चित्रकथा वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत…
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुरेंद्रनाथ बाबर
  • ‘नार्कोस’, ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजची पोस्टर्स
  • Sat , 29 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र वेबसिरीज Web Series नार्कोस Narcos सेक्रेड गेम्स Sacred Games मिर्झापूर Mirzapur

जुलैमध्ये ‘नेटफ्लिक्स’ ही व्हिडिओ ऑन डिमांडची निर्मिती करणारी कंपनी भारतात ‘सेक्रेड गेम्स’ ही आपली पहिली वेबसिरीज घेऊन आली. त्याआधी ‘ब्रिथ’ ही सिरीज अॅमेझॉन प्राईमनं आणली होती, पण ती प्रेक्षकांपर्यंत तितकीशी पोहचू शकली नाही. त्यामुळे वेबसिरीज म्हणून भारतात पहिलं यश मिळवलं ते ‘सेक्रेड गेम्स’नं. आणि त्याच निमित्तानं नेटफ्लिक्सनं भारतात दमदार एन्ट्री केली. 

नेटफ्लिक्स ही वेबसिरीज बनवणारी एक जागतिक कंपनी असून तिनं बऱ्याच वेबसिरीज बनवल्या, पण तिला पहिलं यश मिळालं ‘नार्कोस’ या वेबसिरीजमुळे.

चित्रपटांच्या दुनियेत गुन्हेगारीवर आधारित एखाद्या सर्वोत्तम चित्रपटाचं नाव घ्यायचं झालं, तर अगदी सहजतेनं ‘गॉडफादर’चं घ्यावं लागेल. आणि वेबसिरीजच्या दुनियेतलं नावं घ्यायचं झालं तर ते ‘नार्कोस’चं असेल. या ‘नार्कोस’नं जगाला भुरळ घातली. आणि व्हिडिओ ऑन डिमांडच्या जगतामध्ये नेटफ्लिक्स ‘गॉडफादर’ बनली!

चित्रपटांच्या कथांमध्ये जे मुख्य प्रकार आढळून येतात, ते म्हणजे विनोदी, अॅक्शन, प्रेमकथा, शोकांतिक कथा, गूढकथा, गुन्हेगारी इत्यादी. त्या प्रकारांमध्ये पुढे वेगळे उप-प्रकार असतात. पण त्या अनेक अंगांपैकी नव्या पिढीला गुन्हेगारी आणि त्यातून कथेतील नायकाला आलेली अचानक श्रीमंती दाखवणाऱ्या चित्रपटाबद्दल विशेष आकर्षण असतं. हिंदीतील उदाहरणं द्यायची झाली तर ‘दिवार’ ते ‘दयावान’ ते अलीकडचा ‘जन्नत’ इ.

तसं पाहिलं तर प्रत्येक गुन्हेगारीपटाचं मूळ एकच असतं, ते म्हणजे ‘सेवन बेसिक प्लॉट्स’ या कादंबरीतील बुकर यांच्या नियमातील ‘रेग टू रीचेस’मध्ये फिट बसतं. त्यामुळे अशीच थीम घेऊन नेटफ्लिक्स जगासमोर आली, तिनं ‘नार्कोस’ ही वेबसिरीज लाँच केली. तेव्हा तिला जगभरातून प्रतिसाद मिळाला.

वेबसिरीज हे युवकांपर्यंत लवकरात लवकर पोचणारं मोठं माध्यम म्हणून जगासमोर आलं, याचं दुसरं कारण म्हणजे रोज जास्तीत जास्त डेटा देणाऱ्या सर्विस प्रोव्हायडर कंपन्या. जगभरात डेटा स्वस्त देणाऱ्या कंपन्या अस्तित्वात होत्या, पण भारत अजूनही ‘कमी डेटा महाग दरात’ देत होता. त्यामुळे व्हिडिओ ऑन डिमांडवर आधारित कंपन्यांना भारतात हवा तसा वाव नव्हता. मात्र अचानक रिलायन्ससारख्या कंपनीनं ‘जिओ’ या डेटा सर्विसचं उदघाटन करून नेट प्रोव्हाडिंग जगतात धुमाकूळ घातला आणि स्वस्तात स्वस्त व काही महिने तर चक्क मोफत डेटा द्यायला सुरुवात केली. दररोज दीड जीबी डेटा माफक दरात द्यायला सुरुवात केली, तेव्हा नेटफ्लिक्सच्या सीईओनं जिओ सर्विस प्रोव्हायडरचे आभार मानले होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे वाढत्या वेबसिरिजच्या प्रभावामागे नेट डेटा प्रोव्हायडरचासुद्धा मोठा सहभाग आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

‘नार्कोस’ ही नेटफ्लिक्सवर गाजलेली पहिली वेबसिरीज. गुन्हेगारी दर्शवणारी सर्व कथानकं कुठेतरी ‘गॉडफादर’ला स्पर्श करून जातातच. पण मग चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये फरक काय? तर ‘कथनाचं स्वरूप’. वेबसिरीजमध्ये कथनाला जो फायदा होतो, तो चित्रपटातून होत नाही. चित्रपटाला एक चौकटीत सर्व काही कोंबावं लागतं, पण वेबसिरीज संयमानं, शिस्तीत आणि नेमकेपणानं कथन खुलून सांगते. पटकथा हळुवार पुढे सरकत राहते. वेळेच्या बंधनापासून मुक्त राहते. त्यामुळे आज ‘गॉडफादर’ हा चित्रपट जर वेबसिरिज रूपात आणायचा ठरला, तर त्याचे ‘नार्कोस’पेक्षा अधिक सिझन्स तयार होतील.

‘नार्कोस’ किंवा त्यासमान इतर गोष्टी भारतात येण्याचा मुख्य अडसर म्हणजे सेन्सॉरशिप. चित्रपटांच्या बाबतीत आपण नेहमीच सेन्सॉरशिपचा पेच अनुभवला आहे. सेन्सॉरशिप कलाकाराला त्याच्या कलेपासून वंचित ठेवते. नेमके वेबसिरीजवाले या कात्रीतून बाहेर पडले आणि भारतात नेटफ्लिक्सनं ‘सेक्रेड गेम्स’ आणली. ती सेन्सॉरशिपला धुडकवत समोर आली. कारण वेब कंटेंट अजून कायद्याच्या कचाट्यात नाही. त्यामुळे चित्रपटविश्वातील कलाकारांना वेबसिरीजच्या माध्यमातून मिळालेलं ‘सेक्रेड गेम्स’ हे पहिलंच स्वातंत्र असावं. आणि याचमुळे शिव्या, हिंसा, अश्लीलता, व्यसनं हे खुलेआम दाखवण्याचं स्वातंत्र्य मिळालं. ‘सेक्रेड गेम्स’चे दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी त्या स्वातंत्र्याच्या पूर्ण फायदा उचलत संबंध कला क्षेत्रात धुमाकूळ घातला. इंदिरा गांधींच्या आणीबाणीपासून ते शहाबानू केसपर्यंत अनेक गोष्टींवर जोरदार टीका टिप्पणी करत आणि बाबरी मशिदीच्या विध्वंसचा उल्लेख मध्यभागी ठेवून सबंध भारतातील गेल्या पंचवीस वर्षांतील राजकारणावर, गुन्हेगारीवर, समाजावर अर्वाच्च भाषेत टीका करणाऱ्या या वेबसिरीजनं मोठ्या प्रमाणावर यश कमावलं. 

‘सेक्रेड गेम्स’च्या यशानंतर वेबसिरीजचं गारूड भारतीय लोकांवर आरूढ होऊ लागलं आहे. अशा काळात अॅमेझॉननं तरी का मागे राहावं? मग अॅमेझॉन ‘प्राईम’ घेऊन आली ‘मिर्झापूर’. ‘सेक्रेड गेम्स’ ही राजकारण, गुन्हेगारी आणि समाज या तिन्ही गोष्टी एकत्र घेऊन एका मोठ्या चौकटीत पुढे येत असली तरी ‘नार्कोस’प्रमाणे हळुवार आणि शिस्तीत जात नाही. या उणिवा भरून काढत अॅमेझॉननं ‘मिर्झापूर’ बनवली. म्हणून ‘मिर्झापूर’ ही ‘सेक्रेड गेम्स’पेक्षाही वेगळी बनते आणि ‘नार्कोस’च्या जवळ पोचते. कारण जो फायदा ‘नार्कोस’नं वेबसिरीजमधून उचलला, तो ‘मिर्झापूर’नंही उचलला. तो म्हणजे हळुवार आणि शिस्तीचं कथन. 

गेली अनेक दशकं चित्रपटकला सेन्सॉरच्या कात्रीत आहे. याच सेन्सॉरशिपमुळे ‘वॉटर’ हा दीपा मेहता यांचा सिनेमा ऑस्करसाठी कॅनडाकडून पाठवावा लागला. आणि फॉरेन लँग्वेजमध्ये नॉमिनेटदेखील झाला. हे भारतीय सेन्सरशीपचं यश मानावं की..?

वात्स्यायानानं कामसूत्र जगाला दिलं आणि ते सूर्यमंदिरावर कोरलंदेखील गेलं, पण चित्रपटांत व इतर कलांत त्याचा खुल्यानं उल्लेख करण्याचं स्वातंत्र्य हरवलेला समाज या नव्या माध्यमांमुळे हादरून गेला.

सेन्सॉरच्या कात्रीतून मुक्त होऊन चित्रकथा आता वेबसिरीजच्या माध्यमातून नव्यानं श्वास घेऊ लागल्या आहेत, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ही अभिव्यक्ती जपणं गरजेचं बनलं आहे. भविष्यात चित्रपटांवरील बंधनं कमी झाली नाहीत, तर सिनेक्षेत्राला मोठा धोका संभवू शकतो. ही गोष्ट वेळीच समजून घेणं गरजेचं आहे. 

.............................................................................................................................................

लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.

advbaabar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख