अजूनकाही
निमशहरी भागातील पार्श्वभूमी आणि मध्यवर्ती पात्रांच्या निमित्तानं सदर भागातील मानसिकतेचं सार्थ चित्रण करत, भोवतालातील निरीक्षणं अचूकरित्या टिपत एक कन्व्हिन्सिंग कथानक समोर उभं करण्यासाठी प्रसिद्ध असलेली दिग्दर्शक आनंद एल. राय आणि लेखक हिमांशु शर्मा ही जोडी ‘झीरो’च्या निमित्तानं एक महत्त्वाकांक्षी चित्रपट समोर घेऊन येते. महत्त्वाकांक्षी यासाठी की, ‘झीरो’मध्ये अनेक गोष्टी परिणामकारक, तर इतर बऱ्याचशा अपरिणामकारक ठरताना दिसून येतात. काहीशा हास्यास्पद दृश्यानंतर एखादं अॅब्सर्डरित्या जादुई दृश्य समोर येत राहतं. पारंपरिक भारतीय चित्रपटांहून वेगळं काहीतरी करू पाहण्याची महत्त्वाकांक्षा समोर दिसत राहते. तिला बऱ्याचदा मूर्त स्वरूपही मिळतं. पण मग पुन्हा काहीतरी बिनसतं, पुन्हा काहीतरी जादुई घडतं. आणि हे चक्र भरपूर लांबीच्या या चित्रपटभर सुरू राहतं.
मेरठमधील कुठल्याशा गल्लीच्या पार्श्वभूमीवर ओल्ड स्कूल वेस्टर्न चित्रपटातील दृश्यात काऊबॉय बऊआ सिंग (शाहरुख खान) त्याच्या वडिलांच्या, अशोक (तिग्मांशु धुलिया) तावडीतून कुणा स्त्रीची सुटका करण्याच्या स्वप्नाच्या आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या दृश्याच्या निमित्तानं बऊआ आणि त्याच्या एकूणच कुटुंबाची ओळख होते. बऊआ उद्धट, मनमौजी आहे, कुणाचीही पर्वा न करणारा आहे. बापाच्या पैशावर मौज करत, डझनभर लोकांना आपल्या आवडत्या हिरोईनचा, बबिता कुमारीचा (कतरीना कैफ) चित्रपट दाखवायला घेऊन जाणारा, तिची स्वप्नं पाहणारा आहे. एकूणच तो इतर कुठल्याही सामान्य बॉलिवुड फॅनसारखा आहे.
काहीशा अनपेक्षितपणेच का होईना, पण तो आफियाच्या (अनुष्का शर्मा) प्रेमात पडतो. तिच्याकडून प्रत्युत्तरासाठी आवश्यक असलेली स्टॉकिंग करून झाल्यावर तीही त्याच्या प्रेमात पडते. वरवर पाहता काहीशी पारंपरिक वाटणारी ही गोष्ट त्या दोघांच्या मानसिकतेचा विचार करता स्वाभाविक आहे. आपल्या उंचीमुळे लोकांच्या कुतूहल-कम-उपहासाचा केंद्रबिंदू असलेल्या, गालावरील खळीमुळे मोहक वाटणाऱ्या, वैचित्र्यपूर्ण आणि ऑफेन्सिव्हरित्या विनोदी असलेल्या ऑब्नॉक्शिअस बऊआला आफियाच्या निमित्तानं पहिल्यांदाच कुणीतरी भेटतं, जे या सगळ्या बाबींना आणि स्वतः बऊआलाही शून्य लेखत त्याकडे दुर्लक्ष करतं. अशा वेळी मग त्यानं तिचं प्रेम मिळवण्यासाठी केलेली धडपड ही त्याच्या एरवीच्या आत्मप्रौढी कृतींसारखी वाटत नाही. इथं खोटा आविर्भाव दिसत नाही. आफियालादेखील तिच्या सर्व काही छान असलेल्या, कायम सहानुभूतीपूर्ण नजरा अनुभवलेल्या आयुष्यात बऊआच्या रूपात पहिल्यांदाच तिच्याकडे सहानुभूतीपूर्वक नजरेनं न पाहणारा कुणीतरी मिळतो. हे दोघंही काहीसे सारखे आहेत. दोघांचं जग आणि समस्यादि गोष्टी वेगळ्या असल्या तरीही.
त्यामुळे हे दोघं एकत्र येतात, तेव्हा वैचित्र्यपूर्ण विनोदाचं सहसा मुख्य प्रवाहातील चित्रपटांत दिसून न येणारं रूप समोर येतं. ती याच्या गालावरील खळी आणि फिल्मी आविर्भावात बोलण्याची खिल्ली उडवते, हा तिच्या स्वतःच्या कामगिरीबद्दल बढाया मारण्याची खिल्ली उडवतो. पारंपरिक हिंदी-इंग्रजी प्रेमकथा असलेले चित्रपट पाहणाऱ्या कुणालाही चीजी वाटेल, पण हे दोघंही एकमेकांना पूर्ण करतात. परिणामी अजय-अतुलचं स्वर्गीय, जादुई भासणारं संगीत लाभलेल्या इर्शाद कामिलच्या ‘मेरे नाम तू’च्या निमित्तानं दोघांमधील अव्यक्त भावनांना मूर्त स्वरूप लाभतं. ‘झीरो’ तूर्तास तरी शाहरुखच्या शैलीत हात पसरून ‘हिरो’ बनतो.
बऱ्याच गोष्टी घडतात. जादुई आणि वैचित्र्यपूर्ण प्रवास बाजूला पडून बऊआ आणि बबिता कुमारीचा मार्ग एकत्र येतो. एरवी कधीही इतकी प्रभावी न वाटलेली कतरीना कैफची दमदारपणे साकारलेली बबिता चित्रपटातील सबटेक्स्टला नवीन आयाम प्राप्त करून देते. यानंतरही अनेक गोष्टी घडत राहतात. एकामागून एक दृश्यं समोर येत राहतात आणि अभूतपूर्व पूर्वार्धानंतर काहीशा लांबलेल्या, एकसंध उत्तरार्धाला सुरुवात होते. एरवीही हिमांशु शर्माची पटकथा सदोष असते. त्यातील दृश्यं एकसंधपणा नसल्यानं तुकड्या-तुकड्यांत चांगली वाटत राहतात. इथं मात्र या गोष्टी एरवीपेक्षा अधिक खटकतात, काहीशा कमकुवत उत्तरार्धात बऱ्याच अतर्क्य घटनांची लागते आणि सुरुवातीला तयार झालेला जादुई अनुभव हरवत जातो. परिणामी राय-शर्मा जोडीच्या महत्त्वाकांक्षेचं अस्तित्व जाणवत असलं, तरी ते तितक्या समर्पकरित्या समोर उभं राहत नाही.
‘झीरो’ हा संमिश्र भावना निर्माण करणारा, चांगल्या अर्थानं वैचित्र्यपूर्ण चित्रपट आहे. त्यावर नायकाच्या फिल्मी आणि बॉलिवुडवर प्रेम असणाऱ्या व्यक्त्तिमत्त्वामुळे ‘ओम शांती ओम’ किंवा तत्सम चित्रपट, दिग्दर्शक-लेखकाच्या जोडीच्या चित्रपटांची असलेली नशा जाणवत राहते. खान ते कैफपर्यंत प्रभावी ठरणाऱ्या अनेक गोष्टी दिसून येतात. मग त्यापाठोपाठ उत्तम संवाद लाभलेला, पण नायकाचा साथीदार या वर्णनावर खऱ्या उतरणाऱ्या आत्म्याचा अभाव असलेला मोहम्मद झीशान अयुबही येतो. हॉटेलच्या लॉबीमध्ये रंगांची उधळण आणि नितांतसुंदर चित्रण यामुळे मनात रेंगाळणाऱ्या गाण्याचं संगीत जेव्हा उत्तरार्धात नकोशा ठिकाणी वाजतं, तेव्हा ते खटकतं. थोडक्यात, प्रत्येक चांगल्या अनुभूती देणाऱ्या गोष्टीपाठोपाठ काहीतरी उणीव असलेली बाब समोर येत राहते. ‘झीरो’ वाईट ठरत नाही, पण तो उत्तमही ठरत नाही. तो उत्तम होऊ शकला असता याची जाणीव मात्र मनात उरते.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment