‘बंबलबी’ : या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘बंबलबी’चं एक पोस्टर
  • Sat , 05 January 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie बंबलबी BUMBLEBEE मायकेल बे Michael Bay

या सिनेमाकडे दोन दृष्टिकोनातून पाहता येतं. पहिला- ज्यांनी ‘ट्रान्सफॉर्मर’ मालिका न चुकवता बघितली आहे आणि त्यातल्या सर्व फिल्म्स आवडल्यात, त्यांना ‘मायकेल बे’चं यात नसलेलं अस्तित्व चटकन जाणवेल. दुसरा- ज्यांना ही मालिका आवडते, पण बेच्या दिग्दर्शनात असणाऱ्या व्हिज्युअल्सच्या भडिमारात पडद्यावर काय चाललंय, हे न कळणाऱ्यांना मात्र हा सिनेमा नक्कीच आवडेल. बेच्या दिग्दर्शनात पडद्यावर खूप काही घडत राहणं प्रेक्षकांवर प्रदीर्घ परिणाम साधणारं असायला हवं असा अट्टाहास असतो. त्यामुळे साध्या, सरळ प्रसंगांनासुद्धा भयंकर प्रतिमांमध्ये अडकवून ठेवण्याची त्याला सवय आहे. त्यामुळेच या सिनेमाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, यावर आपली आवडनिवड अवलंबून आहे.

ट्रान्सफॉर्मर्सच्या ग्रहावर सायबरट्रॉनवर ऑटोबॉट्स व डिसेप्टीकॉन्स यांच्यात तुंबळ युद्ध चालू असतं. ऑटोबॉट्सची हार होत असते. त्यामुळे ऑटोबॉट्सचा नेता ऑप्टीमस प्राईम (पीटर कलनचा आवाज) त्यांचा साथीदार B127 ला (डिलन ओ’ब्रायनचा आवाज) पृथ्वीकडे जायला सांगतो. इतर ऑटोबॉट्स त्याला येऊन मिळेपर्यंत त्यानं पृथ्वीचं संरक्षण करावं असा आदेश देतो. B127 लष्कराच्या प्रशिक्षण शिबिरात येऊन थडकतो. काही सैनिकांना मारतो. त्याच्या मागावर असणाऱ्या एका डिसेप्टीकॉनमुळे गंभीर जखमी होतो. एका पिवळ्या रंगाच्या फॉक्सवॅगन बीटलमध्ये स्वतःला रूपांतरित करतो. चार्ली वॉटसन (हॅली स्टेनफेल्ड) ही अठरा वर्षांची मुलगी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच पिवळ्या रंगाच्या फॉक्सवॅगन बीटलला घेऊन येते. बीटलला व्यवस्थित करून दुरुस्त करते, तेव्हा B127 शी तिची ओळख होते. ती त्याचं नामकरण ‘बंबलबी’ करते. वडिलांच्या मृत्युमुळे आई व सावत्र वडिलांपासून दुरावलेली ती त्याच्यात एक मित्र शोधायला लागते.

दिग्दर्शक ट्रॅव्हिस नाईट आणि पटकथाकार ख्रिस्टिना हॉडसन यांनी कथेला छोटेखानी स्वरूपात ठेवायचं हे सुरुवातीपासून ठरवलं असावं. बंबलबी हे पात्र मुळात इतर ऑटोबॉट्ससारखं मानवी आवाजात बोलत नाही. त्याची संवाद साधण्याची पद्धत त्याच्या छातीत फिट केलेल्या रेडिओमधून इंग्लिश गाण्यातले शब्द व वाक्य चपखलपणे वापरणारी आहे. त्यामुळेच तो पहिल्या भागापासून सर्वांचा आवडता झालेला. तसंच मागच्या वर्षी आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स : द लास्ट नाईट’मध्ये तो दुसऱ्या महायुद्धापासून पृथ्वीवर आहे असा उल्लेख येतो. त्यामुळेच पहिल्या भागात म्हणजे ‘ट्रान्सफॉर्मर्स’मध्ये सॅम व्हीटविकीला भेटण्याआधी तो कुठे होता, याची उत्सुकता प्रेक्षकांना असणारच.    

यावर अजून दोन सिनेमांचा प्रभाव दिसून येतो. पहिला ‘द आयर्न जायंट’ हा अॅनिमेशनपट व स्पीलबर्गच्या ‘ईटी’चा. प्रभाव थेट दिसतो ते दोन्ही सिनेमातल्या पात्रांसारखाच इथल्या पात्रात असणाऱ्या नातेसंबंधांवर. दोन्हीत एक मशीन व एक एलियन अनुक्रमे एका लहान मुलाचे मित्र होतात. त्यांच्यावर ओढवणाऱ्या संकटात ही मुलं मदत करतात. त्यांच्यात हळुवार, निरागस नातं तयार होतं. बंबलबी व चार्लीत निर्माण होणारं नातंही असंच आहे. ती वडिलांच्या अकाली मृत्यूला विसरू शकलेली नाही. त्यामुळे त्याच्या निरागस मूक मैत्रीकडे ती ओढली जाते. संकटात सापडलेला, ऑटोबॉट्सपासून दुरावलेला बंबलबी त्यामुळेच तिच्याजवळ येतो. पुढे सॅम व्हीटविकीसोबत त्याचं जे नातं तयार होतं, त्याचीच ही पूर्वकहाणी म्हणता येईल. तरीही हा भाग म्हणावा तसा फुलवलेला नाही. दिग्दर्शक त्यांच्या नात्यात येणारा गहिरेपणा निर्माण होण्याआधीच कथानक पुढे सरकवतात. हे नातं अजून थोडा वेळ पडद्यावर रेंगाळायला हवं होतं असं वाटायला लागतं. तरीही मालिकेत मायकेल बेनं मानवी नातेसंबंधांना, भावभावनांना न दिलेलं महत्त्व इथं प्रकर्षानं दिसून येतं.

याचा अर्थ सिनेमात दोष नाहीत असं नाही. डिसेप्टीकॉन्सची उपस्थिती आहे, पण ते अशा कथांमध्ये खल पात्रांची गरज असावी म्हणून. मालिकेतल्या पहिल्या भागापासून मायकेल बेनं यातील लष्कराचा सहभाग हा जाणूनबुजून वाढवला होता. त्यामुळे फक्त लहान मुलांकरिता असणारी याची अॅनिमेशन मालिका प्रौढसुद्धा बघू शकतील आणि मालिकेचा आवाका मोठा होईल अशी झाली. दर भागात वाढत जाणाऱ्या प्रेक्षक प्रतिसादात हे दिसून आलं. इथंही लष्कराचा भाग असला तरी तो मालिकेची आठवण यावी म्हणूनच असावा. कारण त्याचं अस्तित्व नाममात्र राहतं.

दिग्दर्शक ट्रेव्हिस नाईटनी सिनेमाला बेच्या प्रभावापासून मुद्दामहून दूर ठेवलंय, हे पदोपदी दिसून येतं. खासकरून मारामारीच्या प्रसंगात कोण कुणाशी मारामारी करतोय ते स्पष्ट दिसतं. ऑटोबॉट्स व डिसेप्टीकॉन्स मार्शल आर्ट्समध्ये प्रवीण असलेले दिसतात. त्यामुळे कोरिओग्राफीला लयबद्धता आलीय. काही प्रसंग मात्र भावूकता वाढवणारे झालेत. व्हीएफएक्सचा दर्जा व वापर मात्र हिंदी सिनेमांनी शिकावा असा. एकतर व्हीएफएक्स कुठे व कसे वापरलेत यात फरक करता येत नाही इतके ते बेमालूम मिसळले आहेत. हा बेमालूमपणा अजून आपल्या भारतीय सिनेमांत आलेला नाही. भारतीय कंपन्याच हॉलिवुडचे व्हीएफएक्स करत असतात ना! अर्थात निव्वळ व्हीएफएक्सवर भर न देता कथेकडेही ते लक्ष पुरवतात हेही शिकण्यासारखं आहे. याच मालिकेतल्या शेवटच्या काही भागात व्हीएफएक्सचा खूप वापर मायकेल बेनं केला होता. त्यामुळे कथा मागे पडली होती. आपल्याकडे नुकत्याच येऊन गेलेल्या ‘२.०’ सिनेमात काही प्रसंगात व्हीएफएक्सचा वापर बरा म्हणण्याइतपत होता, पण अजूनही भारतीय दिग्दर्शकांना ते सफाईदारपणे वापरता येत नाहीत.

आपल्याकडे नेहमी दुर्लक्षिला जाणारा अजून एक मुद्दा म्हणजे ‘युज्ड युनिव्हर्स’ ही दिग्दर्शक जॉर्ज ल्युकसची संकल्पना. त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की, आपण ज्या अवकाशात राहतो, तो नेहमी चकचकीत, स्वच्छ नसतो. तो दररोजच्या वापरातला असतो. तरीही आपण तो वापरतो. हीच गोष्ट त्यांनी ‘स्टार वॉर्स’मध्ये त्याचं वास्तववादी रूप वाटण्यासाठी वापरलं. त्यामुळे या मालिकेतले सिनेमे खरेखुरे तिथं घडतायत असं वाटतं.

हीच संकल्पना दिग्दर्शक ट्रॅव्हिस यांनी ऐंशीच्या दशकातला काळ उभा करण्यासाठी वापरलीय. त्यामुळे फॉक्सवॅगन बीटलमधला बंबलबी खराखुरा वाटतो. तो ज्या बीटलचा आधार घेतो, ती जुनी झालेली असते. दिग्दर्शक तिचं जुनाट असणं सोडत नाही, तर चार्लीच्या अवकाशाचा भाग म्हणून वापरतात. त्यामुळेच ते वास्तव वाटतं. आपल्या इथं ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे किंवा विशिष्ट काळात घडणारे सिनेमे तयार होतात, पण ही संकल्पना कुणी वापरल्याचं दिसत नाही. जुना काळ चकचकीतच होता, ही धारणा अजून लोप पावलेली नाही. त्यामुळे हॉलिवुडकडून या बाबतीत बरंच शिकण्यासारखं आहे. तसं झालं तर आपल्या सिनेमांना ‘अच्छे दिन’ येतील.

कोएन ब्रदर्सच्या ‘ट्रू ग्रीट’मधून छाप पाडणारी हॅली स्टेनफेल्ड चार्ली वॉटसनची भूमिका सहज वठवते. त्यामुळे तिची निवड अतिशय योग्य ठरते. जॉन सेना लष्करी वेशात शोभून दिसतो.

२००७ मध्ये आलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ सिनेमानं मायकल बेच्या खास शैलीला अजून वरच्या पातळीवर नेलं होतं. यावर्षी मालिकेला एक तप पूर्ण होईल. चढत्या क्रमानं मालिकेनं प्रेक्षकवर्ग वाढवला. एका पिढीला घडवलं. त्यांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य भाग बनला. त्यामुळे या सिनेमाचा एकूण टोन पाहता या नंतरही स्पिन-ऑफ किंवा सिक्वेल्स यायला बरीच जागा आहे. एका बातमीनुसार एकूण बारा सिनेमे ‘ट्रान्सफॉर्मर्स सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या छत्राखाली येण्याचे संकेत आहेत. तसं झालं तर ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ नंतर हीच मोठी मालिका असेल. २०१० नंतर जन्मलेल्या पिढीची मात्र यापुढे चंगळ होईल.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख