कलादिग्दर्शनाच्या निमित्ताने चित्रपटाचं विश्व उभं केलं जातं. सदर चित्रपट म्हणजे नेटफ्लिक्सच्या ‘ब्लॅक मिरर’ मालिकेतील प्रकरण वाटावं इतका जमून आलेला सुरेख दृश्यानुभव आहे, तो चुकूनही चुकवू नये असाच आहे.
‘शॉपलिफ्टर्स’
यात एका कुटुंबाची अगदीच सुंदर अशी कथा अनुभवायला मिळते. चित्रपटातील मध्यवर्ती पात्रांमधील भावनिक नातं, त्यांच्या कृती नकळत प्रेक्षकाला त्यांच्या कथेत गुंतवून ठेवत भावनिक आवाहन करण्याचं काम करते.
बाकी ‘पाम डि’ऑर’ जिंकणारा हा चित्रपट आवर्जून पहावा असा आहे, हे वेगळं सांगण्याची गरज भासणार नाही.
‘दिठी’
सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’देखील आपल्या बऱ्याच मोठ्या कास्टच्या माध्यमातून एका छोटेखानी कथेला सुंदर पद्धतीनं पडद्यावर उभं करत, प्रत्येक घटनेकडे एखाद्या विशिष्ट मर्यादांच्या, वैचारिक चौकटींच्या पल्याड जाऊन पाहण्याची गरज अधोरेखित करीत एका मूलभूत प्रश्नाचं तत्त्वचिंतनात्मक रूपात चित्रण करतो. परिणामी त्याची व्यावसायिक अंगातून पाहता प्रदर्शित न होण्याची किंवा झाल्यासच अगदीच मर्यादित स्वरूपात रिलीज होण्याची शक्यता पाहता, तो पाहण्याची संधी मिळाल्यास चुकवू नये असा बनतो.
याखेरीज इंडियन सिनेमा विभागातील आणखी एक चित्रपट, ‘राखोश’चा त्याच्या उणीवांखेरीज महत्त्वाच्या ठरणाऱ्या संकल्पनेमुळे उल्लेख करावासा वाटतो. नारायण धारपांच्या ‘पेशंट नं. ३०२’ नामक एका कथेवर आधारित ‘राखोश’ मूलभूत संकल्पनेला बंगाली पार्श्वभूमीवर उभं करतो. याशिवाय, ‘पीओव्ही’ पद्धतीनं, म्हणजे -चित्रपटातील बिरसा या पात्राला सगळं काही कसं दिसतं आणि तो कशाकशाचा साक्षीदार बनतो - यादृष्टीने चित्रित केलेला हा भारतातील पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्या सदोष, तरीही उल्लेखनीय सादरीकरणामुळे त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे.
.............................................................................................................................................
१७ व्या ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मधील पुरस्काराचे विजेते:
जागतिक चित्रपट विभाग
महाराष्ट्र शासनाचा ‘प्रभात’ सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट : गर्ल्स ऑफ द सन
महाराष्ट्र शासनाचा ‘प्रभात’ सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक : रॉड्रिगो आणि सबॅस्टिअन बरिएसो (अ ट्रान्सलेटर)
मराठी चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : चुंबक
सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक : सुमित्रा भावे (दिठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : देविका दफ्तरदार (नाळ)
सर्वोकृष्ट छायाचित्रण : धनंजय कुलकर्णी (दिठी)
सर्वोत्कृष्ट पटकथा : चुंबक
.............................................................................................................................................
‘पिफ २०१९’मधील पुरस्कार विजेत्या आणि इतरही सिनेमांवरील याआधीचे लेख :
ओपनिंग फिल्म - ‘डॅम किड्स’वरील लेख :
https://www.aksharnama.com/client/article_detail/2923
‘गर्ल्स ऑफ द सन’ आणि ‘अ ट्रान्सलेटर’वरील लेख :
https://www.aksharnama.com/client/article_detail/2925
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment