अजूनकाही
कथनाच्या पातळीवर ‘गँग्स ऑफ वासेपूर’पासून ते ‘बाहुबली’पर्यंत बऱ्याच नव्या-जुन्या चित्रपटांकडून बरेचसे घटक घेत ‘केजीएफ’च्या मूलभूत कथेचा डोलारा उभा राहतो. या चित्रपटांतही मनमोहन देसाईच्या चित्रपटातील प्रेरणा सापडतीलच. एखाद्या चित्रपटात पुढे काय घडणार आहे किंवा चित्रपटाचा प्रवास कोणत्या दिशेनं सुरू आहे याची कल्पना पाहणाऱ्याला येत असते, तेव्हा ते कथानक भावनिक किंवा सिनेमॅटिकदृष्ट्या खिळवून ठेवेल अशा पद्धतीनं समोर येणं गरजेचं असतं. ‘केजीएफ’मध्ये मात्र बहुतांशी वेळा असं घडत नाही. इथं समोर घडणारी दृश्यं वैशिष्ट्यपूर्ण असली तरी ती बहुतांशी वेळा नकारात्मकरित्या तशी असतात. कारण ‘केजीएफ’ बहुतेक वेळा आपल्या नायकाच्या लार्जर दॅन लाइफ प्रतिमा उभारण्यावर भर देतो. अशा वेळी तो ‘स्टाइल ओव्हर सबस्टन्स’ ही संज्ञा शब्दशः स्वीकारतो, हे वर्णन इथं योग्य ठरतं.
‘कोलार गोल्ड फिल्ड्स’ ऊर्फ ‘केजीएफ’चा काहीतरी वादग्रस्त आणि संवेदनशील असा इतिहास आहे. ज्यामुळे त्यावर लिहिलेलं ‘एल-डोरॅडो’ नामक पुस्तकावर सरकारनं बंदी आणलेली आहे. इतकंच नव्हे तर या पुस्तकाच्या सर्व प्रतीही जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न यासाठी की यातून बजावलेली एकुलती एक प्रत एका न्यूज चॅनेलच्या हातात पडते. या प्रकरणाबाबत अधिक जाणून घेणं चॅनेलच्या मालकाला (टी. एस. नागभरना) गरजेचं वाटतं. परिणामी ही जबाबदारी चॅनेलची स्टार अँकर दीपा हेगडेवर (मालविका अविनाश) येऊन पडते. मग सदर पुस्तकाचा लेखक आनंद इंगलागीने (अनंत नाग) एका मुलाखतीच्या निमित्तानं ‘केजीएफ’ आणि त्यानुषंगानं राजा बैरया ऊर्फ रॉकीच्या गोष्टीचं केलेलं कथन सुरू होतं.
आपल्या गरीब, सिंगल मदर असलेल्या आईच्या (काहीशा मनमोहन देसाईवजा) - ‘तू कसाही जगलास तरी मरताना मात्र जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती असायला हवं’ अशा अर्थाच्या शेवटच्या शब्दांना जागत ‘पॉवर म्हणजे मुंबई’ अशा समीकरणामुळे मुंबईत येऊन अनैतिक कृत्यं करून मुंबईवर राज्य करू (थोडक्यात भिकू म्हात्रे बनू) पाहतो. मग गँगस्टर बनून नाव कमावल्यावर घडलेल्या मुंबई-बेंगळुरू प्रवासामुळे त्याचा संबंध कोलार आणि तेथील खाणींशी येतो. खाणींवर राज्य गाजवणारं कुटुंब असतं, कुटुंब प्रमुख असतो, आपली आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील भरभराट करण्यासाठी नायकाला या खाणींचा कब्जा मिळवायचा असतो. यू नो द ड्रिल.
एकूणच अपेक्षित-अनपेक्षित वळणं घेत ‘केजीएफ’च्या कथानकाची वाटचाल सुरू असते. पण नावातच ‘चॅप्टर १’ घेऊन वावरणाऱ्या सदर चित्रपटाच्या पटकथेत मात्र वासेपूर-बाहुबलीसारख्या बाबी (म्हणजे कथाकथनाच्या दृष्टिकोनातून परिणामकारक आणि एंगेजिंग असणं) दिसत नाहीत. एक वेळ तर अशी येते की, समोरील दृश्यांच्या सोबतीनं येणारं कथन डझनभराहून अधिक नावं घेत, विस्मयकारक वाटणं अपेक्षित असलेल्या घडामोडी सांगत असतं. मात्र पडद्यावरील दृश्यं आणि सोबतीला ऐकू येणारी वाक्यं अशा दोन्ही पातळ्यांवर बराच गोंधळ उडालेला असतो. समोर येणारी पात्रं महत्त्वाची आहेत किंवा असावीत अशी जाणीवच इथं निर्माण होत नाही. कारण एव्हाना चित्रपटाला स्वतःलाच ‘लार्जर दॅन लाइफ’ नायक वगळता इतर कशावरही लक्ष केंद्रित करायचं नाही, हे दिसून आलेलं असतं. परिणामी काहीही झालं तरी चित्रपटाचे निर्माते किंवा गेला बाजार कथन करणारा अनंत नाग तरी याला या परिस्थितीतून बाहेर काढेल याची खात्री असते. चित्रपटाला अपेक्षित असलेला हेरॉईक प्रभाव निर्माण झालेला असला तरी त्यासोबतीला गरजेची असलेली भावनिक गुंतवणूक मात्र निर्माण होत नाही.
असं असलं तरी ‘केजीएफ’चं तांत्रिक बाजूंनी परिणामकारक असणं नाकारता येत नाही. अर्थात इथंही संकलन मात्र अपवाद राहतं. गडद तपकिरी, काळ्या आणि राखाडी छटा असलेलं रंगपटल इथं प्रभावी वाटतं. छायाचित्रकार भुवन गौडाचं छायाचित्रण उत्तम आहे. जे अगदीच टेन्स्ड क्लोज-अप्सपासून ते इतर सर्व प्रकारच्या दृश्यांपर्यंत ते अपेक्षित परिणाम साधतं. याखेरीज शिवकुमारचं कलादिग्दर्शनदेखील १९५१ ते १९८१ पर्यंतचा काळ उभा करण्यात सहाय्यक ठरतं. आधी उल्लेख केल्याप्रमाणे तांत्रिक बाबींच्या उत्तम असण्याबाबत अपवाद असलेली गोष्ट म्हणजे चित्रपटाचं संकलन. जे फारच कृत्रिम आणि गिमिकरी आहे. अगदी वेळोवेळी बऱ्यापैकी चांगल्या म्हणाव्याशा शेवटाकडे जाताना डोळ्यात खुपणारंदेखील आहे. अॅक्शन सीन्स म्हणजे प्रेक्षकाला फास्ट, गिमिकरी कट्स अपेक्षित आहेत असं काही निर्मात्यांचं गृहीतक का असतं हे माहीत नाही. पण हे गृहीतक चुकीचं आणि खटकणारं आहे इतकं मात्र नक्की.
बाकी चित्रपटाचा लार्जर दॅन लाइफ नायक साकारणाऱ्या यशला फारसे संवाद नसल्यानं इतर काही नसलं तरी तो मारधाड करताना शोभतो असं म्हणावं लागतं. अनंत नाग आणि इतर लोक स्वीकारार्ह कामगिरी करतात. चित्रपटाची नायिका (!) असलेल्या श्रीनिधी शेट्टीचं पात्र फारच कमकुवत पद्धतीनं लिहिलेलं, आणि फारच मोजकी दृश्यं असलेलं आहे. अर्थात जिथं खलनायकदेखील म्हणावा तितक्या गडद आणि परिणामकारक पद्धतीनं लिहिलेला नाही, तिथं नायिकेचं काय घेऊन बसणार म्हणा!
थोडक्यात, ‘केजीएफ’ हा त्यातील हिरोचा ‘वन मॅन शो’ आहे. तो सदोष पटकथा, गिमिकरी संकलन आणि ‘स्टाइल ओव्हर सबस्टन्स’ प्रकारची मांडणी यांमुळे केवळ स्वीकारार्ह ठरतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment