‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ : फक्त संजय बारुंच्या नजरेतून डॉ. मनमोहनसिंग
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
कल्पना मेंढेकर
  • ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ची पोस्टर्स
  • Sat , 19 January 2019
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर The Accidental Prime Minister संजय बारु Sanjaya Baru मनमोहनसिंग Manmohan Singh

राजकारणात फारसा रस नसला तरी आपण काही गोष्टी वाचून-ऐकून असतो. कुठला पक्ष सत्तेत आहे, कुठला विरोधी वगैरे. विरोधी आणि अन्य पक्षाच्या भूमिका काय आहेत, इतकीच जुजबी माहिती आपल्यासारख्या सामान्य नागरिकाला असते. अर्थात तेवढीच मलाही. पण ज्या सिनेमात मारधाड, अ‍ॅक्शन, रोमान्स, गाणी यापलीकडे यथार्थातील काही प्रश्न, काही भूमिका असतात. ते पाहायला आवडतात. त्यातूनच ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा बघितला.

पूर्वप्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारु यांच्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित त्याच नावाचा हा सिनेमा आपल्याला युपीए सरकारच्या काळात घेऊन जातो. सोनिया गांधी काँग्रेस पक्षाध्यक्ष असताना पुढचा पंतप्रधान कोण यावर चर्चा घडत होत्या. सव्वाशे करोड जनतेत एकही पंतप्रधान बनण्याच्या लायकीचा नाही म्हणून एक विदेशी स्त्री येऊन भारतातील पंतप्रधान होण्याची इच्छा ठेवते, अशा वक्तव्याच्या लाटा देशभर उसळत होत्या. त्यावेळी पक्षात पंतप्रधानपदासाठीचा सोनिया गांधींनंतरचा दुसरा उमेदवार कोण यावर चर्चेला ऊत येतो. सोनिया गांधींवरचा देशांतर्गत दबाव वाढत जाऊन त्या पंतप्रधान उमेदवारी नाकारतात आणि डॉ. सिंग यांचं नाव जाहीर करतात.  

अचानक आलेलं डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव पहाता पक्षातील मंडळी खाशी नाराज होतात. इथं पक्षांतर्गत असलेलं पक्षीय राजकारण आपल्याला दिसून येतं. ‘फायनान्सशियल एक्सप्रेस’चे मुख्य संपादक आणि डॉ. मनमोहन सिंग यांचे चाहते असलेले संजय बारु यांना सिंग आपले माध्यम सल्लागार नेमतात. पण बारु यांची एक अट असते, ते फक्त पंतप्रधानांसाठी काम करतील, पक्षासाठी नाही. मनमोहन सिंग हे आपला पक्ष तसंच सोनिया गांधींचा आदर बाळगून असतात, पण पक्ष पीएमओ ऑफिसमध्ये हुकमी एक्का बसवलाय, असं भासवून सगळे अधिकार पक्षाध्यक्षांकडे ठेवतात. जे सहसा पंतप्रधान आणि सल्लागार बारु यांना रुचत नाही. बारु वेळोवेळी डॉ. सिंग यांच्या धीरगंभीर आणि विचारी प्रवृत्तीला धोका आहे असं सांगतात. आपली स्वत:ची ओळख असावी यासाठी ते प्रवृत्त करतात, पण डॉ. सिंग यांना पंतप्रधान म्हणजे जनतेला वाहून घेतलेला सेवक, ते भाषणबाजीवर जोर देण्याऐवजी देशासाठी काही ठोस कार्य करण्याचे आखतात. जे त्यांच्या अमेरिकेशी झालेल्या अणुकरारासंबंधीच्या डीलमध्ये दिसून येते. त्याच वेळी विविध पक्ष, डावे तसंच त्यांना स्वत:च्याच पक्षाशी सामना करण्याची वेळ येते.

एकीकडे स्वत:चाच पक्ष तर दुसरीकडे पंतप्रधान असा सामना करावा लागत असतानाच स्पेक्ट्रम तसंच सर्जिकल स्ट्राईक म्हणजे राजकारण्यांच्या गुप्त बातचीतच्या टेप आणि अनेक भ्रष्टाचार उघडण्याची मालिकाच सुरू होते. पक्षातील कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे डॉ. सिंग यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. ते याचं खापर पक्षावर फोडत नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांची प्रतिमा खराब होते आणि बारु हे पंतप्रधानांना चुकीचे सल्ले देतात म्हणून पक्षाध्यक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागते. याचा डॉ. सिंग यांना धक्का बसतो, कारण बारु सल्लागार आणि जवळचा मित्र असतात. अखेर बारु यांना राजीनामा द्यावा लागतो. पुढे बारु डॉ. सिंग यांच्यावर एक पुस्तक लिहिण्याची इच्छा जाहीर करतात. त्यावर डॉ. सिंग पक्षाबद्दल काहीही लिहू नये असं सांगतात. पण बारु मला दिसलेले, माझ्या सानिध्यातले डॉ. सिंग याबद्दल ठाम असतात. पुस्तक हातात आल्यावर डॉ. सिंग नाराज होतात. ते पुढे त्यांना कधीच भेटत नाहीत. याला कारण त्यांची तत्त्वं.  

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावरून बनलेला हा झाला सिनेमाचा भाग. ‘जे न देखे रवि, ते देखे कवी’ या उक्त म्हणीचा वापर इथं मला करावासा वाटतो. कारण सुज्ञ दर्शक इथं काही गोष्टी हेरतीलच. आगामी निवडणुका तोंडावर असताना हा सिनेमा येणं. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या प्रतिमा ते यूपीए पक्षाची भूमिका, नेतृत्व, धोरण सगळंच केरात मुसळ जाणार नाही ना, अशी आशंका येते. अर्थात कुठलाच पक्ष इतका स्वच्छ नाही, तरी या सिनेमामुळे भरीस भर होऊ नये असं वाटतं. पण डॉ. सिंग यांच्या पंतप्रधान पदाचा काळ लक्षात घेता एका बँकरच्या चष्म्यानं काही गोष्टी इथं मांडाव्याशा वाटल्या. अर्थात हा माझा बिननंबराचा चष्मा म्हणता येईल.

डॉ. सिंग दहा वर्ष पंतप्रधान राहिले. अर्थमंत्री ते पंतप्रधान या त्यांच्या काळाचा आढावा घेतल्यास त्यांच्या कारकिर्दीचा अंदाज येऊ शकेल. नव्वदच्या दशकाची सुरुवात उदारीकरण आणि जागतिकीकरणानं झाली होती. अर्थव्यवस्था मुक्त होत असताना भारताची सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था मुक्त भांडवली प्रवाहातून पुढे नेणं अत्यंत जिकिरीचं काम होतं. अर्थतज्ज्ञ असलेल्या डॉ. सिंग यांनी ते प्रभावीपणे केलं. मुक्त अर्थव्यवस्थेत भारतीय बॅंका सबळ बनवून जागतिक अर्थव्यवस्थेत टिकवून ठेवण्यासाठी प्रूडेंशिअल नॉर्मची अंमलबजावणी केली. राष्ट्रीयीकृत बॅंका मुक्त अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत कॉम्पिटेबल बनवतानाच त्यांचं राष्ट्रीयत्व अबाधित ठेवण्याचं काम डॉ. सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालं. उदारीकरणानंतर आलेल्या मंदीनं साऱ्या जगाला ग्रासलं, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मात्र स्थिर होती. कारण पंतप्रधानपदी अर्थतज्ज्ञ डॉ. सिंग होते.

आज भारतीय बॅंका बुडित कर्जाच्या वजनानं दबलेल्या असल्या तरी बुडणार नाहीत, कारण प्रूडेंशिअल नॉर्मच्या पायाभरणीमुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांची  कॅपिटल ॲडिक्वसी सक्षम आहे. आणि याचं श्रेय डॉ. सिंग यांना द्यावंच लागेल.

आजचं सरकार रिझर्व बॅंकेकडे राखीव निधीतील हिस्सा देण्याची मागणी करत आहेत. डॉ. सिंग यांच्या काळात तर परिस्थिती बरीच प्रतिकूल होती. काळा पैसा निर्माण होत होता. मात्र रिझर्व बॅंकेच्या सार्वभौमित्वात सरकारनं कधीच हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे कोणत्याही दबावाशिवाय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणं अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांना शक्य झाले. २०१४ साली काँग्रेसला हार पत्करावी लागली.  याला जबाबदार डॉ. सिंग यांना धरण्यात आलं. निवडणूक अजेंड्यात डॉ. सिंग यांनी भर घातलेल्या अर्थनीतीचा प्रचार काँग्रेसनं केला असता तर मोदी लाटेला प्रतिरोध करता आला असता. मात्र नेतृत्वात बदल करण्याच्या घाईच्या भूमिकेमुळे निवडणुकीच्या प्रचाराचा रोख पूर्णत: बदलला. काँग्रेसचं पानिपत झालं, पण त्यामुळे डॉ. सिंग यांच्या नेतृत्वाचं महत्त्व कमी होत नाही.  

दिग्दर्शक विजय गुट्टे यांचा हा पहिलाच सिनेमा. त्यांनी चांगला प्रयत्न केलाय. अनुपम खेर यांनी डॉ. सिंग यांची भूमिका तर अक्षय खन्ना हा संजय बारुची भूमिका केली आहे. अनुपम  खेर मध्यमवर्ती भूमिका निभावताना मध्येच आऊट ऑफ कंट्रोल वाटतात. डॉ. सिंग यांच्या चेहऱ्यावरचं निर्मळ हसू मात्र दिग्दर्शक आणि खेर यांना आणता आलेलं नाही. त्यामुळे सिनेमात अक्षय खन्ना भाव खाऊन जातो. 

सहसा नाण्याची दुसरी बाजू कळावी म्हणूनही असे सिनेमे पाहावेसे वाटतात, पण इथं फक्त सिनेमा बारुच्या नजरेतून दाखवला गेलाय. म्हणून हा सिनेमा ‘वन वे’सारखा वाटत राहतो.

.............................................................................................................................................

kmendhekar123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 19 January 2019

कल्पनाताई, चित्रपटातनं दुसरी बाजू कळेलंच असं निश्चितपणे सांगता येत नाही, पण तशी अपेक्षा मात्र असते. असो. तुमचं निरीक्षण : "इथं फक्त सिनेमा बारुच्या नजरेतून दाखवला गेलाय. म्हणून हा सिनेमा ‘वन वे’सारखा वाटत राहतो." अगदी समर्पक आहे. कारण हा सिनेमा मुळातून प्रचारकी थाटाचा आहे. यात मनमोहनसिंगांवर टीका करायचा आजीबात हेतू नाही. टीकेचं लक्ष्य सोनिया व पर्यायाने काँग्रेस पक्ष आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......