अमर्याद अथांग सागराची रत्नखचित मेखला धारण करणार्या सुवर्णरत्नमंडित द्वारकानगरीत श्रीकृष्ण आपल्या नक्षत्रांसमान देखण्या व गुणवान भार्यांसह राहू लागला. जरासंध व कालयवनादी शत्रुबरोबर लढताना गोकुळवासी नाहक भरडले जाऊ नयेत म्हणून त्यांच्या रक्षणाच्या दृष्टीने कृष्णाने देवांचा शिल्पी विश्वकर्मा याच्याकडून द्वारकानगरी बांधून घेतली. ही नगरी म्हणजे स्थापत्यकलेचा अफलातून नमुना होती. नगरी पूर्ण होतानाच गर्ग्यमुनींनी श्रीकृष्णाच्या आठ भावी राण्यांचे प्रासाद बांधून घेतले होते. तत्पूर्वी कृष्ण अविवाहित होता. नंतर अष्टनायिकांनी त्याच्या जीवनांत सोनपावलांनी प्रवेश केला. प्रत्येकीला स्वतंत्र प्रासाद असूनही श्रीकृष्णाच्या हृदयमंदिरात ठाण मांडून बसण्यासाठी चढाओढ असे. यांत रुक्मिणीच यशस्वी झाली होती.
एकदा एका प्रसन्न रात्री नौकाविहार करून श्रीकृष्ण रुक्मिणीच्या बावनकशी कांचनप्रासादातील शयनगृहात आला असता, तिने भोजनोत्तर त्याला तांबूल करून दिला. वार्तालाप करताना तिने रूपगुण संपन्न, वीर्यशाली, तपोनिधी व सर्वशास्त्रनिपुण असलेल्या पुत्राचे मातृत्व देण्याची इच्छा प्रगट केली. त्याने तिला तसे वचन दिले. कारण पुत्र हाच संसारी पुरुषाला उत्तम लोक प्राप्त करून देतो. रुक्मिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने कैलास पर्वतावर भगवान शिवाच्या तपश्चर्येला जाण्याचे ठरवले.
निर्विघ्न तपाचरणासाठी हिमालयातील बदरीकाश्रम हे योग्य स्थळ होते. थोर विभूती त्याचाच आश्रय करून तप करत असत. दुसर्याच दिवशी त्याने हिमालयात जाण्याचा मनोदय प्रगट केला. सूर्योदयापूर्वीच स्नानादी कर्मे करून अग्नीत हवन करून ब्राह्मणांना धनधान्य व सवत्स धेनू दान दिली. राजसभेत जाऊन बलराम, सारण, उद्धवादी यादववीरांना पाचारण केले. नंतर तो उद्धवाला प्रेमाने म्हणाला, ‘‘बा उधो, मी काही महत्त्वाच्या कामासाठी कैलासावर जात आहे. मी माझ्या अलौकिक कर्मामुळे असंख्य शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. ते नित्य द्वारकेकडे वक्रदृष्टीने बघत असतात. त्यामुळे मी परत येईपर्यंत हरप्रकारे नगरीचे रक्षण करा. नगरीची सर्व द्वारे बंद करून केवळ एकच द्वार रहदारीस खुले ठेवा म्हणजे शत्रुवर नजर ठेवता येईल. उग्रसेन महाराजांच्या लेखी आज्ञेने सर्वांची ये-जा चालू दे.’’
श्रीकृष्णाच्या सूचना ऐकून सात्यकी म्हणाला, ‘‘कृष्णा, तू इकडची चिंता न करता जा. आम्ही सर्व मिळून नगरीचे रक्षण करू.’’
अशा रीतीने सर्व आप्त व प्रियजनांकडून समाधान पावलेल्या कृष्णाने कैलासावर जाण्यासठी प्रस्थान ठेवले. त्यावेळी नगरीच्या सुवर्ण वेशीवर श्रीकृष्णाचा राणीवसा आपापल्या दासी व सख्यासह निरोप द्यायला हजर होता. बलरामादी विरांचा व वसुदेव देवकीच्या प्रेमाने निरोप घेऊन कृष्णाने आपली नेत्रकमळे मिटून पक्षीराज गरुडाचे स्मरण केले. काही क्षणातच भक्कम चोंच, बळकट पाय व सुवर्ण नेत्रांचा गरुड आपल्या विस्तीर्ण पंखांवर निळे आभाळ पेलत समोर उभा राहिला. कृष्णाने आपला मनोदय प्रगट करताच तो गरुडावर स्वार झाला. कृष्णाच्या पत्नी दुःखी झाल्या, कारण काही काळ त्यांना पतीचा विरह सहन करावा लागणार होता.
कश्यपपुत्र गरुडाने जेव्हा नभोमंडपात झेप घेतली, तेव्हा भूतलावर प्रचंड वावटळ उठून सर्वत्र धूळ पसरली. अथांग सागर खवळून त्याच्या पर्वतप्राय लाटा उसळल्या. मकर, मीनादी जलचर क्षणभर हवेत फेकले गेले. आपल्या नयनरम्य हालचालीने गरुडाने वेगाने समुद्र पार केला. त्या वेळी त्याच्या विशाला पंखांमुळे उठलेल्या झंझावाताने किनार्याजवळील पर्वत मुळांपासून हादरले. वृक्षवेलींची फळांफुलांसह पडझड होऊन भूकंपाच्या भयाने पशुपक्ष्यांनी आपल्या जागा सोडल्या. त्या सर्वांकडे पाहात गरुड मार्ग आक्रमू लागला. कृष्णाच्या दर्शनाच्या अभिलाषेने आकाशांत अप्सरांसह देवगण गोळा झाले. सर्वांना अभय देऊन त्याने हसतमुखाने निरोप दिला.
दिवस कलायला थोडा अवधी असताना कृष्णाने हिमालयातील बद्री आश्रमाच्या परिसरांत पाऊल ठेवले. त्या वेळी पश्चिमा केशरी रंगांत न्हाऊन निघाली होती, कारण अस्तास जाण्यापूर्वी कृष्णास प्रणाम करताना सूर्याजवळील केशरी थाळा अनावधाने कलंडला होता.
हेच ते बद्रीवन जिथे विष्णूसह श्रेष्ठ ऋषी व देवगणांनी प्राचीन काळी तप केले होते. दशग्रंथी ब्राह्मण लंकेश्वर रावण याचा वध करून त्या पापक्षालनाप्रीत्यर्थ प्रभु रामचंद्राने याच आश्रमाचा आश्रय केला होता. नर नारायण यांच तर ही प्रिय तपोभूमी होती. हा सारा परिसर हिमकन्या गंगेने आपल्या निर्मभ जळाने मंगलमय केला होता. स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने राक्षस-दानवसुद्धा येथे तप करण्यासाठी येत असत.
सूर्य मावळल्याने पाळीव पशु निवारा जवळ करू लागले. पक्षी घरट्यांत विसावू लागले. निशाचार पशुपक्षी शिकारीसाठी बाहेर पडू लागले. आश्रमांत सभोवार असंख्य तपोवने व पर्ण कुट्या दिसत होत्या. सायंकाळचे गोदोहन करण्यासाठी ऋषीपत्नी, कन्या व स्नुषा लगबग करू लागल्या. गाई-वृषभांच्या हंबरण्याने सारे वातावरण भारून गेले.
तिथे वास करणारे काही मुनी समाधीत गेले होते. काहींनी यज्ञीय अग्नी चेतवला होता. काही तपस्वींनी मुंडन केले होते, तर काही जटाधारी होते. काही किडकिडीत तर काही अंगापिंडाने सुदृढ होते. काही केवळ जल व वायू सेवन करणारे तर काही पाने-फळे-फुले यांचा आहार घेणारे हेाते. काही केवळ जगण्यापुरतेच अन्नग्रहण करणारे होते. अशा त्या विविध प्रकारच्या सिद्धगणांनी वेष्टिलेल्या बदरी क्षेत्रांत गरुडाने आपले भक्कम पाय रोवले. गरुड आला त्याअर्थी विष्णूही असणारच, या विचाराने हातांतील कामे दूर सारून अवघे ऋषीगण दर्शनासाठी गोळा झाले. कृष्ण गरुडावरुन पायउतार झाल्यावर सर्वांनी त्याच्या चरणी पाने-फळे-फुले इ. वाहून आपला भाव व्यक्त केला. त्यांचा असा समज झाला की, आपण नकळत केलेल्या अपराधाबद्दल शासन करण्यासाठीच कृष्ण इथे आला आहे, पण त्याचा हेतू कळताच त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सर्वांचा पाहुणचार स्वीकारल्यावर कृष्ण आश्रमाचे अवलोकन करण्यास निघाला. त्याने एक परिसर निश्चित करून एका शिलाखंडावर पद्मासन घातले व ध्यानधारणेसाठी नेत्रकमळे मिटणार तोच त्याला अस्वस्थ वाटू लागले. कारण त्याच्या कानांवर हिंस्त्र पशुपक्ष्यांचा व माणसांच्या किंचाळण्याचा आवाज आला. हा कसला ध्वनी? या कोलाहलातही माझेच स्तवन मला ऐकू येत आहे, असा विचार त्याच्या मनात येतो न येतो तोच पुष्कळ माणसे वन्य पशुंसह येत असलेली दिसली. त्यांच्या हातांत पेटत्या मशाली-पलिते व भाले, कुर्हाडी, परशु इ. शस्त्रे होती. मशालींच्या उजेडात त्याला रक्तमांस भक्षण करणारी पिशाच्चेसुद्धा दिसली. पशुपक्षी आणि लहान अर्भकांसह रक्तबंबाळ झालेल्या स्त्रियाही होत्या. हे सर्व तो नवलाने पाहत होता. त्या घोळक्यातून रक्तपिपासू व विकृत असलेली हिडीस स्वरूपाची दोन पिशाच्चे कृष्णासमोर येऊन काही अंतरावर थांबली. अगम्य भाषेत किंचाळू व बरळू लागली. बरळतानाही त्यांचे उदरभरणाचे यज्ञकर्म चालूच होते. सतत खाणारी ती भूते कृश दिसत होती. अमंगल वागणार्यांच्या मुखी मात्र कृष्णस्तुती होती. कृष्णाचा धावा होता, पण समोर बसलेली सुंदर व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळी दिसते आहे व ती कोण आहे याचा विचार करायचे कष्टही त्यांनी घेतले नव्हते. फक्त ओंगळ बिभत्स योनीतून मुक्ती मिळावी म्हणून ते कृष्णनामाचा जप करत होते.
श्रीकृष्ण तेजस्वी दिसत असूनही एक सामान्य मानव समजून ते विचारते झाले, ‘‘महाभागा, या गहन अरण्यात तू कशाला आला आहेस? इथे येण्याचे धाडस फक्त विष्णूत आहे. त्या परमात्म्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, तो तू नव्हेस? यम, वरुण, कुबेर यांपैकी तू कोण आहेस? या आमच्या शंकांचे निरसन कर.’’ त्यावर तो अनन्य भगवान स्मित करून म्हणाला, ‘‘यदुवंशांत उत्पन्न झालेला मी एक क्षत्रिय असून दुर्जनांचे निर्दालन करणे हे माझे व्रत आहे. भगवान रुद्राला प्रसन्न करण्यासाठी मी आलो आहे. पण तुम्ही कोण आहात? कारण या क्षेत्रांत पापी व अमंगळ यांना प्रवेश नाही. शिकार करणे, मांस भक्षण करणे याला इथे मनाई आहे. या शांत पवित्र तपोभूमीत तुम्ही कसे व का आलात? इथून त्वरित निघून जा. अन्यथा मला बंदोबस्त करावा लागेल.’’
कृष्णाच्या सामोपचाराच्या पण हुकमी बोलण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. ते सर्व मिळून कृष्णालाच वाटेल ते बोलू लागले. एक म्हणाला, ‘‘अरे, मी महाभयंकर व विकृत असा घंटाकर्ण नामक भूत आहे. दुसरा मृत्यूच अशी माझी ख्याती आहे. या सर्व पशुसमूहाचा मी स्वामी असून मी या माझ्या कनिष्ठ बंधूसह कैलासाहून इथे आलो आहे. पूर्वी मी विष्णूला नावे ठेवत असे. त्याचे अभद्र नाव कानांवर पडू नये म्हणून मी कानांवरच घंटा बांधल्या. त्यामुळे त्याचे नाव कुणी उच्चारले तर कानांत न शिरता घंटांवर आपटून परावर्तीत होत असे. शंकराकडे मी मुक्ती मागितली पण त्याने त्या नतद्रष्ट विष्णूला शरण जाण्यास सांगितले. नाईलाज म्हणून मी पश्चिम सागरातील कृष्णाच्या द्वारकानगरीत चाललो आहे. आम्ही कोठे जावे, काय खावे-प्यावे आणि काय परिधान करावे हे सांगणारा तू कोण रे? तूच इथून जा.’’
असे म्हणून ते भूत कृष्णासमोर बसले व त्याला खिजवू लागले. भावालाही बळजबरीने जवळ बसवून ध्यानस्थ बसण्याचा व्यर्थ प्रयत्न तो करू लागला. हळूहळू विष्णूनामाची लय साधली व त्याच्या ओंगळ मुखातून श्रवणीय अशी विष्णूची नामावली येऊ लागली. आजपर्यंत विष्णूने घेतलेले अवतार स्मरून त्यानुसार तो नावे घेऊ लागला. समोर बसलेल्या तथाकथित ‘क्षुद्र मानवाची’ दखल न घेता तो श्यामजपांत मग्न झाला. कृष्णाला त्याचे नवल व कौतुक वाटले. वास्तविक भूतपिशाच्चे ईश्वराच्या नामापासून दूरच असतात, पण हे भूत अपवादच म्हणावे लागेल. मुक्तीसाठी वेडा झालेल्या घंटाकर्णाचे कृष्णाने दिव्यदृष्टीने पापपुण्य पाहिले. तेव्हा निंद्य कर्म करतानाही हरीनेच प्रेरणा दिली हा भाव त्याचा असल्याचे कृष्णाला दिसले. कृष्णाने त्याची उत्सुकता जास्त ताणली नाही. तो शिलाखंडावरून उतरला. हळूवार स्पर्शाने त्याने दोघांना नामसमाधीतून जागे केले. गरुडावर आरूढ झालेल्या, वस्त्र प्रावरणांनी नखशिखांत नटलेल्या व शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणार्या साक्षात विष्णूला पाहून ते पिशाच्यबंधू भोवळ येऊन जमीनदोस्त होण्याचेच बाकी होते. त्या द्वारकाधिशाने द्वारकेत नव्हे तर बदरीक्षेत्री घंटाकर्णाला दर्शनाचा लाभ दिला. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊन दोघे बंधू साश्रु नयनांनी ते दैवी रूप मनात साठवू लागले. नृत्यगायन करू लागले. आपल्या जवळच्या भाल्याला खोचून ठेवलेल्या विप्राच्या शवाचे लचके तोडून त्यांनी हरीला नैवेद्य दाखवला. स्वूकारण्याची विनंती केली पण मांसासारखा तेही विप्राचे मांस विष्णू कसा बरं स्वूकारणार? कृष्णाने नकार देऊन त्यांची समजूत घातली, पण त्यांच्या अंतरीचा भाव पाहून त्याला कृष्णाने पाप मुक्त केले. त्याबरोबर दोघांचे रूप-वेश पालटले. स्वरूप कांतीमान झाले. विष्णूने दोघांच्या मस्तकी वरदहस्त ठेवला व म्हटले, “घंटाकर्णा, तुम्ही दोघे बंधू स्वर्गात वास कराल, तुला अजून काय हवे? मी तुजवर प्रसन्न आहे. घंटाकर्ण सद्गदीत स्वरांत म्हणाला, ‘‘प्रभो, माझे मागचे अपराध विसरून जा. माझे चित्त तुझ्या ठायी जडो’’. दोघांनी विष्णूला साष्टांग प्रणिपात केला. दिव्य देह धारण करून दोघे स्वर्गात गेले.
त्यानंतर श्रीकृष्ण कैलासावर गेला. तिथे हंसानं प्रिय असलेले मानस नामक सरोवर विविध कमळांनी व भ्रमरांनी अच्छादलेले आहे. गंगायमुनादी नद्यांचा जनक हिमालय नानाविध वृक्षवेलींनी समृद्ध होता. साक्षात रुद्र पत्नी पार्वतीसह श्वशुरगृहीच वास्तव्याला असल्याने देव-यक्ष सतत तिथे येत होते. पशुपक्ष्यांची अनेक कुळे तिथे वास करत होती. गुंफा कंदरांतून सिद्धचारण वास करत होते. इथेच शिवाने ब्रह्माचे पाचवे शिर तोडले. अशा त्या प्रदेशात आल्यावर कृष्णाने गरुडाला थांबण्याचा संकेत केला व तो गरुडावरुन पायउतार झाला.
त्याने त्याच ठिकाणी तप करण्याचे ठरवले व पर्ण भक्षण करून साधना सुरू केली. तो फाल्गुन मासाचा आरंभ होता. यज्ञकुंड तयार करून गरुडाने होमासाठी समिधा गोळा केल्या. सुदर्शन चक्राने गंधपुष्पे आणली. शंखाने रक्षणाची जबाबदारी स्वीकारली व गदा व शारंगधनु मनुष्यरूपाने सेवेसाठी उभे ठाकले. खङगाने (तरवारीने) दर्भ आणले. मंदाकीनीने स्वतः अक्षय जलकुंभ आणून दिला. साधनेला हवनाने सुरुवात केली. महिन्यातून एकदाच भोजन घेण्याचा कृष्णाने परिपाठ ठेवला. नंतर वर्षातून एकदा. अशा रीतीने कसलेही विघ्न न येता बारा वर्षे पूर्ण होण्यास एक मास शिल्लक राहिला. तपाचे प्रखर तेजाचे वलय कृष्णाभोवती निर्माण झाले. त्याच्या तपश्चर्येची ख्याती एव्हाना स्वर्गापर्यंत पोहोचली होती. यम, वरुण, इंद्र, ब्रहमादीदेव नारदमुनींसह कैलासावर आले. बारा आदित्य, अष्ट वसु, एकूण पन्नास रुद्र व थोर ऋषी वर्गही आपल्या लाडक्या देवाच्या दर्शनार्थ कैलासावर आला. यक्ष-किन्नर व अप्सरा मग कशा मागे राहतील? त्याही आल्या. ज्याची आराधना समस्थ सृष्टीने व देवांनीही करावी असा कृष्ण जर स्वतः तपस्या करीत आहे त्याला काही खास कारण असावे असे मनांत येऊन देवदेवेश्वर वृषभध्वज उमादेवीसह कृष्णाला दर्शन देता झाला. कर्पुर गौर शिवापुढे सावळा श्रीकृष्ण नतमस्तक झाला. हरीहराची भेट पाहून अप्सरा नाचू लागल्या. यक्ष गाऊ लागले. शिवाने श्रीकृष्णला उठवून अलिंगन दिले व म्हटले, ‘‘गरुडध्वजा, वर माग.’’ कृष्णाने शंकरपार्वतीला रुक्मिणीची इच्छा सांगितली असता शिव म्हणाले, ‘‘कृतयुगांत मी तपश्चर्या करत असता हिमालयाने माझ्या इच्छेविरुद्ध आपली सुलक्षणी कन्या पार्वती हिचा विवाह माझ्याशी करून दिला. माझ्या तपात विघ्न आणण्यास इंद्राने मदनाला नियुक्त केले, तेव्हा मदनाने वसंतऋतूच्या मदतीने मजवर पुष्पधनूतून पाच फुलांचे बाण मारले. उद्देश हाच की जेणे करून मी पार्वतीशी विवाह करण्यास राजी व्हावे परंतु तपांत विघ्न आणले म्हणून मी क्रोधाने तृतीय नेत्र उघडून मदनाला दग्ध केले. तोच मदन प्रद्युम्नच्या रूपांत तुला मी केव्हाच दिला आहे. रुक्मिणीचा तो प्रथम पुत्र आहे.’’ असे म्हणून शंकराने प्रभु विष्णूची स्तुती करून उपस्थितांना त्याची पुजा करण्यास सांगितले व देवी पार्वतीसह तो गुप्त झाला. तत्पूर्वी श्रीकृष्णाला ‘‘तुझा पळवून नेलेला पहिला पुत्र प्रद्युम्न लवकरच प्राप्त होईल’’ असा आशीर्वाद दिला.
श्रीकृष्ण व रुक्मिणीच्या विवाहानंतर लौकरच त्यांच्या संसारवेलीवर पहिले पुष्प पुत्राच्या रूपाने आले. पण पुत्र सहा दिवसांचा असतानाच शंबरासुराने स्त्रीचे रूप घेऊन त्याला सुतिकागृहांतून पळवून नेले. इतका बंदोबस्त असतानाही कृष्णाचे लहान बाळ पळवावे ही नामुष्कीचीच बाब होती. सारी नगरी हादरली, पण श्रीकृष्ण सागरतळासारखा शांत राहिला. योग्य समयी तो सुखरूप परतेल एवढेच तो म्हणाला. त्यालाही पंधरा सोळा-वर्षे उलटून गेली. त्यावेळी पहिल्या अपत्याचे नाव प्रद्युम्न ठेवायचे असे उभयता पती-पत्नीने ठरवले होते, पण नामकरण संस्कारच झाला नाही. प्रद्युम्नचा अर्थ तेजोमय सूर्य. याच्या हातून मृत्यू असल्याने शंबरासुरानेच त्याला पळवून समुद्रात भिरकावले. त्या अर्भकाला महाकाय माशाने गिळले. दैवयोगाने तोच मासा कोळ्यांनी शंबरासुराच्या आचार्याला विकत आणून आपल्या मदतनीस बाईला दिला. तो चिरताच त्यातून पुत्र बाहेर आला व ती स्त्री पूर्वजन्मीची रती असल्याने तिने त्याला राक्षसापासून दडवून ठेवले. माशाच्या पोटातून बाहेर आलेल्या अर्भकाचे तरुणांत रूपांतर झाले व त्याने त्या स्त्रीच्या म्हणजेच मायावती नामक रतीच्या मदतीने शंबरासुराला ठार केले. विधिलिखित टळत नाही हेच खरे. नंतर प्रद्युम्न मायावती तथा रतीसह द्वारकेत आला व त्याने रुक्मिणीमातेला पुत्रप्राप्तीचा आनंद दिला.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment