अजूनकाही
या वर्षी लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या असताना गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ आणि ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या पार्श्वभूमीवर हल्ली राष्ट्रप्रेमाच्या (आणि परिणामी राष्ट्रवादाच्या) बदलत्या व्याख्या समोर येत आहेत. असं असताना ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्येही दिवसातील प्रत्येक शोआधी राष्ट्रगीत सुरू होणं नित्याचं बनलं आहे, तेही न्यायालयानं तशी कुठलीही सक्ती केलेली नसताना. पण जाऊद्या, काशिनाथ घाणेकर म्हणालेच आहेत, ‘उसमें क्या हैं?’
पण त्याच वेळी ‘पिफ’मधील चित्रपटांच्या लाइन-अपमध्ये मात्र अतिरेकी राष्ट्रवाद नव्हे, तर जुलमी सत्तेतून स्वातंत्र्य आणि देशाप्रती निर्माण झालेली प्रेमभावना, याखेरीज लोकशाहीचा अट्टाहास आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा विरोध, एकाच वेळी प्रखर आणि सटल स्त्रीवादी भूमिका, अशा अनेक थीम्स असलेले चित्रपट दाखवले जात आहेत.
ओपनिंग फिल्म ‘डॅम किड्स’मध्ये मध्यवर्ती पात्रातील स्त्री आणि तिच्या सहकाऱ्यांनी फॅसिस्ट जनरल पिनोचे विरुद्ध सुरू ठेवलेला लढा आणि लोकशाहीच्या अंमलबजावणीसाठी केलेला अट्टाहास पहायला मिळाला. तर दुसऱ्या दिवशी एवा हुसन दिग्दर्शित फ्रेंच चित्रपट ‘गर्ल्स ऑफ द सन’नेही हीच परंपरा पुढे नेत कुर्दिस्तानमध्ये जुलमी व्यक्तींच्या वर्चस्वाखाली असलेला आपला देश वाचवण्यासाठी हाती बंदुका घेतलेल्या स्त्रिया समोर आणल्या. त्यातील लढवय्या बहार या स्त्री कमांडरसोबत फ्रेंच पत्रकार मथिल्डा पत्रकारिता आणि सत्य समोर आणण्याचं महत्त्व लक्षात घेत क्लिष्ट मोहीमाही कव्हर करत राहते. फक्त दुसऱ्यांवर अत्याचार करण्यासही मागेपुढे न पहायला प्रवृत्तीनं नव्हे, तर राष्ट्राचं सार्वभौमत्व आणि त्यातील नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित राखल्यानं एक उत्तम राष्ट्र निर्माण होत असतं.
क्युबन-कॅनेडियन चित्रपट ‘अ ट्रान्सलेटर’मध्येही ऐंशीच्या दशकातील हवानातील परिस्थिती, शीतयुद्धाचे थेट आणि गंभीर परिणाम अशा मुद्द्यांना चित्रपटाच्या पार्श्वभूमीच्या निमित्तानं हात घातला जातो. तत्कालीन चिघळलेली राजकीय परिस्थितीचे पडसाद संपूर्ण जनमानसावर उमटल्याचं दिसून येतं.
एवा गोर्डोस दिग्दर्शित ‘बुडापेस्ट न्वार’ नामक हंगेरियन चित्रपटात ज्यात घडतो, त्या १९३६ च्या निमित्तानं एक क्लासिक न्वार शैलीतील क्राइम-थ्रिलर कथा दिसून येते. यातही एका पत्रकाराच्या सत्य शोधण्याच्या कथेसोबत न्वार फिल्म्समध्ये हॅट आणि ओव्हरकोट घालून फिरणारे गुप्तहेर आणि इतरही लोक दिसून येतात. याखेरीज वर उल्लेखलेल्या चित्रपटांप्रमाणे यातही हंगेरीच्या फॅसिस्ट पंतप्रधानाच्या मृत्यूचा आणि देशातील राजकीय अस्थैर्य असलेल्या परिस्थितीचा उल्लेख येतो. प्रचंड सुंदर अशी सिनेमॅटोग्राफी आणि कला दिग्दर्शन चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
‘कॉमिक सान्स’ ही नेव्हिओ मारसोव्हिएक दिग्दर्शित क्रोएशिअन फिल्म काहीशा वैचित्र्यपूर्ण उपहासात्मक अंदाजात एका प्रसिद्ध आणि यशस्वी ग्राफिक डिझायनरच्या त्याच्या व्यावसायिक आयुष्याच्या अगदीच उलट, समस्यापूर्ण अशा वैयक्तिक जीवनाचा आढावा घेते. आपल्या वडिलांकडून स्वैराचार, देहबोली आणि एकूणच व्यक्तिमत्त्वातील बऱ्याच गोष्टी ज्यात उतरल्या आहेत, तो अॅलन मात्र आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्यांच्यापासून दूर गेला आहे. नको असतानाही त्याच्यावर काहीशा लादल्या गेलेल्या एका प्रवासादरम्यान या बापलेकांचे नातेसंबंध आणि अॅलनचं आयुष्य समोर रेखाटलं जातं. विनोद आणि नाट्य यांचा कमालीचा समतोल असलेला हा चित्रपट एक सुंदर दृश्यानुभव आहे.
भारतात अलीकडेच समलैंगिक संबंधाना कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी त्यांना कुणाही इतर व्यक्तींप्रमाणे वागणूक न देता वळणाऱ्या नजरा आणि पावलोपावली दिसून येणारी भेदभावाची भावना या गोष्टी सहजासहजी बदलतील असं नाही. या सर्व पार्श्वभूमीवर ‘द रिब’ या चायनीज चित्रपटाचा विषय महत्त्वाचा ठरतो. आपल्या मुलाचा लग्न करायचा किंवा किमान अफेअरचा विचार तर दूरच, पण तो आता थेट लिंगबदल शस्त्रक्रिया करू पाहतो आहे, हे कळाल्यानंतरची एका बापाची प्रतिक्रिया आणि नंतर नात्यात वाढत जाणारा ताण ‘द रिब’मध्ये दिसतो. या बापलेकांमधील कथेच्या निमित्तानं समलैंगिक संबंधांना पाप-पुण्याच्या चौकटीत बसवण्याचा धर्मगुरूंचा अट्टाहास आणि परिणामी सामाजिक पातळीवर धार्मिक ग्रंथांना, धर्माला असलेल्या महत्त्वामुळे स्त्री वा पुरुष याहून भिन्न असं लिंग असू शकतं किंवा कुणाला आपण चुकीच्या शारीरिक चौकटीत अडकलो आहोत, ही भावनाही अस्तित्वात असू शकते, हे स्वीकारच न करण्याच्या प्रवृत्तीकडे पाहिलं जातं.
‘खटला बिटला’ हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट न्याय आणि एकूणच समाजव्यवस्थेकडे एका तिरकस पाहतो. ज्यानिमित्तानं एक कमालीचा विनोदी आणि उपहासात्मक चित्रपट पहायला मिळतो. याआधी ‘पिफ’मध्ये (वर उल्लेख केलेला) ‘कॉमिक सान्स’ आणि वसिलिस क्रिस्टोफिलकी दिग्दर्शित ‘टू मच इन्फो क्लाऊडिंग ओव्हर माय हेड’ या चित्रपटांना हसल्याचं आठवतं. हे तिन्ही चित्रपट म्हणजे अगदीच अब्सर्ड, उपहासाचे आणि अचूक संवादलेखनाचे उत्तम नमुने आहेत. हे आणि इतरही चित्रपट पहायची मिळता चुकवू नये असे आहेत.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment